विठोबा
विठोबा म्हटले की दोन्ही होत कमरेवर ठेवून वीटेवर उभे असलेले सावळे ध्यान
डोळ्यापुढे येते. पण या संकल्पनेला छेद देणारी चार हातांची आणि मिशी असलेली
विठ्ठलमूर्ती अहमदनगर जिल्ह्यातील टाकळीभान येथे आहे. संशोधकांच्या अभ्यासाचा
विषय ठरलेली ही अनोखी विठ्ठलमूर्ती अशा प्रकारची एकमेव मूर्ती असल्याचे
सांगितले जाते.
.....................
ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाश्यापासून अवघ्या १२ मैलावर
एक छोटेखानी गाव आहे, टाकळीभान नावाचे. या गावात एक साधेसुधे विठ्ठलमंदिर आहे.
पण यातील मूर्ती थेट यादवकाळाशी नाते सांगणारी. विठ्ठल या देवतेच्या उगमाचा शोध
घेणारी... जगभरातल्या इतर मूर्तीपेक्षा संपूर्णतः वेगळी.
या मूर्तीमध्ये विठ्ठलाची ओळख असणारे दोन हात कमरेवर आहेतच. पण तिला आणखी दोन
हात असून त्यातील एका हातात शंख तर दुस-या हातात चक्र आहे. एवढेच नाही तर या
विठ्ठलाला मिशाही आहेत. विठ्ठलाचे विष्णूरुपात घडणारे हे दर्शन अन्यत्र कुठेच
का होत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
यादवकाळात भानू नावाच्या राजाची टाकळीभान ही राजधानी होती. मुळातच
गवळी-धनगरांचा लोकदेव असणारा हा विठ्ठल या यादवकुलीन राजाचे कुलदैवत. या भानू
राजाला विठ्ठलाने विष्णूरुपात दर्शन दिले अशी लोककथा मंदिराचे पुजारी राजेंद्र
भागवत सांगतात. मंदिरातील पुजेची जबाबदारी असणारी त्यांची ही सातवी पिढी आहे.
पण मंदिर त्याच्याही आधीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
अहमदनगरच्या वस्तुसंग्रहालयाचे संचालक असणा-या सुरेश जोशी यांनी या विठ्ठलावर
संशोधन केले. ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांनीही आपल्या पुस्तकात या
विठ्ठलमूर्तीचा उल्लेख केलाय. ते म्हणतात, की गवळी-धनगरांचा लोकदेव असणा-या
विठ्ठलाला यादवकुळातील राजांनी विष्णु-कृष्णरूप प्राप्त करून दिले. त्यामुळे
विठ्ठलस्वरुपाच्या घडणीच्या विचारात टाकळीभानच्या चतुर्भुज मूर्तीचा अभ्यास
महत्त्वपूर्ण ठरतो.
विठ्ठलाच्या गळ्यात वैजयंती माळ असून जानवेही कोरलेले आहे. कमरेवर मेखला असून
तिने दुटांगी धोतर नेसले आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर शाळुंकेसह शिवलिंग आहे.
त्यामुळे शिव-विष्णूच्या समन्वयाच्या प्रक्रियेत ही मूर्ती घडली असल्याचे
स्पष्ट होते. पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणे इथे मकरकुंडले नाहीत. तसेच पंढरपूरात
जशी रुख्मिणी रुसून लांब राहिली आहे, तशी इथे नाही. इथे ती विठ्ठलाच्या बाजुलाच
उभी आहे. या सा-या वैशिष्ट्यांमुळे विठ्ठलाच्या आद्यमूर्तींमध्ये या मूर्तीचा
संदर्भ टाळता येत नाही.
सर्वात मुख्य म्हणजे ज्या संतांच्या रचनांनी आपण विठ्ठलाची उपासना करतो त्यातील
अनेक संतांनी विठ्ठलाच्या या चतुर्भुज रुपाचे वर्णन केले आहे. त्यामुळे हे
चतुर्भूज रूप संताना माहित होते असे म्हणण्यास जागा आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणतात,
संत भेटी अजि मज ।
तेणे जाला चतुर्भुज ।
दोन्ही भुजा स्थळी सहज ।
दोन्ही सुक्ष्मी वाढल्या ।।
संत नामदेव म्हणतात,
चतुर्भुज विठ्ठल । कै देखोन डोळा ।।
भक्तांचा जिव्हाळा । जीव माझा ।।
संत बंका महाराज म्हणतात ,
कर कटावरी । पाऊले साजरी ।।
शंख चक्र करी । मिरवले ।।
संत तुकाराम म्हणतात,
शंख चक्रांकित भूषणे ।
जडीत मेखला चिद्ररत्नाने ।
पीतांबरी उटी शोभे गोरेपण ।
लोपले तेणे रवितेज ।।
संतांनी वर्णलेल्या या रुपाची विठ्ठलमूर्ती असेल की हे त्यांच्या भावविश्वातील
विठ्ठलाचे वर्णन आहे, हे ठामपणे सांगता येत नाही. पण तरीही हा चतुर्भूज विठ्ठल
काहीतरी वेगळे सांगत टाकळीभानमध्ये वर्षानुवर्षे उभा आहे एवढे मात्र निश्चित.
पंढरपूर्वकाळात महाराष्ट्र-कर्नाटकात विठ्ठलोपसना सुरू होती. परंतु अशा
प्रकारचे चतुर्भूज रूप कुठेही आढळत नाही. मध्य प्रदेशातील भेलसे येथे उदयगिरी
लेण्यात अशा प्रकारची एक मूर्ती सापडते. इ.स.४१०-१६ च्या आसपासची ही भेलसे
येथील मूर्ती विठ्ठलाशी कसे नाते सांगते हे अद्याप उलगडलेले नाही. पण
विठ्ठलाच्या उत्क्रांतीत पंढरपूरचे महात्म्य वाढत गेले आणि हे चतुर्भूज ध्यान
लोप पावले असे मत जोशी यांनी व्यक्त केले आहे.
विठ्ठल या दैवताचा उगम अद्यापही सापडलेला नाही. त्याच्या पंढरपूरनिवासाआधी तो
कसा उत्क्रांत झाला त्याचा शोध अद्यापही संपलेला नाही. त्यामुळेच विठ्ठलाचा
अभ्यास करणारे अनेक देशी-विदेशी संशोधक या मूर्तीचा अभ्यास करताहेत. कदाचित या
अभ्यासातून विठ्ठलाच्या या रुपाचे कोडे उलगडू शकेल.
नाम्याची खीर चाखणारा, चोखोबाची गुरे राखणारा, जनाईचे दळणकांडण करणारा आणि
कोट्यवधी वारक-यांचे श्रद्धास्थान असलेला विठोबा सर्वत्र दोन हातांच्या मानवी
रुपात दर्शन देतो. पण इथेच असा त्याच्या परमेशरुपात का बरं उभा आहे ? याचे
संशोधन फक्त विठ्ठलाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासावार प्रकाश टाकेल.
कारण शेवटी दगडातला देव त्याला घडवणा-या माणसाची गोष्ट सांगतो, हे विसरता येत
नाही.
0 comments:
Post a Comment