नटसम्राट मधील अप्पा आणि कावेरीचा
खुप प्रेमळ आणि भावस्पर्शी संवाद....
वाचण्यासारखं काहीतरी खास मेसेज...
अप्पा — कावेरी, गेल्या पन्नाससाठ वर्षात एक
गोष्ट तुला सांगायची मी विसरुन गेलो,
आता सांगणार आहे ती .
कावेरी — कोणती ती?
अप्पा — तू मला फार आवडतेस. मी खूप खूप प्रेम
करतो तुझ्यावर.
कावेरी — इश्श! या गोष्टी बोलायच्या असतात का ?
आणि हे काय मला माहीत नव्हतं ?
अप्पा — तरीही एकदा सांगावंसं वाटतं.
कावेरी — एक विचारु का ? रागवायचं नाही हं.
अप्पा — विचार.
कावेरी — मला सवती किती होत्या!
अप्पा — बापरे! आठवणीच्या मावळतीवर
हे जुने जमाखर्च आता कसे लक्षात येणार?
पण तुला एक सांगतो, कावेरी,
तुला सवत कुणीही नव्हती.
होत्या त्या फक्त माझ्या मैत्रिणी होत्या.
कावेरी — मी मैत्रिण नव्हते ?
अप्पा — तू बायको होतीस.
कावेरी — बायको मैत्रिण असू शकत नाही ?
अप्पा — असू शकते, असतेही; पण
मैत्रिणीपेक्षा आई अधिक असते.
दिवाणखाना कमी असतो,
पण देऊळ जास्त असते.
आकाश कमी असते,
पण पृथ्वी अधिक असते.
थोडक्यात,
बायको हे एक बंदर असतं कावेरी, नवरा नावाच्या गलबतासाठी. गलबत शिडं उभारुन सातासमुद्रात मुशाफरी करायला बाहेर पडतं.हे समुद्र असतात व्यवहाराचे, कलेचे, ध्येयाचे, प्रेमाचे आणि द्वेषाचेही. या दर्यात शिरावं, दूरवरचे किनारे पाहावे, वादळवा-याशी मुकाबला करावा, चंद्रचांदण्यांशी सोयरीक करावी. संतप्त लाटांची मस्ती अंगावर घ्यावी. जगणं असं असावं की पावला-पावलांवर मरणाशी मुलाखत व्हावी. परंतु हे सारे उद्रेक अंगावर घेताना गलबत सतत पाहात असतं आपल्या बंदराकडे. पराभवाच्या जखमा किंवा विजयाचे झेंडे घेऊन ते पुन्हा बंदरात येतं आणि तेथील हिरव्या निळ्या प्रकाशात, प्रशान्त पाण्याच्या गालिच्यावर विश्रांत होतं. गलबताच्या पराक्रमाचा उदय बंदरात होतो, पराजयाचे सांत्वनही त्याला बंदरातच मिळतं...
अशी आहे बंदराची महती....
म्हणजे बायकोची!!!!
लेखक : वि. वा. शिरवाडकर
0 comments:
Post a Comment