Sunday, November 23, 2014
Saturday, November 1, 2014
माझे संगीत व साहित्य क्षेत्र ~ सुधाकर कदम
माझे संगीत व साहित्य क्षेत्र
~ सुधाकर कदम
भाग ४
---------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
लोकमत (अकोला) मधील ’दिंडी’ सदरातील प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत यांचा लेख...(२०१२)
गझलगंधर्व सुधाकर कदमांची काट्यांची मखमल :
तारीख १६ जानेवारी २०१२.
मुंबईचे पु.ल.देशपांडे सभागृह.एका मराठी गझल अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांच्या भेटी झाल्या.सर्वजण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज.‘काट्यांची मखमल’असे काव्यात्म शीर्षक असलेला हा अल्बम म्हणजे मराठी गझलविश्वातला अनोखा आविष्कार.एक सुरमयी माईलस्टोन.गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्या लेखणीतून उतरलेल्या नाविण्यपूर्ण कल्पना मांडणार्या शब्दांनी ह्या गझला अभिव्यक्त झाल्या आहेत. आणि ह्या गझलांना त्या शब्दांना लाभलेल्या गझलगंधर्व सुधाकर यांच्या दीर्घकाळच्या चिंतनातून तयार झालेल्या स्वररचना म्हणजे सोन्याला सुगंध.एरवी चकाकतं ते सर्व सोनं नसतं हा आपला नेहमीचा अनुभव.त्याची एक झलक-"तू हासलीस की ,सगळ्या काट्यांची मखमल होते!तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ होते!"ही गझलांची हिरवळ कानातून मनात उतरत जाते ती सुरेश वाडकरांच्या मखमली स्वरातून.खूप दिवसांनी एव्हढ्या गोड चाली ऐकल्या आणि कान तृप्त झाले. संगीत ही साधना आहे असं जे म्हटल्या जातं ते काही खोटं नाही.नाही तर प्रख्यात गझलकार दुष्यंतकुमार म्हणतातचना-कैसे मंज़र सामने आने लगे हैं गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने सादर केलेल्या "काट्यांची मखमल" या मराठी गझलच्या अल्बमच्या प्रकाशन प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी असेच उद्गार काढले.ते म्हणतात-"काट्यांची मखमल..." ही जलेबी,चमेलीच्या जमान्यातील एक सुरेल स्वरयात्रा अहे.या अल्बममध्ये वेगवेगळ्या ’मूड्स"च्या ९ गझला आहेत.सुरेश वाडकर आणि वैशाली माडेंच्या स्वरातल्या"तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते...","येता येता गेला पाऊस..." आणि "जीवनाचा खेळ रंगाया हवा..." या गझलांमधून वेगवेगळे भावदर्शन घडते.वाडकरांच्या आवाजात "कळेना कसा हा जगावेगळा मी..." ही सुफियाना ढंगाची आणि "गाऊ नये कुणीही रात्री अशी विराणी..."ही खास गझलीयत दाखविणारी गझल आहे.दुसरीकडे वैशालीच्या आवाजातील "किती सावरावे,कसे सावरावे...",दूर गेल्या फुलांतल्या वाटा..." आणि ’हसू उमटले दुःख भोगता गंमत आहे..."या तीन ’मूड’च्या तीन गझला आहेत.याबद्दल बोलताना सारेगमपची ही महागायिका म्हणाली,"इतक्या सुरेल आणि आशयपुर्ण गझला मला सुरेशजींसोबत गायला मिळाल्या हे मी माझे भाग्य समजते आणि याचे सारे श्रेय गझलगंधर्वांना जाते". "धांगडधिंगा गाण्याकडे मी लक्ष देत नाही.मलासुरेल गाणी आवडतात.या अल्बममधील गाणी ऐकत राहावीत अशी आहेत.गझलांचे लिखाण ताकदवर आहेतच, त्याला पूरक स्वररचना असून सुरेशजींच्या आणि वैशालीच्या आवाजाची साथ लाभल्यामुळे हा अल्बम श्रवणीय झाला आहे.”असे मनोगत अशोक पत्की यांनी केले. ह्या गझला गाताना मिळालेलं समाधान सुरेश वाडकरांनी पुढील शब्दात मांडले-.." हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे की जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील कारण या गझलांच्या बांदिशींमध्ये संगीतकार गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी आपला आत्मा ओतला असून,वैशाली माडे,दिलीप पांढरपट्टे यांचेसोबत काम करताना मला खूप आनंद मिळाला.याचे कारण असे की,फार मोठ्या कालावधीनंतर इतके सुरेल (मेलोडिअस) गाणे मला गायला मिळाले.मला खात्री आहे की हा अल्बम रसिकांना निश्चितच आवडेल". आपले मनोगत व्यक्त करताना सुधाकर कदम म्हणाले,"संगीत म्हणजे केवळ तंत्र नसून ती अंतर्मनातून स्फुरीत होणारी एक शक्ती असून ते इश्वर प्राप्तीचे साधन आहे.मात्र त्यासाठी तपश्चर्या करणे आवश्यक असते,तसेच गझल हा काव्यप्रकार इतर गीत प्रकाराहून वेगळा असल्यामुळे त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या सुरावटी तयार कराव्या लागतात..." आता तुम्ही म्हणाल की हे गझलगंधर्व आहेत तरी कोण? तर तुमचं काही चुकलं नाही.हा मराठी गझलगायनाच्या इतिहासातील एक महत्वाची कारकीर्द गाजवणारा कलावंत होय. तो आहे आद्य मराठी गझलगायक गझलगंधर्व सुधाकर कदम.हा गझलगायक-संगीतकार `आपल्याच मस्तीत मी जाई पुढे मात्र बाजारू कवाडे लागती’ अशा खास वैदर्भीय वाणा-गुणाचा आहे. विदर्भपुत्र सुरेश भटांच्या रूपाने जशी अस्सल मराठी गझल महाराष्ट्राला मिळाली आणि मराठी कवितेचा समृद्घ प्रवाह अधिक श्रीमंत झाला, तसाच मराठी गझल गायकीचा उगम विदर्भात होणे अपरिहार्य होते.आद्य मराठी गझलगायक होण्याचा मान यवतमाळ येथे दि. १३ नोव्हें. १९४९ रोजी जन्मलेल्या गझलगंधर्व सुधाकर कदम यांचेकडे जातो. ‘गझल गंधर्व कदम’ ह्या अग्रलेखात जेष्ठ संपादक अनंतराव दीक्षित ह्यांनी केलेली नोंद ह्या संदर्भात महत्त्वाची आहे. ते लिहितात, ‘गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे. अशी गावी मराठी गझल या स्वरूपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत. गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्त्व असते. सांगितिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे. त्यामागे त्यांचे चिंतन आहे.’ त्यांनी बांधलेल्या गझलांच्या चालीवर फिदा होऊन ‘महाराष्ट्राचे मेहंदी हसन’ म्हणून सुरेश भटांनी त्यांना गौरविले आहे. सुरेश भटांचा मुक्काम आर्णीत बरेचदा सुधाकर कदम यांचेकडे असायचा. आर्णीत सुधाकर कदम ह्यांचेकडे मुक्कामी असताना सुरेश भटांनी दि. ९-९-१९८१ ला ‘ही कहाणी तुझ्याच न्हाण्याची’ आणि दि. १२-९-१९८१ ला ‘हा चंद्र ही रात फिरायासाठी’ तसेच ‘उजाड वैराण वाळवंटी खळाळणारा झरा मुहम्मद’ ही नात लिहिल्याची नोंद आहे. सुधाकर कदमांच्या गझलगायकीचा आदर्श महाराष्ट्रापुढे ठेवण्यासाठी ‘अशी गावी मराठी गझल’ हे मैफलीचे शीर्षक जसे सुरेश भटांनी दिले तसेच अनेक मैफलींचे निवेदन सुरेश भटांनी स्वत: केले आहे.तीन तासांची ही मैफिल केवळ मराठी गझलांची असायची. आजकालच्या मैफिलींसारखी उर्दू-हिन्दी गझलांची व्यावसायिक पेरणी तिच्यात नसायची. १५ जुलै १९८२ ला पुण्याच्या म.सा.प. मध्ये झालेल्या ‘अशी गावी मराठी गझल’ ह्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आणि त्यांच्या आवाजातील गझल गायनाची बहुतांश ध्वनिमुद्रणे आणि निवडक व्हिडिओ रसिक अभ्यासकांसाठी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ह्या निमंत्रण पत्रिकेत सुधाकर कदमांचा उल्लेख गझल ‘गझलनवाज’ म्हणून करण्यात आलेला आहे. १९८३ साली ‘भरारी’ शीर्षकाची त्यांची ध्वनिफीत प्रसिद्घ झाली. ज्यात सुरेश भट, उ. रा. गिरी, श्रीकृष्ण राऊत, अनिल कांबळे, सतिश डुंबरे ह्यांच्या गझला आहेत. सुरेश भट आणि सुधाकर कदम ह्यांनी एकत्र वणी-नागपूर-मानवत-देगलूर-औरंगाबाद-इचलकरंजी-कोल्हापुर-पुणे असा महाराष्ट्रभर दौरा केला होता. कोल्हापुरच्या त्यांच्या एका मैफलीचे निवेदन डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी ह्यांनी केले होते.आर्णी या आडवळणाच्या गावी संगीत शिक्षकाची नोकरी करीत असलेल्या सुधाकर कदमांना दूरदर्शन आणि मुंबई -पुण्याची इतर प्रसिद्धी माध्यमे ह्यांचा लाभ होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मराठी गझलगायकीचे योगदान १९८१ नंतर जन्माला आलेल्या आजच्या तरुण पिढीला ठाऊक नसावे ह्यात काहीच आश्चर्य नाही. पाठीच्या दुखण्यामुळे १९९७ नंतर त्यांच्या जाहीर मैफली कायमच्या थांबल्या. सुधाकर कदमांच्या ह्या योगदानाची यथोचित दखल घेऊन दि. १५ मार्च, २००९ रोजी गझल अभ्यासक डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी,प्रख्यात सिनेदिग्दर्शक राजदत्त आणि पुणे विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरु नरेन्द्र जाधव ह्यांच्या उपस्थितीत त्यांना आद्य मराठी गझलगायक म्हणून ‘गझलगंधर्व’ ह्या उपाधीने सन्मानित करण्यात आले.मराठी गझल-गायकीच्या रूपाने गझलगंधर्व सुधाकर कदमांनी लावलेल्या ह्या ‘इवल्याशा रोपाचा’ वेलू नंतर विदर्भातल्याच गझलनवाज भीमराव पांचाळे ह्यांनी ‘गगनावेरी’ नेल्याचा अलिकडचा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे.ह्या दोन गझलनवाजांच्या नंतरच्या पिढीमध्ये विदर्भाचे डॉ. राजेश उमाळे, दिनेश अर्जुना, मदन काजळे, विजय गटलेवार ही तरूण मंडळी मराठी गझल गायकीच्या क्षेत्रामध्ये नव्या दमाने पुढे येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी शुभेच्छांची फुले घेऊन महाराष्ट्र उभा आहे.
प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊतशंकर नगर,जठारपेठअकोला (महाराष्ट्र)22 जनवरी 2012
"सुधाकर कदमांनी ’काट्यांची मखमल’ या अल्बमद्वारे खर्या अर्थाने काट्यांची मखमल करून रसिकांना तृप्त करण्याचे काम केले आहे..."
-कवी-संगीतकार यशवंत देव -
"बर्याच कालावधीनंतर इतकी सुरेल गाणी मी गात आहे,यात सर्व काही आले..."
-सुरेश वाडकर -
"मलोडी हा माझा ’विक पॉईंट’ आहे.’काट्यांची मखमल मधील सर्वच गझला मेलोडिअस आहेत.तसेच सुधाकरजींनी वैशालीकडून खूप छान गाऊन घेतले..."
-संगीतकार अशोक पत्की -
"सुरेशजीं (वाडकर) सोबत सर्वप्रथम गाण्याची संधी सुधाकरजींनी (कदम) मला देऊन माझे एक स्वप्न पूर्ण केले...त्याबद्दल काय बोलावे कळत नाही..."
-वैशाली माडे -