Saturday, October 1, 2016

पितृपूजन आणि कर्मकांड



पितृपूजन आणि कर्मकांड

चांद्र कालगणनेप्रामाणे सध्या चालू असणारा भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष पितृपक्ष अथवा पितृपंधरवडा या नावाने ओळखला जातो. या पंधरा दिवसांच्या काळात बहुसंख्य हिंदुधर्मीय आपापल्या पितरांच्या तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आदी विधी करतात. मृत व्यक्ती शरीराने आपल्या सोबत नसली, तरी ती अशरीरी अवस्थेत आपल्या सोबत आहे, ही कल्पना फार प्राचीन काळीच मानवी मनात उद्भवली आहे. यातूनच अनेकदा भूतप्रेतादी अमानवी योनी आणि त्यांनी एखाद्या माणसाचे भले-वाईट केल्याच्या गोष्टी देखील प्रसृत होतात. ज्याप्रमाणे देवता प्रसन्न होऊन मनोवांछित फळ देतात, किंवा रागावून माणसाचे अहित करतात, त्याचप्रमाणे पितरे देखील माणसाचे बरे वाईट करू शकतात, असे सांगितले जाते.

एकदा आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट गोस्ठींचा संबंध दैवी आपत्तीशी लावला की, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्नही माणसे करू लागतात. कोणीतरी पितरांची अवकृपा झाल्याचे, अगर पितृदोष असल्याचे सांगून निरनिराळे विधी करण्यास सुचवतात. मग माणूस त्या कर्मकांडात ओढला जातो. ही पितरे म्हणजे आपलेच पूर्वज असतील, तर ती आपले वाईट का करू इच्छितील, असा प्रश्न वास्तविक पडला पाहिजे.

अशी कथा आहे, की वैदिक परंपरेप्रमाणे सर्वप्रथम मृत्यू पावलेली व्यक्ती म्हणजे यम. साहिजकच तो सर्वात आधी पितृलोकी गेला. त्यामुळे तेथील राजेपद त्याला मिळाले. याठिकाणी पुढील मृत व्यक्ती गेल्यानंतर यम त्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे स्थान देऊ लागला. त्या लोकी कोणत्याही अन्न-पेय आदी वस्तू स्वातंत्रपाने उपलब्ध नसल्याने ही पितरे त्याकरिता त्यांच्या जिवंत वंशजांवर अवलंबून असतात. ज्या मृताचे वंशज नसतील अगर असूनही पितरांकरिता श्राद्धविधी करत नसतील, त्या पितरांना पितृलोकी उपाशी राहावे लागते. या कल्पनेवरूनच मराठीत ‘पाप्याचे पितर’ हा वाक्यप्रयोग आला आहे. सामान्यपणे हडकुळ्या अगर दुबळ्या व्यक्तीस ‘पाप्याचे पितर’ असे संबोधले जाते. पापी व्यक्ती पापाचरण करणारी, आणि म्हणून धार्मिक आचरण न करणारी मानली जाते. अशी व्यक्ती आपल्या पितारांकरिता श्राद्ध करत नसणारच. मग भरण-पोषण न मिळाल्याने त्या व्यक्तीची पितरे यमलोकी अगदी दुबळी आणि लुकडी होत असणार. याउलट जो श्राद्धविधी करतो, त्याची पितरे मात्र सुदृढ शरीराची असली पाहिजेत.

वंश टिकला तरच आपल्याला अन्नपान मिळत राहील, ही पितरांची काळजी कालिदासाने ‘शाकुंतला’त व्यक्त केली आहे. राजा दुष्यंतास मुल नसल्याने त्याची पितरे दुष्यंताच्या मृत्यूनंतर आपल्याला पिंडदान कोण करणार, या विचाराने रडवेली होत. राजाने अर्पण केलेल्या जलाने आपले अश्रू धुवून मग उरलेले जल ती प्राशन करीत. (धौताश्रु-शेषमुदकं पितर: पिबन्ति).

अशा परिस्थितीत धार्मिकदृष्ट्या बघितले तरी पितरे आपले वाईट करतील असा विचार करणे तितकेसे योग्य नाही. उलट त्यांच्याबद्दल आदरभाव राखला जावा. कुटुंबातील हयात जेष्ठांचा आदार करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आपले आई-वडील जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अगर त्यांचा अपमान करणे, त्यांची काळजी न घेणे आणि मृत्युनंतर मात्र पितरांचा त्रास होऊ नये म्हणून निरनिराळी कर्मकांडे करणे व्यर्थ होय. मातृदेवो भव, पितृदेवो भव असा उपदेश संस्कृतीने केला आहे. त्याकडे दुर्लक्ष कारायचे आणि पितृपक्षात कर्मकांड करायचे, हे तर्कसंगत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, जेष्ठांचा आदर करणे सर्वात म्हत्वाचे आहे. अर्थातच ज्यांची कोणाची श्रद्धा असेल, तर त्यांनी श्राद्धकर्मे जरूर करावीत. श्राद्ध आणि महालयासारखे दरवर्षी करावयाचे विधी श्रद्धेने केल्यास त्याद्वारे सर्व पितरांची तृप्ती होत असल्याने इतर कोणत्याही कर्मकांडाच्या मागे लागण्याची गरजही भासणार नाही.

— अंबरीष खरे (सगुण निर्गुण, मटा. २६ सप्टेंबर २०१६)

(लेखक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत आणि भारतविद्या विभागात संस्कृतचे असिस्टंट प्रोफेसर, अभ्यासक आणि संशोधक आहेत.)

0 comments: