आषाढी एकादशी सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!
हाक वारीची आली, पावलं निघाली
वरसाची ताटातूट, जिवाला लागली
सोबती झाले गोळा, गळाभेट झाली
भारावली मनं, पालखी घेतली.
जनाई मुक्ताई, सोबत माऊली,
नामा तुकोबाची जोड, डोई तुळस ठेवली,
भाळी चंदनाचा टिळा, माळ गळ्यात घातली
केला विठूचा कल्लोळ, दिंडी पंढरी चालली.
टाळ मृदुंगाचा दंगा, हरी नामाचा गजर.
झुले पालखीची झूल, उते प्रेमाचा बहर.
अबिर गुलालाचा रंग, अभंगाचा जोर.
पाहाया पांडुरंग, मन जाहले अधिर.
चालू पंढरीची वाट, खेळू फुगडी रिंगण.
शेवट विसावा, चंद्रभागेचे अंगण.
नाम्याच्या पायरी, भक्तीचं लिंपण.
सावळ्या पाऊली, कैवल्य शिंपण.
हात जोडूनि मागतो, देवा विसर न व्हावा.
जन्म घडो पुन्हा पुन्हा, व्हावी वारीची सेवा.
पुढे परतुनी येऊ, आता निरोप असावा.
जनी विठ्ठल दिसावा, मनी विठ्ठल रुजावा.
- अनामिक
0 comments:
Post a Comment