Wednesday, July 2, 2025

आहार विहार

▫️*आषाढ तळावा.. श्रावण भाजावा..*
  *भाद्रपद उकडावा..!* पण हे असंच का ??

पाऊस म्हणजे भारतीय परंपरेचा खाद्य-योग ! पावसाळा हा केवळ ऋतू नसून, निसर्गाच्या रसपूर्ण लीला अनुभवण्याचा एक सु-काळ होय. "तळणं, भाजणं आणि उकडणं.." या एकाच पावसाच्या तीन रुपांतरामागे लपलेलं आहे.. आयुर्वेदिय तत्वज्ञान, शरीराची गरज आणि चविष्ट आनंदाचा मंत्र! पण असं खाणं कितपत सुरक्षित आहे ? असं खाणं म्हणजे नेमकं काय खाणं ??

१) *आषाढ* म्हणजे पावसाचा श्रीगणेशा.‌ आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे- गुडघेदुखी, सर्दी- फडसे, थंडीताप, infections अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस, यामुळे एकाच वेळी पित्त वाढते अन् वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर *आषाढात "तळलेलं" खाणं हा अफलातून उपाय आहे !* 

विशेषत: कोलेस्टेरॉल जराही वाढू न देता, तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी "औषध" बनते. आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडते !

म्हणूनच; मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव, तिखट मिठाच्या पुऱ्या इ. आधीच बनवून ठेवायची पद्धत आहे. जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. 

शिवाय; पावसाचा पहिला रोमॅंटिक स्पर्श.. कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदाभजी.. आणि कपातला उबदार चहा.. यासारखा _Instant Romantic_ अंतर्बाह्य "आषाढ डायट" जगात शोधूनही सापडणार नाही !

२) *श्रावण* म्हणजे सणांचा महिना. जमिनीतली उष्णता संपून चकाकी ऊन पडू लागते. ऊन-पावसाच्या खेळातून गारवा कमी होतो, मात्र दमटपणा वाढतो. वात हळूहळू कमी होऊन शरीरावयावांचे आखडणे, दुखणे इ. तुलनेने कमी होते. मात्र पित्त वाढलेलेच असते. अशावेळी वाताचा फार विचार न करता, केवळ पित्त आटोक्यात ठेवणे महत्त्वाचे, म्हणून *श्रावणात "भाजलेलं" खाणं सर्वोत्तम आहे.* 

आगीत भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा, मका, वाटाणा, वांग्याचं सुगंधी भरीत, मातीचा वास घेणारी भाजलेली ज्वारीची भाकरी, भाजलेले पापड,‌ तांदूळ भाजून केलेला भात, भाजलेले लाडू इ. सर्व पित्ताचा राग थोपवतात. परिणामी ऍसिडिटी, मायग्रेन, हाय-बिपी, मुळव्याध ह्या तक्रारींचा जन्म होत नाही.

आणि हो, भाजलेलं खाण्याचा जो स्वर्गानुभव श्रावणात येतो, तो अख्या वर्षभरात कधीच येत नाही. कदाचित म्हणूनच आपल्याकडे _*"श्रावणमासी हर्ष मानसी..."*_ असं म्हंटलेलं आहे.

३) *भाद्रपद* म्हणजे ‌परतीचा पाऊस आणि तीव्र उकाड्याचं आगमन. गारव्याचा लवलेश संपल्याने वात बऱ्यापैकी शांत होतो. मात्र उकाड्यामुळे श्रावणात आधीच वाढलेले पित्त, शरीरात जिथे संधी मिळेल तिथे उद्रेक उत्पन्न करतो (ie पित्ताचा प्रकोप होतो). 

हाच तो काळ जिथे जरा चुकीचं खाल्लं, की हार्टअटॅक, पॅरालीसीस, तीव्र ताप, कोणताही शुल्लक आजार अचानक गंभीर होणे इ. गोष्टी घडू लागतात. परिणामी सर्वाधिक वार्षिक मृत्यू ह्याच महिन्यात होताना दिसतात. 

अशा अनुचित घटना टाळण्यासाठी भाद्रपद महिन्यात बहुतांश धार्मिक उपवास आलेले आहेत. जेणेकरून अन्न कमी खाल्ले जाईल आणि पित्त प्रकोप व्हायला वाव भेटणार नाही. याचसाठी *भाद्रपदात "उकडलेलं" खाणं अगदी योग्य आहे.* 

जसे की, उकडलेल्या शेंगा, कंदमुळं, शेंगदाणे, उकडीचे मोदक, उकडून शिजवलेल्या पालेभाज्या, उकडलेला भात इ. प्रयत्नपूर्वक खाल्ल्याने October HEAT चे रूपांतर आपण October HIT मध्ये नक्की करू शकतो. 

कदाचित म्हणूनच गणपती, गौरी, दुर्गा या देवता आपल्याला भेटण्यासाठी मुद्दाम भाद्रपदाचाच आसमंत निवडतात. कारण उकडलेलं अन्न म्हणजे शरीराला दिलेला शुद्धता व शांतीचा स्पर्शच ! नाही का ?

अज्ञात


माझे पान fb page