Sunday, July 19, 2026
Friday, May 15, 2026
'आनंदरेषा' पुसल्या जात नाहीत...
अथांग मनाचा समुद्र डॉ आनंद नाडकर्णी
Sunday, May 3, 2026
_भरमसाठ फी घेणाऱ्या मोठ्या शाळा कशाला हव्यात
Sunday, April 19, 2026
पुस्तक परिचय
Tuesday, April 7, 2026
गोष्ट १
Thursday, September 19, 2024
एका घराचं विसर्जन
एका घराचं विसर्जन
ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.
- डॉ. आनंद नाडकर्णी
सकाळ वृत्तसेवा
Updated on: 08 September 2024, 12:23 am IST
गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे 'कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.' हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा 'व्यवसाय-मित्र' म्हणजेच सायकिअॅट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.
ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.
आमची मैत्री घट्ट होत गेली आणि त्या घरातली माझी झोपायची जागाही पक्की झाली ती पुढच्या चार दशकांसाठी. माझे वडील एकोणीसशे नव्वद सालच्या जानेवारी महिन्यामध्ये गेले आणि त्या टप्प्यावर अनिल हा मित्राच्या रूपातून माझ्यासाठी सुद्धा 'बाबा' झाला.
हळूहळू बाब्या, बाबडू आणि 'Babs by The Bay' अशी अनेक नामकरणे झाली त्याची. सुनंदा पुढे निघून गेल्यावर, बाबाची आई इंदुताई त्या घरात आली. बाबाच्या एकटेपणावर तिनं वीस वर्षे मायेची गोधडी घातली.
ह्या घरातल्या माझ्या पहिल्या दहा-पंधरा वर्षांच्या मैत्रीवर मी लेख लिहिला होता. तो 'लेखकाचे घर' ह्या पुस्तकात मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळेंनी प्रसिद्ध केला आहे. तर ह्या घरातल्या मजेदार मायेच्या क्षणांची मला सवय होत गेली. मी पहाटेच्या साखरझोपेत असताना बाबाची जाग सुरू व्हायची.
तो डेस्कटॉप कॉम्प्युटरवर जाऊन बसायचा. सकाळी उठवायची जी वेळ मी सांगितली असेल त्या वेळी बासरी वाजवून, गाणे म्हणून मला उठवायचा. मग चहासोबत गप्पा. बाबासाठी ब्रेकफास्ट म्हणजे दिवसातली महत्त्वाची इव्हेंट.
आजीने ट्रेनिंग दिलेली ज्योती ही मुलगी आजीनंतरची आठ वर्षे त्याच निगुतीने बाबाची काळजी घ्यायची. मस्त नाश्ता करून तयार झालो आणि घरातून बाहेर पडणार तर नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये बाबाला फोटो काढायची हुक्की यायची. अनेक व्यक्ती आणि घरांचा एकमेव, अधिकृत फोटोग्राफर होता तो.
संध्याकाळी कामे आटोपली की वेध लागायचे पुन्हा त्या घरी यायचे. रात्रीचे चारीठाव जेवण; साधे पण रुचकर. त्यानंतर ताजे ताक, मौसमी फळे आणि त्यानंतर चॉकलेट किंवा आइस्क्रीम किंवा केळी, पेरू अशा फळांचे मजेदार फ्रूट सॅलड. आम्हाला गप्पांना कोणतेही विषय पुरायचे. तत्त्वज्ञान ते गॉसिप, इतिहास ते राजकारणातील सद्य:स्थिती, साहित्य ते संगीत...
काहीही. बाबा जोक्स सांगायचा. किस्से आणि गाणी. एकमेकांचे लिहिलेले मजकूर एकमेकांना वाचायला देणे. रात्रीचे दहा-साडेदहा झाले की तो म्हणायचा, "चला, झोपण्याआधी आनंदला फोन करायची वेळ झाली." गेली पंचवीस-तीस वर्षे, दिवसातला शेवटचा फोन तो मला (किंवा मी त्याला) करायचो. प्रत्यक्ष समोर असलो की हा त्याचा आवडता डायलॉग,
आनंददायी क्षणांनी भरलेले दिवस. बाहेरचे तणाव, दुखे तिथेच ठेवून इथे विसाव्याला यायचे. माझी पत्नी सविता ह्या घराला म्हणायची, 'हे तुझे माहेर'. तर माहेरच्या सवयी सुटत नाहीत. फोटो, पेंटिंग, रेषाचित्र रसिकतेने नेमके कसे पाहायचे त्याची सवय इथे लागली.
सुरांना समजून कसे घ्यायचे ते समजले. स्वादाला निर्भयपणे उपभोगायला मिळाले आणि सवयीच्या बिछान्याचा स्पर्श... सकाळच्या सालंकृत पोहे-खिचडीचा सुवास. माझी ज्ञानेंद्रिये तेजतर्रार केली ह्या घरानं.
ह्या घरात बाबामुळे भेटलेल्या अनेक जणांमुळे माझी नात्यांची रेंज इतकी वाढली. बाबाचे काही मित्र पुढच्या काळात माझेही 'स्वतंत्रपणे' मित्र झाले. सदाशिव अमरापूरकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, कार्यकर्ता अरुण ठाकूर, सतारमय विदुर महाजन, लेखक उमाताई आणि निरुपाक्ष कुलकर्णी... किती नावे घेऊ.
ह्या घराने विचाराचा परीघ विस्तारायला केवढी मदत केली. सुमित्रा (भावे) मिळाली, सुनील (सुखटणकर) आला
आणि सिनेमामाध्यमाची द्वारे खुली झाली. ह्या सगळ्यामध्ये भर मुक्तांगण परिवारामधल्या आमच्या असंख्य पेशंट, कार्यकर्त्या मित्रांची.
सततचे जागते-खेळते घर. ऐतिहासिक दृष्टीने ह्या घराच्या दरवाजाला कधीही रात्रीची कडी लावली जात नसे. गेली अडीच वर्षे ह्या घरामध्ये महिन्याचे काही दिवस मी एकटाच असतो वसतीला. मीही घराची सवय मोडत नाही. ह्या घरातल्या बाबाच्या खोलीमध्ये मात्र मी आता जात नाही. मी त्या खोलीच्या दरवाजाबाहेरूनच कधी बाबाला साद घालतो.
अनेक घरांमध्ये असते तसे बाहेरच्या खोलीत एक कालनिर्णय टांगलेले असायचे. त्या कॅलेंडरवर माझ्या राहण्याचे दिवस 'मार्क' केलेले असत. ह्या काळात बाबा बाहेरचे कार्यक्रम घेत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हा दोघांची नवी नवी रेस्टॉरंट्स शोधायची सवय मागे पडली होती. घरगुती अन्नाशी असलेली बांधिलकी वाढलेली होती.
बाबाला हुक्की यायची पिझ्झा खायची. मग आम्ही ती ऑर्डर देण्याचाही उत्सव करायचो. खाणारी तोंडे वाढली की अशी ऑर्डर करायला मजा यायची. मुक्ता, यशो ह्या मुली आणि त्यांची कुटुंबे आली की जोरदार अंगतपंगत व्हायची.
माझ्या गळ्यात घालायची स्लिंग बॅग असते चामड्याची. त्याचे डिझाइन आणि ती ऑर्डर करून घेणे हे बाबाचे काम. अनेक वर्षे तो मला अनेक गोष्टी पुरवायचा. त्याची रुपयातली किंमत त्याला विचारणे हा गुन्हाच असायचा.
माझा मुलगा कबीर छोटा असताना दर भेटीमध्ये त्याच्यासाठी विशिष्ट चिवडा आणि श्रुजबेरी बिस्किटे ह्यांची भेटपाकिटे हजर असणारच. आजी होती तेव्हापर्यंत घरी केलेल्या खाऊचे डबे सवितासाठी म्हणून घेऊन यायचो. पुण्याला येण्यासाठी मी सकाळी सहाच्या सुमारास ठाण्याच्या घरातून निघतो. साडेसात ते पावणेआठ ह्या दरम्यान बाबाचा पहिला फोन... "कुठपर्यंत?"
आयुष्यभर इतके भटकलेला बाबा. पण त्याला घराचे वेड होते. त्याच्या त्या राज्यात तो सुखी असायचा. भिंतीवर लावलेले त्याचे फोटो, त्याची आणि इतरांची पेंटिंग्ज, सहजच नजर वेधून घेणारी त्याची काष्ठशिल्पे, दिवाळी ते दिवाळी बदलला जाणारा दिवाणखान्यातला कंदील (अर्थात नाइटलॅम्प) अशा वस्तू घराला जिवंत करायच्या.
आजी आणि ज्योतीच्या व्यवस्थितपणाला न जुमानता स्वतःची 'पसारा' हौस बाबा पूर्ण करायचा तो त्याच्या खोलीत. हा अगदी केंद्रशासित प्रदेश. आमच्या नजरेला न दिसणाऱ्या अनेक वस्तू त्या 'पिसाऱ्या'तून त्याच्या हाताला अलगद लागायच्या. त्याच्या कपड्याच्या कपाटातल्या एका फळीचा अर्धा हिस्सा त्याने माझ्यासाठी ठेवलेला. माझे कपडे,
टॉवेल मात्र अगदी घडी घालून ठेवलेले. बाहेर घालायच्या कपड्यांचा सेट ठेवला तर तोही कडक इस्त्री करून सज्ज.
कोरोना महासाथीच्या काळातही मी नियमितपणे पुण्याला यायचो. मुक्तांगणचे काम, पुण्याच्या आय.पी.एच. संस्थेतली रुग्णसेवा असे काम चालायचे. ह्या कालावधीमध्ये बाबाकडे राहायला येणारा मीच असायचो, त्या पत्रकारनगर वसाहतीमध्ये,
त्या काळात त्या सोसायटीच्या समिती सदस्यांनीही मला 'रहिवासी' असा दर्जा दिल्याने माझे येणे-जाणे सोपे झाले होते. ह्या काळात आम्हाला गप्पांसाठी वेळही खूप मिळायचा, घरात बसूनच मैफील जमवायची. जुने हिंदी-इंग्रजी
चित्रपट पुन्हा पुन्हा चवीने पाहायचे. गॉडफादर तर बाबाला 'फ्रेम बाय फ्रेम' पाठ होता.
हिंदी मथले जॉली एलएलबी, रुस्तुम, पिंक असे चित्रपटही तो तुकड्यातुकड्यात पाहायचा. जेम्स बॉण्ड आणि
हिचकॉक ही आमची अगदी कॉमन प्रेमप्रकरणे. ह्या शिवाय बाबा ज्या लेखन विषयाने पछाडला जायचा त्यावरच्या गप्पा. दर जूनमध्ये असायची ती दिवाळी अंकांमध्ये तो लिहिणार त्या लेखांची चर्चा. लेखाचा खर्डा लिहून झाला की वाचन.
कोणता लेख कोणत्या दिवशी अंकाला द्यायचा ह्यावर पुन्हा चर्चा. ह्या तीन महिन्यांत त्याचे लेखन अगदी 'पीक'ला असायचे. खरिपाचा हा हंगाम संपला की स्वारी स्वतःच्या मनमौजी अभ्यासाला तयार. एखाद्या विषयाची त्याला भूल पडली की तो पूर्ण नादावून जायचा. अशा प्रत्येक विषयाचे रूपांतर लेखनात व्हायचेच असे नाही.
कोरोना मावळतीला लागला आणि जीवन गती घेऊ लागले तसे त्याचे प्लॅन सुरू झाले होते नव्या प्रवासाचे. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी असे झटकेही त्याला यायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील 'दुरुस्ती' करणाऱ्यांचा त्याचा गटच होता. पुढेपुढे
हे सारे फोनही ज्योतीच करायची. बाबाच्या सकाळच्या मित्रांच्या भेटीसाठीच्या दैनंदिन प्रभातफेऱ्या पुन्हा चालू झाल्या आणि बावीस सालच्या
जानेवारीमध्ये घरातच पडण्याचे निमित्त झाले. त्यानंतर महिनाभरामध्ये ते घर रिकामे झाले ते कायमचेच. माझे वडील मला प्रत्यक्ष सहवासातून मिळाले बत्तीस वर्षे. ते गेले आणि त्यांची जागा घेणारा बाबा मिळाला तोही पुढची बत्तीस वर्षे.
त्या काळातच माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे डाव विस्कटले आणि फिस्कटले. नव्याने आयुष्याची मांडणी करण्याच्या प्रवासात ऊब होती ती ह्या घराची. अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी आणि सविताने लग्न करायचे ठरवले, तेव्हा तिच्या आईवडिलांची अधिकृत कुटुंबभेट घडवून आणायची होती. तेव्हा माझ्या बाजूने पालक म्हणून बाबा होता आणि मानसमाता म्हणून ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शोभा थत्ते. माझ्या आयुष्यातल्या हळव्या क्षणी, हरलेल्या काळात आणि हरखून जाण्याच्या प्रसंगांत हे घर माझ्यासोबत होते.
आता काही काळात ही कॉलनी जाणार पुनर्विकासाच्या वाटेने. गेले काही महिने आवराआवर सुरू आहे. मुक्तांगणला न्यायचे सामान, मित्रपरिवारात वाटायचे सामान अशी विभागणी सुरू आहे. बाबाचे सर्व कलासाहित्य व्यवस्थितपणे ठेवायच्या प्रकल्पात मुली यशो मुक्ता, भाची प्राजक्ता अशा साऱ्या मग्न आहेत.
दर पंधरा दिवसांनी मी आलो की एक नवा कोपरा रिकामा दिसतो, एक नवी भिंत ओकीबोकी असते. ज्या साऱ्याचे सर्जन होते त्या साऱ्याचे विसर्जन होते हा नियमच की सृष्टीचा. घरे तरी त्याला कशी अपवाद असणार.
मनाचे दरवाजे उघडे ठेवायला शिकवणारे हे घर आपली कात टाकणार आहे. टाकुनिया जीर्णजर्जर वस्त्रे... इथे नवीन वास्तूची निर्मिती होणार आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या वास्तव्याची शेवटची रात्र त्या घरात घालवली. सकाळी डोळे भरून सारे घर न्याहाळले. दाराला कुलूप लावले. एक किल्ली खांद्यावरच्या बॅगेत टाकली आणि किल्ल्यांचा एक संपूर्ण गुच्छ मनाच्या कोनाड्यात जपून ठेवला.
(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
संग्रहित
Link : https://www.esakal.com/saptarang/psychiatrist-investigator-brown-sugar-problem-gard-book-rjs00
Friday, June 24, 2022
post 3
Sunday, June 12, 2022
post 3
Monday, March 21, 2022
post 2
Saturday, March 19, 2022
post 3
Saturday, February 26, 2022
स्वा सावरकर पुण्यतिथी
Wednesday, August 4, 2021
तुमच्या दुकानात देव मिळेल कां?
Friday, July 2, 2021
शंख
Wednesday, June 30, 2021
नथुराम गोडसे आणि गांधी
Friday, June 25, 2021
संग्रहित
Saturday, June 12, 2021
पुलं
Monday, February 1, 2021
स्वामी विवेकानंद जयंती
जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही
स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) निमित्त अभ्यास करता-करता एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी व स्वामी विवेकानंद ह्या दोन व्यक्तिमत्त्वांमधील समानता. कागदावर उतरविल्याशिवाय राहवत नाही इतकं साम्य अभ्यास करताना दिसू लागलं म्हणून हा लेखनप्रपंच.
समर्थांना लहानपणीच मारुतीरायाच्या भक्तीचे वेड लागले. एकदा आठ-नऊ वर्षांचा ‘नारायण’ (समर्थांचे मूळ नाव) काही केल्या कुठे सापडेना. सर्वत्र शोधाशोध झाली; पण नारायण काही मिळेना. थोड्या वेळाने नारायण फडताळातून बाहेर आला आणि आईचा जीव भांड्यात पडला. “कुठे होतास इतका वेळ?” ह्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण म्हणाला, “चिंता करितो विश्वाची.” लहान नरेंद्रनाथाचे वेडही काहीसे असेच होते. माडीवर ध्यानस्थ बसण्याचे प्रयोग, त्याने अगदी लहान वयात सुरू केले. एकदा नरेंद्राने रामायणाची कथा ऐकली व त्यातील हनुमानाच्या शक्तीचे वर्णन ऐकून तो भारावून गेला. कीर्तनकाराने उल्लेख केला की हनुमान वनात राहतो त्याला भेटण्याच्या उद्दीष्टाने छोटा नरेंद्र केळीच्या बनांत बराच काळ बसला; पण हनुमानाचे दर्शन झाले नाही म्हणून खटटू मनाने घरी आला. घडलेली कथा त्याने आईला सांगितली तेव्हा तिने त्याची समजूत घातली की हनुमान रामाचे काही काम करावयास गेला असेल म्हणून तुझी भेट झाली नाही. हे स्पष्टीकरण छोट्या नरेंद्रला पटले.
ह्या दोन संन्याशांमध्ये ठाशीव साधर्म्य सापडते. बालपणापासूनचे वैराग्य ही त्यातील सगळ्यात मोठी व पायाभूत समानता. दोघांना घोड्यावर बसून रपेट करण्याची आवड होती. समर्थ दासबोधात असे म्हणतात- ‘तुरंग (घोडा) शस्त्र दमून पाहिले’ म्हणजे घोडा घेण्यापूर्वी चालवून पहावा. छोट्या नरेंद्रचा किस्सा सांगतात, त्याला कुणीतरी विचारले, ” बाळ तू मोठेपणी काय करणार? ” त्यावर त्याचे उत्तर होते, ” मी घोडागाडी चालवणार.” हे उत्तर ऐकून सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाच्या तसबीरीसमोर वडिलांनी नरेंद्रला उभे केले आणि सांगितले, “काही हरकत नाही, पण श्रीकृष्णास मान घोडागाडी चालव.” आणि काय कौतुक वर्णावे, ह्या मुलाने पुढे अनेकांसाठी अध्यात्माचा रथ हाकला, मार्गदर्शन केले.
खेळांची आवड, त्यातील प्राविण्य, सळसळता उत्साह याच्या मूर्ती म्हणजे समर्थ व विवेकानंद होत. विवेकानंदांना फुटबॉल, मुष्ठीयुद्ध अत्यंत प्रिय होते. काही प्रसंगी दुबळ्या शरीरयष्टीच्या मित्रांकडे पाहून किंवा नुसत्या पुस्तकी किडे बनणाऱ्यांकडे पाहून ते म्हणत, “ती पुस्तके फेकून द्या आणि मैदानात उतरा. उत्तम व्यायाम करा, धडधडीत शरीरसंपदा कमवा.” हे दोन्ही संन्यासी संगीतात उत्तम गती असणारे होते. जाणकार होते. विवेकानंद सतार, तबला, पखावज वाजवित असत. त्यांनी गाण्याचे बा-कायदा शिक्षण ‘वेणीमाधव अधिकारी’ व ‘दुसरे उस्ताद अहमदखाँ’ ह्यांच्याकडे घेतले. ‘संगीत कल्पतरु’ नावाचा ग्रंथ त्यांनी वयाच्या बावीसतेवीसाव्या वर्षी लिहिला होता. पुढे तो १८७८ वर्षी ‘श्रीचंडीशरण बसाक’ यांनी आपल्या ‘आर्यपुस्तकालय’ या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केला. समर्थ संगीत कुठे शिकले हे माहीत नाही; पण त्यांचे संगीत विषयावरील भाष्य थक्क करून सोडणारे आहे. जसे –
१. अजि कोई ‘काफी’ (हा एक राग आहे) गाओ रेऽ
राग में राग तो सारा केदार, मोहन तान कल्याण चलावे
ऐसा हे सारंग भाई ऽ पाहा कैसा शंकराभरणऽ भरण नव्हें इतरा मरण
आसावरी रागऽ आसावरी रागऽ आसावरी रंग माजे
२. ताळ मृदंग, उपांग यंत्र वीणे
धिगीकट धीगीकट तान तानें मानें धींग होतो,
असे रागांवर, तालांवर भाष्य केले आहे.
आता आपण ह्या दोन संन्याशांच्या इतर काही पैलूंवर नजर टाकूया. समर्थांच्या काही ओव्या आणि त्या संदर्भात विवेकानंदांच्या आयुष्यातील प्रसंग अशा क्रमाने हे पाहूया.
दुसऱ्याच्या दु:खाबद्दलची संवेदनशीलता
समर्थ म्हणतात,
दुसऱ्याच्या दु:खे दु:खावेऽ दुसऱ्याच्या सुखे सुखावेऽऽ
आवघेचि सुखी असावेऽ ऐसी वासना ऽऽ (अशी इच्छा)
अकरा सप्टेंबर १८९३ साली शिकागोत भरलेल्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी जगद्विख्यात शब्द उच्चारले, “अमेरिकेतील माझ्या बंधूभगिनींनो” त्यादिवशी त्यांचा उदोउदो झाला. भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या रात्री विवेकानंद घरी आले आणि बराच काळ त्यांना झोप येईना. झालेल्या कौतुकामुळे नव्हे, तर त्यांच्या मनातले विचार होते, ’हे जगन्माते मला माझ्या देशबांधवांचे दु:ख दूर करण्याची शक्ती दे. तसे काहीतरी कार्य माझे हातून घडू दे. असे काही घडणार नसेल, तर असला मानसन्मान, हारतुरे, कौतुकसुमनें मला नकोत.’ ह्या विचारांची तीव्रता इतकी होती की डोळ्यातून घळघळा वाहणाऱ्या अश्रुंनी उशी भिजली. यानंतर भारतात कार्य करीत असताना अनेकदा भारतीय जनतेचे दारिद्र्य, दु:ख पाहून त्यांचे अंत:करण पिळवटून निघे. एका प्रसंगी त्यांनी असे उद्गार काढले आहेत की समाजसुधारणेसाठी, पीडितांची पीडा दूर करण्यासाठी हृदयातील रक्त शिंपडण्याइतकी तयारी हवी, त्यागवृत्ती हवी.
उपासना आणि संघटना बांधणी
उपासनेबाबत समर्थ अतिशय प्रभावी भाष्य करतात, दासबोधात म्हणतात,
अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग
लोक, समजोन मग आज्ञा इच्छिती
तसेच,
काही गल्बला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ
जेणेकरिता विश्रांती वेळ आपणांसी फावे
विवेकानंदांनी अनेकदा सखोल ध्यानमग्न स्थितीचा अनुभव घेतला. परदेशात वास्तव्य करीत असतां ‘थाऊजण्ड पार्क’ इथल्या वास्तव्यात त्यांनी खूप ध्यानधारणा केली. कन्याकुमारीच्या खडकावर तीन दिवस ध्यान व चिंतनात घालविले. ‘कॅल्व्हे’ नावाच्या स्त्रीला मानसिक अस्थैर्याने ग्रासले होते. विवेकानंदांकडे ती आली तेव्हा त्यांनी स्वत:च्या बाजूला ध्यानास बसावयास सांगितले. त्यातून तिला अपूर्व शांतता लाभली. इतकी की नंतरचे कित्येक दिवस तो अनुभव ती इतरांना सांगत होती. कार्यव्याप सांभाळताना त्यांनी वैयक्तिक साधनेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
समर्थांच्या भाषेत मांडावयाचे झाले तर
जितुके होईल तितुके करावे
भगवत्कीर्तीने भरावे भूमंडळ
संघटना बांधणीचे अपूर्व कसब ह्या दोघांनी समाजाला स्वत:च्या कार्यातून दाखविले
समर्थ म्हणतात,
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे
समर्थांनी भारतभर हजारहून अधिक (जवळजवळ अठराशे) मठ उभे केले. महाराष्ट्रात त्यांनी स्थापलेले ११ मारुती अर्थात् मारुतीमंदिरे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहेत. असंख्य रामदासी, संन्यासी निर्माण केले. रामदासी संप्रदायाची ही परंपरा आजही टिकून आहे. इतर अनेक देवालयांची पुनर्बांधणी, नवनिर्माण त्यांनी केले. समर्थांच्या मठाबद्दल परकीय प्रवासी ‘कॉस्मा दी ग्वार्द’ म्हणतो, “रामदासी संप्रदायाचे मठ स्वयंपूर्ण, स्वावलंबी व संपन्न होते.”
ख्रिस्ती मिशनरी चळवळ पाहूनच विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ ह्या नावाने चळवळ उभी केली. संन्याशांची संघटना बांधली. रामकृष्णांनी विवेकानंदांवर जबाबदारी दिली होती, ह्या तरुण संन्याशांपैकी एकही पुन्हा घराकडे, संसारी इच्छांकडे वळता कामा नये. विवेकानंदांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. अमेरिकेत त्यांनी वेदांताचे वर्ग चालविले. अनेकांना ध्यान-धारणा शिकविली. पत्रं लिहून प्रेरणा दिली, मार्गदर्शन. रामकृष्ण मिशनच्या बोधचिन्हामागे विवेकानंदांची आध्यात्मिक संकल्पना अशी होती – ‘पाण्याच्या लाटा म्हणजे कर्म, उमललेले कमलपुष्प म्हणजे भक्ती, हंस म्हणजे परमेश्वर, उगवता सूर्य म्हणजे ज्ञान. ह्या सर्वांना वेटोळे घालणारा नाग म्हणजे कुंडलीनी योग.’ विवेकानंदांच्या पश्चात अनेकांनी पुस्तके लिहिली. त्यातून विवेकानंदांचे संघटना बांधणीचे कौशल्य उमजून येते.
संन्याशाची निर्भीडता व अनेकांचा आधारस्तंभ
पवित्रतेच्या धारणेतून निर्भीडतेचा जन्म होतो. भयाची भावना जवळपास फिरकतही नाही.
समर्थांचा एक शिष्य उद्धव गोसावी हा एका मठाचा मठाधिपती होता. तेथील मुसलमान सुभेदार गोसावीबाबांना फार त्रास देऊ लागला. समर्थांना हे कळल्यावर ते त्वरेने तेथे गेले व त्या सुभेदारास वेताच्या छडीने फोडून काढले. ह्याबाबतचे समर्थांचे भाष्य मोठे मनोरंजक आहे.
म्हणोनि येके करा रे पाजी ताडिता उभ्याने मुततो काजी
तोबा तोबा हम नहीं जानो जी या अल्ला या खुदा म्हणतसेऽ
असाच तडफदार स्वभाव विवेकानंदांचा होता. कॉलेजात शिकत असताना, परीक्षेची फी भरण्याचीही आर्थिक स्थिती ‘हरिदास’ नावाच्या मित्राची नव्हती. राजकुमार नावाच्या कॉलेजच्या ज्येष्ठ लेखनिकाने त्यांची विनवणी धुडकावून लावली. ह्या राजकुमारला विवेकानंदांनी अफूच्या अड्डयावर धरले व सांगितले की ‘मी ह्याचा बोभाटा करेन.’ तेव्हा तो राजी झाला व हरिदासाचा मार्ग सुकर झाला. वराहनगरच्या मठात विवेकानंदांबरोबर काही संन्यासी राहत होते. एका सरकारी अधिकाऱ्याला हे संन्यासी इंग्रजविरोधी कारवाया करताहेत असा समज (गैरसमज) झाला. तो चौकशीसाठी मठात आला. विवेकानंदांनी आपल्या कार्याची ग्वाही देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला; पण अधिकारी काही बधेना. शेवटी विवेकानंदांनी खोलीचे दार लावून घेतले आणि अशा काही आवाजात सज्जड दम दिला की तो काय समजायचे ते समजून गेला.
अशाच एका प्रसंगात विवेकानंदांचे गुणविशेष प्रकर्षाने उल्लेखावेसे वाटतात. बोटीने परदेशी जात असतां, एका माणसाबरोबर हिंदुत्वाबद्दल होणाऱ्या चर्चेचे वादात रूपांतर झाले. समोरचा माणूस भारतीय देवी – देवतांबद्दल अपशब्द बोलू लागला, हे पाहता विवेकानंदांनी त्याची कॉलर पकडली व म्हणाले, “भल्या माणसा तू आता गप्प बसावंस ह्यातच तुझी भलाई आहे. अन्यथा तुला खाली पाण्यात फेकून देईन,” हे ऐकल्यावर तो गप्प झाला हे सांगणे न लागे.
समर्थांच्या भाषेत विवेकानंदांची कृती वर्णन करावयाची झाली तर
आधी गाजवावे तडाखे तरीच भूमंडळ धाके
किंवा
नीतीन्याये वाट रोधावी पाषांडांची
क्रांतिकारी संन्यस्त जीवन
दोघे क्रांतिकारी होते. वेणाबार्इ नावाच्या तरुण स्त्रीच्या नशीबी विधवेचे जिणे आले. ती समर्थांची शिष्या बनली. समर्थांनी तिचे नामकरण ‘वेणास्वामी’ केले आणि एका मठाची अधिकारी बनविले. इतकेच नव्हे तर तिला कीर्तन करावयास शिकविले. त्याकाळी कुठल्याही स्त्रीला संन्यास घेणे, मठाधिपती बनणे किंवा समाजप्रबोधन करणे असले अधिकार नव्हते. समर्थांनी स्वत:च्या अधिकारात हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणले. विवेकानंदांनी ‘सिस्टर निवेदिता’सारख्या परदेशी स्त्रीला भारतीय पद्धतीने संन्यास देऊ केला. तिने भारतात शाळा उघडल्या, समाजसेवा केली.
समर्थांचा दासबोध वाचताना जाणवते की त्यांचे भाष्य नाही असा जगातला एकही विषय नाही – राजकारण, महंतलक्षण, मूर्खाची लक्षणे, शहाण्याची लक्षणे, भक्तीचे प्रकार, अद्वैतवाद असे असंख्य विषय दासबोधात विस्तॄतरुपाने मांडले आहेत.
१९ डिसेंबर १९१५साली तुरीयानंदांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध झाले आहे. त्यात ते उल्लेख करतात, विवेकानंदांनी चप्पल शिवण्यापासून ते चण्डीपाठ कसा करावा अशा अनेक विषयांवर अनेकांना मार्गदर्शन केले. ह्या दोन महान व्यक्तींना कुठल्याही विषयाचा आवाका घेणे सहज जमत असे, मग ते विटा भाजण्याचे तंत्र असो, कागद बनविणे असो किंवा अजून काही इंग्लंडमधे फिरत असताना विवेकानंदांनी एका औद्योगिक प्रदर्शनाला देखील भेट दिली. ‘मी संन्यासी आहे, मला काय त्याचे’ अशी विचारधारा बिलकुल नव्हती. थोड्याशा अनवट वाटेने जाणारे हे महंत होते. समर्थ विडा खात असत तर विवेकानंदांनी काही काळ हुक्का किंवा पाईपचा आस्वादही घेतला.
विरक्तांचे परिव्राजक व्रत
संन्यासी हा प्रवासी असावा-‘नदी बहती भली, साधु चलता भला’ ह्या उक्तीप्रमाणे समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. विवेकानंदांनी तर देश आणि विदेश दोन्ही पालथे घातले.
समर्थ म्हणतात,
विरक्ते येकदेसी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे
विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्या परी
तसेच,
वैराग्याची बहु आवडी उदास वृत्तीची गोडी
विवेकानंदांनी दक्षिणेपासून उत्तरेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे संपूर्ण भारतभर भ्रमण केले. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत भ्रमण केले. व्याख्याने दिली’श्रीयुत गुडविन’सारखा शिष्य त्यांना या दरम्यान लाभला. पुढे तो त्यांचा लेखनिक बनला म्हणून विवेकानंद लिहू शकले. वेदांतावर ‘टीका’ करू शकले.
विवेकानंद परदेशी असताना भारतातील काही द्वेष्ट्यांनी त्यांच्याविषयी अपप्रचार केला. इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल खोटेनाटे लिहून वर्तमानपत्रात छापून आणले. इतके करूनही समाधान झाले नाही म्हणून ते विदेशापर्यंत पोहोचविले. चारित्र्यावर शिंतोडे उडविले. ह्यामागील मुख्य व्यक्ती त्यांच्या वंग प्रांतातीलच ‘मुजुमदार’ नावाची होती. विवेकानंदांनी हे टीकेचे आसूड हृदयावर दगड ठेवून झेलले. ‘नीळकंठ’ बनून ते कडू विष प्राशन केले. समर्थांच्या भाषेत व्यक्त करावयाचे तर,
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावें
परिव्राजक व्रत घेतलेल्या विवेकानंदांनी आपल्या भ्रमणकाळात एक कठोर व्रत घेऊन स्वत:ची परीक्षा घेतली होती. व्रत असे होते – स्वत:हून कुणालाही अन्न मागावयाचे नाही. अगदीच आग्रह केला तर थोडेसे अन्न घ्यावयाचे; पण भुकेविषयी उल्लेखही करावयाचा नाही.
समर्थांनी पाण्यात उभे राहून साधना केली तेव्हा, मिळालेली भिक्षा पाण्यातून काढावी म्हणजे त्यातील रस, गंध, चव सगळे नष्ट होते, मग त्यातील एक भाग गायीला, एक भाग पाण्यातील जीवांना द्यावा व एक भाग (मुष्ठीभर) आपण घ्यावा. अशी बारा वर्षे साधना केली. धन्य ते विरक्त लोक आणि धन्य ती तपश्चर्या!
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी
समर्थांनी मृत्युचे भय घालविण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरणच दासबोधात लिहिले आहे. मृत्युच्या पुढे कुणाचे काही चालत नाही. मृत्यू न म्हणे हा राजा हा रंक, हा संन्यासी हा गृहस्थी असे विस्तॄत प्रबोधन केले आहे. जीवनातले शाश्वत तत्त्व अथवा सत्य म्हणजे मृत्यू हे समजवताना ते म्हणतात,
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात राहे
तसेच,
मना सांग पा रावणां काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वें बुडाले
मृत्युसंबंधी विवेकानंदांचे विचार आपल्याला अंतर्मुख करतात. एकदा जमलेल्या लोकांनी मृत्यु- बद्दलचा विषय छेडला तेव्हा विवेकानंद म्हणाले, “जेव्हा जेव्हा मृत्युचा विचार येतो तेव्हा माझ्या मनांतदुर्बलतेचा अंशही उरत नाही.” असे म्हणून विवेकानंदांनी दोन दगड उचलले व एकमेकांवर जोरात आपटले. पुढे ते म्हणाले,”माझं मन असं टणक होऊन जातं, जेव्हा मी मृत्यूबद्दल विचार करतो, याचं कारण मी परमेश्वराचं दर्शन घेतलं आहे.”
किती घनगंभीर विचार आहेत नाही!
अशा या दोन प्रकाशताऱ्यांच्या शिष्यांना आपल्या गुरुबद्दल जे काही वाटलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं. त्याचा अल्पसा उल्लेख करून हा प्रपंच इथेच थांबवितो.
रामदासांचा शिष्य उद्धव गोसावी ह्याने एका ओवीबद्ध काव्याची रचना केली. त्यात तो म्हणतो की बरें झाले मी लग्न नाही केले, ह्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली संन्यासी झालो आणि अनेक व्यापांतून मुक्त झालो. त्यातल्या शेवटच्या ओळीच फक्त इथे देतो,
धन्य धन्य महापुरुष तेचि ईश्वराचे अंश
शुकासारिखे उदास म्हणती त्यांसी
शिवरामाला तारिले ( उद्धवालाच शिवरामही म्हणत ) जन्मापासूनि मुक्त केले
भक्त लोक मुक्त झाले रामराजें
भगिनी निवेदिताने ‘दी मास्टर अॅज आय सॉ हिम्’ ह्या पुस्तकांत विवेकानंदांविषयी लिहून ठेवलंय, त्यांच्याकडून काय काय घेतलं, काय अनुभवलं, किती काय शिकली हे वाचनीय आहे. शिष्याच्या दृष्टीतून दिसणारा गुरु बराच वेगळा जाणवतो.
अशा लोकांचे अनुभव, त्यांचे जीवन म्हणजे हीरे, माणिक, मोती आहेत. आपण त्यातले किती वेचावे, धारण करावे तेवढे थोडे आहे.
आयुष्य हेचि रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटीं
ईश्वरी अर्पूनिया लुटी आनंदाची करावीं
इतकेच काय ते म्हणू शकतो
– ©️ सचिन वि. उपाध्ये
राऊळ महाराज
Wednesday, December 30, 2020
मोठी त्याची सावली
मोठी त्याची सावली : भाग ७
- - - - - - -
प्रतिभेच्या उगमापाशी...
"तळ्याकाठचं गवत
तळ्याशी सलगीनं वागायचं
कारण त्याला जगायला
तळ्याचं पाणी लागायचं"
अशा शब्दांत जगाचा आपमतलबीपणा मांडताना "मिठी या शब्दात किती मिठास आहे, नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे", असा तरल शृंगारही चंद्रशेखर गोखले यांनी मांडला. त्यांच्या अर्थगर्भी चारोळ्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस नादावला. निर्मितीच्या यशानंतर चंद्रशेखर गोखले यांच्या वाट्याला आभाळभर मानसन्मान आला...! पण प्रतिभेच्या उगमापाशी होती पराकोटीची अवहेलना आणि अस्थिरता!
गोखलेंच्या काव्यातूनही त्यांचं सोसलेपण बोलकं होतं. आयुष्यानं पोरवयातच बरंच काही शिकवलं. आपण शिक्षणाच्या फळीवर फार काही करू शकणार नाही, ही बोचरी जाणीवदेखील! मात्र त्यांनी परिस्थितीचा निमूटपणे स्वीकार केला. आपणहूनच त्यानं वर्गाच्या अगदी शेवटच्या बाकावरला एक कोपरा धरला. पण दोन गोष्टी आतल्याआत सुरू होत्या 'चिंतन' आणि 'चित्रकारी'. भोवतालच्या घटनांचा त्यांच्या मनावर होणारा परिणाम व्यक्त व्हायला प्रवृत्त करायचा. मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबात जन्माला आलेला तो. तीन बहिणींच्या पाठीवर चौथा मुलगा. मुलांनी शिकण्याशिवाय तरणोपाय नाही, या विचाराशी बांधलेलं घर होतं त्याचं. कला बिला सगळं काही नंतर..! वडिलांचं एक वाक्य तो कायम स्मरणात ठेऊन होता, "शिकला नाहीस तर कॉलनीतल्या साठेंच्या किराणा दुकानात पुड्या बांधायला पाठवीन." तेव्हापासून साठ्यांच्या दुकानासमोरून जातानाही तो धास्तावलेला असायचा.
तो जे. जे. आर्ट्स स्कूलमध्ये दाखल झाला. त्याचं कागदावर व्यक्त होणं घरात रुचायचं नाही फारसं. त्यातून वाद व्हायचे. पुढं पुढं कुरबुरी इतक्या वाढल्या की त्याचं हळुवार मन दुखावलं जायचं. अगदीच नाईलाज झाल्यानं एक दिवस घर सोडावं लागलं. मोठ्या बहिणीनं आश्रय दिला आणि सोबतच विचार आणि कृतीचं स्वातंत्र्यही! एकदा लहानग्या भाचीला अंघोळ घालून देताना तिच्या हातातली बाहुली पाण्याच्या टबात पडली. ताठरलेले हात-पाय...छताकडं लागलेले डोळे... आणि पाण्याच्या पृष्ठभागावर विखुरलेले बाहुलीचे केस... निर्जीव बाहुलीच ती. पण ते दृश्य पाहून तो कमालीचा अस्वस्थ झाला आणि आयुष्यातली पहिली चारोळी जन्माला आली...
"पाण्याचं वागणं
किती विसंगत
पोहणाऱ्याला बुडवून
प्रेताला ठेवतं तरंगत"
घर सोडल्यानंतरचा प्रसंग. एका संध्याकाळी तो 'जेजे'तून बाहेर पडला. बाहेर पावसाची रिपरिप चालली होती. पुस्तकं डोक्यावर धरून पावसाचे थेंब अंगावर झेलत तो आपल्याच तंद्रीत घराकडे निघाला. पावलं वळतील तसा तसा! ती कुठं पडतायत हेही कळत नव्हतं त्याला. घराच्या फाटकापाशी आला आणि एकाएकी भान आलं. जे घर कधीचंच सोडलं आहे तिथं येऊन पोहोचलो आहोत आपण. पावलं थबकली आणि मागं वळली. सख्ख्या नात्यांमधली दरी जरा अधिकच रुंद भासली त्याला. डोळे डब्ब भरून आले आणि त्या भावनेनं एका अजरामर चारोळीचं रूप घेतलं...
"पुसणारं कुणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
रडणारंच कुणी नसेल तर
मरणही व्यर्थ आहे"
लग्न करायचंच नाही, हे त्याचं जवळपास ठरलं होतं. एक दिवस एका मित्रानं सांगितलं, "तुझ्या कवितांची एक चाहती आहे. तुला भेटायचं म्हणतेय ती." तिच्याशी भेट झाली. पुढे उलगडा झाला की तिला भेटायला आणताना मात्र "हे तुझ्याकरता आलेलं स्थळ आहे", असं सांगितलं गेलं होतं. रीतसर पसंती झाली आणि लग्न उरकलं. 'उमा' नावाची अत्यंत समजूतदार मुलगी आयुष्यात आली. "शेखर, तू लिहीत रहा. वाटल्यास मी लोकांसाठी भाजी- पोळ्या करून विकेन", असं म्हणणाऱ्या अर्धांगिनीनं त्यांच्या अडचणीच्या काळात आपला शब्द खरा केला. हा समंजसपणाचा भाव त्यांच्या एका कवितेतून असा उमटला..."घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं...एकानं पसरवलं तर दुसऱ्यानं आवरायचं". आता चंद्रशेखर गोखले छानपैकी स्थिरावले आहेत. जगाच्या पाठीवर त्यांच्या चारोळ्यांचे कोट्यवधी चाहते आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत करियरसाठी धडपडणाऱ्या होतकरूंचे मॉडेल को-ऑर्डीनेटर, मालिकांचे संवादलेखक, कथालेखक अशा विविध रुपांत ते आपल्याला भेटतात. सौभाग्यवती उमा गोखले मालिकांच्या जगातली प्रेमळ आई आणि समंजस काकू किंवा मावशीच्या रुपात बघायला मिळतात. मराठी कवितेच्या प्रांतात गोखल्यांनी इतिहास घडवला. "मी माझा"संग्रहाच्या लाखो प्रती खपल्या. इतर भाषेत रूपांतरित झाल्या. "मराठी चारोळीचा जनक" ही बिरुदावली ते विनयपूर्वक हसून अमान्य करतात, हे गोखलेंचं मोठेपण आहे. दिवस निघून जातात... जखमा साकळतात...उरलेले व्रण मात्र जन्माची सोबत करतात. अजूनही कधीतरी कातरवेळी जुन्या आठवांनी त्यांचा स्वर कापरा होतो... डोळे भरून येतात...काही क्षण निःशब्द जातात... पुन्हा चारोळीकार चंद्रशेखर गोखलेंच्या चेहऱ्यावर हसू विलसतं... "मी माझा"संग्रहाच्या मुखपृष्ठावरच्या फोटोतल्यासारखं...!
© नितीन भट
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3986990831386283&id=100002262164906
