Wednesday, June 30, 2021

नथुराम गोडसे आणि गांधी


३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली. 

ह्याच संदर्भात गांधीहत्येच्या खटल्याचे कागदपत्र वाचताना नथुराम गोडसेंच्या जबानीत मला असा एक एक उल्लेख आढळला की, “...जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी सुरु केलेला उपवास सोडण्यासाठी त्यांनी ज्या ७ अटी ठेवल्या होत्या त्या सर्व हिंदूविरोधी होत्या...” मला खूप विचार करूनही ह्या नेमक्या अटींपैकी एकही आठवली नाही. थोडंफार शोधूनही कुठेच काही मिळालं नाही. आपल्याला शाळेत (किंवा ‘सरकारी’!) इतिहास सांगताना ह्या अटी नेमक्या काय होत्या हे कधीच सांगितले गेले नाही. जानेवारी १९४८ मध्ये गांधी हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी उपासाद्वारे प्रयत्न करत होते वगैरे वरवरचे उल्लेखच सगळीकडे आहेत. अनेकांनी ते वाचलेही असतील. मग गोडसेंनी त्यांच्या जबानीत असं का सांगावं की त्या सर्व अटी हिंदूविरोधी होत्या? अश्या काय अटी होत्या त्या?

ब्रिटीश लायब्ररीत जुने न्यूजपेपर आर्काईव्झ शोधणं सुरु केलं. १९६६ पासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारे ज्येष्ठ इतिहाससंशोधक आणि लेखक डॉ वासुदेव गोडबोलेही योगायोगाने नेमका हाच संदर्भ बराच काळ शोधत आहेत असे समजले. त्यांना मी ह्याबद्दल विचारणार इतक्यात त्यांचाच निरोपवजा हुकूम आला की ‘टाईम्स ऑफ इंडीया’ चे जानेवारी १९४८ मधले अंक पहा आणि ह्या ७ अटी काय ते शोधून कळवा. मग मात्र माझी खात्री झाली की आता हे प्रकरण तडीस न्यावेच लागेल.

पहिल्यांदा अर्थातच जानेवारी १९४८ चे ‘टाईम्स ऑफ इंडीया’ शोधायला घेतले. सुरुवात १२ जानेवारी १९४८ पासूनच्या अंकांनी केली. गांधींच्या उपवासाची सुरुवात - तब्येतीचे अपडेटस वगैरे सगळी माहीती होती पण त्यांनी उपास सोडण्यासाठी नेमक्या अटी काय ठेवल्या होत्या हे मात्र कुठेच नव्हते. १९ जानेवारी १९४८ च्या ‘टाईम्स ऑफ इंडीया’ मध्ये गांधींनी उपास सोडल्याची बातमी अगदी फ्रंट पेजवर होती आणि त्यात त्यांच्या त्या ७ अटी मान्य झाल्याची बातमीही होती. पण संपूर्ण पेपर शोधूनही त्या अटी मात्र काही सापडल्या नाहीत. गोडसे म्हणतात त्याप्रमाणे त्या खरंच हिंदूविरोधी होत्या का हे नेमकं समजायचा काही मार्ग नव्हता. मग आता काय करावं?

मग त्याच सुमाराचे सहज कुतूहल म्हणून बाकीचे जुने इंग्रजी न्यूजपेपर्स शोधायला सुरुवात केली. १९ जानेवारीच्या ‘डर्बी इव्हिनिंग टेलिग्राफ’ ह्या वर्तमानपत्रांत गांधींनी उपास सोडल्याची बातमी दिसली आणि सोबत हापण उल्लेख दिसला की त्या सात अटींपैकी एक अट ही होती की सप्टेंबर १९४७ च्या दंग्यानंतर दिल्लीतल्या ज्या ११७ मशीदी ज्यांची (हिंदू आणि शीखांनी) देवळं किंवा घरं बनवली होती त्यांच्या पुन्हा मशीदी बनवण्यात याव्यात. हे वाचून मला नाही म्हटलं तरी धक्काच बसला. एकतर कोणत्याही  भारतीय पेपरमध्ये ह्यातले कोणतेच उल्लेख नसावेत आणि ह्या सात अटी जर सगळ्याच अश्याच असतील तर मग?

मी इथले न्यूजपेपर आर्काईव्हज अजून जोमाने शोधू लागलो. ‘कोव्हेंट्री इव्हिनिंग टेलिग्राफ’, ‘डंडी इव्हिनिंग टेलिग्राफ’, ‘ग्लुस्टरशायर इको’, ‘द सिटीझन’, ‘बेलफास्ट न्यूज’, ‘बेलफास्ट टेलिग्राफ’, ‘बर्मिंगहॅम गॅझेट’, ‘द वेस्टर्न मॉर्निंग न्यूज’, ‘नॉटींघम इव्हिनिंग पोस्ट’, ‘हेराल्ड एक्सप्रेस’, ‘द स्कॉट्समन’, ‘लॅंकास्टर गार्डीयन’ वगैरे ह्या आणि अश्या फारश्या माहीत नसलेल्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या आर्काईव्हजमध्येही गांधीच्या उपवासाबद्दल बातम्या आहेत. (ही सगळी कात्रणं आहेत बरं का माझ्याकडे!) पण शोधत असलेल्या सगळ्या ७ अटी मात्र कुठेच मिळत नव्हत्या.

हा शोध आता सोडून द्यावा असा विचार मनांत येत असतानाच ‘द यॉर्कशायर पोस्ट’ चा १९ जानेवारी १९४८ चा अंक पहाण्यात आला आणि त्यात ह्या ७ अटी एकदाच्या मिळाल्या. काय होत्या बरं ह्या अटी? खाली मी त्या अटी देतोय. हा अटींवरून ह्या अटी खरंच गोडसेंनी सांगितल्याप्रमाणे हिंदूविरोधी होत्या का हे ज्याचं त्याने ठरवावं. गांधींचे विचार चूक किंवा बरोबर हे ज्याचं त्याने ठरवावं. माझं मत मी सांगणार नाहीये. 

अट १ - दिल्लीजवळच्या मेहरौली येथे मुसलमानांना त्यांचा उरूस साजरा करायची परवानगी असावी. (मेहरौलीत ख्वाजा कुतुबुद्दीनची मशीद होती. दंग्यांत त्याची मोडतोड झाली होती. हिंदू आणि शीखांनी त्याच्या आजूबाजूच्या मुसलमानांना हाकलून लावलेले होते. ह्या ख्वाजा कुतुबुद्दीनचा उरूस २६ जानेवारी १९४८ रोजी व्हायचा होता. पण तो करताना त्यात अडथळे येण्याची शक्यता होती. गांधींना हे नको होते.)

अट २ - दिल्लीतून पळून गेलेल्या मुसलमानांना सुरक्षितपणे परत येऊ द्यावे. 

अट ३ - दिल्लीतल्या ज्या ११८ मशीदींची देवळे बनवण्यात आलेली आहेत त्या मशीदी पुन्हा मुसलमानांना देऊन टाकण्यात याव्यात. 

अट ४ - संपूर्ण दिल्ली मुसलमानांसाठी सुरक्षित बनवण्यात यावी. 

अट ५ - रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुसलमानांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी. 

अट ६ - हिंदू आणि शीखांनी मुसलमानांवर टाकलेला आर्थिक बहिष्कार मागे घेण्यात यावा. 

अट ७ - दिल्लीत उरलेले काही मुस्लिम वस्त्यांचे भाग पाकिस्तानातून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासितांनी वापरू नयेत. 

सोबत ह्या सगळ्या कात्रणांचे फोटोही पहाता येतील. जाताजाता रामायणातल्या एका श्लोकाची मात्र नक्की आठवण करून देऊ इच्छितो:

मरणान्तानि वैराणि निवॄत्तं न: प्रयोजनम् |
क्रीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव || (रामायण ६ - १०९ - २५)

इत्यलम्!

- संकेत कुलकर्णी (लंडन)

Source : facebook

Friday, June 25, 2021

संग्रहित

विलक्षण योगायोगाची
एक भावुक सत्यकथा

💕❣️
 कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी..

 मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

*‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’*

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

     *~ श्री. धनंजय देशपांडे, लातूर*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 

चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

           ~ बी. रघुनाथ
✨✨✨

मराठी भाषा

विलक्षण मराठी भाषा....😇 

*रस्ता - मार्ग*
* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

*खरं - सत्य*
* नेहमी खरं बोलावं हा उपदेश.
* सत्य म्हणजे सोबत पुरावा जोडावा लागतो.

*घसरडं - निसरडं*
* पडून झालं की घसरडं.
* सावरता येतं ते निसरडं.

*अंधार - काळोख*
* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
* निसर्गात जाणवतो तो काळोख.

*पडणं - धडपडणं*
* पडणं हे अनिवार्य.
* धडपडणं हे कदाचित सावरणं.

*पाहणं - बघणं*
* आपण स्वत:हून पाहतो.
* दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

*पळणं - धावणं*
* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

*झाडं - वृक्ष*
* जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.

*खेळणं - बागडणं*
* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
* जे मुक्त असतं ते बागडणं.

*ढग - मेघ*
* जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
* जे नक्की बरसतात ते मेघ.

*रिकामा - मोकळा*
 * वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा. 
* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

*निवांत - शांत*
*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

*आवाज - नाद*
* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
* जो मोराच्या चालण्यानं होतो तो नाद.

*झोका - हिंदोळा*
* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 
* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

*स्मितं - हसणं*
* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

*अतिथी - पाहुणा*
* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

*घोटाळा - भानगड*
* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Saturday, June 12, 2021

पुलं

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख -

 'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... 

हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला मी हॉस्पिटलमधे गेलो होतो !

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... 

त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.
अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं.

एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्ती मागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) 

लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले.

डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... 

अशा विचारांतच मला झोप लागली...

मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! 
आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत? नव्हतं सहन होत मला हे. मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते ! की कळूनही उपयोग नव्हता ?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील ... अगदी कायमचीच !!!

#fbshare