‘कौन बनेगा करोडपती’चा नववा सीझन नुकताच संपला. हे पर्व गाजवले महिलांनी. करोडपती तर एक महिला झालीच, पण घरसंसार सांभाळणाऱ्या, फारसं न शिकलेल्या आणि २५/५० लाख रुपये मिळवणाऱ्या इतर दोघींची कहाणीही स्फूर्तिदायक आहे.
‘कौ न बनेगा करोडपती’चा नवव्या सीझनमधील एकमेव करोडपती ठरलेली व्यक्ती एक महिला होती, जमशेदपूरची अनामिका मुजुमदार. त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही कोट्यधीश होऊ शकलं नाही. मात्र, अन्य दोन महिला स्पर्धकांनी अवघ्या देशवासीयांची मने जिंकून घेतली.
त्यांनी देशातील महिलांपुढे आत्मविश्वास, स्वाभिमानाचा वस्तुपाठच ठेवला. या दोघी म्हणजे मुंबईच्या मीनाक्षी जैन आणि बिहारच्या नेहा कुमारी! दोघींतील समान धागा म्हणजे त्या अगदी सर्वसामान्य गृहिणी आहेत; पण तरी त्या केबीसीच्या हॉट सीटवर बसल्या अन् अनुक्रमे २५ व ५० लाख रुपयांची घसघशीत रक्कमही जिंकल्या! ज्या आत्मविश्वासाने अन् जिद्दीने त्या हा खेळ खेळल्या, त्याने खुद्द अमिताभ बच्चनही अचंब्यात पडले. प्रेक्षक अर्थात अवाक् झालेच. या दोघींनी देशभरातल्या महिलावर्गाला संदेश देऊ केलाय - गृहिणी म्हणून स्वत:ला कधीही कमी लेखूू नका. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास नेहमी जागृत ठेवा. त्यांचं भावविश्व, त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची पार्श्वभूमी त्यांनी जेव्हा या खेळादरम्यान जगासमोर मांडली, ते ऐकून साऱ्यांच्याच ओठांवर शब्द उमटले - तुस्सी ग्रेट हो!
मीनाक्षी जैन मुंबईत राहतात. भारतातल्या लाखो महिलांप्रमाणे पती, दोन मुलं, सासरे असा संसार सांभाळतात. त्यांचा जन्म राजस्थानमधील कुंडा या लहानशा गावातला. माहेरी सहा बहिणी आणि एक भाऊ असा मोठा परिवार. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची. परिणामी, मीनाक्षी यांचं लग्न लवकर, वयाच्या १६-१७व्या वर्षीच झालं. साहजिकच त्या फक्त दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करू शकल्या. लग्न झाल्यावर पुढे शिकण्याचा प्रश्नच नव्हता. पण शिक्षणाविषयीची कमालीची ऊर्मी, जिद्द त्या मनात खोलवर बाळगून होत्या. शिक्षण पूर्ण करू न देता लवकर लग्न लावून देणाऱ्या आपल्या वडिलांना अन् दिगंबर जैन समाजालाही त्यांना एकदा तरी सांगायचे होते की, मुलांपेक्षा मुली तसूभरही कमी नाहीत! पण त्यांना तशी संधी मिळत नव्हती. आपल्या परिस्थितीचा बाऊ करत मीनाक्षी हातावर हात ठेवून बसल्या नाहीत.
काळाबरोबर कसे चालत राहता येईल, याची चाचपणी त्या घरातूनच का होईना, सतत करत राहिल्या. त्यासाठी त्यांनी एकमेव पर्याय निवडला, तो म्हणजे वाचन! मीनाक्षी भरघोस वाचत राहिल्या. पुस्तकं, वर्तमानपत्रं, इंटरनेट. हाती येणाऱ्या प्रत्येक साधनाचा त्या अक्षरश: फडशा पाडत राहिल्या. इतिहास, वर्तमानकालीन संदर्भ असोत की आणखी काही, त्या शब्दन् शब्द टिपत राहिल्या. त्यांचा हा धडाका पाहून त्यांच्या बहिणींनी त्यांचे नाव ठेवले ‘गुगल’! त्या वाचनाची टिपणंही काढत राहिल्या. या अफाट वाचनाने जगभरातील सर्व विषयांच्या ज्ञानाचे दरवाजे त्यांना खुले करून दिले. अत्यंत कठीण प्रश्नांची उत्तरंही सेकंदाचा विलंब न लावता जेव्हा त्यांनी दिली, तेव्हा त्यांचे सामान्यज्ञान पाहून अमिताभनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला! निरीक्षण, वाचन अन् आकलन या गोष्टींचे महत्त्व मीनाक्षी यांनी समजून घेतले. म्हणूनच दहावी पास असलेली ही महिला ५० लाखांची मानकरी होऊ शकली. मीनाक्षी यांचं वेगळेपण एवढ्यावरच संपत नाही. त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करताना त्यांना कधी शिकवणी लावली नाही. त्या दोघांचा अभ्यास त्या स्वत:च घेत असत. तोसुद्धा इंग्रजीत.
मुलांना शिकवता-शिकवता आपण स्वत:देखील इंग्रजीवर प्रभुत्व मिळवले, असे त्या अभिमानानं सांगतात. केबीसीत मीनाक्षी म्हणाल्या, ‘डिग्री बडी नहीं होती, ज्ञान बडा होता है...’ हे वाक्य त्यांनी शब्दश: सिद्ध करून दाखवलं. केबीसीच्या मंचावरून त्यांनी आपल्या वडिलांकडे आगळी मागणी केली. त्या म्हणाल्या, ‘तुमच्या अंत्यविधीवेळी मुलींना मुखाग्नी देण्याची परवानगी द्या!’ केवढे हे धाडस. जैन समाजातील बहुतांश कुटुंबांत आजही महिलांचं स्वातंत्र्य, शिक्षण, स्वावलंबन याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे.
मीनाक्षी यांच्या बहिणीचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना वाळीत टाकण्यात आले होते. घटस्फोट हे आजही या समाजात पाप समजले जाते. या घटनेचा मीनाक्षी यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. वडिलांची मानहानी सहन झाली नाही. जैन आणि अन्य समाजांतही मुलांना मिळणारा मानसन्मान मुलींना का लाभत नाही, या प्रश्नाने त्या अस्वस्थ झाल्या. काहीही होवो, एक दिवस केबीसीमध्ये सहभागी होऊन वडिलांना मी त्यांची मुलगी असल्याचा अभिमान मिळवून देईन, असा चंगच त्यांनी बांधला. तो त्यांनी पूर्ण केला अन् पित्याच्या अंत्यविधीवेळी मुखाग्नी देण्याची परवानगी साऱ्या जगासमोर मागितली. मीनाक्षी हे करू शकल्या, कारण वाचनाने त्यांना जगाचा आरसा दाखवला होता. रूढी, परंपरा, परिस्थिती यांपैकी काहीही त्यांना रोखू शकले नाही. वाचनाच्या भक्कम पायावर त्या ठामपणे उभ्या राहू शकल्या. मीनाक्षी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. केबीसीत जिंकलेल्या रकमेची गुंतवणूक करून त्यातून त्या ज्यांचे शिक्षण अडचणीत सापडले आहे, अशा मुलींना मदत करणार आहेत. निव्वळ स्व-सन्मानातूनच एवढा व्यापक दृष्टिकोन त्यांच्यात रुजू शकला असेल.
बिहारमधील नालंदा येथील नेहा कुमारी अशाच गृहिणी स्पर्धक म्हणून केबीसीच्या हॉट सीटवर विराजमान झाल्या. अत्यंत प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या त्या दिसत असल्या, तरी त्या हास्यामागे बिहारसारख्या प्रदेशातील सामाजिक बंधनं, महिला म्हणून मिळत असलेली दुय्यम आणि अस्वस्थ करणारी वागणूक त्यांनी दडवून ठेवली होती, हे यथावकाश समोर आले. अन् तरीही त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असलेला कमालीचा आत्मविश्वास अनेकांना आश्चर्यात टाकून गेला. नेहा कुमारी पदवीधर आहेत, त्यांचे पती सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. तरी नेहा यांना काही सामाजिक, कौटुंबिक बंधनांशी दोन हात करावे लागताहेत. त्या म्हणाल्या, मी हसतमुख राहणारी व्यक्ती आहे. मला नेहमी खूप हसू येते. पण जाहीर कार्यक्रमात मला दिलखुलास, मनमोकळं हसताना माझ्या सासूने पाहिल्यास खैर नाही. घरी गेल्यावर त्या माझ्याकडे डोळे वटारून पाहतात. मी इथे आत्ताही हसते आहे खरी; पण घरी गेल्यावर ऐकावे लागेल - ‘काय फिदीफिदी हसत होतीस!’ म्हणजे फक्त एखाद्या मुलीचे लग्न झाले आहे म्हणून हा समाज तिला मनमोकळे हसूही देत नाही. त्यापुढे जाऊन नेहा कुमारी यांनी सांगितले, त्यांच्या परिवारात सुनेने दिराचे नाव घेतलेले चालत नाही. तसे केल्यास संस्कारहीन मुलगी म्हणून कायम हिणवले जाते! अमिताभ यांच्याशी चाललेल्या चर्चेदरम्यान त्यांच्या दिराचा विषय निघाला, तेव्हा नेहा यांनी ही व्यथा मांडली. विवाहावेळी नेहा यांना त्यांच्या सासऱ्यांनी पसंत केले.
नेहा यांच्या भावी पतीशी त्यांची भेटही घालून देण्यात आली नाही. केबीसीत निवड होऊनही त्याचा फारसा आनंदही पतीच्या चेहऱ्यावर दिसू शकला नव्हता. याउलट ‘तिथे जाऊन ही काय करणार?’ अशीच भावना उमटली होती! या मानसिकतेमुळेच पदवीधर असूनही त्यांना नोकरी करता आली नाही. नेहा घरकामात तरबेज आहेत. कथित आदर्श सुनेप्रमाणे त्या स्वयंपाकात तसेच कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यात कोठेही कमी पडत नाहीत. टिपिकल गृहिणीचे जगणे त्या जगत असल्या तरी शिक्षणामुळे त्यांच्यातील स्व-सन्मानाबद्दलची जागरूकता टिकून आहे.
सभोवताली काय घडते आहे, याची दखल त्या घेत असतात. सोशल मीडिया, इंटरनेट या सध्याच्या काळातल्या ज्ञानसाधनांशी त्यांनी मैत्री केली आहे. त्यामुळेच त्या केबीसीत पोहोचू शकल्या. अन् तेथेही ‘परिस्थिती काहीही असो, दिलखुलास जगा, स्वत:वर विश्वास ठेवा,’ असे सांगणाऱ्या त्यांच्या बाण्याने साऱ्यांना जिंकून घेतले. या पर्वातील २५ लाख रुपये जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धकही ठरल्या. या महिलांनी जिंकलेली रक्कम महत्त्वाची नाही. त्यापेक्षा बिकट परिस्थितीतून वाट काढत बेधडकपणे जगासमोर येऊन अवघ्या महिलांच्या व्यथांना वाचा फोडण्याची त्यांची जिगर लाखमोलाची आहे. अन् त्यांना पाहून सामान्य गृहिणींनी स्वत:तल्या मीनाक्षी वा नेहाला शोधण्याचा प्रयत्न केल्यास हे परिवर्तन कोट्यवधीच्या रकमेपेक्षा अधिक मोलाचे ठरणार आहे!
- सारिका पूरकर-गुजराथी, नाशिक
queen625@gmail.com
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sarika-gujarathi-writes-about-inspiring-winners-of-kbc-5756163-PHO.html?ref=ltrec
रसिकांच्या प्रतिक्रिया
तुस्सी ग्रेट हो !!
रसिकांच्या प्रतिक्रिया
तुस्सी ग्रेट हो !!
या दोघींनी देशभरातल्या महिलावर्गाला संदेश देऊ केलाय - गृहिणी म्हणून स्वत:ला कधीही कमी लेखूू नका. तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास नेहमी जागृत ठेवा. त्यांचं भावविश्व, त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीची पार्श्वभूमी त्यांनी जेव्हा या खेळादरम्यान जगासमोर मांडली, ते ऐकून साऱ्यांच्याच ओठांवर शब्द उमटले - तुस्सी ग्रेट हो!
#Shiv Pachade
FB~ https://www.facebook.com/shiv.pachade
0 comments:
Post a Comment