एका घराचं विसर्जन
ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.
- डॉ. आनंद नाडकर्णी
सकाळ वृत्तसेवा
Updated on: 08 September 2024, 12:23 am IST
गेली बेचाळीस वर्षे, पुणे शहरातला माझा पत्ता म्हणजे 'कृष्णा बिल्डिंग, पत्रकारनगर, ऑफ सेनापती बापट रोड.' हे घर अनिल आणि सुनंदा अवचटांचं. मी ह्या पत्त्यावर दाखल झालो तो सुनंदाचा 'व्यवसाय-मित्र' म्हणजेच सायकिअॅट्रिस्ट म्हणून. त्या वेळी माझं आणि अनिलचे समीकरण जुळलं नव्हतं. ते यथावकाश जुळून आले.
ब्राउनशुगर समस्येचा अभ्यास ह्या निमित्ताने तो माझ्या आयुष्यात 'शोधपत्रकार' म्हणून आला. त्यातून गर्द ही वृत्तपत्र मालिका, पुढे मुक्तांगण ही संस्थाच (२९ ऑगस्ट १९८६) अस्तित्वात आली आणि 'गर्द' हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालं.
आमची मैत्री घट्ट होत गेली आणि त्या घरातली माझी झोपायची जागाही पक्की झाली ती पुढच्या चार दशकांसाठी. माझे वडील एकोणीसशे नव्वद सालच्या जानेवारी महिन्यामध्ये गेले आणि त्या टप्प्यावर अनिल हा मित्राच्या रूपातून माझ्यासाठी सुद्धा 'बाबा' झाला.
हळूहळू बाब्या, बाबडू आणि 'Babs by The Bay' अशी अनेक नामकरणे झाली त्याची. सुनंदा पुढे निघून गेल्यावर, बाबाची आई इंदुताई त्या घरात आली. बाबाच्या एकटेपणावर तिनं वीस वर्षे मायेची गोधडी घातली.
ह्या घरातल्या माझ्या पहिल्या दहा-पंधरा वर्षांच्या मैत्रीवर मी लेख लिहिला होता. तो 'लेखकाचे घर' ह्या पुस्तकात मॅजेस्टिकच्या अशोक कोठावळेंनी प्रसिद्ध केला आहे. तर ह्या घरातल्या मजेदार मायेच्या क्षणांची मला सवय होत गेली. मी पहाटेच्या साखरझोपेत असताना बाबाची जाग सुरू व्हायची.
तो डेस्कटॉप कॉम्प्युटरवर जाऊन बसायचा. सकाळी उठवायची जी वेळ मी सांगितली असेल त्या वेळी बासरी वाजवून, गाणे म्हणून मला उठवायचा. मग चहासोबत गप्पा. बाबासाठी ब्रेकफास्ट म्हणजे दिवसातली महत्त्वाची इव्हेंट.
आजीने ट्रेनिंग दिलेली ज्योती ही मुलगी आजीनंतरची आठ वर्षे त्याच निगुतीने बाबाची काळजी घ्यायची. मस्त नाश्ता करून तयार झालो आणि घरातून बाहेर पडणार तर नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये बाबाला फोटो काढायची हुक्की यायची. अनेक व्यक्ती आणि घरांचा एकमेव, अधिकृत फोटोग्राफर होता तो.
संध्याकाळी कामे आटोपली की वेध लागायचे पुन्हा त्या घरी यायचे. रात्रीचे चारीठाव जेवण; साधे पण रुचकर. त्यानंतर ताजे ताक, मौसमी फळे आणि त्यानंतर चॉकलेट किंवा आइस्क्रीम किंवा केळी, पेरू अशा फळांचे मजेदार फ्रूट सॅलड. आम्हाला गप्पांना कोणतेही विषय पुरायचे. तत्त्वज्ञान ते गॉसिप, इतिहास ते राजकारणातील सद्य:स्थिती, साहित्य ते संगीत...
काहीही. बाबा जोक्स सांगायचा. किस्से आणि गाणी. एकमेकांचे लिहिलेले मजकूर एकमेकांना वाचायला देणे. रात्रीचे दहा-साडेदहा झाले की तो म्हणायचा, "चला, झोपण्याआधी आनंदला फोन करायची वेळ झाली." गेली पंचवीस-तीस वर्षे, दिवसातला शेवटचा फोन तो मला (किंवा मी त्याला) करायचो. प्रत्यक्ष समोर असलो की हा त्याचा आवडता डायलॉग,
आनंददायी क्षणांनी भरलेले दिवस. बाहेरचे तणाव, दुखे तिथेच ठेवून इथे विसाव्याला यायचे. माझी पत्नी सविता ह्या घराला म्हणायची, 'हे तुझे माहेर'. तर माहेरच्या सवयी सुटत नाहीत. फोटो, पेंटिंग, रेषाचित्र रसिकतेने नेमके कसे पाहायचे त्याची सवय इथे लागली.
सुरांना समजून कसे घ्यायचे ते समजले. स्वादाला निर्भयपणे उपभोगायला मिळाले आणि सवयीच्या बिछान्याचा स्पर्श... सकाळच्या सालंकृत पोहे-खिचडीचा सुवास. माझी ज्ञानेंद्रिये तेजतर्रार केली ह्या घरानं.
ह्या घरात बाबामुळे भेटलेल्या अनेक जणांमुळे माझी नात्यांची रेंज इतकी वाढली. बाबाचे काही मित्र पुढच्या काळात माझेही 'स्वतंत्रपणे' मित्र झाले. सदाशिव अमरापूरकर, आर्किटेक्ट शिरीष बेरी, कार्यकर्ता अरुण ठाकूर, सतारमय विदुर महाजन, लेखक उमाताई आणि निरुपाक्ष कुलकर्णी... किती नावे घेऊ.
ह्या घराने विचाराचा परीघ विस्तारायला केवढी मदत केली. सुमित्रा (भावे) मिळाली, सुनील (सुखटणकर) आला
आणि सिनेमामाध्यमाची द्वारे खुली झाली. ह्या सगळ्यामध्ये भर मुक्तांगण परिवारामधल्या आमच्या असंख्य पेशंट, कार्यकर्त्या मित्रांची.
सततचे जागते-खेळते घर. ऐतिहासिक दृष्टीने ह्या घराच्या दरवाजाला कधीही रात्रीची कडी लावली जात नसे. गेली अडीच वर्षे ह्या घरामध्ये महिन्याचे काही दिवस मी एकटाच असतो वसतीला. मीही घराची सवय मोडत नाही. ह्या घरातल्या बाबाच्या खोलीमध्ये मात्र मी आता जात नाही. मी त्या खोलीच्या दरवाजाबाहेरूनच कधी बाबाला साद घालतो.
अनेक घरांमध्ये असते तसे बाहेरच्या खोलीत एक कालनिर्णय टांगलेले असायचे. त्या कॅलेंडरवर माझ्या राहण्याचे दिवस 'मार्क' केलेले असत. ह्या काळात बाबा बाहेरचे कार्यक्रम घेत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्हा दोघांची नवी नवी रेस्टॉरंट्स शोधायची सवय मागे पडली होती. घरगुती अन्नाशी असलेली बांधिलकी वाढलेली होती.
बाबाला हुक्की यायची पिझ्झा खायची. मग आम्ही ती ऑर्डर देण्याचाही उत्सव करायचो. खाणारी तोंडे वाढली की अशी ऑर्डर करायला मजा यायची. मुक्ता, यशो ह्या मुली आणि त्यांची कुटुंबे आली की जोरदार अंगतपंगत व्हायची.
माझ्या गळ्यात घालायची स्लिंग बॅग असते चामड्याची. त्याचे डिझाइन आणि ती ऑर्डर करून घेणे हे बाबाचे काम. अनेक वर्षे तो मला अनेक गोष्टी पुरवायचा. त्याची रुपयातली किंमत त्याला विचारणे हा गुन्हाच असायचा.
माझा मुलगा कबीर छोटा असताना दर भेटीमध्ये त्याच्यासाठी विशिष्ट चिवडा आणि श्रुजबेरी बिस्किटे ह्यांची भेटपाकिटे हजर असणारच. आजी होती तेव्हापर्यंत घरी केलेल्या खाऊचे डबे सवितासाठी म्हणून घेऊन यायचो. पुण्याला येण्यासाठी मी सकाळी सहाच्या सुमारास ठाण्याच्या घरातून निघतो. साडेसात ते पावणेआठ ह्या दरम्यान बाबाचा पहिला फोन... "कुठपर्यंत?"
आयुष्यभर इतके भटकलेला बाबा. पण त्याला घराचे वेड होते. त्याच्या त्या राज्यात तो सुखी असायचा. भिंतीवर लावलेले त्याचे फोटो, त्याची आणि इतरांची पेंटिंग्ज, सहजच नजर वेधून घेणारी त्याची काष्ठशिल्पे, दिवाळी ते दिवाळी बदलला जाणारा दिवाणखान्यातला कंदील (अर्थात नाइटलॅम्प) अशा वस्तू घराला जिवंत करायच्या.
आजी आणि ज्योतीच्या व्यवस्थितपणाला न जुमानता स्वतःची 'पसारा' हौस बाबा पूर्ण करायचा तो त्याच्या खोलीत. हा अगदी केंद्रशासित प्रदेश. आमच्या नजरेला न दिसणाऱ्या अनेक वस्तू त्या 'पिसाऱ्या'तून त्याच्या हाताला अलगद लागायच्या. त्याच्या कपड्याच्या कपाटातल्या एका फळीचा अर्धा हिस्सा त्याने माझ्यासाठी ठेवलेला. माझे कपडे,
टॉवेल मात्र अगदी घडी घालून ठेवलेले. बाहेर घालायच्या कपड्यांचा सेट ठेवला तर तोही कडक इस्त्री करून सज्ज.
कोरोना महासाथीच्या काळातही मी नियमितपणे पुण्याला यायचो. मुक्तांगणचे काम, पुण्याच्या आय.पी.एच. संस्थेतली रुग्णसेवा असे काम चालायचे. ह्या कालावधीमध्ये बाबाकडे राहायला येणारा मीच असायचो, त्या पत्रकारनगर वसाहतीमध्ये,
त्या काळात त्या सोसायटीच्या समिती सदस्यांनीही मला 'रहिवासी' असा दर्जा दिल्याने माझे येणे-जाणे सोपे झाले होते. ह्या काळात आम्हाला गप्पांसाठी वेळही खूप मिळायचा, घरात बसूनच मैफील जमवायची. जुने हिंदी-इंग्रजी
चित्रपट पुन्हा पुन्हा चवीने पाहायचे. गॉडफादर तर बाबाला 'फ्रेम बाय फ्रेम' पाठ होता.
हिंदी मथले जॉली एलएलबी, रुस्तुम, पिंक असे चित्रपटही तो तुकड्यातुकड्यात पाहायचा. जेम्स बॉण्ड आणि
हिचकॉक ही आमची अगदी कॉमन प्रेमप्रकरणे. ह्या शिवाय बाबा ज्या लेखन विषयाने पछाडला जायचा त्यावरच्या गप्पा. दर जूनमध्ये असायची ती दिवाळी अंकांमध्ये तो लिहिणार त्या लेखांची चर्चा. लेखाचा खर्डा लिहून झाला की वाचन.
कोणता लेख कोणत्या दिवशी अंकाला द्यायचा ह्यावर पुन्हा चर्चा. ह्या तीन महिन्यांत त्याचे लेखन अगदी 'पीक'ला असायचे. खरिपाचा हा हंगाम संपला की स्वारी स्वतःच्या मनमौजी अभ्यासाला तयार. एखाद्या विषयाची त्याला भूल पडली की तो पूर्ण नादावून जायचा. अशा प्रत्येक विषयाचे रूपांतर लेखनात व्हायचेच असे नाही.
कोरोना मावळतीला लागला आणि जीवन गती घेऊ लागले तसे त्याचे प्लॅन सुरू झाले होते नव्या प्रवासाचे. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी असे झटकेही त्याला यायचे. वेगवेगळ्या क्षेत्रातील 'दुरुस्ती' करणाऱ्यांचा त्याचा गटच होता. पुढेपुढे
हे सारे फोनही ज्योतीच करायची. बाबाच्या सकाळच्या मित्रांच्या भेटीसाठीच्या दैनंदिन प्रभातफेऱ्या पुन्हा चालू झाल्या आणि बावीस सालच्या
जानेवारीमध्ये घरातच पडण्याचे निमित्त झाले. त्यानंतर महिनाभरामध्ये ते घर रिकामे झाले ते कायमचेच. माझे वडील मला प्रत्यक्ष सहवासातून मिळाले बत्तीस वर्षे. ते गेले आणि त्यांची जागा घेणारा बाबा मिळाला तोही पुढची बत्तीस वर्षे.
त्या काळातच माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे डाव विस्कटले आणि फिस्कटले. नव्याने आयुष्याची मांडणी करण्याच्या प्रवासात ऊब होती ती ह्या घराची. अठ्ठावीस वर्षांपूर्वी मी आणि सविताने लग्न करायचे ठरवले, तेव्हा तिच्या आईवडिलांची अधिकृत कुटुंबभेट घडवून आणायची होती. तेव्हा माझ्या बाजूने पालक म्हणून बाबा होता आणि मानसमाता म्हणून ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉ. शोभा थत्ते. माझ्या आयुष्यातल्या हळव्या क्षणी, हरलेल्या काळात आणि हरखून जाण्याच्या प्रसंगांत हे घर माझ्यासोबत होते.
आता काही काळात ही कॉलनी जाणार पुनर्विकासाच्या वाटेने. गेले काही महिने आवराआवर सुरू आहे. मुक्तांगणला न्यायचे सामान, मित्रपरिवारात वाटायचे सामान अशी विभागणी सुरू आहे. बाबाचे सर्व कलासाहित्य व्यवस्थितपणे ठेवायच्या प्रकल्पात मुली यशो मुक्ता, भाची प्राजक्ता अशा साऱ्या मग्न आहेत.
दर पंधरा दिवसांनी मी आलो की एक नवा कोपरा रिकामा दिसतो, एक नवी भिंत ओकीबोकी असते. ज्या साऱ्याचे सर्जन होते त्या साऱ्याचे विसर्जन होते हा नियमच की सृष्टीचा. घरे तरी त्याला कशी अपवाद असणार.
मनाचे दरवाजे उघडे ठेवायला शिकवणारे हे घर आपली कात टाकणार आहे. टाकुनिया जीर्णजर्जर वस्त्रे... इथे नवीन वास्तूची निर्मिती होणार आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्या वास्तव्याची शेवटची रात्र त्या घरात घालवली. सकाळी डोळे भरून सारे घर न्याहाळले. दाराला कुलूप लावले. एक किल्ली खांद्यावरच्या बॅगेत टाकली आणि किल्ल्यांचा एक संपूर्ण गुच्छ मनाच्या कोनाड्यात जपून ठेवला.
(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
संग्रहित
Link : https://www.esakal.com/saptarang/psychiatrist-investigator-brown-sugar-problem-gard-book-rjs00
0 comments:
Post a Comment