Friday, September 1, 2017

एक लेखक मोलमजुरी करणारा

एक लेखक मोलमजुरी करणारा...

संपत मोरे 

पावला-पावलावर धक्के बसत असतात. संभ्रम निर्माण होत असतात. भ्रम दूर होत असतात. हा ही एक मोठा धक्काच की, पाठ्यपुस्तकात ज्या लेखकाचा धडा असावा, तो लेखक एका झोपडीत राहावा, पोटापाण्यासाठी त्याने गुरं राखावी, गवंड्याच्या हाताखाली मजुरी करावी...
सातारा जिल्ह्यातील मरळी येथील शंकर कवळे यांचा एक धडा सातवीच्या ‘सुगम भारती’ पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. उर्दू, कन्नड, गुजराती कन्नड, सिंधी, तेलगू या माध्यमातील पुस्तकातही त्यांच्या धड्याचा समावेश झाला आहे. म्हटली तर ही नित्याची बातमी परंतु या माहितीसोबत कवळे हे उदरनिर्वाहासाठी गवंड्याच्या हाताखाली मजुरी करतात, ही माहिती नित्याची नव्हे तर खऱ्या अर्थाने धक्का देणारी आहे. आज आता बातम्या वाचून लोक त्यांना आवर्जून भेटायला येताहेत. मात्र, कालपरवापर्यंत हा अस्सल मातीतला लेखक उपेक्षेचं जीणं जगत होता हे वास्तव अस्वस्थ करणारं आहे.

शंकर कवळेंच्या घराकडं जाणारा रस्ता छोटाच. एक गल्ली पार केल्यावर आपण लेखकाच्या दारात पोहोचतो. घर एकदम साधं. दगडमातीचं. आत लहान मूल रडत होतं. बाहेरून आवाज दिल्यावर साधारण तीस-एक वर्षाच्या बाई बाहेर आल्या.
"लेखक आहेत?’
"आवं ते जळण आणायला डोंगरावर गेल्याती. या की आत...’
मग त्यांनी हाक मारून एका पोराला बोलावून घेतलं.
"डोंगरात जाऊन ह्यास्नि घेऊन ये. पावनं आल्याती म्हणावं’

मी घरात गेलो, तिथं अाणखी एक बाई होत्या. या लेखकाच्या बहीण. त्यांचं सासर चाफळ. भावाला भेटायला आल्या होत्या. त्या सांगू लागल्या, "भावाला पैल्यापासून वाचायचा नाद हाय. घरात माणसासंग कवा बोलत नसायचा. सारखं पुस्तकात डोकं घालून बसायचा.’ त्या भावाबद्दल सांगत असतानाच, दारात डोक्यावर मोळी घेऊन एक जण आला. हेच लेखक शंकर कवळे! कवळेंनी डोक्यावरची मोळी खाली ठेवली. उन्हातून आल्यामुळे घामाच्या धारा वाहत होत्या. घाम पुसत कवळे आत आले. माझ्यासमोर बसले. एकदम साधा माणूस. त्यांना पाहून हे लेखक अाहेत, असं सांगितलं तर कोणाला पटणार नाही. ते बोलायला लागले. बोलणं एकदम शांत. शब्दात ओलावा.
ते सांगू लागले, ‘आमची घरची परिस्थिती गरिबीची. आई-वडील शेतमजुरी करायचे. त्यांनी खूप काबाडकष्ट करून आमचा सांभाळ केला. हालाखीच्या परिस्थितीत मला बारावीपर्यंत शिकवले. बारावी पास झालो. पुढच्या शिक्षणासाठी मला कराड किंवा सातारला जाणं गरजेचं होतं, पण पुढं शिकण्याइतकी आमची परिस्थिती नव्हती. मग मी शाळा सोडली आणि गावातील लोकांची गुरं राखायला जायला लागलो. सकाळी गुरं सोडायची, संध्याकाळी परत यायचं. दिवसभर गुरांमागं डोंगरावर असायचो. सुरुवातीला दिवसभर नुसताच बसून असायचो. पण एक दिवस माझ्या थोरल्या भावाने मला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’ कादंबरी वाचायला दिली. ती कादंबरी देहभान विसरून एका दिवसात वाचली. कादंबरी वाचताना सगळं चित्र डोळ्यासमोर उभा राहत होतं. या पुस्तकाने मला खूप आनंद दिला, मग भावाकडून दुसरं पुस्तक घेतलं. मग तिसरं. या काळात इतका झपाटून गेलो होतो की, जे मिळालं ते पुस्तक वाचत होतो. गुरांमागे रोज एक पुस्तक वाचत होतो. पुस्तक नसलं की त्या दिवशी मला करमत नसे, एवढा वाचनाचा नाद मला लागला. घरात वीज नव्हती. एकच रॉकेलचा दिवा होता. त्यामुळं रात्रीचं वाचायला जमायचं नाही. कधी उजाडतंय आणि कधी वाचत बसतोय, असं वाटायचं. पुढे दिवस उजाडला की, पुस्तकाच्याच नादात असायचो.
चार पाच वर्षे असं वाचल्यावर मला वाटायला लागलं, पुस्तकात जशा गोष्टी आहेत, तशा आपल्याही भागात, गावात घडतात, मग आपणही त्या लिहाव्यात. मग लिहायला येतंय का म्हणून बसलो, तर एका महिन्यात हुंडाप्रथेवर आधारित ‘आरती’ ही कादंबरी लिहून झाली. ती कादंबरी अनेक दिवस घरात होती. एक दिवस पेपरात नवीन लेखकाचे लिखाण प्रसिद्ध करण्याबाबतची जाहिरात वाचली. पुण्याला जाऊन प्रकाशकांना भेटलो. कादंबरी प्रकाशित करण्यासाठी त्यांनी पैसे मागितले. माझ्याकडे पैसे नव्हते. मी आईला सांगितले. तिने आणि बहिणीने शेतमजुरी करून साठवलेले साडेसात हजार पैसे दिले. पुस्तक छापल्यावर पैसे मिळतील, अशी आशा होती. पुस्तक छापून पाच सहा महिने उलटले. आई पैशाचं विचारायला लागली. मग प्रकाशकांना भेटायला गेलो.त्यांनी दहा हजाराचा चेक दिला. तो घेऊन आलो. बँकेत गेलो, तिथं म्हणाले ‘खाते काढायला हवे' त्यासाठी पैसे नव्हते.मग घरी गेलो. दुसऱ्या दिवशी एकाकडून उसने पैसे घेऊन आलो. खाते काढले. चेक भरला. पंधरा दिवसांनी बँकेत गेलो, तर कळलं. प्रकाशकाने दिलेला चेक वठलेलाच नाही. प्रकाशकांना फोन केला, तर ते म्हणाले ‘थोडे दिवस थांब रोख पैसे देतो' त्यांनतर वर्षभर त्यांना फोन करत होतो, पत्र लिहीत होतो. शेवटी, एक वर्षांनी त्यांनी मला दीड हजार दिले. माझे साडेसात हजार गेलेले आणि मला मिळाले दीड हजार, तेही एका वर्षानी. मी खूप निराश झालो.’ लेखक कवळे त्याच्या लिखाणाची सुरुवात आणि पहिल्या कादंबरीनंतरचा निराशाजनक अनुभव मला सांगत होते.
अर्थात, पहिलाच अनुभव वाईट आला म्हणून लेखक खचले नाहीत. त्यांनी ‘बिजली’, ‘अनुराग’ या कादंबऱ्या, ‘खरा माणूस’, ‘माणुसकीचा मोठेपणा’, ‘बुद्धिमान बिरबल’ हे कथासंग्रह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र अशी सहा पुस्तकं लिहिली. या पुस्तकांतूनही त्यांना फारशी आर्थिक प्राप्ती झाली नाही. ‘आपल्याजवळ जे सांगण्यासारखं आहे, ते सांगायचं'याच निष्ठेने कवळे लिहीत राहिले. गावच्या पश्चिमेला असणारा डोंगर, गावातील जोतीबाचं मंदिर हीच त्यांच्या लिखाणासाठी निवांत ठिकाणं बनली. लिखाण करता-करताच ते गुरे राखण्याचे काम करत होते. त्यातही फारसे पैसे मिळायचे नाहीत. अशा वेळी लिखाणासाठी लागणारे कागद, पेन हे साहित्य आई घेऊन देत होती. आईच्या पाठबळावर ते लिहीत होते. लग्न होईपर्यंत त्यांचं लिखाण सुरू राहिलं. लग्नानंतर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. कामासाठी बाहेर पडणं गरजेचं बनलं. त्या ओढाताणीत लिखाण बंद झालं. घर चालवण्यासाठी हा लेखक शेतात भांगलण करायला गेला. गवंड्याच्या हाताखाली मजुरीला गेला. एका टप्प्यावर त्यांचं लिखाण पूर्णपणे थांबलं. ते फाटका संसार सावरण्याचा चक्रात अडकले.
गेल्या वर्षी पुण्यातील विलास वाघ यांच्या ‘सुगावा' मासिकात त्यांनी ‘लोकशाही’ या विषयावर एक लेख लिहिला. जयसिंगपूर येथील एका वाचकाने तो लेख वाचून त्यांनी कवळेंना त्यांचे साहित्य पाठ्यपुस्तक महामंडळाकडे पाठवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कवळेंनी त्यांचे साहित्य पाठवले. काही दिवसांनी कवळे यांना बोलावून त्यांचा धडा ‘सुगम भारती’च्या सातवीच्या अभ्यासक्रमात येणार असल्याची माहिती दिली गेली. तरीही ‘आपला धडा पुस्तकात येणार’ यावर त्यांचा विश्वास बसला नाही. एक दिवस त्यांना पाठ्यपुस्तक महामंडळाचे पुस्तक मिळाले. त्यातील स्वतः लिहिलेला‘माणुसकी आणि मोठेपणा' हा धडा पाहून लेखक गहिवरून गेला. आपल्या आजवरच्या कष्टाचं चीज झालं ही भावना मनात दाटून आली. तो धडा पाहून सहज तोंडून उद्गार निघाले, "हे बघायला माझी आई पायजे हुती...’ ते ऐकून घरातील इतर भावंडंही रडायला लागली. म्हातारीच्या आठवणीनं सगळ्यांचे डोळे भरून आले...
पुस्तकात धडा आल्यावर कवळे यांना वाटलं, ही बातमी पेपरला देऊया. पण बातमी द्यायला सातारला जायला हवं. त्यांच्याकडे एसटी भाड्यालाही पैसे नव्हते. एक दोघांकडे मागितले, पण मिळाले नाहीत. मग त्यानं पोराच्या गळ्यातील सोन्याचा बदाम विकला. त्यातून जे पैसे मिळाले त्यातून ते सातारला गेले आणि बातमी देऊन आले. या बातमीनंतर ‘शंकर कवळे यांचं लेखन, त्यांचं जगणं, त्यांचा आजवरचा संघर्ष' या गोष्टी समाजासमोर आल्या.

आता शंकर कवळे यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातून लोक येत आहेत. मात्र, त्यांचं राहतं घर पाहून येणारा प्रत्येक माणूस हळहळतोय. सरकारच्या गोरगरिबांसाठी अनेक योजना आहेत. पण या योजना अजून तरी शंकर कवळे यांना त्यांच्या चंद्रमौळ्या झोपडीतून बाहेर काढू शकलेल्या नाहीत. त्यांनी घर मिळावं म्हणून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत, पण शासकीय नियमाप्रमाणे घराला जेवढी जागा लागते तेवढी कवळे यांच्याकडे नाही, त्यामुळे त्यांना घर मिळत नाही. गेल्या वर्षीपर्यंत त्यांच्या घरी वीज नव्हती. त्यांचं तान्ह मूल अंधारात सारखं रडायचं, हे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विजेच कनेक्शन घेऊन दिलं. वीज आलेली आहे, पण गॅस अजूनही नाही. पाठ्यपुस्तकात धडा असलेल्या या लेखकाच्या घरी आजही चुलीवर स्वयंपाक केला जातो आहे. त्यासाठी लागणारं जळण लेखक डोंगरावर जाऊन आणत आहेत...
एका आडवळणी गावच्या शंकर कवळे यांचा धडा पुस्तकात आला म्हटल्यावर लोक कौतुकाने हार आणि शाल घेऊन येत आहेत. पण या फुलांच्या हाराने कवळे यांच्या आयुष्यात सुगंध येणार नाही. किंवा सत्काराच्या शालीने त्यांचं दारिद्रही झाकलं जाणार नाही. पूर्वी गरिबी याचं कारणांमुळे कवळे, यांचं लिखाण थांबलं होतं. ते उपेक्षेच्या अंधारात गेले होते.पण ‘सुगम भारती’तील धड्यामुळे प्रसिद्धीचा सगळा झोत, कवळेच्या चंद्रमौळी झोपडीवर पडलाय. हा झोत काही दिवस राहीलही, पण या झोताच्या प्रकाशात दिसणारा त्यांचा फाटका संसार कसा सावरला जाणार? असा सवाल कवळेंच्या घराची खचलेली भिंत विचारत आहे...
sampatmore21@gmail. com
लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sampat-more-writes-about-writer-shankar-kawle-5679516-NOR.html


0 comments: