पहिली भेट
नाही हो म्हणता म्हणता, एकदाची ती येणार होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती
ठरल्याप्रमाणे ती आली
स्टेशनवर गर्दीत शोधत होती
थोडी लाजत, थोडी घाबरत
ओढणीशी चाळा करीत होती
मी दुरूनच पाहिले तिला, पाहता मला गोड हसली ती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती
क्षणभर मग कुणी काहीच बोललं नाही
गाडी हलली ... बाकी काहीच घडल नाही
काठोकाठ भरलेले ते चार डोळे
आवरता आवरता मग कुणीच सावरले नाही
नि:शब्द प्रेमाची भाषा निराळी, न बोलता सहज कळली होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती
तिच्यासोबत नंतर देवळात गेलो
तिला हात जोडताना फक्त पहात राहिलो
लोभस किती ते शांत निर्मळ भाव
हरपून भान कसे हरवून गेलो
नव्या नात्याची, नव्या आयुष्याची, तेव्हा जणू नवी रुजवात होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती
निघालो तेव्हा तिचा हात हातात होता
अन मनाच्या कोपऱ्यात विरह सलत होता
स्टेशनाच्या गर्दीत तिचा हात सुटला जेव्हा
दुराव्याचा तो क्षण काळीज चिरत होता
खिडकीतून बघताना वाकून मला, उमाळ्यांना ती अडवित होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट ठरली होती
मी तेव्हा तिथे तसाच उभा
सोबतीला सारे ते क्षण घेऊन
पहिल्या भेटीच्या मोहक, सुंदर
ती गेली खूप साऱ्या आठवणी देऊन
घडतील पुन्हा कितीतरी अशाच, पहिली भेट ती पहिली होती
कधी कुठे मग ठरता ठरता, आमची पहिली भेट घडली होती
-अनामिक
1 comments:
छान लिहलंय... मस्त जमलंय एक चोतूस विश्व...
Post a Comment