माझी ओंजळ भरलेली
युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात.
चंद्रशेखर गोखले | Updated: April 1, 2017 12:16 AM
चित्रपटाच्या झगमगत्या क्षेत्रात वावरायला मिळाल्यामुळे स्त्रीकडे बघण्याची दृष्टी जास्त निरोगी बनली, चित्रीकरणाचं एक युनिट असतं आणि युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात. अशा वेळी स्त्री-पुरुष हा भेद पुसट होतो. वाद झाले तरी समान पातळीवर होतात, तसेच इतर गोष्टीही.. अशा वेळी ‘हा ऽऽऽ ती बघ मावा खातेय’ किंवा ‘ती बघ झुरके मारतेय’ असले बाळबोध विचार मनात येत नाहीत.. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी’ ही असली विधानं कालबाह्य़ वाटायला लागतात..
‘कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या’ म्हणत कोणत्या दोन स्त्रियांनी सजवलेल्या पाळण्याच्या वरून- खालून मला एकमेकींकडे सोपवलं आता आठवत नाही; पण तेव्हापासूनच तिच्याशी माझा संवाद घडायला लागला, चार बहिणींच्या पाठीवर अनपेक्षितपणे म्हणजे अपेक्षा नसताना माझा जन्म झाला त्यामुळे माझ्याभोवती गराडा पडला तो या नानाविध रूपं घेऊन कौतुकाने आलेल्या स्त्रियांचाच. पण त्यात पहिली ओळख दृढ झाली ती आईशी!
मी खूप भाग्यवान आहे! भाग्यवान अशासाठी की वयाच्या पाचव्या वर्षीही मी आईच्या अंगावर पीत होतो हे मला लख्ख आठवतंय.. दुधाची चव नाही सांगता येणार; पण जुन्या घरी स्वयंपाक घराच्या दाराशी देव्हाऱ्याकडे तोंड करून आई पदराआड मला घेऊन बसायची ते चित्र अजूनही डोळ्यासमोर आहे.. आमची जुनी शेजारीण ठक्करबा आईला सारखं समजवायची छाया आता सोडव त्याला नाहीतर हे सुटणारच नाही. तेव्हा मायेनं आई मला अधिकच कवटाळायची तो मायेचा स्पर्श म्हणजे त्या अकृत्रिम मायेची खरी ओळख. म्हणूनच नंतर आईशी पटलं नाही, वाद झाले, मी वेगळा झालो तरी ही नाळ तुटलीच नाही..
‘मातृ देवो भव’ असं सरधोपटपणे म्हणून मी मोकळा झालो नाही कारण असे फसवे संस्कार आईने दिलेच नाहीत, तिच्यात स्त्री म्हणून, पत्नी म्हणून आणि व्यक्ती म्हणून व्यक्त होण्याचं घटनांचं विश्लेषण करण्याचं प्रचंड सामथ्र्य होतं. ती सगळ्या भूमिका मनापासून जगली आणि मलाही ही देणगी दिली. आणि जस जसा माझ्या परिसराचा परीघ वाढत गेला तस तशी ती विविध रूपात भेटतच गेली, शिकवत गेली.
०
चित्रपटातून प्रगल्भ स्त्रीचं खरं रूप दाखवलं ते ऋशीकेष मुखर्जी, शक्ती सामंता, बासू चटर्जी यांनी. लहानपणापासून चित्रपट माध्यम मला अगदी जवळचं वाटायचं. मी स्वत:ला इंडस्ट्रीचाच समजायचो त्यामुळे चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा मी कायम अभ्यासपूर्ण नजरेने पाहिल्या. अगदी ‘सत्यकाम’, ‘बंदिनी’, ‘मंजली बहू’ ते अगदी राजेश-शर्मिलाच्या ‘आविष्कार’पर्यंत. बंगाली चित्रपटांमुळे भाभी म्हणजे वहिनी हे नातं माझ्या दृष्टीने कायम सामथ्र्यवान, उत्कट आणि आदर्श ठरलं. आणि वहिनीही कधी वाईट असूच शकत नाही अशी माझ्या मनाची धारणा झाली. मला सख्खी वहिनी नाही, पण ज्या दोन वहिनी मला जोडलेल्या नात्यांमुळे मिळाल्या त्या म्हणजे चित्रा वहिनी आणि सुवर्णा वहिनी या दोघींचे स्वत:चे संसार टिकले नाहीत, पण जगण्यातली सकारात्मकता त्यांनी जी दाखवली ती माझ्या मनात कायम ठसली.
माझा जन्म जसा काही अपेक्षा नसताना झाला तसंच माझं लग्नसुद्धा कोणाची काय माझीही अपेक्षा नसताना झालं. वाटतं, पण या नात्याला सामोरं जाणं येडय़ागबाळ्याचं काम नाही. लग्न ठरलं तेव्हा उमाला खूप बोलायचं असायचं आणि मला काही बोलणं सुचायचं नाही, काय बोलू? हा माझा तक्रार मिश्रित प्रश्न असायचा, म्हणजे तशा मला रग्गड मैत्रिणी होत्या, पण हे नातं वेगळंच पडतं. मी बोलायचो नाही म्हणून उमा नव्र्हस व्हायची. चित्रा वहिनीने सांगितलं, बोलायची सवय कर, जितकी सवय करशील तितका संवाद मोकळा राहील, अगदी कुठला शर्ट घालून बाहेर गेलो ते, वाटेत खारे दाणे घेतले हेही सांग, मग बघ.. आणि खरंच गेली तेवीस वर्षे अव्याहत आम्ही दोघे बोलतोय.
उमा माझ्या आयुष्यात आली आणि स्त्रीविषयीचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला आणि स्पष्ट झाला, आमच्या आईसारखीच उमालाही सतत व्यक्त होण्याची सवय आहे किंवा ती तिची गरज आहे, त्यात तिचं वाचन दांडगं, वैचारिक बैठक पक्की त्यामुळे अभिनय क्षेत्रासारख्या अस्थिर क्षेत्रात वावरत असूनही ती वास्तवाचं भान सोडत नाही.
आपण आपल्या आयुष्यातलं स्त्रीचं स्थान आणि स्त्रीचा मान अबाधित ठेवत असू, बिनशर्त मान्य करत असू तर आपलं वास्तवतेचं भान कधी सुटत नाही, त्या सुटू देत नाहीत.
तुम्ही असाल मोठे टिकोजीराव, पण तुम्हाला तुमची खरी ओळख तुमची मैत्रीणच करून देते. आपल्यातले गुण, आपल्यातली कमतरता जितकी ती समजून घेते तितकं इतर कोणी समजून घेत नाही. आणि या बाबतीत तर मी भाग्यवानच ठरलो. माझ्या असंख्य मैत्रिणींनी ना मला कोलमडू दिलं ना तरंगू दिलं. जयाताई, मनीषा, वीणा, स्वाती, तिलू, शुभी, स्नेहल, नीलिमा, मधू अशी किती नावं घेऊ ज्या कायम परखड आणि निखळच वागल्या. त्या काळात कवीने जरा तऱ्हेवाईक वागायची प्रथा होती. त्या कवींचे तऱ्हेवाईकपणाचे अनेक किस्से रंगवून सांगितले जायचे, पण मला कधी असं वागायला मिळालंच नाही कारण मी जरा असा वागतोय असं यांना वाटलं, तशी शंका जरी आली तरी टपली मारायला या तत्पर असायच्या. मी लग्नाचा निर्णय घेतानाही या मैत्रिणीच जास्त ठाम होत्या. तेव्हा माझी ओळख म्हणजे गूड फॉर नथिंग अशीच होती, पण तेव्हा उमाने मैत्रिणीची भूमिका पूर्णपणे निभावली.
०
स्त्री ही प्रेम व्यक्त करत असते आणि पुरुष प्रेम सिद्ध करत असतो.. हा दोघातला मूलभूत फरक आहे, पण सिद्ध करण्यापेक्षा व्यक्त करण्यात जास्त रसिकता आहे, हे आपण लक्षातच घेत नाही. सिद्ध करून झालं की प्रवास संपला, याउलट व्यक्त होण्यातलं सातत्य आपल्याला जास्त समृद्ध करत असतं.
मला माझी हार मान्य आहे
म्हणजे तू जिंकलास असं होत नाही
डाव तुझ्या हाती देऊनही
जिंकता तुला येत नाही.. या ओळी मला या माझ्या निरीक्षणातूनच सुचल्या.
एक प्रथित यश कलाकार होता. तो एका लेखिकेवर मनापासून भाळला.. ती मात्र खरंच त्याच्या प्रेमात पडली. मग चोरून गाठीभेटी सुरू झाल्या याचा सुगावा घरच्यांना लागला. प्रतिष्ठेपेक्षाही सुरक्षितता महत्त्वाची ठरली. त्याने पूर्णविराम दिला. तिने तो मान्य केला, पण तिने खरं प्रेम केलं होतं, कायमचा देश सोडून जायचा निर्णय तिने घेतला तेव्हा ती शेवटचं त्याला भेटायचं म्हणत होती. त्याचं भाळलेपण कमी झालं होतं तो भानावर आला होता. तो तिला टाळत होता.. शेवटी एका पार्टीत दोघे समोर आले, पण त्याच्या सोबत त्याची पत्नी सुद्धा होती, तो अभिनेता होता हुकमी अभिनय हा त्याच्या व्यवसायचा तसेच व्यक्तिमत्त्वाचाही भाग होता त्याने काय केलं? सहानभूती मिळवायला आणि वेळ मारून न्यायला छातीत कळ आल्याचा अभिनय केला. गोंधळ उडाला. धावपळ झाली. पण या दोघी त्याला पूर्ण ओळखून होत्या. परिणाम काय? तो दोघींच्या मनातून उतरला आणि त्या दोघी खूप छान मैत्रिणी झाल्या.
०
चित्रपटाच्या झगमगत्या क्षेत्रात वावरायला मिळाल्यामुळे स्त्रीकडे बघण्याची दृष्टी जास्त निरोगी बनली, चित्रीकरणाचं एक युनिट असतं आणि युनिट म्हणजे बहुतेकजण झपाटल्यासारखे काम करत असतात. अशा वेळी स्त्री-पुरुष हा भेद पुसट होतो. वाद झाले तरी समान पातळीवर होतात, तसेच इतर गोष्टीही.. अशा वेळी ‘हा ऽऽऽ ती बघ मावा खातेय’ किंवा ‘ती बघ झुरके मारतेय’ असले बाळबोध विचार मनात येत नाहीत.. ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी’ ही असली विधानं कालबाह्य़ वाटायला लागतात.. मुळात असली उदात्त विधानं स्त्रीवर लादायचीच गरज भासत नाही. कारण मुळात या सगळ्या भावना स्त्रीमध्ये असतातच.. विषय निघाला म्हणून सांगतो प्रियादीदी (तेंडुलकर) खूप वेगळी, खूप वेगळा विचार करणारी मुलगी होती. एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर हुकमी बाजी मारण्याची तिची क्षमता होती. कपडय़ांचं दुकान, टाँकशोचं शूटिंग, मराठी, गुजराती, हिंदी रंगभूमी, मालिका, चित्रपट, त्यात तिचं लिखाण आणि दौरे दिवसाचे चोवीस तास तिला पुरायचे नाहीत, पण मातृत्वाचा विषय निघाला की कासावीस व्हायची.. त्यामुळे तिला एक छंद जडला होता. कोणी हात पाहणारा समोर आला की ती आपला हात दाखवायची करियरचं तिला इतकं पडलेलं नव्हतं, पण मी आई होईन का? हा प्रश्न ती मनात, डोळ्यात, उरात घेऊन बसायची..
आपल्याकडे स्त्रीच्या हळव्या भावनांचा वापर करून घेण्यात अनेकजण तरबेज आहेत, जसं हल्ली अनेक जाहिरातीत आईची ममता विनाकारण पणाला लावतात.. दीदीच्या एका प्रोडय़ुसरनेही प्रियादीदीची ही कमजोरी बरोबर ओळखली होती. छोटय़ा बजेटचा चित्रपट होता. दीदीच्या एका गुजराती मित्राने गळ घातली म्हणून तिने तो स्वीकारला होता. पहिल्याच शेडय़ुलला दीदीला चित्रपट स्वीकारल्याचा पश्चात्ताप होत होता त्यामुळे चित्रीकरणात तिला रस राहिला नव्हता. त्यावर त्या निर्मात्याने एक क्लृप्ती योजली. असा हात बघून भविष्य सांगणारा भामटा सेटवर आणून ठेवला तो दीदीला सांगायचा, ‘मेरी जबान है आपको बिटिया होगी.. देखना चांदसी सूंदर.. दीदी मग त्याच मूडमधे असायची. मला वाटतं, सतीश शहा का सतीश कौशिकच्या लक्षात हा प्रकार आला आणि त्याने प्रोडय़ुसरला झापला. तो चित्रपट आला की नाही हेही धड आठवत नाही आता.
०
‘त्याच्या नजरेतून ती’ म्हणजे माझ्या मते शेजारी शेजारी ठेवलेले डाळ-तांदुळाचे डबे.. नजरेतून बघायला उसंतच नाही. एकत्र झाले की असे एकरूप होतात.. म्हणून तर मेतकूट जमलं म्हणतात.. खिचडी पक रही है म्हणतात. अर्धागिनी ही उपाधी म्हणूनच अतिशयोक्ती वाटत नाही.
अपवाद ही असतात, पण अपवादला उदाहरण म्हणून सादर नाही करता येत.
नवरा-बायकोचे विनोद इतके लोकप्रिय का होतात? कारण नव्वद टक्के स्त्री-पुरुष ही पती-पत्नीची भूमिका मनापासून एन्जॉय करत असतात. तिची शिस्त मनातल्या मनात त्याला पटत असते आणि त्याचं तिच्यावर विसंबून असणं तिला सुखावह असतं.
माझ्या अनुभवाचे बोल सांगू का?
सगळं तुला देऊन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली..
चंद्रशेखर गोखले
chandrashekhargokhale18@gmail.com
0 comments:
Post a Comment