Saturday, May 14, 2022

post 4

जी .ए. कुलकर्णी - कथासंग्रह पिंगलावेळ- कथा ‘ऑर्फियस’
-आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका
समीक्षक - श्रीनिवास हवालदार
जी .ए. कुलकर्णी यांची  ‘ऑर्फियस कथा एका ग्रीक पुराणकथेवर आधारित आहे. मूळ पुराणकथेत ‘ऑर्फियस’ हा तंतुवाद्य [सारंगी] वाजवणारा महान वादक आपल्या संगीताच्या सामर्थ्याने मनुष्य ,पशुपक्षी,वृक्ष व दगडधोंडे यांनादेखील प्रभावित करतो ते इतके की ते त्याचे संगीत ऐकण्यासाठी त्याच्या मागे धावत असतात. ऑर्फियस कथेचे बरेच ग्रीक Versions आहेत परंतु खालील कथानकाबद्दल सामान्यतः एकमत आहे. जी.ए. नी या पुराणकथेस जीवन आणि मृत्यु यांचा परिवेश पांघरून  आंतरिक सुखाचा शोध घेणारी एक शोकांतिका घडवून एक नवीनच संदेश दिला आहे.
ऑर्फियस आणि त्याची प्रेमिका युरिडिसी यांच्या लग्नाच्या दिवशीच युरिडिसीवर एक अन्य प्रेमी तिच्यावर होणाऱ्या बलात्कार करण्याचा प्रयत्न करतो.याचा प्रतिरोध करण्यासाठी जंगलात पळून जाताना युरिडिसी  साप चाउन मरते आणि तिच्या मृत्यूमुळे व्हिवळ झालेला ऑर्फियस तिला जिवंत परत आणण्यासाठी आपल्या संगीताच्या सामर्थ्यावर अनेक बाधा दूर करून मृत्युलोकाच्या डोहात प्रवेश करण्यात सफल होतो. तेथील दारावरच्या महाकाय, भीषण तीन मुखे असलेल्या श्वानास आपल्या अमोघ वादनाने गुंगवुन मृत्युलोकात मृत्यू देवते पर्यंत पोहोचतो. मृत्यू देवता Hades ही त्याच्या संगीतामुळे मुग्ध होते आणि ऑर्फियस मृत्युदेवतेकडून युरिडिसीला पृथ्वीवर पोचे पर्यंत तिच्याकडे मागे वळून न पहायच्या अटीवर परत न्यायची परवानगी मिळवतो पण ऑर्फियस मृत्युदेवतेच्या युरिडीस मृत्युलोकात परतण्याच्या आश्वासना बद्दल साशंक असतो आणि युरिडीस खरोखरीच आपल्यामागे येत आहे का नाही हे बघण्यासाठी मागे बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते.  पृथ्वीवर पोहोचण्याच्या काही क्षणापूर्वीच ऑर्फियस मागे वळून बघतो आणि त्याला युरिडिसी मृत्युलोकात परत जाताना दिसते. ही घटना केंद्रस्थानी ठेऊन  नंतर जी. ए. ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी देतात परंतु त्या अगोदर मूळ पौराणिक कथेचा शेवट समजणे आवश्यक आहे.
ऑर्फियस पुनः त्याच्या संगीताच्या माध्यमाने  मृत्युलोकात जाण्याचा प्रयत्न करतो परंतु असफल होऊन पृथ्वीवर येतो. तो पृथ्वीतील दुसऱ्या कोणाही स्त्रीशी प्रेम करणार नाही अशी प्रतिज्ञा करतो.यावर Thrace येथील काही जंगली स्त्रिया मत्सर भावनेने त्याला धरून त्याच्या शरीराचे दोन फाक करून एका पहाडा खाली पुरून देतात पण त्याचे डोके सतत  गाणाऱ्या अवस्थेत समुद्रात फेकून देतात. ग्रीक तत्ववेत्ता Plato ह्याने ऑर्फियसला 'भेकड' म्हणून संबोधिले आहे आणि त्याला त्याच्या भेकडपणाची कठोर शिक्षाही मिळाली असेही त्याचे मत आहे.”In fact, Plato's representation of Orpheus is that of a coward, as instead of choosing to die in order to be with the one he loved, he instead mocked the gods by trying to go to Hades to bring her back alive. Since his love was not "true"—he did not want to die for love—he was actually punished by the gods, first by giving him only the apparition of his former wife in the underworld, and then by being killed by women.”
आता जी. ए. ने ग्रीक पुराणकथे पासून वेगळे होऊन कथेस अगदी वेगळीच कलाटणी कशी दिली या बद्दल विचार करू.पृथ्वीवर पोहोचेपर्यंत मागे न पाहण्याची अट स्वीकारहूनही त्याने विपरीत आचरण का केले हा जी.ए.च्या कथेतील मुख्य मुद्दा आहे.याचे कारण मृत्यूलोकापासून पृथ्वीपर्यंत च्या मार्गात या दोघांच्या वार्तालापात सापडते. दोघांना एकमेकाशी बोलण्याची मुभा मृत्युदेवतेने दिली होती हे उल्लेखनीय आहे.
ऑर्फियस आणि युरिडिसी  या दोघांचा वार्तालाप वाचला तर कळेल की   ऑर्फियसला तिच्या मृत्यूपूर्वीच्या सर्व सुखद आठवणी त्याच्या मनात बिंबलेल्या आहेत आणि पृथ्वीवर पोहोचल्यावर पुन्हा दोघांचे जीवन पूर्वीप्रमाणेच आनंदी असेल असे त्याला वाटते. यावर युरिडिसीचा प्रतिसाद फारच निराशाजनक असतो. ती आर्त  स्वरात म्हणते की उत्कट आनंदाचे आपण गोळा करीत असलेले क्षण म्हणजे अखेर मृत्यूच्याच गळ्यात घालायच्या हातातील मणी आहेत, हे मला आता उमजत आहे. ती म्हणते की आपण अनेक वृद्ध, जर्जर माणसं पाहतो पण त्यांची दयनीय अवस्था म्हणजे आपलीच भविष्यातील प्रतिबिंब आहेत हे आपणास फार उशिरा जाणवते. आपले अनेक क्षण सुखाचे असतात परंतु ते सतत हातातून निसटत असतात याची जाणीव आपणास होत नाही. सगळ्यांचं मृत्यू अटळ आहे याची जाणीव सर्वांना  असते परंतु माहित असणं निराळं आणि आपण तो स्वतः भोगण निराळं. ऑर्फियस तिच्या शब्दाने चमकतो.तिच्या बोलण्याने ऑर्फियस समजतो की मृत्यूचा भीषण अनुभव घेतलेली युरिडिसी आणि मृत्यूपूर्वीची युरिडिसी ह्या दोन वेगळ्या व्यक्ती झाल्या आहेत. मृत्युचा अनुभव घेतलेली ही युरिडिसी त्या्ची लाडकी युरिडिसी असुनही मृत्युच्या भीषण अनुभवाने पूर्वीची युरिडिसी राहिलेली नाही. यानंतर पृथ्वीवर जिवंतपणात ही मृत्युचा तो भीषण अनुभव तिचा पाठलाग करणार आहे आणि त्यामुळे तिला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे. तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही. तो युरिडिसीला पृथ्वीवर परत मृत्युलोकात पाठविण्याचा निर्णय घेऊन मुद्दाम मागे वळून तिच्याकडे पाहतो आणि युरिडिसी आर्त किंकाळी देऊन नाहीशी होते.
युरिडिसी लुप्त  झाल्यावर ऑर्फियस तेथे विचारमग्न होऊन उभा राहतो आणि त्याने घेतलेला निर्णय योग्य होता की काही दुसरा निर्णय शक्य होता या व्दिधा मनस्थितीत पुन्हा मृत्युदेवतेस भेटण्यास जाऊन प्रायश्चित स्वीकारण्याची तयारी दाखवतो. मृत्यु देवता त्याची कानउघाडणी करून परत जाण्याचा आदेश देतो.  मृत्युचा अनुभव घेतलेल्या युरिडिसीला जिवंतपणाही मृतःप्राय भासणार आहे आणि त्यामुळे तिच्यासोबत पूर्वीचे जीवन जगणं शक्य नाही हा तर्क ऑर्फियसने मृत्यदेवतेस पटवून दिल्या नंतर मृत्युदेवता त्याला पुनः त्याला युरिडिसी सहा महिने त्याच्याबरोबर सहा महिने पृथ्वीवर आणि सहा महिने मृत्युलोकात एकटी राहण्याचा पर्याय देते आणि या पर्यायाने त्याचे जीवन शक्यतोवर सुखकारक होऊ शकते याची कल्पना देते. मृत्युदेवता त्यास समजावते की क्षणभंगुरतेने माणसाचे मन विषण्ण होण्याचे कारण नाही. आपला प्रवास अगदी तात्पुरता आहे आणि या वाटेने पुन्हा येण्याची संधी मिळणार नाही हे समजूनच सुखाचा उपभोग घ्यायला हवा.
ऑर्फियसला देवते ने दिलेला पर्याय पटतो परंतु युरिडिसी आपल्या पूर्व मतावर ठाम असते वारंवार मृत्यू आणि जीवन यांचा जीवघेणा खेळ खेळण्यास नकार देऊन ती ऑर्फियसला परत जाण्यास सांगते.
जी.ए. ने  शेवटी  ऑर्फियस आणि युरिडिसी दोघांबद्दल म्हटले आहे " ती  दोघंही शहाणी आहेत , कारण त्या दोघांनीही आपल्या मर्यादा ओळखल्या आहेत. यालाच कदाचित ज्ञान देखील  म्हणता येईल”
"

0 comments: