Friday, February 23, 2018

मराठी शाळा की इंग्रजी शाळा

साभार चंदन तहसीलदार

माझी मुलगी अडीच वर्षांची झाली आणि तेव्हापासूनच तिला शाळेत/ नर्सरीत/ प्लेग्रुप मध्ये टाकण्याबाबत अनेकांनी सूचनावजा आज्ञा द्यायला सुरुवात केली.
(लग्न ,परीक्षा, शाळा अश्यावेळी हे सल्ले देणारे खरोखर वेळ येते तेव्हा मदतीला धावून येते तर हे जग अधिक सुंदर दिसले असते नाही?)
तर हीच शाळा छान आणि तीच शाळा बंडल वगैरे सल्ले पाकिस्तान कडून होणाऱ्या गोळीबाराप्रमाणे रोज माझ्यावर होऊ लागले.
अर्थात आमच्या मराठी शाळेत "ऐकावे जनाचे करावे मनाचे" असं नीट शिकवल्यामुळे मी सर्वांनाच पुरून उरलो.
मी स्वतः मुलात मूल होऊन खेळणारा असल्याने (काही लोक उगाच त्याला बालिश म्हणतात.) प्ले ग्रुपचं अनावश्यक ओझं (तिच्या डोक्याला आणि माझ्या खिशाला) मी लादलं नाही.
तर आता अधिक वेळ आणि शब्द न दवडता मूळ मुद्द्याकडे येतो.
गेल्या आठवड्यात एका इंग्रजी शाळेत प्रवेशाची माहिती काढण्यासाठी गेलो.
पहिला प्रश्न
क्लार्क बाई - "काय करता?" 
मी - नोकरी.
त्या - कुठे?
मी - एमिरेट्स.
त्या - शाळेची फी २७०००
बिल्डिंग डोनेशन - ८०००
पुस्तकांचे आणि कपड्यांचे मिळून - 3500
ऍडमिशन फी - 2500
हे पैसे एप्रिलच्या १० पर्यंत भरावे लागतील.
मी - शाळा जून मध्ये सुरू होते ना?
त्या - हो पण एप्रिलमध्येच ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल.
मी - पूर्ण वर्षाची फी भरून?
त्या - हो.
मी - फॉर्म मिळेल का?
त्या - त्यासाठी आधी तुमच्या मुलीचा इंटरव्यू होईल. फॉर्मचे १५० रुपये.
मी - इंटरव्यू मध्ये काय विचारणार?
त्या - विशेष काही नाही. What is your name? Sing a song.. वगैरे.
मी - इतकं सगळं मुलांना आधी येणं अपेक्षित आहे?
त्या - प्री स्कूल मध्ये शिकवतात.
मी - पण माझी मुलगी नाही गेली हो..
त्या - (क्षणभर विचार करून.) बरं. घेऊन या. पाहू पुढे.
मी - ठीक आहे. येतो .. (वाट बघा..)

या धक्क्यातून सावरायला ७-८ दिवस लागले.
मग पुढल्यावेळी जाताना मुलीला घेऊनच गेलो. अर्थात एका मराठी माध्यमाच्या शाळेत.
ऑफिसमध्ये सरस्वती, गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराज विराजमान असल्याने बाहेर चपला काढून यायला सांगितलं.
आधी त्या बाईंनी दिविजाला नाव विचारलं.
मग म्हणाल्या, "मुलगी गोड आहे हो! आमची छान गट्टी होईल."
मग त्यांनी मला सांगायला सुरुवात केली..
आपली शाळा या वॉर्डातली गुणवंत शाळा म्हणून ओळखली जाते. मी साडे तीन मिनिटात ही शाळा "आपली शाळा" झाली याचा विचार करायला लागलो.
"पहिलीपासून आम्ही इंग्रजी शिकवतो पण शक्यतो सगळं मौखिक.."
"म्हणजे मुलांना तोंडओळख होते.
तिसरीनंतर आम्ही इंग्रजी लिहायला शिकवतो.
तोवर त्यांना मराठी अक्षरे लिहिण्यावाचण्याची सवय झालेली असते मग गोंधळ होत नाही."
पुढे मग पाचवीनंतर सेमी इंग्रजी किंवा पूर्ण मराठीचा पर्याय आहेच.
शिवाय केम्ब्रिज विद्यापीठाशी संलग्न एक अभ्यासक्रम आम्ही "आमच्या मुलांसाठी" घेउन येतोय.
मी - वा छान. पण तुम्ही फी बद्दल काही बोलला नाहीत.
त्या - आधी तुम्हाला शाळेत कोणकोणत्या गोष्टी केल्या जातील ते सांगते. मग फी बद्दल बोलू.
इथे आम्ही वेगवेगळे दिवस साजरे करतो.
शुक्रवारी शिवजयंती केली.
आज भाजी दिवस आहे. भाज्यांची ओळख व्हावी म्हणून..
"दिविजा, आपण नंतर भाज्या बघायला जाऊ हं."

" मला नाव आणि पत्ता द्या. हा फॉर्म आहे. याची किंमत ३० रुपये. आणि शाळेची वर्षाची फी ३००० रुपये. यात पुस्तके वगैरे सगळं.
फक्त गणवेश वेगळा शिवून घावा लागेल. आणि रोज डबा द्यावा लागेल."
नंतर त्या दिविजाला घेऊन वर्ग दाखवून आल्या.
जवळजवळ २० मिनिटे हे सर्व ऐकताना मला अचानक वाटायला लागलं शाळेत प्रवेश घेणं किती महत्त्वाची जबाबदारी आणि निर्णय आहे पालक म्हणून..

अर्थात माझा निर्णय आधी झालाच होता. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले.
तुम्ही कोणत्या शाळेत प्रवेश घ्याल ?

- चंदन तहसीलदार.

0 comments: