Tuesday, June 29, 2010

माकड आणि माणूस
एकदा एक माकडीण बाजारात गेली
चोरून कैरी अन् डाळ घेऊन आली
माकडभाऊ बसले होते छान ऊन खात
भसाडया आवाजात कुठलेसे गाणे गात
माकडाला म्हणाली - बसलाय कायउठा!
गुळ चांगला किसा अन् वेलदोडा कुटा
माकड: अगं  बयेकाय झालयं काय तुला
सकाळच कोवळं ऊन खाऊ दे ना मला
माकडीण: आता तुमचा पुरे झाला आराम
तुम्हाला काही करायला नको काम
माकड: काम मला सांगतेहे अतीच झालं
चार पिढ्यांनी माझ्या कधी काम नाही केलं
"म्हणे आराम पुरे", "तू येडी का खुळी?"
ब्रेकफास्ट राहिलाय माझा मला दे चार केळी
माकडीणसकाळ पासून कससंच होतंय मला
म्हणून तेवढं स्वयंपाकाचं सांगते तुम्हाला
करा बेत शिरापूरी बटाटयाची भाजी
जोडीला भरलेली वांगी करा ताजी
चांगलचुंगलं खावसं वाटतंय मला
आबंट-तिखट चव लावा माझ्या जिभेला
सासूबाईंचे पाय जेव्हा झाले होते भारी
मामंजींनीच उचलली जबाबदारी सारी
तुमचाही पुरे आता पोरकटपणा
झाडावरून उडया मारत राहता दणादणा
माकड: काय बोलतेस तू...काही समजत नाही
पाय भारी - चकरा काही उमगत नाही
पित्त झालंय तुला म्हणून हा त्रास होतो
आत्ता जाऊन तुझ्यासाठी मोरावळा घेऊन येतो
माकडीणअहो संसाराच्या वेलीवर उमलणार आहे फूल
इवलाश्या पावलांची लागली मला चाहूल
माकड: कसले वेल कसले फूल काहीही बोलतेस
मला अशी सारखी कोडयात टाकतेस
वेल अन् फूलमला काय घेणे देणे
मला फक्त माहित गोड फळे खाणे
माकडीण: आता कसे सांगू तुम्हालाकाही समजत नाही
अहो तुम्ही बाबा होणार अन् मी होणार आई
घरात आपल्या छोटेसे बाळ आता येणार
त्याच्या माकडलीलांनी घर आपले भरणार
माकडाची टयुब जरा उशीरानेच पेटली
घरातच त्याने मग कैरी डाळ वाटली
शेपूट तोंडाला लावून माकडीण हसली
कैरीला खाता खाता मनात म्हणत बसली
माणूस काय अन् माकड काय
माणूस काय अन् माकड काय
'वरून ताकभात ओळखणे यांना माहितच नाय
यांना माहितच नाय!

0 comments: