Tuesday, December 26, 2017

कोषांतर ~ सुप्रिया जाधव


उंचावरून कोसळल्यावर कसे वाटते ?
कडेलोट झाल्या दगडाला विचारून ये
२०१७ या सरत्या वर्षात आणखी एक वाचनीय गजलसंग्रह वाचकांच्या भेटीला येतो आहे. आणखी एक हा शब्दप्रयोग अशासाठी केला, कारण २०१७ या वर्षाने काही चांगले गजलकार आणि गजलसंग्रह गजलरसिकांना देऊ केले आहेत. मात्र आज प्रकाशित होणाऱ्या “कोषांतर” या गजलसंग्रहाचे स्वत:चे असे एक वेगळेपण आहे.
हृदयात दडलेली व्यथेची कस्तुरी
उमगायचा नाही तिचा परिमळ तुला
मराठीमध्ये गजल लिहिणाऱ्या एकूण गजलकारांच्या तुलनेत स्त्री गजलकारांचे प्रमाण अगदीच अत्यल्प आहे. अगदी सुरेश भट यांच्या समकालीन गजलकारांपासून ते आजपर्यंतचा मागोवा घेतला तर स्त्री गजलकारांची एकूण संख्या ५० देखील होत नाही. त्यातही सातत्याने आणि तंत्रशुद्ध आणि आशयपूर्ण गजलयोगदान देणाऱ्या स्त्री-गजलकारांची संख्या अर्ध्याहून अर्धी होती. पण, जी गजल रसिकांच्या भेटीला येत आहे ती नक्कीच मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणारी आहे.
हिरकणी इतकीच फरफट रोज होते
मात्र अमुचा पाठ अभ्यासात नाही
या सिग्नेचर शेराने अनेक वाचकांनी आज भेटीला येणारा गजलसंग्रह कुणाचा हे नक्कीच ओळखले असेल. आज “सुप्रिया मिलिंद जाधव” यांचा “कोषांतर” हा गजलसंग्रह प्रकाशित होतो आहे. कालखंडाचा विचार केला तर सुप्रिया जाधव यांच्या गजललेखनाचा प्रवास हा साधारण २००१ नंतरचा असावा. मात्र त्यांच्या गजलेतील परिपक्वता ही त्यांच्या आधीच्या पिढीतील स्त्री आणि पुरूष दोहोंच्या गजलच्या समकक्षेला पुरून उरणारी आहे.
तिच्या अश्रूंमधे मनसोक्त दुनिया नाहलेली
जगाला प्रश्न पडलेला कसे दव ओसरेना ?
मी ह्या लेखाचा प्रवाह अजिबातच तुलनात्मक वगैरे ठेवणार नाही. आणि जरी तो तसा ठेवायचा झाल्यास आधीच्या पिढीतील अनेक स्त्रीगजलकारांच्या पंगतीत सुप्रिया जाधव यांची गजल मनाचे स्थान पटकवणारी आहे, यात तीळमात्र शंका नाही. गजल प्रवासाच्या ज्येष्ठताक्रमात सुप्रिया जाधव हे नाव उशिरा येत असले तरीही गजलेतील काव्यगुणांच्या श्रेष्ठताक्रमात त्यांच्या गजलांनी बाजी मारलेली आहे. म्हणूनच संगीता जोशी, क्रांती साडेकर यांच्या नंतरच्या ठळक नामावलीत सुप्रिया जाधव हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
असे सामावले दोघे मिठीमध्ये, जणू की ;
अहंकारास निष्ठेचा दुरावा सोसवेना
सौंदर्यनिर्मिती हा काव्याचा हेतू असला, तरी आनंद हेच त्याचे फळ होय. काव्यातील शब्दांचे वेगळेपण, त्याचे व्यापकपण, ते अनुभविण्याची पध्दत, त्यातील प्रतिमा, प्रतिभा आणि सौंदर्य. त्याला येणारे कलारूप, काव्यानंदाचे स्वरूप आदि काव्यविचार आजच्या साहित्य विचाराचे मुलभूत आणि महत्वाचे चर्चाविषय आहेत. सर्वांना समजण्याजोगे, सुलभ शब्द, साधी सोपी गोष्ट असावी इतकीच काव्याकडून अपेक्षा असते.
टाळता येतात झालेल्या चुका
एवढा निष्कर्ष काढूयात का ?
हा कितीतरी सामंजस्यपूर्ण विचार त्यांनी आपल्या गजलेतून मांडलेला आहे. याच गजलेतील मला आवडलेला एक शेर इथे उद्घृत करतो आहे.
झेप पृथ्वीची... पडावी ‘तोकडी’
अन नभाचा प्रश्न हा की ‘का झुका ?’
कवितेला भावनेचा प्रकट आरसा असेही म्हणतात. हा आरसा सर्वात आधी त्या कवीचे प्रतिबिंब दाखविणारा असतो. त्या त्या वेळच्या कवितेतून त्या वेळचा भाव उलगडत जातो. कविता ही कवीचे अंतरंग असते, आत्मसंवाद किंवा रसिकसंवाद हा त्यालाच जोडून येणारा गुण आहे. तो साधायचा प्रयत्न अनेकांनी अनेक प्रकारानं केलेला दिसतो. मात्र सुप्रिया जाधव यांच्या शैलीत वैविध्यता आहे.
मनाचा आरसा जर मानते आहे तुला
खरे प्रतिबिंब दाखवल्याविना तडकू नको
असा थेट संवाद... आणि
मनाला मागणे सुचण्याअगोदर
उडाला केस माझ्या पापणीचा
अशी अलवारता सुप्रिया जाधव यांच्या गजलेत ठायी ठायी प्रत्ययाला येते.
वाचनात आलेला एक संदर्भ आठवतोय, विष्णुशास्री चिपळूणकर हे पहिले वाड़मयीन समीक्षक. ते बाह्यालंकारापेक्षा कवीच्या अंत:करणाच्या स्वाभाविक उद्गारांनाच काव्यमूल्य मानायचे. (वास्तविक काव्याची खरी ओळख तिथेच तर होत असते.) त्यांची दृष्टी सौंदर्यवादी आणि आस्वादक अशी होती. माणसांच्या मनोधर्मांपैकी संवेदनेशी काव्याचा विशेष संबध असतो.
“विदारक सत्य” रेखाटून जाते
गुन्हा अक्षम्य घडतो लेखणीचा
सजा कोणती अखेर देऊ लेखणीस ह्या ?
मनात ‘जे जे’ येते ‘ते ते’ मांडत नाही
काव्यातील श्रेष्ठता त्यातील जीवनदर्शनाच्या व्यापकतेवर आणि श्रेष्ठतेवर अवलंबून असते हे आगरकरांनीही सांगीतले आहेच. शुध्द काव्याचा हेतू रसिकांना आत्यंतिक आनंद देण्याचा असतो. ह्यात सुप्रिया जाधव यांची गजल आपली काव्यात्मकता आणि त्यातून संप्रेषित होणारा काव्याशय यांच्या जोरावर नक्कीच अग्रेसर आहे.
तुझ्या संगती मार्ग निर्धोक वाटे
दिशांना भ्रमांची चिथवणूक नुसती
काव्याचा आणि गजलेचा मुख्य विषय भावना हाच असतो. भावनेइतका विकारक्षम, वैचित्र्यमय नि मनोरंजक विषय साऱ्या सृष्टीत सापडणार नाही. भावनेची स्वरूपे आणि कारणे जशी अनंत असतात तशीच कार्येही अनंत असतात. कवीने कुणाचेही अनुकरण न करता आपल्या काव्यप्रकृतीस अनुसरूनच कविता करावी. या उक्तीला अनुसरून शैली आणि आशय या दोहोंच्या बाबतीत सुप्रिया जाधव यांची गजल आपले वेगळेपण सिद्ध करते.
सहाही ऋतुंना तुझा गंध येतो
निसटत्या क्षणांचीच जपणूक नुसती
निसर्गासही समर्पणाचे महत्त्व कळते
नवी पालवी फुटण्यासाठी जुनाट झडते
कवितेतला वा गजलेतला भाव म्हणजेच निखळ आनंदरस होय. रसाचा वरचा थर जरी सुख किंवा दु:ख यापैकी एका भानवेचा असला तरी त्याच्या खालील थर नेहमी आनंदाचाच असतो. रस हा काव्याचा आत्मा आहे. सर्व ललित कलांमध्ये काव्य ही सर्वश्रेष्ठ कला होय. कारण काव्याने होणारा परिणाम चिरकाल टिकणारा असतो. हे सारेच गुण ओघाने सुप्रिया जाधव यांच्या गजलेत वाचावयास मिळतात.
चढवत जा तू इमल्यांवरती खुशाल इमले
दगड पायथ्याचा ‘भरभक्कम’ सरकवू नको
आनंद ही ज्ञानाची पुढची पायरी होय. भावनेच्या चिंतनापासून आणि अनुभावापासून होणारा हा दुहेरी आनंद असतो. ह्या आनंदाचा आस्वाद घेण्यासाठी रसिकाच्या अंगी विवेचनशक्ती, कल्पनाशक्ती आणि सहानुभूतीक्षमता असावी लागते. अशा प्रत्येक रसिकाला दखल घ्यायला भाग पाडणारी सुप्रिया जाधव यांची गजल आहे.
स्वतःची निर्मिली आहे जरी ओळख निराळी
स्वतःला गोवते आहे पुन्हा नावात त्याच्या
फिकासा वाटला त्याच्यापुढे मृदगंधसुध्दा
सुगंधी श्वास विरघळला जसा श्वासात त्याच्या
मध्यंतरी एका लेखात माझ्या माहितीप्रमाणे भूषण कटककर यांनी सुप्रिया जाधव यांच्या गजल आणि कवितांच्या बाबतीत एक सुंदर वाक्य लिहिले होते. “सुप्रिया जाधव यांच्या गजलेवर 'एकांगीपणाचे व प्रेमविषयक गजल' असे शिक्के मारण्यात अक्षम्य घाई झालेली आहे.” आणि त्याच्याच पुढे त्यांनी याहून सुंदर एक वाक्य लिहिलेले आहे... “त्यांचा 'विषयांचा आवाका' बघा.” हा आवाकाच आज संग्रहरुपाने आपल्या भेटीला येतो आहे. कटककर यांच्या विधानाला जोडून मी पुढे असे म्हणेन की, तत्पूर्वी नात्यांची बदलती परिभाषा सांगणारा त्यांचा एक शेर... सोबतच त्यांनी एका नव्या प्रतीकाचा वापर आपल्या गजलेत किती सहजगत्त्या केलाय याचीही प्रचिती वाचकांना येईल.
फेविकोलचा जोड देउया का नात्यांना ?
सख्खा-सख्ख्याशीही नाते टिकवत नाही
प्रेम, प्रीती यावर लिहिणारी कवयित्री पण त्रयस्थाच्या भूमिकेतून विचारपूर्वक, भावनेत ओंथबणारी ऋजुता पण भावनेत वाहून न जाणारा विचार त्यांच्या गजलेत प्रामुख्याने दिसून येतो. मनाच्या पाण्यात उठणारे तरंग त्यात आहेत. काव्याच्या आणि गजलेच्या सौंदर्य मांडणीइतकेच गंभीर विचार व त्यातील गंभीर सौंदर्य गजलेला पोषकता प्रदान करत असते. ही पोषकता सुप्रिया जाधव यांच्या गजलेत अनुभवायला मिळते.
आजकाल सर्रास असे का अतर्क्य घडते ?
भल्या पहाटे मनातली इच्छा मावळते
मनातल्या आशयाला स्पष्ट रूप देणारी कवयित्री म्हणूनच त्यांची गजल ही काव्यप्रवाही आणि त्यातील आशय आत्मनिष्ठ आहेत. आंतरबाह्य ते सुंदर आहेत. काव्यातील सूक्ष्म विचार, त्यांच्या सुहृद आविष्कार आणि समरसून मांडलेला विषय, जपलेला वेगळा बाज, वेगळी शैली ह्या साऱ्याच बाबतीत सुप्रिया जाधव यांची गजल वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी आहे.
बहरला बहावा जणू सांगतो
समस्या निवळतील ध्यानस्थ बस
ह्या आणि यांसारख्या असंख्य शेरांचा एक सुंदर कोष बनून आपल्या हाती येते आहे. एकूणच साहित्य प्रांतातला सर्वात हळूवार, संवेदनशील प्रकार म्हणजे कविता. कविता तुमच्या दु:खाला शब्द देते. तर गजल ही त्यातील वेदनेलाही लय देते आणि सुखाला झळाळी देते. आशयघन गजलांचा हा सुंदर कोष “कोषांतर”च्या रूपाने आपल्या भेटीला येतोय. प्रत्येक गजलरसिकाने आवर्जून संग्रही ठेवावा, असा हा गजलसंग्रह असणार आहे, याविषयी मी अत्यंत आशावादी आहे.
- जनार्दन केशव म्हात्रे

0 comments: