Showing posts with label marathi kavita. Show all posts
Showing posts with label marathi kavita. Show all posts

Saturday, February 11, 2017

बीज अंकुरे

बीज अंकुरे, अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ?

बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ

अंकुराचे होता रोप, होई रोपट्याचे झाड
मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड
निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात

नाही झाला महावृक्ष, जरी नसे कल्पतरू
फुला-फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू
क्षणभरी विसावेल वाटसरू सावलीत
~ मधुकर आरकडे
#बालभारती #मराठी #कविता

Friday, February 5, 2016

सोबती सख्या रे तू असा



सोबती सख्या रे तू असा
विहरतो नभी पक्षी जसा...

तू दिशा तू माझे पंख तू ..
प्रीत तू सुखाचा आरसा ..

गुंतली तुझ्या नादात मी ..
धुंद दे जरी तू राजसा रे

ऊन पावसाळी
तू सावळा कवडसा

बावरी अशी मी
तू पाहुणा ऋतूचा

बदलता रंग तू
मनी स्वछंद तू
सख्या रेशमी सुराचा गंध रे तू...

- गजर चित्रपट गीत

Monday, September 21, 2015

दुष्काळ



दुष्काळाच्या झळा संपता संपेना
कर्जाचा बोजा काय कमी होईना

ह्यातही घोटाळ्यावर खापर
नेत्यांचा नुसता दिखावा सुरु

शब्द फार आणि कामाची नुसती बोंब त्यांची फक्त
दुष्काळात होरपळून शेतकऱ्यांचे  जीव गेले किती

नेत्याचं नुसतं जखमेवर मीठ चोळणं उरलं
आश्वासनांचा नुसता पाऊस

येथे खेळ खंडोबा चाले
पाणी मात्र उद्योग धंद्यान साठी मिळे
चारा छावणी नाव फक्त
जिथे आसरा घेतात गुरं आणि माणसं

तरीही त्यातही घोटाळे तोंड वर करून बोले
दुष्काळाच्या झळा संपता संपेना


~ विद्या पालकर 

Thursday, December 4, 2014

सुर्योदय

सुर्योदय

रात्र संपली !
सूर्य उगवला ,पहाट झाली!


पक्ष्यांची किलबिल

अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी बसले,

वातावरण कसे ताजे तवाने झाले !
सूर्य किरणे झाडाच्या आडोश्याने पसरु लागली ,
सूर्योदय झाला!अन नवा दिवस उगवला !!

~ विद्या 

Thursday, July 10, 2014

Friday, June 27, 2014

परछाई




जेव्हा बुलंद करणे जमले स्वतःस नाही
परछाई मी स्वतःची करतो बुलंद आहे

क्षितिजाशी सुर्य जाता परछाई होत मोठी
पण हाय दो क्षणांनी जाते पुसून आहे

जाता दिव्यासमीप होतेच तीही मोठी
जवळीक जास्त करता चटकाच येत आहे

परछाई होय परकी मग कोण होय जवळी
आशा कुणाकुणाची मी बाळगून आहे
~ नाम
fb@ https://www.facebook.com/naamagumjaayegaa
Blog ~ http://marathikavyanama.blogspot.com

Tuesday, June 24, 2014

जीवन




जीवन

मरगळलेले शब्द नसावे
सळसळणारे गीत असो
नफ़ा फ़ायदा सोडून देऊन
कळवळणारी प्रीत असो

विलक्षणावर प्रेम असावे
ऐरे गैरे साथ नसो
जिवंत उत्साहात मरावे
कोमेजून शंभरी नको

सदा सजन आकाश दिसावे
पंखावर काजळी नको
भुषण येवो दूषण येवो
मार्गावर कुंपणे नको

जाईन आज किंवा मी उद्या
उरेल ना काही माघारी
पण जे जगलो क्षणभर त्याचा
किंचित पश्चात्ताप नको



- नाम गुम जायेगा
उर्फ सुनील सामंत
https://www.facebook.com/naamagumjaayegaa

Thursday, April 10, 2014

चेहरा

चेहरा
-----------

चेहऱ्यावरी चेहरा
न जाणे त्यावर किती मुखवटे

विश्वास अविश्वासाच्या
साऱ्या खुणाचं भासती

कधी हास्यामागे
आक्रंदने लपवती

खळी खुलताच
चेहरे नटती

कधी अभिनयाचे पाढे दिसती
कधी नाटकांचे प्रयोग रंगती

डोळे मात्र बोलके
अंतरीचे भाव सांगती …

~ विद्या 

Friday, March 22, 2013

तू सावली




तू सावली माझ्या जीवनाची ..
तू श्वास माझ्या अंतरीचे ..

कधी अश्रू बनून ओघळणारी तू..
तरीही सदा जवळ वाटणारी तू ..

जीवनात रंग भरुनी जाणारी तू ..
नवी स्वप्ने दाखवणारी तू ..

काळाच्या आघातात हरवलेली तू ...
मात्र मनाच्या कुपीत सदा दडवलेली तू...
- विद्या 
*आईच्या स्मरणार्थ मी लिहिलेली कविता *

Sunday, February 17, 2013

बघ माझी आठवण येते का?

मुसळधार पाऊस खिडकित उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक ,
बघ माझी आठवण येते का ?

वारयाने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो ,
नाहीच जाणवल काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच,
पाण्यात पाय बुडवून उभी रहा, वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे,
चालत रहा पाऊस थांबेपर्यत,
तो थांबणार नाहीच, शेवटी घरी ये,
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नवर्याची वाट बघत,
बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल,
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल,
तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचा कारण,
तू म्हणं घर गळतयं, मग चहा कर, तूही घे ,
तो उठून पंकज उधास लावेल, तू तो बंद कर,
किशोरीच सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं,
विजांचा कडकडाट होईल, ढ़गांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ,
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर ,
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर ,
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
-सौमित्र

Saturday, February 16, 2013

सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात



सुरकुतलेले गाल, अन थरथरणारे हात,
खोल गेलेले डोळे अन पडून गेलेले दात!
पण पाठीवर हात ठेवता, मिटते सारी काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

आजीच्या हाताची चव लय लय भारी,
पोट भरेपर्यंत मग ती स्वःता मला चारी!
हॉटेल मधल्या पिझ्झाला तिची चव नाही,
भूक लागल्यावर चारायला आता ती नाही!

आईच अन आजीच मात्र कधीच पटत नाही,
एकदातरी भांडल्याशिवाय दिवस जात नाही!
बाबांनी ओरडल्यावर मात्र आई रडत बसते,
तेव्हा मात्र स्वःता हि तिचे डोळे पुसते!

आजीची माझ्या गोधडी सतरा ठिकाणी फाटलेली,
तरीसुद्धा मायेने ओतप्रोत भरलेली!
बेडवरच्या गादीवर झोप मला येत नाही!
पाणावलेले डोळे मग गोधडी तुझी शोधत राही!

आजीचा माझ्या जीव सगळ्या तिच्या लेकरांवर,
गोठ्यामधली गाई अन कोंबडीच्या पिल्लावर!
सगळ्यांचीच नेहमी करत बसणार काळजी,
लाडक्या या नाताची, लाडकी माझी आजी!

माझ्यावर माझी आजी जीवापाड प्रेम करायची,
शब्द पडण्यापूर्वीच इच्छा पूर्ण करायची!
त्या दिवशी मात्र तिन माझ ऐकलं नाही,
हाका मारून रडलो तरी साद दिली नाही!

रडून रडून नंतर डोळे गेले थकून,
आजी माझी गेली आयुष्यातून निघून!
लाडक्या तिच्या नाताला एकटच माग सोडून,
आजी माझी गेली देवाकडे निघून!

देवाने अस का केल मला माहिती आहे,
माझ्याइतकाच तोसुद्धा प्रेमाचा भुकेला आहे!
ए देवा, आजीला माझ्या नेहमी सुखात ठेवायचं,
पुढच्या जन्मीसुद्धा तिलाच तू पाठवायचं!
-अनामिक 

Friday, February 1, 2013

बालपण खरच छान असतं

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं

बालपण खरच छान असतं .....

आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं

बालपण खरच छान असतं .....

-श्रीकांत राजेंद्रकुमार देशमाने !!

Thursday, February 23, 2012

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो

मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
दूर जरी तू तिथे हितगुज मी साधतो

अंतरीची ओळख सखी पाउल इथे रेंगाळते
मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो

तू तिथे तृप्तीचे श्वास घ्यावेत
... ... अन त्या श्वासांनीही इथे मी तृप्त व्हावे

आयुष्याची वाटचाल एकटयानेच चालायची असते
हा विचार करायलाही मला सोबत तुझी हवी असते

आपले कुणीतरी असावे थोडेसे गालात हसणारे
रडल्यावरही रागावणारे आणि नकळत डोळे पुसणारे

तुझे आश्वासक डोळे खूप दिलासा देऊन जातात
तुझ्या पाउलवाटेवरहि मी तुझा सोबती आहे

हे खरे खरे सांगून जातात...
-अनामिक

Saturday, February 18, 2012

मामा तुझं गाव



मामा तुझं गाव..
लहानपणी फार तर फार माझ्या मामाचं पत्र हरवायचं
दिवस बदलत गेले आणि आता मामाचं गावच हरवलंय
इथे शेजारीच राहतो माझा मामा
आणि अलीकडे पलीकडे अश्या दोन मावश्या
एवढी जवळ प्रेमाची नाती आली आणि
तेवढीच दूर त्याची गोडी गेली

लहानपणी आठवतंय,
मामाचं गाव सोडून जाताना
त्याच्या अंगणातला छोटा दगड खिशात घेतलेला
उर भरून आठवण आली की डोळे भरून साठवायला

त्याची छोटी पोरं, केलेली मजा.. त्या दगडात दिसायची
कडी, कोयंडे घासताना तुझ्या बागेतल्या झोपाळ्याचा आवाज यायचा
आणि आठवण काढताना कधी कधी मुद्दाम वाजवायचा

खरं सांगू मामा,
खूप खूप आठवण यायची तुझी
जेव्हा मैलोनमैल लांब होतास
आणि आज जेव्हा चार हातांवर आहेस तर ती आस नाही
आठवड्यातून एकदा भेटायचा पण त्रास नाही

दुराव्यातला गोडवा तो हाच का
उगाच आलास इतक्या जवळ तू मग
लांब असतानाच्या तुझ्या आठवणी त्रास द्यायच्या
पण तुझ्या आठवणींनी दिवस रंगवून द्यायच्या
अगदी त्या रंग भरायच्या पुस्तकासारख्या...!!!!
-अनामिक

Thursday, February 16, 2012

वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे



वाटते मला मी पण वारा बनूनी फिरावे
तुझ्या नाजूक चेहऱ्यावरती स्मिथ हास्य फुलवावे.

करताच स्पर्श तुझ्या अंगी रोमांच उभा राहावा
तुझ्या गुलाबी ओठांचा हळूच स्पर्श व्हावा.

देण्यास आलिंगन हात तुझे पुढे यावेत
आनंदाचे क्षण मिठ्ठीत तुझ्या घालवावेत.

हळूहळू मिठ्ठी तुझी सैल होताना
अश्रू येतात डोळ्यात मी दूर जाताना.

घडेल का असे आवचित कधीतरी
बनूनी वारा मी फिरावे तुझ्या संगती...!!! ♥
- अनामिक

Saturday, March 13, 2010



मराठी कविता


करु वाटे खरे तर तुला एक फोन
यावा वाटे खरे तर तुझा एक फोन
असे काही होत नाही मग उगाचच
याला कर फोन कधी त्याला कर फोन


फोन तुझा सदा चालू कधी बंद नाही
आणि त्याला तारेचाही आता बंध नाही
पक्षापरी निरोपांची हवेतून ये-जा
हातातून तो ही परी झेपावत नाही
हातामध्ये फोन तरी प्रश्ण एवढाच
बोलायचे काय आणि बोलणार कोण


कसा बघ फोन माझा गावोगाव फ़िरे
हातातल्या हातामध्ये एकटाच झुरे
ह्रदयात साठवल्या काही जुन्या खुणा
टाकवेना फोन बाई जरी झाला जुना
पुन्हा पुन्हा करतो मी बटणाशी चाळा
पुन्हा पुन्हा बदलतो रींगरचा टोन !


खिडकीत साधुनिया सिग्नलचा कोन
कसे कसे किती किती बोलायचा फोन!
आता कसा उगामुगा वरवर बोले
जिभेवर जसे काही त्याच्या वारे गेले !
गोड गोड बोलायला एकटा मी पुरे
भाडायला तरी सखे लागतात ना दोन !

मराठी कविता

मावळत्या पहिल्या किरणाचा आनंद मी
पानावर शांत पहुडणारा दवबिन्दु मी
सागराशी नाळ जोडणार्‍या नदीचे समिप्य मी
किनार्‍यावर आदळणार्‍या लाटेचा आवेग मी
पावसाच्या थेंबाकरिता आतुरलेला चातक मी
स्वार्थी जगातील 
उरलेली माणुसकी मी



मराठी कविता


आले आकंठ भरून
दिवेलावणीचे सल
पायातल्या सावल्यांची
नाही लागली चाहूल...


थेंब थेंब वेचणारा
हात असावा हाताशी
जिवाभावाच्या भेटीची
जशी तहान तळाशी...


एक डोळयातली वाट
एक अंगाच्या गावाची
क्रौंचवधाला किनार
वेधवंती विभ्रमाची...
कोणी पाहण्याच्या आधी
वाटे झाकावेत डोळे
आपल्याच नजरेला
दिसे डोळयातले काळे...


जागता हे अंगामध्ये
गाणे जुनेच नव्याने
माझ्या एकतारी पोटी
किती अव्यक्त तराणे...