Friday, October 9, 2026

*नानाच्या गावाला जाऊ या...* #पुरुषोत्तमबेर्डे

*नानाच्या गावाला जाऊ या...* 
 #पुरुषोत्तमबेर्डे
 
अलीकडे नानाला कधीमधी फोन केला की नानाकडून एकच उत्तर असायचे..  शेतावर आहे..  
नानाचे शेत, म्हणजे नानाची वाडी.. आणि त्या वाडीत पसरलेले विविधांगी शेत..  त्यात मळे तर आहेतच,  वाफे आहेत...  छान सुंदर रस्ते आहेत..  एक तलाव आहे..  त्यात मासे बदके सोडलेली आहेत, जवळच विहीर आहे, फळाफुलांनी बहरलेली  झाडें आहेत,  सुशोभित खुराडे आहेत, त्यात कोंबड्या आहेत. प्रशस्त आणि सुसज्ज गोठे आहेत,  त्यात गाई गुरे आहेत,  खिल्लारी  उंचीपुरी बैलजोडी आहे,  त्यांच्यासाठी बैलगाडी आहे. त्या बैलगाडीच्या जोखडाच्या पुढच्या टोकावर ' नानाची वाडी ' चा डिझाईन केलेला  सिम्बॉल आहे.  जणू काय मर्सिडीजच आहे.  तितक्याच डौलाने तो सिम्बॉल तिथे विराजमान आहे. 
स्वतःच्या गाड्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी पार्किंग शेड्स आहेत..  

हे सर्व झालं शेताचं..  
त्यात एक टुमदार बंगला आहे.  त्याची बांधणी अप्रतिम आहे.  वाडाच  जणू...  अत्यंत मोजक्या पण कलात्मक ऐवजानी सजवलेला बंगला ...  त्याला लागून एक अद्ययावत अशी जीम... 
असायलाच हवी ना ? 
पहाटे पाचलाच तिथली मशिनरी खणखणीत आवाजात जागी होते मालकाच्या हस्तक्षेपाने...  
या शेताचे प्रवेशद्वार भक्कम किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे आहे. तिथे २४ तासाच्या ड्युटीवर कोणी वाचमन नाही... तर त्या शेतात फिरत असतात मालकाच्या जिव्हाळ्याचे पाचेक कुत्रे.. विना परवानगी आत घुसणाऱ्याची वर्दी त्यांच्या डरकाळ्यानी  आतल्या मालका पर्यंत जाते... मग आतून मालकाचा त्याही पेक्षा मोठ्या आवाजात आदेश जातो..  
'ए ssss  येऊ दे त्यांना आत.... ' तेव्हा ते पंचवॉचमन शांत होतात... 

रात्री अपरात्री चोरीच्या उद्देशाने कोणी आत  शिरलाच तर जिवंत बाहेर पडेल याची गॅरंटी नाही.  शिवाय मालकाकडे परवानाधारक लांब पल्ल्याच्या बंदुका आहेत ते वेगळेच...  
हे सर्व सिंहगडाच्या पायथ्याशी आहे...  आणि याचा मालक हि सिंहगडाच्या पायथ्याला शोभेल असाच आहे..  त्याचं  नाव नाना पाटेकर...  

दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्यात बरच साम्य आढळतं.  रांगडेपणा आणि मातीशी असलेलं नातं.  याची सांगड प्रत्यक्ष जीवनात दोघांनीही जबरदस्त घालून ठेवलेली आहे.  जसे आहोत तसे दाखवायला दोघांच्याही आड त्यांचा सुपरस्टार असल्याचा स्टारडम येतं नाही.  अलीकडच्या काळात  तुम्ही राजनीकांतना पाहिलं असेल...  गेलेले केस, दाढी वाढलेली...  सफेद झब्बा,   लुंगी हा प्रादेशिक लिबाज,  रजनीकांत याच वेशात तुम्हाला कुठेही दिसेल.  नानाच्याही अंगावर असेच काहीतरी प्रादेशिक दिसेल... मराठमोळा लेहंगा,  गुडघ्यापर्यंत पायघोळ झब्बा....  त्याला समोर दोन फ्लिपवाले खिसे..  एकात स्केच पेन वगैरे..  आणि एकात चष्मा वगैरे. शेतात असताना  हातात पांढरा स्वच्छ नॅपकिन अथवा उपरणं.  नाना हॉलिवूडमध्ये असो, बॉलिवूडमध्ये असो, ... अलीकडे तो सगळीकडे असाच दिसेल...  
ड्रायव्हर नाही,  मेकपमन नाही,  छत्री धरायला बॉय नाही. तारखा बुक करायला मॅनेजर नाही. नाना पाटेकर.. म्हणजे वन मॅन इंडस्ट्री..  
'नाना..  तू तुझा स्टारडम कसा मॅनेज करतोस?'  
'म्हणजे? '
'गर्दीचा त्रास होत नाही... ? '
'छे रे..  कोणी पुढेच येतं नाही...  प्रेमाने आलं तर गळाभेट, अंगावर आलं तर  देतो एक ठेवून...'  
नानाने त्याच्या स्टाईल ने उत्तर दिलं..  

खरंय..  नानाच्या एकूण प्रथम दर्शनी व्यक्तिमत्वाचा हाच दरारा आहे.  व्यक्तिमत्वात इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक परिपक्वता आलेली आहे. नाहीतर एखादंदुसऱ्या सिनेमांत हिट झालेल्या स्टार लोकांचे तोरे बघा...  नसलेल्या गर्दीला खेचून घेण्याची स्पर्धा असतें.....  
या उलट नाना...  
'पुर्ष्या ...  कामाठीपुरा बघूया जाऊन... ' 
'चालेल..  कधी जाऊ या? '
'उद्या सकाळी ११ वाजता...  दादरला जिप्सीत भेटू..'  
एका मित्राच्या ड्रायव्हरला गाडीसकट बोलवून घेतले...  छोटीच गाडी होती...  लोकेशन वर कळू नये म्हणून...  मी,  नानाचा मुलगा मल्हार,  तो ड्रायव्हर आणि नाना..  असे चौघेच निघालो..  मल्हारच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं.. कामाठीपुरा सारख्या भर गर्दीत नाना खाली उतरला,  तर पुरेशी सिक्युरिटी सुद्धा नाही....   पण नाना भायखळा,  कामाठीपुरा,  खेतवाडी,  गिरगावात चांगलाच रमला होता. गोलपिठ्या जवळच्या गोलदेवळाच्या बाजूच्या गल्लींत काही वर्षे नानाचे बालपण गेले होते. त्याच वयाचा होऊन नाना एकेक बारकावे दाखवत होता...  फार दिखावा न करता,  खाली न उतरता,  शांतपणे तो विभाग आम्ही फिरून आलो...  
मधला बराच काळ लोटला होता...  नानावर त्या विभागाचे झालेले संस्कार त्याच्या अनेक भूमिकांतून पुढे कधी कधी डोकावले...  त्याच्या गाजलेल्या भूमिकांमधून कुठे न कुठेतरी त्या संस्कारांची रग दिसून येतेच.  
आजही नानाने आपल्या सिनेमांत काम करावं  म्हणून निर्माते धडपडतात ....  पण त्यांना नानाच्या अनेक परीक्षेला तोंड द्यावे लागतं.. .  तेव्हा कुठे त्यांना नाना मिळतो ..  नानाला घेऊन एखादं प्रोजेक्ट  करायचे म्हणजे शिवधनुष्यच...  नाना त्यात इतका घुसतो की समोरचा अवाक होऊन जातो...  तो त्यासाठी त्याचा वेळ घेतो...  समोरच्याला वाटतं .. हा करेल की नाही?  की उगाच वेळ काढतोय?..  
पण एवढा किस काढल्या नंतर लोकांच्या समोर येतं ते 'अब  तक छपन्न ' सारखं काही तरी भन्नाट.. 
तीन वर्षे नाना त्यावर घासत होता..  निर्माता हवालदिल  झाला होता...त्याचा पार्टनर राम गोपाल  वर्मा,  त्याला नानाची सवय होती...  पण निर्माता अस्वस्थ होता...  दिग्दर्शक 'शिमीत अमीन' न्यूयॉर्क रिटर्न उच्च शिक्षित...  त्याच्या डोक्यात अमेरिकन क्राईम....  आणि नाना या मातीतला...  अख्खा सिनेमा या मातीत कसा मुरेल यासाठी नाना कंबर कसून होता..  अखेर सिनेमा झाला...  दीर्घकाळ वाट पाहून जेव्हा रिलीज झाला तेव्हा निर्मात्याचे उखळ पांढरे झाले..  तुफान रिस्पॉन्स..  अगदी मुंबईतल्या रस्त्यावरचा सिनेमा..  रसिकांनी डोक्यावर घेतला..  दोन भाग निघाले त्यानंतर ...  thats  नाना....  पेशंन्स ठेवा..  नाना बरोबर काम enjoy करा....     

जे जे इन्स्टिट्यूट ऑफ  अप्लाइड आर्ट मध्ये आमच्या तीनएक वर्ष पुढे होता नाना.  

कॉलेज मधल्या निवडणुकीत आपल्या सहकाऱ्यांबरोबर छोटी छोटी भाषणे करुन धमाल उडवणारा नाना,  कॉलेज संपताच आपल्यातल्या कमर्शिअल आर्टिस्टला  व्यवसायासाठी काही स्कोप मिळतो का,  याच्या प्रयत्नात होता.  पण बोलण्यावरची हुकूमत,  विचारांमधला  पक्केपणा आणि रांगडं रुपडं या भांडवलावर हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीकडे ओढला गेला.  आविष्कारच्या नाटकांमधून दिसू लागला...  आणि एके दिवशी..... 

 *पहिला ब्रेक* 

विजय तेंडुलकर यांच्या 'पाहिजे जातिचे ' या नाटकात नानाचे  कास्टिंग झाले बबन्याच्या भूमिकेसाठी...  दिग्दर्शक अरविंद देशपांडे यांनी त्याच्यावर विशेष काम करुन नाना मधला तो बेफिकीर आणि द्वाड तरुण,  जो वरवर बघीतल गेलं तर जमीनदार बापाच्या धाकतला,  पण बाहेर त्याला न जुमानता बेदरकारपणे वावरणारा बबन्या, तुफान लोकप्रियता मिळवत गेला....  
रंगमंच अक्षरशः कवेत घेउ शकेल असे नाना मध्ये गुण अनेक दिग्दर्शकानं दिसू लागले. आणि व्यावसायिक रंगभूमी नानाला खुणावू लागली.  विजयाबाई मेहता यांच्या सारख्या  दिग्दर्शिकेचे संस्कार नाना  वर झाले आणि हमीदाबाईची कोठी,  महासागर,  पुरुष सारखी नाटके नानाच्या कारकिर्दीला पक्की दिशा देऊ लागली.  

 *दुसरा ब्रेक* 

'पुरुष ' मधल्या गुलाबराव या पुढाऱ्याच्या स्त्रीलंपट पण धूर्त आणि बेरकी व्यक्तिरेखेने नाना नाट्यरसिकांच्या गळ्यातला ताईत  झाला.  अफाट लोकप्रिय गर्दीत 'पुरुष'  नाटक  पहिले जाऊ लागले. 
या नाटकाने नानाला मराठी आणि हिंदी चित्रपटाचे दरवाजे उघडून दिले...  

 *तिसरा ब्रेक* 

एन. चंद्रा या तरुण मराठी दिग्दर्शकाने नवीन नटांची फौज घेऊन त्यात एका अस्वस्थ मराठी तरुणाच्या भूमिकेत नाना पाटेकरला घेऊन ‘ अंकुश ‘ हा हिंदी सिनेमा केला, सर्वांनी या सिनेमासाठी अपार कष्ट केले आणि परिणामी हा कमी बजेटचा हिंदी सिनेमा त्यातल्या लाव्हारसयुक्त विचारांमुळे प्रचंड यशस्वी झाला त्यातूनच  मराठी व्यतिरिक्त इतर हिंदी भाषिक दिग्दर्शकांना  नानातले अनेक गुण दिसले. 

आणि एके दिवशी हिंदी सिनेमाला,  एक थंड डोक्याचा,  पण गरम विचारांचा तिरसट आणि खुनशी असा लोभस 'अन्ना ' सापडला...  परिंदा  सिनेमातला 'अन्ना '... 
त्यानंतर मात्र नाना पाटेकर हे नाव भारतीय चित्रपट विश्वात चर्चिले जाऊ लागले.  

यापूर्वी थंडपणे निर्घृण कत्तली करत फिरणारा गब्बरसिंग लोकांनी पहिला होता..  त्याला डोक्यावर घेतले होते...  तरीही तो  दऱ्याखोऱ्यात वाढलेला,  घोड्यावरून फिरणारा डाकूच होता. सहसा जनसामान्यांच्यात न वावरणारा..  पण तुमच्या आमच्यातला एक थंड डोक्याचा अत्यंत हुशार खलपुरुष एकदा नाही दोनदा... म्हणजे 'पुरुष' नाटकात एकदा आणि दुसऱ्यांदा 'परिंदा' मध्ये.  सहज पटेल असा,  सहजासहजी मुंगी मारावी तसा वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा खात्मा करणारा सो कॉल्ड  व्हिलन नानाच्या रूपाने पडद्यावर वावरला...  इतका परिणामकारक की प्रत्यक्ष नानाच्या आईने त्याला निक्षून सांगितले, की ही असली काम करुन मोठ्या दिमाखात माझ्या  पाया  पडायला येणार अशील तर येऊ नकोस, हाकलून देईन...  

नानाची आई हा नानाचा सर्वात मोठा गुरु,  सहकारी,  मैत्रीण आणि सर्व काही...  तिने त्याला दिलेले एकेक शिक्षणाचे बाळकडू,  नानाला आयुष्यभर पुरले. आईचा शब्द नाना साठी अंतिम. कारण त्या आईने काढलेल्या आपल्या मुलांसाठीच्या खस्ता नानाला बरच काही शिकवून गेल्या होत्या.  नानाच्या आईचे माहेर म्हणजे जणू गॉडफादर मधली कॉर्लीऑन फॅमिली. मन्या  सुर्वे हा नानाचा मामेभाऊ. या सर्व भावंडांचा आपल्या गरम डोक्याच्या लेकावर परिणाम होऊ नये म्हणून या माउलीने नानाला त्यांच्या पासून लांब ठेवले. त्याच्या शिक्षणात रस घेतला. शिकवले.  

वरवर नास्तिक वाटणारा नाना केवळ आईला दिलेल्या शब्दाखातर दरवर्षी घरात येणाऱ्या गणपतीबाप्पाची मनोभावे सेवा व पूजा करीत असे. स्वतः फुलांची आरास तयार करुन त्या मखरात मोठ्या डौलात बाप्पा विराजमान होत. पारंपरिक वेशात  आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका नानाच्या उपस्थितीत होतं.  हे सर्व नाना त्याच्या आईला दिलेल्या शब्दाखातर करीत असे. 
 
 *ब्रेक के बाद...* 

मधुर पाण्याचे झरे जसे खडकाळ ओढ्यातून वाहतात तसें नानाचे आहे.  हा रांगडा पहाडी व्यक्तिमत्वाचा खडकाळ माणूस  आतून प्रेम भावनेने ओथंबलेला आहे. हे त्याचे सामाजिक कार्य  बघितले की लक्षात येते. बाबा आमटे यांच्या पासून ते अगदी अलीकडच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देण्यापर्यंत नाना तन,  मन आणि धन  यांच्यासह  हिरीरीने उतरतो. आपल्या उत्पन्नातला खूप मोठा भाग या कार्यासाठी वापरण्याची धमक नाना मध्ये आहे...  

तीच गोष्ट  मला रजनीकांत यांच्या मध्येही दिसते. अशी माणसं मग लोकांच्या गळ्यातला ताईत होऊन फिरतात त्याचे आश्चर्य वाटायला नको. 
अगदी आमच्यात सहजपणे वावरणारा नाना,  गेल्या तीस चाळिस वर्षात कधी लार्जर दॅन  लाईफ झाला कळलेच नाही. नानाने जितके सिनेमे केले त्याच्या दुप्पट तिप्पट त्याने नाकारले. न आवडलेली कुठलीच गोष्ट दयेपोटी नानाने केल्याचे जाणवत नाही.  ज्या  मूळ स्वभावावर,  म्हणजे पंजाब्यांची हाजी हाजी करणे,  उठता बसता सलाम ठोकणे आणि कामे मिळवत राहणे,  हे सर्व करण्याची वेळ नानावर कधी आलीच नाही. उलट शब्दांचे फटकारे आणि सडेतोड उत्तरे देऊन प्रसंगी हातघाईवर येऊन समोरच्याचे बिनडोक विचार जमीनदोस्त करण्याचा बुलडोझर घेऊनच नाना हिंदी सिनेसृष्टीत वाववराला. अनेक आरोप झाले,  प्रकारणे झाली,  पण नानाच्या कर्तृत्वाला खिंडार पडले नाही. ते बुलन्दच राहिले. 
एखादी गोष्ट आवडली की मनापासून दाद देण्याची वृत्ती मात्र नाना मध्ये आजही दिसून येते. 

अलीकडे मी ‘क्लोज एनकौन्टर’ या माझ्या कथा संग्रहातील एकेक कथा लिहून झाली की सर्व मित्रांना पाठवीत असे. त्यात नाना अग्रक्रमाने होता. कथा वाचून झाली की नानाची प्रतिक्रिया येत असे. ‘छान... ‘ उत्तम’ ...एवढेच त्यात असे. पण तेवढीही पुरेशी असे. त्यातच सर्वकाही असे.  या पुस्तकाच्या प्रकाशनाला नाना उपस्थित राहिला आणि त्याच्याच हस्ते प्रकाशन झाले... इतकेच नव्हे तर यातल्या एका कथेवर एखादी कलाकृती सादर करण्याची व त्यात भूमिका करण्याची घोषणाही नानाने  केली. 

  परंपरेच्या जोखडाखाली नाना कधी अडकलेला दिसला नाही... पण संस्कृती जपायची वेळी आली की नाना पुढे असतो. आईच्या रूपात तो या भारतमातेलाही पाहतो.  

प्रहार चित्रपटातल्या कमांडोच्या भूमिकेसाठी नाना प्रत्यक्ष कमांडोचे शिक्षण घ्यायला मिलिटरीत दाखल झाला. इतकेच नाही तर कारगिलच्या युद्धात खास परवानगी मिळवून प्रत्यक्ष सहभाग घेतला.  कारगिलच्या बर्फाळ माथ्यावर भारतीय सैनिकाच्या खांद्याला खांदा  लावून लढला. मुंबईच्या दंगलीत पोलिसांबरोबर लोकाना शांततेचे आवाहन करीत उघड्या जीप मधून फिरला. क्रांतीवीर सिनेमात टाळ्या घेणारा नाना केवळ ‘ ये हिंदुका खून, ये मुसलमानका खून ‘ म्हणून गप्प नाही बसला...प्रत्यक्ष  त्या विचारांच्या परीक्षेलाही उतरला. 
हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अफाट यशाच्या जोरावर ग्लॅमरस  आयुष्य एखाद्या आलिशान बंगल्यात घालवणे नानाला सहज शक्य होते..  पण अगदी कारकिर्दीच्या ऐन भरात बाबा आमटे,  यांच्यासारख्या महात्म्याचे संस्कार नानावर होतात..  आणि विचारांची दिशाच बदलल्याचे जाणवते..  

 एकेकाळी एखादा मित्र भेटला की त्याच्यावर प्रेमाने शारीरिक अटॅक करुन  नाना त्याला घुसळून काढायचा..  त्याला शिव्यांची लाखोली वाहून मग प्रेमाने आपुलकीने त्याची चौकशी करायचा..  आज त्या सर्व घुसमुसळेपणाची जागा आदरातिथ्याने घेतलीय...  इथेही त्याच्या आईचेच संस्कार...  
वेब सिरीज च्या निर्मितीच्या चर्चेसाठी कधी लोखंडवाला तरी कधी शेतावर,  तर  कधी पुण्याच्या घरात..  नाना बोलावत असे..  पण एकदाही हॉटेलातून जेवण मागवले नाही. स्वतः किचन मध्ये उभा राहून त्याच्या हाताने जेवण करून वाढणे यात त्याला अथक आनंद मिळतो...  फोडणी देता देता आपली चर्चा सुरु असते..  तशात नाना प्रत्येक  पदार्थाचे महत्व सांगून ते डायट किती उपयोगाचे हेही सांगत असतो...  

'पुर्ष्या..  घावण (मराठी डोसा ) खाल्ले असशीलच ना?  त्यात हे असे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि बारीक अद्रक पेरले आणि जर दाताखाली आले तर मज्जाच येते...  '

सराईतपणे नानाने तव्यावर घावण टाकलेले असतें..  त्यानंतर दुसऱ्या बाजूला सांडग्याची भाजी...  तिचे  महत्व सांगत नाना बरोबर जेवण...  सोबत मग एखादी नुकतीच वाचलेली कविता...  त्याचं रसग्रहण... किंवा एखाद्या सिनेमात दिग्दर्शकाबरोबर झालेलं कडाक्याचं भांडण आणि शेवटी त्याचा अफलातून रिझल्ट.... 

मिटिंग संपल्यावर गाडी पर्यंत सोडायला आलेला नाना साईड मिरर  मधून लांब जाताना दिसतो...  पण प्रत्यक्षात खूप जवळ आलेला असतो...  

मित्र या संकल्पनेची प्रचिती तो पर्यंत आलेली असतें..  
पडद्यावरचा ‘नाना’ व्यक्तिरेखेतला ‘नाना’... आणि प्रत्यक्षातला ‘नाना’...  

तीन  वेगळे ‘नाना’ तोपर्यंत मनाच्या पडद्यावर छापून उरलेले असतात.....

 *नानाच्या गावाला जाऊया..*    
#पुरुषोत्तमबेर्डे.

 #नानापाटेकर #LatestNews #RIP #MarathiNews #NanaPatekar #श्रद्धांजली #श्रद्धांजली

Thursday, October 1, 2026

सुभाषित २

अकृत्वा परसन्तापं अगत्वा खलानम्रताम् |
अनुसृत्य सतां वर्त्म यदल्पमपि तद्बहु ||

दुसर्‍याला त्रास न देता, दुष्टांशी लाचारी न करता जरी थोडंच [मिळालं] तरी ते पुष्कळ आहे. [नेहेमी आपले आचरण शुध्द ठेवावे मग फळ जरी थोडे कमी मिळाले तरी चालेल.]
#सुभाषित #मराठी #संस्कृत

Wednesday, September 30, 2026

सुभाषित १

संतुष्टो भार्यया भर्ता 
भर्त्रा भार्या तथैवच |
यस्मिन्नेव कुले नित्यं
कल्याणं तत्र वै ध्रुवम् ||

ज्या परिवारात (कुलात) पत्नी आपल्या पतीपासून आणि पती आपल्या पत्नीपासून नेहमी प्रसन्न राहतात त्या घरामध्ये निश्चित रुपाने नेहमी सुख,शांती व कल्याणाचा वास असतो.
#सुभाषित #मराठी #संस्कृत


संतुष्टो भार्यया भर्ता 
भर्त्रा भार्या तथैवच |
यस्मिन्नेव कुले नित्यं
कल्याणं तत्र वै ध्रुवम् ||

ज्या परिवारात (कुलात) पत्नी आपल्या पतीपासून आणि पती आपल्या पत्नीपासून नेहमी प्रसन्न राहतात त्या घरामध्ये निश्चित रुपाने नेहमी सुख,शांती व कल्याणाचा वास असतो.
#सुभाषित #मराठी #संस्कृत


यत्र विद्वद्जनो नास्ति 
तत्र शास्त्रं न विद्यते |
यत्र शास्त्रं न विद्यते 
तत्र ज्ञानं न विद्यते ||

जेथे विद्वान व्यक्ती नसतात तेथे शास्त्राचे वास्तविक ज्ञान नसते आणि जेथे शास्त्राचे ज्ञान नसते, तेथे खर्‍या ज्ञानाचा विकास होत नाही.
#सुभाषित #मराठी #संस्कृत

अपराधो न मेऽस्तीति नैतद्विश्वासकारणम्|
विद्यते हि नृशंसेभ्यो भयं गुणवतामपि||

दुष्ट माणसांच्या बाबतीत "मी काही (त्याचे) वाईट केले नाही" त्यामुळे तो (दुष्ट) छळणार नाही, अशी खात्री अगदी गुणी लोकांना सुद्धा धरता येत नाही. दुष्ट मनुष्य सर्वांना छळतोच.
#सुभाषित #मराठी #संस्कृत


अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्।
देहांते तव सान्निध्यं देहि मे परमेश्वर।।

हे परमेश्वरा! मला सहज मृत्यू, दैन्य रहीत जीवन आणि मृत्यूपश्चात तुझ्याजवळ स्थान देण्याची कृपा कर.🙏🏻
#सुभाषित #मराठी #संस्कृत


शनैः पन्थाः शनैः कन्थाः शनैः पर्वतमस्तके |
शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ||

सावकाश प्रवास करावा, हळू हळू वैराग्य धारण करावे, डोंगरमाथ्यावर थांबून थांबून जावे, क्रमाक्रमाने उजळणीसह ज्ञान मिळवावे, संयमाने व जाणीवपूर्वक धन मिळवावे.
#सुभाषित #मराठी #संस्कृत







पुढे जायचं असेल तर

पुढे जायचे असेल तर...

१. शांत राहा.
तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कृती अधिक बोलल्या पाहिजेत.
प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते. काही उत्तरं काळच देत असतो.

२. ज्यांच्यामुळे तुमची मनःशांती भंगते, त्यांच्यापासून दूर राहा.
प्रत्येकाला आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्याची गरज नसते.
काही माणसांपासून दूर जाणे म्हणजे त्यांचा पराभव नव्हे; तो आपल्या शांततेचा विजय असतो.

३. तत्त्वहीन, सवंग आणि विषाक्त लोकांशी संघर्ष करण्यात शक्ती वाया घालवू नका.
त्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी चार हात करा.
कारण परिस्थिती तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते आणि तुम्ही ज्या ताकदीने तिच्याशी लढता, त्यानुसार तुमच्या पदरात ती यशाचे दान टाकत असते.

४. स्वतःला घडवत राहा.
तुम्ही स्वतःला घडवता, हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं.
तुमची गुणवत्ता, तुमचे कर्तृत्व आणि तुमचे चारित्र्य यांच्यापुढे स्पष्टीकरणांची गरज पडत नसते. 

५. तुमच्या यशाची कहाणी स्वतः सांगत बसू नका.
ते परस्पर लोकांच्या लक्षात येऊ द्या.
नाही कळलं तरी खेद मानू नका.
कारण प्रत्येक गोष्टीचा निकाल लागण्यासाठी वेळ लागत असतो आणि काळ हा प्रत्येक कर्तृत्वाचा साक्षीदार असतो.

६. स्वतःशी प्रामाणिक राहा.
काळाच्या ओघात माणूस आपल्या बोलण्याने नव्हे, तर आपल्या कृतीतून उघड होत असतो.
म्हणून लोकांना काय वाटेल यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणाला काय उत्तर द्यायचे आहे, याचा विचार करा.

७. इतरांची प्रतिमा मलीन करण्याचा चुकूनही प्रयत्न करू नका.
असे प्रयत्न अनेकदा बूमरँगसारखे परत येतात.
दुसऱ्याला खाली खेचण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला इतके उंच उभे करा की, इतरांसाठी ती दिशा ठरेल.

८. यशस्वी माणूस केवळ पदावरून ठरत नसतो.
प्रामाणिकपणे आणि नेटकेपणाने आपली सेवा बजावणारा, प्रसंगी स्वतः अर्धपोटी राहून आपल्या अपत्यांना उच्च पदावर पोचवणारा एखाद्या कार्यालयातील एखादा शिपाई, माथाडी कामगार किंवा शेतमजूर देखील तितकाच यशस्वी माणूस असतो.

एकूण रागाला मौन द्या, हाती आलेत्या कामाला कर्म समजा, चारित्र्याला बळ द्या आणि स्वतःचं आयुष्य घडवा.
बाकीची कहाणी काळ सांगेल.


Ashok Mankar

Friday, September 18, 2026

हनुमान चालीसा

श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु, जो दायकु फल चारि।। 
बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।। 

चौपाई :

जय हनुमान ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुं लोक उजागर।।

रामदूत अतुलित बल धामा।
अंजनि-पुत्र पवनसुत नामा।।

महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।।

कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा।।
****
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
कांधे मूंज जनेऊ साजै।

संकर सुवन केसरीनंदन।
तेज प्रताप महा जग बन्दन।।

विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर।।

प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया।।
******

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा।।

भीम रूप धरि असुर संहारे।
रामचंद्र के काज संवारे।।

लाय सजीवन लखन जियाये।
श्रीरघुबीर हरषि उर लाये।।

रघुपति कीन्ही बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय भरतहि सम भाई।।
*****


सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं।।

सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा।।

जम कुबेर दिगपाल जहां ते।
कबि कोबिद कहि सके कहां ते।।

तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राज पद दीन्हा।।
******
तुम्हरो मंत्र बिभीषन माना।
लंकेस्वर भए सब जग जाना।।

जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू।।

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लांघि गये अचरज नाहीं।।

दुर्गम काज जगत के जेते।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते।।
*****
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे।।

सब सुख लहै तुम्हारी सरना।
तुम रक्षक काहू को डर ना।।

आपन तेज सम्हारो आपै।
तीनों लोक हांक तें कांपै।।

भूत पिसाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै।।
****

नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा।।

संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै।।

सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज सकल तुम साजा।

और मनोरथ जो कोई लावै।
सोइ अमित जीवन फल पावै।।
*****
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा।।

साधु-संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे।।

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन जानकी माता।।

राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा।।
***
 तुम्हरे भजन राम को पावै।
जनम-जनम के दुख बिसरावै।।

अन्तकाल रघुबर पुर जाई।
जहां जन्म हरि-भक्त कहाई।।

और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्ब सुख करई।।

संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा।।
*****

जै जै जै हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं।।

जो सत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई।।

जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा।।

तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय मंह डेरा।। 

...


पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित, हृदय बसहु सुर भूप।।

Monday, September 14, 2026

१०० वे साहित्य संमेलन■ उत्सवप्रियतेकडून वैचारिक मंथनाकडे.■

१०० वे साहित्य संमेलन
■ उत्सवप्रियतेकडून वैचारिक मंथनाकडे.■ 

************************************

दिलीप देशपांडे.

जामनेर. जि.जळगांव.

८९९९५६६९१७

dilipdeshpande24@gmail.com

************************************

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऐतिहासिक प्रांगणात होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगुल वाजला आहे. त्यासोबतच 'साहित्याचे व्यासपीठ नेमके कोणाचे आणि कशासाठी?' हा मराठी जगतातील सर्वात जुना यक्षप्रश्न पुन्हा एकदा नव्या उग्रतेने आणि अधिक तीव्रतेने समोर येतो. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांनी १४८ वर्षांपूर्वी १८७८ मध्ये ज्या ज्ञानसत्राचे पहिले बीज रोवले, त्या परंपरेचे आज शंभरावे पाऊल पडत आहे. हा केवळ एका आकड्याचा खेळ नाही, तर मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या आणि विचारविश्वाच्या प्रवासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. परंतु, आज या शतक महोत्सवी सोहळ्याकडे पाहताना आनंदापेक्षा चिंता आणि अभिमानापेक्षा आत्मपरीक्षणाची गरज अधिक भासत आहे. राज्य सरकारने या ऐतिहासिक संमेलनासाठी पाच कोटी रुपयांचा अभूतपूर्व निधी मंजूर केला असून, संमेलनापूर्वी ९९ पूर्वतयारी उपक्रम, यासाठी दहा ते बारा कोटींचा निधी उपलब्ध करून दिले असल्याचे समजते. 

( छोटेखानी संमेलने.) आणि १३ विद्यार्थी संमेलनांचे जंगी नियोजन सुरू आहे. काही ठिकाणी नांदी  संमेलनास सुरुवात झाली आहे. पण, कोट्यवधी सुजाण मराठी वाचकांच्या मनात एकच धास्ती आहे—हा सोहळा केवळ चार दिवसांचा 'सरकारी आणि राजकीय भपका' ठरणार की मराठी भाषेला पुढील शंभर वर्षांची दिशा देणारे 'वैचारिक विचारपीठ' बनणार?             

    आज मराठी साहित्याच्या दारात राजकारणी, व्ही.आय.पी. पाहुणे आणि सत्कारमूर्तींची अवाढव्य गर्दी उभी राहिलेली दिसते! व्यासपीठावर नेत्यांची गर्दी, मंत्र्यांच्या स्वागतासाठी धावणारी आयोजकांची यंत्रणा, मिनिटा-मिनिटाला शाल-श्रीफळांचा होणारा पाऊस, तासनतास चालणारे कंटाळवाणे सत्कार सोहळे आणि या सगळ्या गदारोळात व्यासपीठाच्या एका कोपऱ्यात बिचारे मान खाली घालून बसलेले खरे साहित्यिक... हे चित्र आजवर आपण प्रत्येक साहित्य संमेलनात पाहिले आहे. मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळालेल्या या सुवर्णकाळात जर साहित्याच्या पवित्र मंदिराला राजकारणाच्या आणि उथळ सत्कार संस्कृतीच्या विळख्यातून मुक्त करता आले नाही, तर हा सोहळा म्हणजे केवळ कोरडी उत्सवप्रियता ठरेल. आज वेळ आली आहे ती एका मोठ्या बदलाची—व्यासपीठावरून राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे हद्दपार करण्याची, निरर्थक सत्कार सोहळ्यांना पूर्णविराम देण्याची आणि थेट मूळ साहित्य विषयावर सडेतोड चर्चा घडवून आणण्याची. या पार्श्वभूमीवर, शंभराव्या संमेलनाचा एकसंध आकृतिबंध कसा असावा आणि महाराष्ट्राच्या सुजाण वाचकांच्या आयोजकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, याचा वेध घेणे अत्यंत गरजेचे आहे.

   राजकीय हस्तक्षेपाची सावली विरुद्ध स्वायत्त साहित्य विश्वाचा हुंकार अशी परिस्थिती आहे. गेल्या काही दशतकांत मराठी साहित्य संमेलनांना लागलेले सर्वात मोठे गालबोट म्हणजे राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप आणि व्यासपीठांवरील त्यांचे वर्चस्व. उद्घाटनापासून ते समारोपा पर्यंत राजकीय नेत्यांची उठबस, त्यांच्या अवतीभोवती फिरणारी सुरक्षा यंत्रणा आणि त्यांच्या स्वागतासाठी होणारी चढाओढ यात मूळ साहित्य आणि साहित्यिक बाजूला फेकले जातात.

वर्ध्याच्या साहित्य संमेलनात तर संमेलनाच्या अध्यक्षांना व्यासपीठापर्यंत जाण्याला अडवले गेले होते.अशी परिस्थिती का निर्माण व्हावी.?

 लोकशाहीत राजकारण अपरिहार्य असले, तरी साहित्याच्या स्वायत्त व्यासपीठावर राजकारण्यांनी केवळ 'अतिथी' म्हणून यावे, 'यजमान' म्हणून नव्हे. जेव्हा एखादे साहित्य संमेलन राजकीय नेत्यांच्या अजेंड्यानुसार चालते, तेव्हा साहित्यातील मुक्त अभिव्यक्तीला आपोआपच मर्यादा येतात. लेखकाने समाजातील विसंगतींवर, सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर आणि सामाजिक अन्यायावर बोट ठेवणे अपेक्षित असते. परंतु, जर संमेलनाची दोरीच राजकीय नेत्यांच्या हाती असेल, तर तिथून सडेतोड वैचारिक मंथन कसे होणार? शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने ही राजकारणाची सावली साहित्यावरून दूर व्हायला हवी. नेत्यांना व्यासपीठावर स्थान देण्याऐवजी त्यांना समोरील प्रेक्षकगृहात मानाचे स्थान द्यावे, आणि राजकीय नेत्यांनी रसिक म्हणून साहित्य संमेलनात कार्यक्रमाचा मोकळेपणाने आस्वाद घ्यावा. व्यासपीठ केवळ आणि केवळ सरस्वतीच्या उपासकांसाठी राखीव ठेवण्याचे धाडस पुण्यात आयोजकांनी दाखवले पाहिजे. तरच या शतक महोत्सवाचे नाविन्य दिसून येईल.

सत्कार सोहळ्यांचा अतिरेक त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो. साहित्य संमेलनांचे आणखी एक विदारक रूप म्हणजे मिनिटा-मिनिटाला होणारे सत्कार आणि शाल-श्रीफळांचा सुळसुळाट. प्रत्येक सत्राच्या सुरुवातीला स्वागत, परिचय, सत्कार आणि आभार प्रदर्शनातच अर्ध्याहून अधिक वेळ निघून जातो. ज्या मुख्य विषयावर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यासाठी वक्त्यांना शेवटी केवळ  पाच ते सात मिनिटे दिली जातात. 'वेळेअभावी घाई करावी लागत आहे' हे वाक्य प्रत्येक साहित्य संमेलनात पालुपदासारखे ऐकायला मिळते.हे साहित्य संमेलन आहे का सत्कार संमेलन ? हा प्रश्न पडावा. शंभराव्या संमेलनात ही 'सत्कार संस्कृती' पूर्णपणे मोडीत काढण्याची गरज आहे. व्यासपीठावर या औपचारिकतेचा अतिरेक टाळून तो मौल्यवान वेळ लेखकांच्या वाचनासाठी, कवींच्या कवितांसाठी आणि वक्त्यांच्या विचार मांडण्यासाठी वापरला गेला पाहिजे. वाचकांना नेत्यांचे किंवा आयोजकांचे चेहरे पाहण्यात रस नसतो, त्यांना लेखकांचे विचार ऐकायचे असतात, हे भान आता तरी ठेवले पाहिजे.

संमेलनात विद्यार्थी अन् युवकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. १०० व्या संमेलनाचे सर्वात मोठे बलस्थान ठरले पाहिजे ते म्हणजे तरुण पिढी. आजवरची संमेलने ही ज्येष्ठ नागरिकांचे किंवा निवृत्तांचे मेळावे वाटत आली आहेत. हे चित्र बदलण्याची सुवर्णसंधी पुण्यात उपलब्ध आहे, कारण पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आणि लाखो तरुणांचे आश्रयस्थान आहे. संमेलनाचे केवळ १३ औपचारिक विद्यार्थी सोहळे करून भागणार नाही, तर मुख्य संमेलनात तरुणांना निर्णायक वाटा द्यावा लागेल. आजचा युवक हा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तो सोशल मीडिया, पॉडकास्ट, ब्लॉग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून स्वतःचे साहित्यविश्व उभे करत आहे. या लिहित्या हातांना मुख्य व्यासपीठावर जागा मिळाली पाहिजे. जोपर्यंत कॉलेजचे कट्टे, विद्यापीठांचे कव्हरेज आणि तरुणांची ऊर्जा या संमेलनाला जोडली जात नाही, तोपर्यंत साहित्याचा प्रवाह जिवंत राहू शकत नाही.

मराठी केवळ संवादाची नव्हे, 'ज्ञानभाषा' होणे ही काळाची गरज आहे.मराठी भाषेला 'अभिजात' दर्जा मिळाला, हे अत्यंत भूषणावह आहे. परंतु, केवळ अभिजाततेचा टेंभा मिरवून भाषा टिकत नसते. मराठी ही आता 'ज्ञानभाषा' झाली पाहिजे, हा या १०० व्या संमेलनाचा मुख्य अजेंडा असायला हवा. ज्ञानभाषा म्हणजे काय? तर विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, कायदा आणि अर्थशास्त्र यांसारख्या आधुनिक क्षेत्रातील उच्च शिक्षण मराठीतून उपलब्ध झाले पाहिजे. आज मराठी माणूस घरात मराठी बोलतो, पण व्यवहारात आणि नोकरीत त्याला इंग्रजीचाच आश्रय घ्यावा लागतो. जोपर्यंत जागतिक स्तरावरील उच्च ज्ञान मराठीत अनुवादित होत नाही आणि मराठी ही रोजगाराची, अर्थार्जनाची भाषा बनत नाही, तोपर्यंत भाषा समृद्ध होणार नाही. संमेलनात या विषयावर केवळ भावनिक भाषणे न होता, विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची आणि तज्ज्ञांची एक विशेष कार्यशाळा घेऊन 'मराठी ज्ञानभाषा' करण्याचा ठोस कृती आराखडा जाहीर केला पाहिजे.प्रकाशकांना दालनासाठी कमी दर आकारणी करायला हवी.  वाचनसंस्कृती कोणत्याही साहित्य संमेलनाचा खरा आत्मा आहे.  तिथले 'ग्रंथ प्रदर्शन' किंवा पुस्तकांची दालने यांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांत ग्रंथदालनांचे भाडे इतके गगनाला भिडले आहे की, छोट्या आणि प्रामाणिक प्रकाशकांना संमेलनात स्टॉल लावणे अशक्य झाले आहे. अशा वेळी केवळ व्यावसायिक आणि बडे प्रकाशकच तिथे तग धरू शकतात. शंभराव्या संमेलनात ही चूक सुधारली पाहिजे. राज्य सरकारने दिलेल्या ५ कोटींच्या निधीचा वापर करून, प्रकाशकांना अत्यंत नाममात्र किंवा कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून दिले पाहिजेत. प्रकाशकांवरील आर्थिक बोजा कमी झाला, तरच ते वाचकांना मोठ्या सवलतीत पुस्तके देऊ शकतील. पुस्तके स्वस्त मिळाली, तरच सामान्य वाचक, गरीब विद्यार्थी ती खरेदी करतील. संमेलनाचा मंडप किती चकचकीत आहे यापेक्षा, ग्रंथदालनात पुस्तकांचा किती सुकाळ आहे आणि तिथे किती पुस्तकांची विक्री झाली, यावर संमेलनाचे यश मोजले गेले पाहिजे.

एकाच वेळी अनेक कार्यक्रमा मुळे रसिकांची कोंडी आणि नियोजनाचा बोजवारा साहित्य संमेलनांमधील नियोजनाचा आणखी एक मोठा त्रुटीयुक्त पैलू म्हणजे 'समांतर सत्रे' किंवा एकाच वेळी अनेक कार्यक्रम असणे. मुख्य व्यासपीठावर परिसंवाद सुरू असतो, त्याच वेळी दुसऱ्या हॉलमध्ये कथाकथन चालू असते आणि तिसऱ्या बाजूला कविकट्टा सुरू असतो. यामुळे संमेलनाला येणाऱ्या रसिकांची मोठी कोंडी होते. एखाद्या वाचकाला समकालीन कादंबरीवरची चर्चाही ऐकायची असते आणि कवींच्या कविताही ऐकायच्या असतात. मात्र, एकाच वेळी अनेक कार्यक्रम असल्यामुळे त्याला एकाच गोष्टीची निवड करावी लागते. परिणामी, रसिकांची विभागणी होते आणि गर्दी विखुरली जाते. शंभराव्या संमेलनात अशा समांतर सत्रांची संख्या मर्यादित ठेवून, प्रमुख कार्यक्रमांचे वेळापत्रक एकसंध आणि रसिकस्नेही पद्धतीने आखले पाहिजे.प्रतिसाद नसलेल्या कार्यक्रमांचा विचार व्हायला हवा.(  'काव्य कट्ट्या'चे उदाहरण ) नियोजनाचा थेट परिणाम काही विशिष्ट कार्यक्रमांवर होतो. उदाहरणार्थ, संमेलनातील 'काव्य कट्टा' किंवा काही दुय्यम परिसंवाद अशा ठिकाणी रसिकांचा प्रतिसाद अत्यंत नगण्य असतो किंवा अनेकदा तिथे शुकशुकाट पाहायला मिळतो. मुख्य व्यासपीठावरील व्ही.आय.पी. गर्दी किंवा समांतर सुरू असलेल्या प्रसिद्ध कार्यक्रमांमुळे या कट्ट्यांकडे रसिक फिरकतच नाहीत. केवळ कार्यक्रम पत्रिकेत नाव हवे किंवा काही कवींची सोय लावायची आहे, म्हणून असे कार्यक्रम रेटणे बंद केले पाहिजे. ज्या कार्यक्रमांना रसिकांचा प्रतिसाद नाही, त्याविषयी आयोजकांनी गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. अशा सत्रांचे स्वरूप बदलावे, त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडावे किंवा त्यांचे वेळेचे नियोजन बदलावे. दर्जा नसलेल्या आणि श्रोते नसलेल्या कार्यक्रमांवर वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा, कार्यक्रमांची संख्या कमी करून त्यांची गुणवत्ता वाढवण्यावर भर दिला पाहिजे. काही साहित्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संमेलनाचे अध्यक्षांना संमेलनात होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरवितांना विचारात घेतले जायला हवे. कारण माजी संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, पत्रिका समोर आल्यानंतरच मला काय कार्यक्रम आहे हे समजले. पत्रिका तयार करताना माझे मत विचारात घेतले नव्हते.

  चार दिवसांचा हा ऐतिहासिक सोहळा संपल्यानंतर जेव्हा संमेलनाची सांगता होईल, तेव्हा मराठी माणसाच्या हातात काय उरले असेल? केवळ काही गाजलेल्या भाषणांच्या क्लिप्स, मंत्र्यांचे फोटो, जेवणाची स्तुती आणि व्ही.आय.पी. पाहुण्यांचे व्हीडिओ? का मराठी भाषेच्या समृद्धीचा, तिला ज्ञानभाषा करण्याचा आणि तिच्या डिजिटलायझेशनचा एक ठोस कृती आराखडा? १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा केवळ एक उत्सव नाही, तर ती एक ऐतिहासिक जबाबदारी आहे. हे संमेलन राजकीय कुरघोडीचे मैदान बनू नये, तर वैचारिक देवाणघेवाणीचे पवित्र मंदिर बनावे. मोठ्या प्रमाणावर होणारे सत्कार टाळून, राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप नाकारून, तरुणांना सोबत घेऊन आणि प्रकाशकांना बळ देऊन जेव्हा केवळ साहित्यावर, पुस्तकांवर आणि भाषेवर सखोल चर्चा होईल, तेव्हाच या शंभराव्या संमेलनाचे सार्थक होईल. पुण्याला होणारे शतक महोत्सवी साहित्य संमेलनाकडून कडून वाचकांच्या रसिकांच्या अनेक अपेक्षा आहे. त्या पूर्ण होतील अशी आशा बाळगू या.

   पुण्याच्या विद्यापीठातील हे शतक महोत्सवी साहित्य संमेलन मराठी भाषेला पुढील शंभर वर्षांची ऊर्जा देणारे ठरो, हीच संपूर्ण मराठी जगताची आणि सुजाण वाचकांची आग्रही अपेक्षा आहे! 

■■


Saturday, September 12, 2026

गणपती येतहत वाजत गाजत

लोकसत्ता/ १२ सप्टेंबर २०२६
------
          गणपती येतहत वाजत-गाजत
                 - डॉ. महेश केळुसकर 
 ---------------------------------------------------------
              ढामच्याक ढामच्याक 
               झिनच्याक झिनच्याक 
               पावसाचा व्हाजाप 
               लागला वाजाक 
                हसत नाचत नि 
               भिजत भिजत 
              गणपती येतहत वाजत-गाजत.... 
वेताळ बांबर्डे आलं की एसटीतून उतरून रांगणा तुळसुलीपर्यंत आम्ही गणपतीला चालत जायचो. चौथी-पाचवीत होतो. चालून चालून पायांचे तुकडे पडायला यायचे. पण गणपतीची ओढ असायची. शेतवाडीतून वाट काढत डुंगलीवर पोचलो की कुकारे सुरू  व्हायचे‌. मग दादा आजोबा खळ्यात येऊन उभे राहायचे. आम्ही दिसलो की त्यांच्या चेहऱ्यावर कष्टाळू आनंद पसरायचा. चतुर्थीच्या आधल्या दिवशी गावाकडच्या त्या गावठी घरात लगबग चाललेली असायची. व्हानशेत( माजघरात )उंच माच्यावर गणपतीचा मोकळा चौरंग ठेवलेला असायचा. वर माटवी. तिला लगडलेले आंब्याचे टाळ, कवंडाळं, रानफळं, रानफुलं आणि हरणा हवीतच. खडूच्या चुन्यानं रंगवलेल्या गणपतीमागच्या भिंतीवर रंगवलेली कमळं शोभून दिसायची.उद्या येऊन गणपती पाटावर म्हणजे चौरंगावर बसणार. तब्बल पाच दिवस. तोपर्यंत 'आवारणा' चालू. आणि आवारण्याच्या दिवशी मासे हवेतच. व्हानशेमागच्या पडवीत तीन दगडांच्या चुलीतल्या दगडावरच्या टोपात बांगडे नाहीतर सौंदाळे रटरटत असायचे. आता पाच दिवस मासे खायला मिळणार नाहीत... केवढी तपश्चर्या सारस्वतांची ! अरेरे ! हाहाहा ऽ
                 अंघोळी झाल्या की आम्ही गणपतीच्या शाळेकडे कूच करायचो.ओल्या गवतावर ठेवलेले काही गरंडेल (ॲटम बॉम्ब )फुस्स फूस्स  करत विझून जायचे. एखादा विझता विझताच अचानक कुल्ल्यावरच फुटायचा. 
गणपतीच्या शाळेत हारीनं गणपती मांडून ठेवलेले असायचे. आमचा गणपती आम्ही दुरूनच ओळखायचो. आमचा मूर्तिकार एवढा कसबी होता की गणपती आपल्याकडेच बघतोय असं प्रत्येकालाच वाटत राहायचं..पाटापुढे नारळ ठेवायचा. अगरबत्तीच्या काड्या पेटवून ठेवायच्या. जाळीचा रुमाल मूर्तीच्या मस्तकावर. मूर्तिकाराला आमचे काका विचारायचे, " काय रे किती देवचे तुका?"  त्याचं दरवर्षीचं ठरावीक उत्तर- " दाजींनु , देवाचा काय कोण मोल करता ? काय ते समजान देवा ..रंगबिंग म्हाग झाले वो--"  मग काका मागल्या वर्षापेक्षा दहा-वीस रुपये अधिक करून मूर्तिकाराच्या हातात पैसे ठेवायचे.' मोरयाऽ मोरयाऽ ' चा उंच आवाजातला गजर करत गणपतीचा पाट आमच्या न्हानु गड्याच्या डोकीवर चढायचा आणि घराकडे तोंड करून गणपती चालू लागायचा, आमची पोरांची दंगामस्ती बघत..
वाटेने सारखं 'मोरया मोरया' चालू . ओसरीवर पाट ठेवला की आमची आई आणि काकी बाहेर येऊन गणपतीची दृष्ट ओवाळून टाकायच्या. मग गणपती थेट चौरंगावर थोडा तिरपा करून ठेवला जायचा.प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत आमचा दम निघायचा नाही. मोदकांचा उकडीचा हळदी दरवळ घरभर पसरलेला. आम्ही सारखे स्वयंपाक घरात चकरा मारणार. पण नैवेद्य झाल्याशिवाय कुणाची हिंमत नाही व्हायची मोदक पळवण्याची. दिवस चढतोय --दुपार झाली-- अजून भटजींचा पत्ता नाही. पोटात कावळे कोकलतायत. आमचे वडील सोवळ्याचा मुगटा नेसून तयार आहेत. आला आला ..भट आला.. "चला चला चला.."
जणु काही आम्हीच उशीर लावलाय अशी भटाची घाई .मग 'केशवाय नमः माधवाय नमः 'अशा आचमनांची लगबग. अर्ध्या तासात भट पूजा आटोपायचा. तोवर दुपारचे दोन - अडीच वाजलेले असायचे. पूजेनंतर आरती. काका हार्मोनियम काढायला बघायचे. पण आम्ही त्याआधीच जोरजोरांनं टाळ बडवत ' सुखकर्ता.. दु:खहर्ता' सुरू करायचो. आरती चालू असतानाच केळीची पानं मांडली जायची. प्राणप्रतिष्ठा झालेल्या गणपतीसमोर २१ मोदकांचं केळीचं पान.  'सुखकर्ता' झालं की डायरेक्ट 'घालीन लोटांगण..' 
मस्त जेवण झाल्यावर मंडळी घोंगड्या, चटया पसरून ताणून देणार आणि संध्याकाळी भजनकऱ्यांचे  कुकारे ऐकू येईपर्यंत घोरत राहणार. पिकलेल्या भातरोपांचा पिवळा धमक सुगंध वाऱ्यावर येत राहायचा आणि त्या गुंगीत मी झोपेतल्या झोपेत गणपतीशी काय काय बोलत रहायचो... 
अंधार पडायला लागायचा. पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांचा उजेड रानझाडांच्या फटींमधून सांडत आमच्या घराच्या दिशेनं जवळ येताना दिसायचा आणि भजनकऱ्यांच्या खांद्यावर एकमेकांना आदळणाऱ्या टाळांचे आवाज... आमचे काका भजनमंडळीचे बुवा. कारण हार्मोनियम त्यांच्या मालकीची आणि त्यांच्याशिवाय सात सुरांवरून सरसर फिरणारी दहा बोटं आणि गोड गळा उभ्या गावात कुणापाशी नव्हता. पहिलं भजन आमच्या घरी. काका पेटीवर आणि न्हानू देवळी  मृदंगावर. गण, गवळण, गजर आणि भैरवी. झालं भजन ! मग कुंबयाच्या पानांच्या खोल्यांमधून (द्रोणांमधून) काळ्या वाटाण्यांची तिखट मसालेदार गरम गरम उसळ,  नाहीतर गोड न्हेवऱ्या अर्थात करंज्या. हे भजन झालं की मंडळी गावातली भजनं करायला सुटायची. मी काकांच्या मागून लोंबकळत निघायचो.पहाटे चार-पाच वाजेपर्यंत भजनं घूमत राहायची. सूर्याची कोवळी किरणं अंगावर घेत घरी परतताना मध्येच पादण्याचे फटाके फुटत राहायचे. हा काळ्या वाटाण्यांच्या उसळीचा प्रताप असायचा.
दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी. माझी डोळ्यात फूल पडलेली (मोतीबिंदू झालेली) म्हातारी बाईआजी अळूची पानं पुढ्यात घेऊन गाठी वळायची. मी तिच्या पुढ्यात. आजीनं दरवर्षी मला गाठी वळण्याचं प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण मला ते शेवटपर्यंत जमलं नाही. अळूवड्या वेगळ्या आणि गाठी वळणं वेगळं . म्हटलं तर सोपं , पण म्हटलं तर फार अवघड काम असतं ते. आणि ऋषिपंचमीला गाठी घालून केलेली कंदमूळं खातांना चारही वेद आपणच पहिल्यांदा सांगितलेत, असा भास व्हायचा.
                  हुंदरबी दिवशी 'नव्याची'खीर व्हायची. पिकलेल्या भातामधून नवी केसरं ( लोंब्या )आणून नवा तांदूळ काढायचा. घिरटीवर भरडायचा आणि मग त्यावर्षीच्या नव्या तांदळाची गूळ घालून खीर करायची. शेतातल्या उंदरांना नेऊन ठेवायची. उंदरांनी पिकाचं नुकसान करू नये म्हणून प्रार्थना करायची. गणपतीची शपथ घालायची. श्रद्धा होती तशी दादा आजोबांसारख्या सगळ्या शेतकऱ्यांची‌. गणपतीचं वाहन उंदीर. तो प्रसन्न झाला तर गणपतीही प्रसन्न होणार. घरादाराचं भलं करणार .
           गणपतीच्या दिवसात काकांनी कुडाळहून आणलेले फटाके शेळे ( कंडम)होऊ नयेत म्हणून चुलीच्या पेढ्यावर ठेवले जायचे आणि चुकून एखादं किटाळ फटाक्यांवर पडलं की स्वयंपाक घरात फटाक्यांच्या माळा उडत राहायच्या. म्हणून आजी, आई , काक्या आम्हा पोरांवर ओरडत राहायच्या. खूप काम करायच्या बायका चतुर्थीच्या दिवसात. सारखी सारवणं आणि रांगोळ्या.चुलीवर चहाचं पातेलं तिन्ही त्रिकाळ. काही ना काही स्वयंपाक चालूच असलेला. पूजेचं साहित्य त्यांनी जमवायचं आणि अगदी गंध पण त्यांनीच उगाळून ठेवायचं. इतकं सगळं करून रोज रात्री बायका गणपतीसमोर फुगड्या कशा घालायच्या याचं मला नवल वाटत आलं. तीन तीन तास फेर धरून त्या फुगड्या घालायच्या आणि
 'यादवराया राणी रुसून कैसी गेली...' अशी गाणी म्हणत राहायच्या...
           रोज संध्याकाळी आम्ही सगळी पोरं आणि कधी घरातल्या बायका वाडीतले गणपती बघायला बाहेर पडायचो. त्यावेळी टीव्ही बिव्ही काही नव्हता. एखाद्याकडे ट्रांजिस्टर लागला तर दैवी चमत्कार वाटायचा. त्याची खोप केंबळ्याची. पण मुलगा मुंबईला हॉटेलमधे वेटर , नाही तर गिरणी कामगार. त्याचं पण मुंबईत खुटुखुटु चाललेलं. पण एखादा चाकरमानी मुंबईहून चतुर्थीला गावी येताना ट्रांझिस्टर आणायचा. त्या ट्रांझिस्टरला पट्टा असायचा. तो खांद्याला अडकवून चाकरमानी गावभर फिरायचा. सगळे आश्चर्यानं चाकरमान्याचा रुबाब बघत राहायचे... बढाया ऐकत राहायचे. 
               पाच दिवस कधी संपायचे, कळायचं नाही. रांगणातुळसुलीहून आम्ही फोंडाघाटला आणि धाकट्या काकांची मुलं कराडला परतायची वेळ यायची. मधले काका दाजी आणि त्यांचं कुटुंब गावीच होतं. गणपती विसर्जनाचा दिवस उजाडायचा. दुपारी म्हामदा म्हणजे मावंदं ! वडे आणि वाटाण्याचा सांबारा, पाच भाज्या, रायतं, कोशिंबीर,वरण-भात- तूप.. गणपतीला पंचपक्वानांनी तृप्त करून निरोप. म्हणता- म्हणता संध्याकाळ व्हायची. सकाळपासूनच पोरं कावरी-बावरी झालेली असायची. घरातल्या बायका स्वतःचीच समजूत घालत राहायच्या. कासावीशी प्राण मन तळमळी.... 
उत्तरपूजा झाली की बाप्पा आसनावरून खाली उतरायचे. " मोरयाऽ मोरयाऽ मोरयाऽ.."  डोळे झरू लागायचे...घरातल्या सवाष्णी गणपतीच्या हातावर दही घालायच्या. ओटीवर पाट ठेवला की पुन्हा दणक्यात आरती व्हायची. मग घराच्या दिशेनं गणपतीचं मुख ठेवून पुन्हा लवकर येण्याचं आश्वासन देत गणपती  वहाळाच्या दिशेनं निघायचे. आमच्या घराशेजारीच थोडा दूर शंखनिखळ पाण्याचा वहाळ (ओहळ) होता. नितळ पाणी वाहत असलेलं. आणि तो वहाळ खोल पण होता. वाडीतले पाच दिवसांचे दहा-बारा गणपती वहाळावर एकदम यायचे. प्रत्येक पाटासमोर श्रीफळ.पाटावर निरंजन. ओल्या मातीत खोचलेल्या पेटत्या अगरबत्त्या‌. देवांनी जास्तीत जास्त वेळ आपल्यात रहावं  म्हणून आरत्यांमागून आरत्या. पोरं माडाच्या झाडावर फुलबाजे फेकायची. फुलबाजे वरच्यावर अडकून, संध्याकाळच्या किरमिजी अंधारात झावळ्यांमधून पांढरीशुभ्र फुलं उडवत राहायचे. फार मजा यायची. फटाके वाजत राहायचे. आणि मंत्रपुष्पांजली झाली की सर्वांच्या कल्याणाचं एक लांबलचक गाऱ्हाणं कोणीतरी बुजुर्ग माणूस पहाडी आवाजात घालायचा. 'व्हय म्हाराजा' झालं की मग गणपतीच्या मूर्तींना वहाळात खोल पाण्यात नेऊन पाटांवरून अलगद सोडणारे तरणेबांड गडी, हळूहळू एक एक पाट उचलायचे. " मोरया..मोरया.." चा कल्लोळ उठायचा . सर्वांचेच डोळे  भिजलेले असायचे ..त्या डोळ्यांमधल्या पाण्यात पार्थिव मूर्ती विरघळत राहायच्या......
*****************************************

Tuesday, September 8, 2026

बातमी काव्यार्थ एक प्रवास ईबुक प्रकाशन सोहळा

बातमी 

काव्यार्थ : एक प्रवास संकलन : Ramdas Khare 
ई अक्षरमन प्रकाशन

Thursday, September 3, 2026

साहित्य - संस्कृती डॉ.महेश केळुसकर

पुढारी/ रविवार विशेष / ३० ऑगस्ट २०२६
--
साहित्य -  संस्कृती/ डॉ.महेश केळुसकर 
------------------
           कोकण साहित्यरत्न प्र.श्री.
          ****************************
        पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानातील आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या नेरूर या गावी १४ फेब्रुवारी १९२२ रोजी प्रभाकर श्रीधर नेरुरकर उर्फ 'प्रश्री' यांचा जन्म झाला आणि २८ जून १९९८ रोजी ते परलोकवासी झाले. ७६ वर्षांच्या आपल्या आयुष्य प्रवासामध्ये प्रश्रींचा प्रत्येक श्वास आणि ध्यास फक्त कोकण आणि कोकणच होता. सिंधुदुर्गात,'रत्नागिरीत आणि मुंबईत त्यांच्या-माझ्या अनेक गाठीभेटी झाल्या, साहित्य चर्चा झाल्या, त्यातून मला हे कळलं की प्रश्री हे कोकणच्या साहित्य आणि संस्कृतीशी कायमची नाळ जोडून असलेले आणि नवीन लेखक- कवींना सतत उमेद आणि प्रोत्साहन देणारे मोठे साहित्यिक आहेत. 
           ' मुलांचे मासिक', 'बालसन्मित्र',  ' सुमनोद्यान',  आदी नियतकालिकांमधून शालेय जीवनापासून प्रश्रींचं लेखन प्रसिद्ध होऊ लागलं. पुढे ते कथा लिहू लागले आणि त्या  'धनुर्धारी', ' हंस ',  'वसंत' मधून प्रसिद्ध होऊ लागल्या.  मराठी आणि इंग्रजी भाषांमधून त्यांनी मुक्त पत्रकारिता केली. सु. पाच दशकं सातत्यानं मराठी आणि इंग्रजी नियतलकालिकांमधून  त्यांचं समीक्षा लेखन गाजत राहिलं.  भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि गोमंतक मुक्ती लढ्यात त्यांनी भाग घेतला होता. साहित्यिकांच्या आणि विचारवंतांच्या अर्थपूर्ण मुलाखती घेण्याचा आगळावेगळा प्रयोग त्यांनी अनेक वर्षे केला. आपलं सुरुवातीचं ललित लेखन 'मौज'  सारख्या प्रतिष्ठित साप्ताहिककातून येण्यावर  त्यांनी कटाक्ष ठेवला.  आचार्य अत्रे संपादित 'दैनिक मराठा'चे गोवा सरहद्दीवरील अधिकृत वार्ताहर म्हणून त्यांनी गोमंतक मुक्ती संग्राम काळात काम केलं. नवी दिल्ली येथील 'सेंचुरी' या इंग्रजी साप्ताहिकात प्रश्रीनी मराठी साहित्य व साहित्य प्रकारांवर दहा वर्ष इंग्रजीतून लेखन केलं. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा 'सेंचुरी','लोटस' , 'टाइम्स ऑफ इंडिया' आणि अन्य परदेशी नियतकालिकांमधून इंग्रजी अनुवाद त्यांनी केला. प्रगत व दलित साहित्य चळवळीमध्ये मराठी साहित्य क्षेत्रातील १९६०ते १९८० पर्यंतच्या वाटचालीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. 
विविध विषयांमध्ये रुची असलेल्या प्रश्रींनी १९६७ साली, महाराष्ट्राचे सर्कस महर्षी नारायणराव वालावलकर यांच्या 'दि ग्रेट रॉयल सर्कस' बरोबर पूर्व आफ्रिका आणि मॉरिशस बेटावर मुक्काम केला होता.   मॉरिशस बेटावरील भारतीय जीवनावर आणि विशेषतः तिथे दीडशे वर्ष स्थायिक झालेल्या मराठी समाजाचा आणि तिथल्या प्रचलित 'मोरस' मराठी भाषेचा संशोधन पूर्व समग्र शोध घेणारं लेखन प्रश्रींनी केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी आणि कुडाळी लोकबोलीतील लोकसाहित्यावर संशोधन आणि कोकणी लोकगीतांचं सभाष्य संकलन करण्यामध्ये प्रश्रींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने त्यांचा 'कोकणी लोकगीते' हा ग्रंथ प्रकाशित केला. प्रश्रींची आणखी एक महत्त्वाची सांस्कृतिक कामगिरी म्हणजे अमेरिकेतील व आफ्रिकेतील ब्लॅक कवी आणि लेखकांच्या वाङ्मयाचा व्यापक अभ्यास तसंच 'Black Verse ' (काळी कविता) चा मराठीत विपुल अनुवाद. व्हिएतनामचे अध्यक्ष हो ची मिन्ह यांच्या इंग्रजी कवितांचा तसंच पाब्लो नेरूदाच्या कवितांचा त्यांनी केलेला मराठी अनुवादही गाजला.
               डायरी लेखन हे सुद्धा कोणत्याही भाषेतील साहित्याचं महत्त्वाचं आणि ऐतिहासिक अंग असतं,  असं प्रश्री यांचं म्हणणं होतं. ते स्वतः एक सर्जनशील 'डायरी लेखक' होते. आपल्या स्वतःच्या डायरी लेखनाबद्दल प्रश्री म्हणतात की "मला असं जाणवत आलं आहे की आपल्या जीवनातील जागृतीच्या काळात , जगत आणि धडपडत असताना आपली रिकाम्या पोत्यासारखी अवस्था झालेली असते. कधी ते पोतं भरतं ,'कधी भरतच नाही. त्याला छिद्रं आणि भोकं पडलेली असतात. ते टोकाटोकांनी उसवलेलं सुद्धा असतं आणि जेवढी काही अल्प स्वल्प त्या दिवसाची कमाई त्या पोत्यात भरायला जातो, तिच्यातील बराचसा भाग गळून गेलेला असतो. अशावेळी आंतरव्यापी जाणवणारी पोकळी डायरी भरून काढू शकते की काय हे पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी मी डायरी लिहितो.खरं म्हणजे माझं डायरी लेखन हा मी केलेला एक प्रकारे आत्मगत लेखन प्रयोगच असतो. हे लेखन आत्मचिंतन, आत्म प्रकटन, आत्मशोध, आत्मपलायन आणि आत्मसंवाद असू शकतो." 
          कथा, कादंबरी, लघु निबंध, प्रवास वर्णन इत्यादी स्वरूपाचं विपुल लेखन केलं .आणि साहित्य हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असला तरी त्यांचा खरा पिंड शिक्षकाचा होता. मुंबईत आल्यावर प्रारंभी ते छबीलदास हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लागले आणि पुढे वरळीच्या जनता हायस्कूलमध्ये आले आणि तिथेच १९८० मध्ये मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. १९७८ साली शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार लाभला .
लेखक म्हणून स्वतःची जडणघडण करत असताना आणि पुढे येत असताना,  प्रश्री नेरूरकर यांनी अनेक नवोदित लेखकांनाही घडवलं. दलित साहित्यातील आघाडीचे लेखक बाबुराव बागुल, दया पवार,  नामदेव ढसाळ,  अर्जुन डांगळे आणि नव्या उमेदीनं लेखन करणारे सुरेश कदम, पांडुरंग कदम, प्रकाश आणि शंकर खरात, उर्मिला पवार इत्यादींना नेरुरकरांचं मार्गदर्शन ऋण विसरता येण्यासारखं नाही. 
        दुसरी नेरूळकर तेही आपले गुरुवर्य रामभाऊ बर्वे यांचं रूम विसरले नाही रामभाऊंनी आपल्यावर साहित्याचे संस्कार केले आणि पुढे लेखक म्हणून आपल्याला दिशा मिळाली अशी नोंद त्यांनी करून ठेवली आहे रामभाऊ बर्वे आपल्या विद्यार्थ्यांना विशेषतः प्रश्रींना मराठी साहित्याची नवनवी पुस्तक आणून देत असत तसंच त्यांचे शिक्षक सिताराम प्रभू वालावल गावातील नारायणाच्या देवळाजवळ टोपीवाला वाचनालयाचे ग्रंथपाल ही होते ते आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तक आणून वाचायला देत प्रतिभा साजण हे पुस्तक इंग्रजी तिसरीत असताना प्रश्न यांनी वाचलं विद्यार्थी तसेच असतानाच कश्रींनी वीस खांडेकर लक्ष्मणराव सरदेसाई विभाग कृष्ण कोल्हटकर वामन मल्हार जोशी अनंत काणेकर या आघाडीच्या लेखकांची पुस्तकं वाचली रवींद्रनाथ टागोरांची हरिभाऊ आपटे यांनी मराठीत अनुवाद दिलेली गीतांजली ही याच काळात त्यांनी वाचली हरिभाऊंच्या पण लक्षात कोण घेतो गड आला पण सिंह गेला उषःकाल या कादंबऱ्या वाचून ते झपाटून गेले आणि त्यांनी ठरवलं की आपण एक दिवस लेखक व्हायचं आणि तसे ते झाले.
*********



Wednesday, September 2, 2026

बातमी

** काव्यार्थ : एक प्रवास **
ई अक्षरमन, ठाणे तर्फे माझे ईबुक आता प्रकाशनाच्या वाटेवर. यामध्ये सामावले आहेत माझे चार कविता संग्रह. स्पंदन, जीर्ण देव्हारा, सी टी स्कॅन आणि आता अटळ आहे. या संग्रहांवर आजवर ज्या मान्यवरांनी, समीक्षकांनी, वाचक रसिकांनी लिहिले त्या एकत्रित रसास्वादाचे हे ईबुक. कवितेचा प्रवास आपणास नक्कीच आवडेल असा विश्वास आहे. तेव्हा...येत्या सहा सप्टेंबर रोजी नक्की भेटूया. तपशील लवकरच. धन्यवाद.


प्रकाशनाच्या वाटेवर

** प्रकाशनाच्या वाटेवर **
सुप्रभात मित्रांनो. कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की " काव्यार्थ: एक प्रवास " हे माझे ईबुक लवकरच प्रकाशित होणार आहे. ते आपणा पर्यंत कसे पोचेल त्याचा तपशील कळवेनच. हे माझे विसावे पुस्तक. १९९४ मध्ये प्रकाशित झालेला स्पंदन हा कविता संग्रह ते २०२१ मध्ये प्रकाशित झालेला आता अटळ आहे या कविता संग्रहापर्यंतचा प्रवास या ईबुक मध्ये सामाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये मान्यवरांचे अभिप्राय, प्रतिक्रिया, विविध वृत्तपत्रात, मासिकात प्रसिद्ध झालेली परीक्षणे, या ईबुक मध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. ही माहिती अनेक ठिकाणी विखुरलेली होती ती नीट एकत्र गुंफून त्याचा दस्तावेज बनवणे हे मेहनतीचे काम  ई अक्षरमन यांनी निगुतीने केले, त्यांच्या टीमचे मनापासून आभार. लवकरच भेटू. धन्यवाद.


Tuesday, September 1, 2026

Tuesday, August 25, 2026

लेख २

नवकथेच्या अध्वर्यूंशी ओळख
आजच्या तरुणांना मराठी साहित्य आणि भाषेची गोडी वाटावी यासाठी रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये गेली तीन वर्षे कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टा घेण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमात तरुणांना सामील करून घेतले जात आहे.
Updated: 17 Aug 2017, 4:12 am IST|Maharashtra Times

कट्टा ३३ वा. कधी ः आज गुरुवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० स्थळ : सेमिनार हॉल, रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर.

तरुणांना मराठी साहित्य आणि भाषेची गोडी वाटावी यासाठी रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये गेली तीन वर्षे कोमसाप युवाशक्ती कॉलेजकट्टा घेण्यात येत आहे. याअंतर्गत विविध उपक्रमात तरुणांना सामील करून घेतले जात आहे.

व्हॅलेंटाइन डे विथ बुक्स, बातमीतील दुनियागिरी, आनंद यादव यांच्या साहित्यावर आधारित ‘आनंदावली’, जागर युवामनाचा, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू महाभारत.कॉम तसेच तरुणाईचे असंमेलन हे पथनाट्य, आवाजाचे तंत्र मंत्र कार्यशाळा, वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तक परीक्षण, नाटकातून व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यान, कथाकथन एक तंत्र आणि मंत्र, कट्ट्यावरचा पाऊस, दिवाळी अंकातील कथांचे अभिवाचन, विधानसभा - मौज प्रकाशन भेट, मधू मंगेश कर्णिक यांच्या लेखांचे अभिवाचन अशा अनेकविध उपक्रमांमधून विविध कॉलेजांमधील विद्यार्थी या कट्ट्यात सहभागी होत आहेत. हा कट्टा दीपा ठाणेकर, निखिल मोंडकर, विवेक पिंपुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जातो. या कट्ट्याला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन आणि कॉलेज यांचे उत्तम सहकार्य लाभले आहे.

२५ ऑगस्ट हा गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस. साहित्यक्षेत्रात सुप्रसिद्ध लेखक गंगाधर गाडगीळ यांच्याकडे नवकथाकार म्हणून आदराने पाहिले जाते. त्याच बरोबर अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. कथा, नाटक, प्रवासवर्णन, समीक्षा , कादंबरी या साहित्य क्षेत्रात त्यांनी लीलया वावर केला. गाडगीळ यांच्या लेखनाचा आजच्या पिढीला परिचय व्हावा, यासाठी १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमधील सेमिनार हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची संकल्पना कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुस्कर यांची आहे.

आजच्या पिढीने गाडगीळांनी केलेले विविधांगी लेखन वाचावे, यासाठी गाडगीळांच्या साहित्यकृती, आत्मचरित्र , कथा, नाटिका यांचे वाचन आणि अभिवाचन या कार्यक्रमात होणार आहे.

आजची पिढी वाचनसंस्कृती पासून दूर जात आहे, असा अनुभव ठायीठायी येत आहे. त्याची कारणे आपण सर्वांनी तपासली पाहिजेत. त्यासाठी तरुणांना जबाबदार न धरता त्यांना साहित्यात रूची निर्माण होईल, यासाठी अभिवाचन, नाट्यसादरीकरण अशा प्रभावी माध्यमांचा वापर कट्ट्याद्वारे केला जात आहे.

या कार्यक्रमाला जोड दिली आहे ती विजय मोंडकर यांच्या मुलाखतीची. विजय मोंडकर यांनी गंगाधर गाडगीळ यांच्या कथांचे ‘कथा गंगेच्या धारा’ या दूरदर्शन मालिकेत रूपांतर केले. कथांचे मालिकेत रूपांतर करताना गाडगीळांच्या साहित्याचे त्यांना जाणवलेले विविध पैलू ते या कार्यक्रमात उलगडतील. कथेचे मालिकेत रूपांतर होतानाचा प्रवास या मुलाखतीतून जाणून घेता येईल.

#संग्रहित


लेख

आज २५ ऑगस्ट. नवकथेचे प्रणेते ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिवस. काही वर्षांपूर्वी लोकमत मध्ये लिहिलेल्या त्या लेखाचे आज स्मरण. संपूर्ण लेख खाली दिला आहेच. 

"सूर्य मावळल्यावर आकाश रिकाम्या शिंपल्यासारखं दिसू लागलं, की कसं रिकामंरिकामं वाटायचं. सगळं काही हरवल्यासारखं वाटायचं. 
माड डुलले की आपली मनंही डुलायची. एखादा मेघ एकाकीपणे आकाशातून तरंगत गेला, की आपणही दूर कुठेतरी निघून जायचो. 
वाळूत उमटलेली पावलं आणि त्यात उमळलेला ओलावा ह्यांना केवढा गूढ अर्थ प्राप्त झाला होता तेव्हा ! तू वाळूत रेघोट्या ओढत असताना,
मी टक लावून त्यात कुठचा अर्थ शोधत होतो बरं ? आणि तेव्हा तू मला इतकी विलोभनीय वाटायचीस की, तुला स्पर्श करायची मला 
भीती वाटायची.!"  

१९५४ साली प्रकाशित झालेल्या "तलावातलं चांदणं" ह्या गाजलेल्या कथासंग्रहातील हा अंश. साठवर्षांपुर्वीचे हे लिखाण आपल्याला 
आजही किती विलोभनीय, प्रसन्न आणि वेगळ्या अनुभूतीचे भासत आहे. मराठी नवकथेच्या क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव 
श्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ. प्रयोगशीलतेला एक वेगळं, समर्थ अवकाश देणारं एक प्रसन्न व्यक्तिमत्व. मराठी साहित्य विश्वात
 'नवकथेचे एक प्रणेते' म्हणून गाडगीळांचे स्थान महत्वाचे आहे. महानगरातील कल्लोळाचे यथार्थ दर्शन, यंत्रयुगीन वास्तवाची प्रखर जाण, 
त्याचबरोबर मानवी मनोव्यापाराचे सूक्ष्म दर्शन आपल्या अनेक कथांमधून वाचकांना घडवणाऱ्या गाडगीळांनी मराठी वाचकाला समृद्ध केले,
एक वेगळी दिशा दिली, नवी दृष्टी दिली. कथालेखनाव्यतिरिक्त गाडगीळांनी प्रवासवर्णने, समीक्षालेखन.,ललितलेखन, एकांकिका, किशोरकथा 
असे चौफेर लेखन केले आहे. काही पुस्तकांचा अनुवाद हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये झाला आहे. 

गाडगीळांनी आपली कथा 'प्रिया आणि मांजर' ही १९४१ मध्ये लिहिली व वाङ्मयशोभा मध्ये प्रकाशित झाली. १९४६  साली प्रकाशित झालेला  'मानसचित्रे'  हा त्यांचा पहिला कथासंग्रह.बा. सी. मर्ढेकर यांच्यासारख्या प्रतिभाशाली कवीने १९४७ सालीच आपल्या रसपूर्ण समीक्षेद्वारे गाडगीळांच्या कथालेखनाला प्रोत्साहन दिले. पुढे प्रख्यात समीक्षक वा. ल. कुलकर्णी, रा. भि. जोशी. पु. भा. भावे यांनी गाडगीळांच्या साहित्याची यथोचित दखल घेतली. नव्या वळणाची, नव्या विचारांची,वेगळेपणाचं मर्म उलगडून सांगणारी कथा तसेच कथेच्या क्षेत्रात नव्या पायवाट ढुंढाळणारे एक प्रयोगशील लेखक म्हणून गाडगीळ लोकप्रिय झाले. 
मुंबईमधील शहरी जीवनसंस्कृतीचं चित्रण गाडगीळांनी आपल्या अनेक कथांमध्ये केले. मुंबईला त्यांनी आपलेसे केले, मुंबईपण त्यांच्या सर्वांगामध्ये 
जणू भिनलं. गाडगीळ हे खऱ्याअर्थाने मुंबईकर लेखक आहेत. सामाजिक परिस्थितीचे टोकदार भान, मध्यमवर्गीय माणसाची मनोवृत्ती, त्याच्या 
वास्तव जीवनाचे अनेक कंगोरे, त्याच्या इच्छाआकांक्षाचं , मानवी जीवनातील विसंगती, सुखदुःखाची चित्रं, गाडगीळांनी आपल्या कथेत रेखाटली आहेत. 
त्याचप्रमाणे पुरुषकेंद्री व्यवस्थेमुळे कौटुंबिक, सामाजिक जीवनात जे  वादळ निर्माण होते आणि त्याचबरोबर स्त्रीचे शोषण देखील होते त्या शोषणाचं 
चित्रण गाडगीळांनी मार्मिकपणे आपल्या कथांमध्ये केले आहे. गाडगीळांनी लेखनाला जेव्हा सुरवात केली तेव्हा प्रेमकथांचं अधिराज्य होते, 
मात्र गाडगीळांनी जाणीवपूर्वक प्रेमकथा खूप कमी लिहिल्या. एकीकडे गंभीर कथालेखनाबरोबरच त्यांनी विनोदी कथाही लिहिल्या. मध्यमवर्गीय 
माणूस हा त्यांच्या विनोदी कथांचा गाभा होता. गाडगीळांच्या कथेचा ओढा व्यक्तींच्या स्वभावधर्मापेक्षा त्यांच्या मनाच्या घडणीवर होता. लहान मुलं 
ते जक्खड म्हतारा माणूस यांच्या अनोख्या मनोव्यापाराचे चित्रण गाडगीळांनी ताकदीने रेखाटले. अगदी थोड्यात सांगायचे म्हणजे गाडगीळांची 
कथा आपल्या घराघरांमधून, मनामनामधून घडणारी आहे. कथांमधून संवादांचा अतिशय संयत, असा समतोल त्यांनी सांभाळला. प्रख्यात समीक्षक
श्रीमती सुधा जोशी म्हणतात, " गाडगीळांच्या कथेचे महत्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे असे नाही. तिच्यातील कलापूर्णता तसेच 
मौलिकता स्वतंत्रपणेही लक्षणीय आहे. गाडगीळांच्या कथेचा प्रवास हा कलावंत म्हणून त्यांचा स्वत्वशोध आहे, गंभीरपणे घेतलेला एक मूल्यशोध आहे." 

२५ ऑगस्ट १९२३. जन्म मुंबईतला. प्रारंभीचे शालेय शिक्षण गिरगावातून होऊन १९३८ ला मॅट्रिक झाल्यावर १९४४ मध्ये चर्नीरोड येथील 
विल्सन कॉलेजमधून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इतिहास या विषयामधून त्यांनी एम. ए केले. पुढे प्राध्यापकीचा श्रीगणेशा सुरतच्या 
महाविद्यालयात सुरू करून नंतर मुंबईतील नावाजलेल्या पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल प्राध्यापक म्हणून काम पाहिले. एकीकडे सकस 
कथालेखन करता करता दुसरीकडे 'अर्थतज्ज्ञ' म्हणून गाडगीळ नावाजत होते. किती विरुद्ध टोकाच्या दोन गोष्टी? एकूण आठ वर्षे मुंबईच्या नरसी 
मोनजी कॉलेज मध्ये अर्थशास्त्राचे प्राचार्य म्हणून होते.! १९७१ ते १९७६ कालावधीत आपटे समूहाचे आर्थिक सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. 
१९८८ ते १९९३ या कालावधीत गाडगीळ साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष होते . एकीकडे प्राध्यापकी करीत असताना त्यांची अनेक पुस्तके ठराविक अंतराने प्रकाशित होऊ लागली. जवळजवळ ८५ पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.त्यापैकी उध्वस्त विश्व, कबुतरे, तलावातले चांदणं, उन्हं, नव्या वाटा, कडू आणि गोड, खरं सांगायचं म्हणजे, वेगळं जग,रत्ने, ही पुस्तके उल्लेखनीय. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर अतिशय ताकदीने लिहिलेली 'दुर्दम्य' ही कादंबरी प्रचंड गाजली. 'आठवणींच्या गंधरेखा हे आत्मकथन.  'एका मुंगीचे महाभारत' या आत्मचरित्र पुस्तकाला १९९६ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. अनेक 
पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार लाभले. १९८० मध्ये न.चि. केळकर आणि १९८२ मध्ये रा. श्री. जोग या पुरस्कारांनी सन्मानित. कुसुमाग्रज 
प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार. अमेरिकेची प्रतिष्ठित अशी रॉकफेलर फौंडेशनची फेलोशिप त्यांना लाभली. १९८१ मध्ये रायपूर येथे संपन्न झालेल्या 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गाडगीळांच्या काही निवडक कथांवर आधारित 'कथागंगेच्या धारा' ही दूरदर्शन मालिका 
प्रसारित झालेली रसिकांना स्मरत असेलच.  

गाडगीळांचे कथाकथनाचे कार्यक्रम मी पाहिले नाहीत,  स्मरतंही नाहीत. मात्र अर्थसंकल्पावर, अर्थशास्त्रावर आधारित असे दोन जाहीर 
कार्यक्रम पाहिल्याचे मला स्मरते. तेदेखील ठाण्यात.! गाडगीळ वृत्तपत्रांमधून जागतिक घडामोडींवर, देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनेकवेळा लिहीत असत. 
१९९५ च्या सुमारास कुठल्याशा वृत्तपत्रात " मराठी माणसाने आता बदलले पाहिजे" हा अभ्यासपूर्ण लेख वाचनात आला. तेव्हा नोकरीबरोबरच 
एखादा छोटासा जोडउद्योग सुरू करावा असा मनात होते. त्याचवेळी नेमका तो लेख समोर.! अगदी सहजपणे त्यांना पत्र पाठवले. ११ डिसेंबर १९९५. 
इतका मोठा अर्थतज्ज्ञ, लेखक, समीक्षक. एखाद्या मित्राला सल्ला देतात तसे प्रांजळपणे, स्पष्टपणे त्यांनी पत्रामधून मला उत्तर पाठवले. ते असे. 
"तुम्ही अगत्यपूर्वक पत्र पाठवून 'मराठी माणसाने आता बदलले पाहिजे' हा माझा लेख आवडल्याचे कळविलत, त्याबद्दल मी मन:पूर्वक आभारी आहे. 
उद्योजक होण्याच्या मार्गात किती अडचणी असतात त्याची तुम्ही दिलेली माहिती अगदी खरी आहे. परंतु त्यातूनच मार्ग काढून उद्योजक 
म्हणून अनेकांनी यश मिळवले आहे. तुम्हीही याबाबतीत घाईगर्दी न करता व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊन विचारपूर्वक पावले टाकाल 
व यश मिळवलं अशी मला अशा आहे. शुभेच्छा." मी उद्द्योजक न होता नोकरदारच राहिलो हा गमतीचा भाग सोडा. 
गाडगीळांचे ते  पत्र अजूनही पाहिल्यावर मनाला उभारी येते. प्रत्येक धडपड्या मराठी तरुणाने ह्या पत्राचा गंभीरपणे विचार करावा आणि 
यशस्वी उद्योजक बनावे. 

१५ सप्टेंबर २००८. एकाचवेळी साहित्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर प्रचंड हुकूमत असणारे नवकथेचे हे प्रणेते, प्रसन्न व्यक्तिमत्वाचे
अभिजात चांदणे कुठल्याशा तलावामधील कंपित लाटांमध्ये विखरून गेले, कायमचे.!! 

(रामदास खरे, ठाणे)

Wednesday, August 12, 2026

ज्ञान भारतम website

ज्ञानाचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी 'ज्ञानभारतम्' अभियान! 

भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयातर्फे 'ज्ञानभारतम्' राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान देशभर सुरू करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत देशभरातील हस्तलिखितांचा शोध, नोंदणी, दस्तऐवजीकरण आणि डिजिटल स्वरूपात संवर्धन करण्यात येणार आहे. अध्यात्म, धर्म, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, गणित, ज्योतिष, नाट्यशास्त्र, रसायनशास्त्र आदी विविध विषयांवरील कागद, ताडपत्र, भूर्जपत्र, कापड किंवा इतर माध्यमांवरील हस्तलिखितांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, हस्तलिखितांची मालकी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडेच कायम राहणार असून शासनाकडून त्यांचे जतन व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे.

आपल्या घरात, मठ, मंदिरे, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था किंवा खाजगी संग्रहात प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध असल्यास त्यांची माहिती 'Gyan Bharatam' मोबाईल ॲपवर नोंदवून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हा.

आपल्या अमूल्य ज्ञानवारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी या राष्ट्रीय अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करते.

अधिक माहितीसाठी : gyanbharatam.com ला भेट द्या.

Fb post @ Sunetra Ajit Pawar

Sunday, August 2, 2026

पुस्तक परिचय




आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या साईड इफेक्ट्स ( डिंपल पब्लिकेशन )  या गूढकथा संग्रहाचे पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. कवयित्री, अनुवादक प्रा सुजाता राऊत आणि म.टाइम्सचे संपादक यांचे मनापासून आभार. संपूर्ण परीक्षण text स्वरूपात खाली दिले आहे. 

** मनाच्या डोहातील गूढ तरंग **
मानवी मनाचे पदर अनाकलनीय अतर्क्य व अथांग आहेत. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड Mystery म्हणजे गूढ याविषयी बोलताना म्हणतो खरं गूढ हे बाह्य गोष्टीत नसून मनाच्या आतच दडलेलं आहे व हा मनाचा प्रवास थक्क करणारा आहे.
      लेखक, चित्रकार, कवी रामदास खरे यांच्या साईड इफेक्ट्स या गूढ कथासंग्रहाचे वाचन करताना आपल्याला याचा प्रत्यय येतो. मराठीत रहस्यकथा,भयकथा, गूढकथा यांना सहसा एकच मापदंड लावला जातो. पण या तीनही कथाप्रकारांची स्वतःची अशी शक्तीस्थळं आहेत. त्यातही गूढकथेचा आवाका मोठा आहे. फक्त रहस्य उलगडणे किंवा वाचकाच्या मनात थरार निर्माण करणे यापुरतीच गूढकथा सीमित नाही. 
        उत्कृष्ट साहित्यरचनेसाठी आवश्यक असणारे काही घटक असतात ज्यामध्ये पात्रनिर्मिती,वातावरण भवतालाचे तपशील व मुख्य म्हणजे मनाचा प्रवास असतो. प्रस्तुत गूढकथासंग्रहात हे सर्व घटक संतुलित पद्धतीने आले आहेत.म्हणूनच या कथा परिणामकारक ठरतात. या सर्व कथांमध्ये प्रथमपुरुषी किंवा तृतीयपुरुषी निवेदन आहे. त्यातून कथा उलगडत जातात. गूढकथा आहेत म्हणजे सतत भीतीची काळीशार सावली जाणवत राहील असा लेखकाचा कुठेही प्रयत्न नाही. उलट अगदी सहज नेहमीच्या संवादातून या कथा उलगडतात.
      सरप्राईज ही कथा मैथिली व मिलिंद या दांपत्याची आहे. भर पावसाळ्यातल्या दिवशी मैथिलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद सरप्राईज देणार असतो. पण प्रत्यक्षात काय घडतं? कोणतं सरप्राईज मिळतं हे उत्तम रीतीने लेखकाने हाताळलेलं आहे. ड्रीमलँड या कथेतला नायक व त्याचा मित्र जगू या दोघांच्या संवादातून उलगडत जाते. जगूला पडणाऱ्या स्वप्नांनी नायकाबरोबरच आपणही अस्वस्थ होतो. पण शेवटी जगूच्या आयुष्यात काय घडतं? हे मुळातून वाचलं पाहिजे.
       मानवी आयुष्याचा प्रवास हा सरळ रेषेसारखा नाही. नियतीचं अतर्क्य असं गूढ त्यामध्ये दडलेलं आहे. मुख्य म्हणजे मनाच्या या डोहामागे काय अद्भुत गहन तरंग लपलेले आहेत याचा अंदाज आपण लावू शकत नाही. रामदास खरे यांच्या सर्वच कथांमध्ये हे समान सूत्र दिसतं.
      कोंड ही यातील एक उत्कृष्ट कथा आहे. गावच्या जमिनीचा व्यवहार बघायला आलेला मध्यमवयीन नायक,तिथे भेटलेली नाजूक पावलांची राधा, तिच्या आयुष्यातला पेच हे साकारत जातं. या कथेचा शेवट अगदी वेगळा व कथेला उंचीवर नेणारा आहे. लेखकाचे संवाद नेमके व सहज आहेत आणि भाषा चित्र समोर उभी करणारी आहे. शब्दांचा वापर अचूक आहे. उदाहरणार्थ “आठवणींचा आग्यामोहोळ फुटलेला. माझ्या कृश गात्रांच्या फांद्यावर हट्टाने चिकटून बसलेला आठवणींचा सनातन थर. घाटांची आवर्तन सुरू झालीयेत” अशा पद्धतीचे वर्णन व निवेदन अनेक कथांमध्ये आढळते. अबाधित या कथेतील देवचाराचे वर्णन खिळवून टाकेल असे आहे. या कथेत व इतरही काही कथांमध्ये कोकणचे, तिथल्या भवतालाचे संदर्भ व वर्णन येते. गूढ फक्त घटनांमध्ये नसते, ते भवतालात, चराचरात, आसमंतात भरलेले असते. मनाच्या आतल्या प्रदेशात तर असतेच असते. कोकणची ही पार्श्वभूमी काही कथांमध्ये एखादे मुख्य पात्र असल्यासारखी समोर येते. “निळभोर आभाळ ,विस्तीर्ण नदीकाठ, हिरव्या गर्द डोंगरांची पार्श्वभूमी लाभलेली. झाडांच्या उलट्या सावल्या पाण्यात विरघळत चालल्यात शांतपणे. कसलीही घाई नाहीये .सगळं कसं निस्तब्ध निवांत. पेंटिंग साठी पोषक वातावरण” हे कोंड या कथेतील वर्णन.
     काळीशार गर्द सावली, जाळं, नेक्स्ट अशा अनेक कथांमध्ये पात्रांचा भवताल व घटना त्यातील नाट्य फुलवलेले आहे. अनेक कथांचा शेवट हा सूचक आहे. त्यातील गूढ वाचकांना खुणावत राहतं. काही कथांमध्ये बरेच तपशील येतात. उदाहरणार्थ नेक्स्ट ही कथा. पण कथेची घडण होण्यासाठी ते आवश्यक वाटतात. या कथा फक्त घटना समोर ठेवत नाहीत तर त्यामध्ये गुंतलेल्या माणसांचे मनोव्यापारही समोर येतात. या सर्व कथांची गुंफण सहज आहे. रहस्य समोर ठेवायचं, वाचकाला भयाने गारद करावं किंवा उगाच संमोहाच्या आवर्तात ठेवावं अशी कुठलीही भूमिका नाही. उलट प्रवाही निवेदनात कथा समोर येतात. काही कथांचा पैस मोठा आहे. उदाहरणार्थ डायरी, मुक्ती या कथा. त्यासाठी अधिक विस्तृत स्वरूपात खोल आशय या कथा नक्कीच व्यक्त करू शकतात.यापुढे लेखकाने अशा पद्धतीच्या दीर्घकथा लेखनाकडे वळावं असं वाटतं. 
     डिंपल प्रकाशनाने त्यांच्या परंपरेला साजेशी अशी पुस्तकाची निर्मिती केली आहे. आजचे महत्त्वाचे कथालेखक व चित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांनी समर्पक शब्दात पुस्तकाची पाठराखण केली आहे. लेखकानेच या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारले आहे. त्यातील गडद लाल,केशरी काळ्या रंगात या कथांचे साईड इफेक्ट चित्रित झालेले आहेत. मनाला संमोहित करणारे गूढ अनुभव देणारे हे पुस्तक वाचताना आपण मानवी मनाच्या गूढगर्द अरण्यात प्रवेश करतो व रमून जातो.
      – सुजाता राऊत, ठाणे. 

साईड इफेक्ट्स (गूढकथा )
रामदास खरे
डिंपल पब्लिकेशन,वसई. 
पृष्ठे :१२२, मूल्य रू.२००/

Saturday, July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान यांचं कार्य

शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे.... 
चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान RSS चे आजीवन कार्यकर्ते होते, ज्यांनी ओडिशामध्ये भाजपाचा पाया घातला!

ओडिशामध्ये भाजपाला उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता! 1998 मध्ये देवेंद्र प्रधान देवगड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री बनले!

धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या विद्यार्थी राजकारणाची सुरुवात ABVP मधून केली आणि 2004 मध्ये वडिलांनी आपली जागा मुलाला दिली आणि धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले!

प्रधान कुटुंबाने सलग दोन पिढ्या संघाच्या विचारधारेला या भागात पसरवून भाजपाला मजबूत केले आहे आणि ओडिशाच्या आदिवासी भागात धर्मांतर रोखण्यासाठी खूप काम केले आहे!

मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली! शिक्षणमंत्री झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पाठ्यपुस्तकांच्या पुनरावलोकनाचे काम सुरू केले!

परदेशी आक्रमणकर्त्यांना नायकांऐवजी खलनायक म्हणून दाखवले आणि भारतीय महापुरुषांना नायक म्हणून स्थापित केले, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत!
धर्मेंद्र प्रधान जी यांच्या कार्यकाळातील प्रमुख सुधारणा, कामगिरी आणि धोरणांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.

NEP 2020 संरचनात्मक सुधारणा  
नवीन रचना: 3 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी "10+2" रचना बदलून "5+3+3+4" प्रणाली लागू केली.

प्राथमिक शिक्षण: पायाभूत शिक्षण (वय 3-8 वर्षे) आणि व्यावहारिक अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला.

पीएम श्री शाळा: 13,000 पेक्षा जास्त शाळांना स्मार्ट क्लासरूम, ICT आणि विज्ञान प्रयोगशाळांनी अपग्रेड केले.

एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट: विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्रीसह शिक्षण मधेच सोडून पुन्हा सुरू करण्याची सुविधा दिली!

आंतरराष्ट्रीयीकरण आणि तांत्रिक शिक्षण  
जागतिक कॅम्पस: परदेशी विद्यापीठांना (जसे डीकिन, वोलोंगोंग) भारतात प्रवेश दिला आणि IIT चे परदेशात विस्तार केला.

भाषिक प्रवेश: B.Tech ची पाठ्यपुस्तके आणि तांत्रिक अभ्यासक्रम 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले.

प्रवेश परीक्षा: NEET, JEE आणि CUET 12 भाषांमध्ये तर CTET 19 भाषांमध्ये घेण्यास सुरुवात केली.

भाषा आणि पायाभूत साक्षरता उपक्रम  
निपुण भारत: इयत्ता 3 च्या अखेरीस सर्व मुलांसाठी सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे लक्ष्य ठेवले.

भारतीय भाषा उत्सव: दरवर्षी 4 ते 11 डिसेंबर दरम्यान होणारा भाषा उत्सव सुरू केला.

समर कॅम्प: एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकण्यासाठी 4.7 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना या अभियानाशी जोडले.

संस्थात्मक पाठबळ: UGC, CBSE आणि NCERT स्तरावर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली.

अभ्यासक्रम आणि उत्तरदायित्व सुधारणा  
अभ्यासक्रमात बदल: आणीबाणी आणि सर्जिकल स्ट्राइकवर धडे समाविष्ट केले; प्रादेशिक राजघराण्यांना प्राधान्य दिले.

सामग्री हटवणे: स्थानिक आणि राष्ट्रीय नायकांना प्राधान्य देण्यासाठी मुघल इतिहासाची सामग्री कमी केली.

झिरो टॉलरन्स: पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याचे धोरण स्वीकारले.

संस्थात्मक सुधारणा: वैयक्तिक घटनांऐवजी शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन आणि मोठ्या सुधारणांवर लक्ष केंद्रित केले.

NEET चा पेपर लीक झाला तेव्हा 13 गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकले, आणि 1 महिन्यातच पूर्ण ताकदीने NEET ची परीक्षा पुन्हा घेतली आणि ती यशस्वी झाली.

स्वातंत्र्यानंतरपासूनच शिक्षण विभाग मौलानांऐवजी, एखाद्या राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्यक्तीच्या हात द्यायला हवा होता, तर आपला इतिहास काही वेगळा असता.
पण आज दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला आहे..

मित्रांनो आपले वैचारिक मतभेद काहीही असुद्या...पण आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक अमूल्य हिरा गमावलेला आहे.

जय हिंद!🇮🇳
जय श्री राम!🚩

-Mahesh Kawale


देश विरोधी ताकतें फायदा न उठाए 
इसलिए फैसल लिया ! धर्मेद्र प्रधान 

Wednesday, July 22, 2026

कवी गोविंद

गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद 
(जन्म: ९ फेब्रुवारी, १८७४ – मृत्यू :२८ फेब्रुवारी,१९२६)
मराठी काव्यविश्वात असे काही कवी होऊन गेले, ज्यांच्या लेखणीने केवळ रसिकांची मने जिंकली नाहीत, तर समाजात जागृतीही निर्माण केली. अशाच एका ओजस्वी कवीचे नाव म्हणजे गोविंद त्र्यंबक दरेकर, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र "कवी गोविंद" या नावाने ओळखतो. त्यांच्या कवितांनी स्वातंत्र्यलढा धगधगीत ठेवण्याचे काम केले. 
९ फेब्रुवारी १८७४ रोजी नाशिक येथे जन्मलेल्या कवी गोविंद यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होते. कवि गोविंद अवघे चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील निधन पावले. या दुःखातून सावरत असतानाच त्यांना तीव्र ताप आला आणि त्या आजाराने त्यांचे दोन्ही पाय कायमचे लुळे झाले.
शारीरिक हालअपेष्टा आणि शिक्षणाच्या संधी न मिळाल्यामुळे अनेक अडचणी आल्या, पण त्यांच्या मनातील काव्यशक्ती अडथळे ओलांडून पुढे जात राहिली.
कवी गोविंद यांनी आपल्या लेखनाची सुरुवात लावण्यांनी केली होती. साध्या, सोप्या पण भावनिक ओढ निर्माण करणाऱ्या त्यांच्या लावण्यांना रसिकांनी दाद दिली. पण त्यांना खरी दिशा मिळाली ती १९०० मध्ये, स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर यांच्याशी झालेल्या परिचयाने.
सावरकरांनी स्थापन केलेल्या 'मित्र मेळा' या तरुण क्रांतिकारक संघटनेशी त्यांचा जवळचा संबंध आला आणि त्यांच्या लेखणीचा नवा प्रवास सुरू झाला. आता त्यांचे शब्द केवळ मनोरंजनासाठी नव्हते, तर ते देशभक्तीचा अंगार बनले. 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?' यांसारख्या कवितांनी क्रांतीची ज्योत तेवत ठेवली.
गोविंद यांच्या कविता फक्त शब्द नव्हते, तर त्या क्रांतीची हाक होती. शिवाजी, तानाजी आणि रामदास यांसारख्या पराक्रमी व्यक्तींवर आधारित त्यांच्या रचनांनी तरुणांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढण्याची आग पेटवली. 'स्वातंत्र्याचा पालना', 'स्वातंत्र्यलक्ष्मीस्तव', 'भारतप्रशस्ती' यांसारख्या त्यांच्या रचनांनी तर देशप्रेमाच्या भावना अधिक तीव्र केल्या.
त्यांच्या कविता इतक्या प्रभावी होत्या की ब्रिटिश सरकारने त्यांचे साहित्य  धोकादायक साहित्य म्हणून जप्त केले. मात्र, त्या नष्ट होऊ शकल्या नाहीत. सावरकर कुटुंबातील महिलांनी या कविता वाचून तरुण क्रांतिकारकांना प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
कवी गोविंद काही काळ सावरकर बंधूंसोबत राहिले आणि 'मित्र मेळा' संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभागी झाले. पुढे हीच संस्था 'अभिनव भारत' म्हणून ओळखली जाऊ लागली, आणि गोविंद या संघटनेतील महत्त्वाचे सदस्य झाले. त्यांच्या कविता आणि विचारांनी अनेक तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित केले.
२८ फेब्रुवारी १९२६ रोजी कवी गोविंद यांनी अखेरचा श्वास घेतला, पण त्यांची कविता आजही जिवंत आहेत. १९३० मध्ये ‘गोविंदांच्या कविता’ या नावाने त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करण्यात आला.
कवी गोविंद यांचे जीवन म्हणजे कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कसा टिकवायचा याचा आदर्श आहे. त्यांचे शब्द आजही देशभक्ती जागवतात, प्रेरणा देतात आणि आपल्याला स्मरण करून देतात की स्वातंत्र्य ही एक सतत जपण्याची आणि संघर्ष करून टिकवण्याची मूल्यवान गोष्ट आहे.
त्यांची कविता म्हणजे शब्दांनी पेटलेली क्रांती, जी आजही स्वातंत्र्याच्या गाथेत तेजाने झळकत आहे!
कवी गोविंद यांना पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार 
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#shrikantjoshi #shrikantjoshi_official #गोविंदत्र्यंबकदरेकर #स्वातंत्र्यशाहीरगोविंद #kavigovind

Monday, July 20, 2026

news

The Maharashtra Food and Drug Administration (FDA) has launched an AI-powered citizen complaint portal to make reporting food adulteration, fake medicines and substandard pharmaceutical products faster and easier. Announcing the initiative, FDA Commissioner Tukaram Mundhe said citizens can file complaints by speaking in Marathi, Hindi or English, and the AI system will automatically convert them into structured written complaints before forwarding them to the concerned officer. The portal also offers complaint tracking, real-time updates and an auto-escalation system to ensure timely action and greater transparency.

FDA Helpline: 1800 222 365

#PuneTimesMirror #TukaramMundhe #FDA #AI #FoodSafety


Sunday, July 19, 2026

मराठी शिक्षक आणि मुलांमधला अनुभव

मी बरीच वर्षे ICSE बोर्डच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे क्लास घेत होते, दोन वर्षांपूर्वी काही वैयक्तिक अडचणींमुळे मी ते क्लास घेणे बंद केले. त्यावेळी मला काही पालकांचे फोनही आले होते "मॅडम प्लीज तुम्ही पुन्हा मराठीचा क्लास सुरू करा." पण कधी कधी इतर कुणी तरी निर्माण करून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर उभं राहणं नको वाटतं. त्यामुळे मी 2020 नंतर ICSE बोर्डचे ऍडमिशन घेणे बंद केले. त्यादरम्यानच 2019 च्या  मार्च महिन्यात शेवटच्या आठवड्यात अरव नावाच्या एका विद्यार्थ्यांचे ऍडमिशन घेतले होते. त्यावेळी अरव नववीत गेला होता. 

तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की मी त्याची फिस परत करून अरवची ऍडमिशन कॅन्सल करू शकत नव्हते. त्यामुळे नववी आणि दहावी हे दोन्ही वर्ष मी अरवला (एकट्याला) ऑनलाइन क्लास घेऊन शिकवले.

आज अरवचा दहावीचा रिझल्ट लागलाय. त्याच्या आईचा धन्यवाद म्हणून मेसेज आलाय! अरवने फोन करून सांगितलं, "मॅडम मला सगळ्यात जास्त गुण मराठी विषयात मिळाले आहेत" ऐकून फार बरं वाटलं.  इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी कायमच खूप अवघड वाटते त्यामुळे त्याला शुभेच्छा देतांना मी हसत हसत म्हणाले "आता इथून पुढच्या आयुष्यात तुझा कधीच मराठीशी संबंध येणार नाही, सुटलास तू!" त्यावेळी अरव आनंदाने उत्तरला "मॅडम घरात तर मराठीच बोलणार ना आणि मला ज्या विषयात सर्वाधिक  गुण मिळालेत ती भाषा मी सोडणार कशी! उलट मी पुढच्या पिढीला देखील ती भाषा शिकवेल" पंधरा वर्षाच्या अरवचे हे शब्द ऐकून क्षणभर डोळ्यांत पाणी आलं. जुने दिवस आठवले. त्या मुलांचा गोंगाट, लेखनसराव करतांना शॉर्टकट्स मारून लिहिलेली त्यांची उत्तरं, त्यांचा पिज्जा पार्टीचा हट्ट, मी रागवले म्हणून कधीतरी त्यांनी मला लिहिलेली माफीची पत्रं... असं बरंच काही आठवत राहिलं. 

आज अरवच्या निमित्ताने ते सारं काही ऑफिशियली संपलं. यापुढे त्या जागेवर ICSEच्या विद्यार्थ्यांना पुन्हा कधीच मला मराठी शिकवता येणार नाही..! याची एक बोचरी जाणीवही झाली. खरंतर माणूस काही जागा नाईलाजाने सोडतो पण ती जागा सोडताना का होईना आपण आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला...याचा आनंद खूप जास्त असतो. अर्थात याचं श्रेय त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आहे ज्यांनी माझ्यातील शिक्षक अधिकाधिक प्रगल्भ बनवला!

अभिनंदन अरव 🌹🌹🌹 
खूप खूप मोठा हो बाळा

@ ज्योती भारती

नाती तुटताना...

"इतकी सुंदर जोडी होती... मग असं काय झालं असेल की घटस्फोट घ्यावा लागला ?" पण या प्रश्नाचं उत्तर आपण बाहेरून पाहतो तेवढं सरळ नसतं.

खरं तर कोणतंही नातं टिकणं ही मोठी गोष्ट आहे आणि काही नात्यांचं सन्मानाने संपणंही तितकंच मोठं वास्तव आहे. नातं टिकलं म्हणून ते यशस्वीच आणि तुटलं म्हणून ते अपयशीच, असा सरळ निष्कर्ष काढता येत नाही. काही नाती आयुष्यभर एकत्र राहूनही आतून रिकामी असतात; तर काही नाती वेगळी झाल्यानंतरही परस्परांविषयी आदर जपतात. म्हणूनच अशा बातम्या वाचताना उत्सुकता असणं स्वाभाविक आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे संवेदनशीलता. 

एक प्रेक्षक म्हणून आपण या सिनेतारकांचा नात्यांचा प्रवास नाही, तर त्यातील निवडक क्षण पाहत असतो. जसे एक छान फोटो, एखादा रोमँटिक व्हिडिओ, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा एकमेकांच्या कौतुकाची पोस्ट... यावरून आपण त्यांच्या संपूर्ण संसाराचा अंदाज बांधू शकत नाही. प्रत्येक नात्याला जसा एक सार्वजनिक चेहरा असतो तसाच एक अत्यंत वैयक्तिक, बंद दरवाज्यांआडचा वेगळा चेहराही असतो. जो जगाला कधीच पूर्णपणे दिसत नाही. पण तरीही याचा अर्थ असा नाही की विभक्त होतांना त्यांना दुःख झालंच नसेल. प्रत्येक जोडप्याचं विभक्त होणं चुकीचं असतं असं आपण म्हणू नये... कारण आपल्या समाजात अजूनही नातं टिकवण्याला इतकं महत्त्व दिलं जातं की ते नातं आनंद देतंय की वेदना, हा प्रश्न अनेकदा मागे पडतो.

शेवटी प्रश्न इतकाच उरतो—नातं टिकवणं महत्त्वाचं की नात्यात माणूस टिकणं महत्त्वाचं ? याचं उत्तर प्रत्येक जोडप्याला स्वतःच्या आयुष्यात आपापल्या परीने शोधावं लागतं. बाहेरच्यांनी मात्र प्रत्येक नात्याकडे कुतूहलाने नव्हे, तर करुणा आणि समजुतीने पाहण्याची गरज आहे. कारण प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या छायाचित्रामागे एक न दिसणारी कथा असते—आणि त्या कथेचं खरं सत्य फक्त त्या दोन व्यक्तींनाच माहीत असतं.

©️ ज्योती हनुमंत भारतीhttps://www.facebook.com/jyotihanumantbharati

Friday, July 17, 2026

Tuesday, July 14, 2026

पन्नाशीच्या उंबरठयावर

अल्लडपणा पासून सुरू झालेला प्रवास जेव्हा पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन थांबतो तेव्हा समजतं आपण पन्नाशीला आलो!! तुम्हाला कळलंच असेल आजचा विषय आहे ' पन्नाशी पार करताना.." हे वय म्हणजे अनेक अनुभवांची शिदोरी तुमच्या गाठीशी असते. व.पु. म्हणतात तसं, " सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.." हे देखील समजलेले असते. पुरुष असो किंवा स्त्री, नोकरीची जेमतेम आठ ते दहा वर्ष फक्त राहिलेली असतात. वयाच्या पंचवीसाव्या वर्षा पासून नोकरीला लागलेला तो जेव्हा पन्नाशीत स्थिरावतो तेव्हा तो अख्खा प्रवास किती कठीण होता, त्या वेळी किती स्थित्यंतरे अनुभवावी लागली हे त्याने जवळून पाहिलेलं असतं. स्त्रियांना देखील कष्ट चुकलेले नाही. नववधू म्हणून पाऊल टाकणारी ती खरं तर तितकी परिपक्व नसते. पण, व.पु. म्हणतात तसं, संसाराचा धूर डोळ्यात जाऊन तिला संसारातली मजा कळते. हे वय तसं म्हटलं तर कष्ट करण्याचं नाही. जरी पन्नाशी असली तरी, तरुण वयात जी धावपळ तुम्ही करता ती पन्नाशीत नाही करता येत. एक उदाहरण देते, समजा सकाळी ७.५० ची ट्रेन तुमच्या डोळ्यासमोर जात असेल तर तुम्ही ती धावत जाऊन पकडू शकता, कारण त्या वयात रक्त हे सळसळते असते,हेच पन्नाशीत आल्यावर काही ना काही प्रकृतीच्या तक्रारी सतावतात..
 सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही माणूस ओळखायला शिकलेले असता. स्त्रियांना तर एक गोष्ट चांगलीच माहित असते ती म्हणजे, नाती जपणं हे त्यांनी आत्मसात केलेलं असतं. व.पु. जसं म्हणतात, " कोणतीही चूक ही नात्यापेक्षा नक्कीच मोठी नसते.." हे त्यांनी जाणलेले असते. हिच शिकवण त्या आपल्या मुलीला देतात. अहो आयुष्याची पन्नास वर्षे काढणं म्हणजे सोपं आहे का?? जे केस पांढरे होतात ते असेच होत नाही ना. त्या मागे अनेक उपेक्षेचे हुंदके असतात, नाईलाजास्तव कराव्या लागणाऱ्या तडजोडी असतात. न सांगता येणाऱ्या व्यथा असतात. मुला मुलींच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करणं याचा देखील विचार करावा लागतो. काही प्रमाणात तब्येतीच्या कुरबुरी सुरू होतात. शरीराला काहीसं जडत्व येतं. आपण सर्व मध्यमवर्गीय माणसं आहोत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी, सुख शोधणारी. या वयात सुखद धक्के आनंद देतात पण वेदनांचा हुंकार नेहमीच मांडता येत नाही. हे वय म्हणजे मुला मुलींचे मित्र मैत्रिण व्हायचे वय असते. नव्याने संसार सुरू करणाऱ्या मुलीला तिची आई हीच एक चालती बोलती मैत्रीण असते. कारण, आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. सगळ्यात महत्वाचं इथे लिहायचं म्हणजे, या वयात एकमेकांचा सहवास हा फार महत्वाचा असतो. ' प्रथम तुज पाहता जीव वेडावला.' हे तरुणपणी म्हणून झालेलं असतं परंतु, आता ' तु अशी जवळी रहा..' हे म्हणावं लागतं. कारण, एकदा का मुलं मुलींची लग्न झाली की तेच दोघं एकमेकांसाठी असतात. आयुष्याची पुढची वर्ष ही जपणूकीसाठी असतात. कधीतरी त्याने चहा करणं, कधीतरी तिने स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं असतं. ती देखील तारुण्यात म्हणतेच की, ' बनात ये ना जवळ घे ना..' पण जशी तिची पन्नाशी उलटते तेव्हा ती देखील म्हणते,' घरात हसरे तारे असता, पाहू कशाला नभाकडे..' 
 हे वय म्हणजे आरामाची खऱ्या अर्थाने गरज असणारे वय. कुठेतरी थकलेल्या जीवाला विसाव्याची गरज असतेच ना!! पन्नास वर्षे जेव्हा तुम्ही आयुष्य जगता म्हणजे ते निव्वळ जगणे नसते तर कितीतरी वेळा स्वतःचं मन मारुन समोरच्याचं मन दत्तक घ्यावं लागतं. पुरुषांना देखील हे चुकलेलं नसतं. स्वतःच्या लग्नात आनंदात असणारी ती दोघं मुलीच्या लग्नात मात्र सनईचे सुर ऐकून हळवे होतात. खरंच, ही पन्नाशी म्हणजे आयुष्यातलं एक सोनेरी पान,तसंच अनेक आठवणींचे आणि अनुभवांचे नजराणे देतं हे मात्र खरे.. कारण, नेत्र हे पैलतीरावर पोहोचण्या आधी आयुष्याचा महोत्सव साजरा जर केला नाही तर काय उपयोग..
                                   .. मानसी देशपांडे 
                                                  विरार.