सारेच काही मनातले, मनापासून दडविले मी
ओठान्तले मोती नकळत, शब्दांत ओविले मी
अश्रूतला सूर मज, कळला उशिरा जेव्हा
डोळ्यांच्या ओल्याव्यास आधी ,खूप तुडविले मी
परतीच्या वाटेला मी, पाठ फिरविली अशी
मग दूर जाता -जाता असे,मार्ग हरविले मी
आज पावेतो आयुष्याचे, गूढ सुटेना मजला
आता नकळत जाळ्यांचे, फास सोडविले मी
जे पाश मजला हवे ,त्यांनीच दूर लोटिले
मग ती बंधने इथे, कधी न जुळविले मी
आजचाच चंद्र हा, अर्धाच इथे दिसतो मज
कधी काळी पुनवेत त्याचे, वर्तुळ घडविले मी
नितळ निर्झर निरंतर, वाह्तोच हा रोज झरा
घालून बांध आज तयाच्या ,सुरास अडविले मी
इथे सारेच नियम माझे ,तरीही अनघाच आज
चिरीमिरी आयुष्यात, प्रारब्धासहि फितविले
-रजनीकांत दुसने
0 comments:
Post a Comment