Sunday, September 15, 2024

post 6

सध्या तरुण पिढी मोबाईल आणि स्क्रीनच्या मागे लागली आहे, ते त्यात खूप वेळ घालवतात असे आरोप नेहमी होतात. त्यात बऱ्याच प्रमाणात तथ्यही आहे. त्याचे विपरीत परिणाम मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही होतात. कोरोंनाने सर्व वयोगटातील शाळकरी मुलामुलीना  हातात लवकर मोबाईल दिला असला तरी कोरोना संपल्यावर तो दूर झाला नाही. मुलांना कोणत्याही ताज्या घडामोडींची माहिती नसते असे म्हणता येणार नाही. त्यांचा माहितीचा 'सोर्स' हा वर्तमानपत्रांपेक्षा ऑनलाईन आहे हेही खरे आहे. परंतु मोबाईल, टीव्ही चॅनेल्स, यु ट्यूब यापेक्षा आपल्या सर्वांचा बातम्यांचा / माहितीचा जो मूळ सोर्स होता तो रेडिओ या मुलांपासून लांब गेला आहे. अर्थात याचा दोष त्यांना देता येणार नाही. घरचे ज्येष्ठ रेडिओ न ऐकता मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसणार असतील तर मुलांना सवय तरी कशी लागणार ? आधीपेक्षा कमी, पण आजही अनेक घरांमध्ये रेडिओ ऐकला जातो आणि त्यावर अनेक दर्जेदार कार्यक्रम इथे सादर होत असतात. तुम्ही कितीही ऑनलाईन असाल तरी घरी रेडिओ हवाच यात वाद नाही.

काल 'द हिंदू' या नावाजलेल्या दैनिकात रेडिओसंदर्भात एक बातमी वाचली आणि रेडिओच्या आठवणी जाग्या झाल्या. केरळमधील मावेलिकरा जवळ एका गावात आत्मानंद विलासम संस्कृत प्राथमिक शाळा आहे. जवळपास दीडशे वर्ष जुनी अशी ही शाळा आहे. विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर कमी करण्यासाठी या शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येकी २४०० रुपयांचा एक रेडिओ भेट दिला. घरी त्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने  किमान अर्धा तास कोणताही कार्यक्रम ऐकायचा, मग त्या बातम्या असतील, शैक्षणिक कार्यक्रम असेल, साहित्यिक /सांस्कृतिक कार्यक्रम असेल वा काहीही असेल. तो ऐकायचा आणि शाळेत आल्यावर आपण काय ऐकले, त्यातून काय शिकलो हे सांगायचे असा उपक्रम सुरु केला. इयत्ता पाचवी ते सातवीच्या साठ विद्यार्थ्यांना हे रेडिओ देण्यात आले.

शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी एका बैठकीत ही कल्पना मांडताना रेडिओ हा 'अदृश्य शिक्षक' आहे पण अतिशय महत्वाचा आहे, आपण सगळ्या विद्यार्थ्यांना तो देऊ या असे सांगितले. सर्वानी ही कल्पना लगेच उचलून धरली. शाळेचे माजी विद्यार्थी, पालक शिक्षक संघटना, आणि इतरांनी लगेच अर्थसाह्य दिले आणि ही कल्पना प्रत्यक्षात आली. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मुरलीधरन थझकार (Thazhakara) हे ऑल इंडिया रेडिओतून निवृत्त झाले आहेत, त्यामुळे या माध्यमाची त्यांना पुरेपूर माहिती आहे. रेडिओचा प्रसार व्हावा असे त्यांना मनापासून वाटते. .

या उपक्रमाद्वारे फक्त रेडिओचा प्रसार झाला असे नाही तर विद्यार्थ्यांना रेडिओ दिल्यापासून त्यांच्यात चांगला फरक पडला असे त्यांचे कुटुंबीय आणि शिक्षक सांगत आहेत. रेडिओवर कार्यक्रम ऐकताना विद्यार्थी अधिक लक्ष देतात, अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतात. त्यावर शाळेत बोलायचे असल्याने कार्यक्रमाचा सारांश कसा सांगायचा हेही चांगल्या पद्धतीने कळायला लागले आहे, असे शिक्षक सांगतात. हे विद्यार्थी शाळेत वर्गात अधिक लक्ष देऊन ऐकायला लागले, रेडिओमुळे मुलांची भाषा सुधारली असे त्यांचे म्हणणे आहे.  सगळ्या साठ मुलांना रेडिओवर काय ऐकले हे सांगण्याची संधी मिळत नाही, निवडक संख्येनेच मिळते. तरीही सगळ्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ती मिळत असल्याने विद्यार्थी खुश आहेत.

दर्जेदार कार्यक्रम ऐकायचे असतील तर रेडिओ आणि (मराठी लोकांबद्दल बोलायचे तर) दूरदर्शन सह्याद्री वाहिनी याना पर्याय नाही हेच खरे ! आता Whatsapp च्या जमान्यात आकाशवाणी प्रसारण सुरु होतानाची  धून सतत फॉरवर्ड केली जाते. ती ऐकत राहण्यापेक्षा रेडिओ ऐकणे चांगलेच नाही का ? 

केरळमधील या शाळेने जो उपक्रम केला आहे तसा महाराष्ट्रात कोणी केला आहे का? माहिती असल्यास जरूर कळवा. 

© अशोक पानवलकर 

0 comments: