Monday, July 27, 2015
Wednesday, July 22, 2015
'कान' सेन
'कान' सेन
आपल्या सगळ्यांना सहानुभूती हा प्रकार परिचयाचा आहे. अनेक गोष्टींचा आपण सहानुभूतीने विचार करतोच; पण समानुभूती म्हणजे सहानुभूती नव्हे. सहानुभूतीमध्ये एक त्रयस्थपणा आहे. थोडं अंतर आहे. समानुभूतीमध्ये 'दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करणे' अंतर्भूत आहे.
"नात्यांमधला सगळ्यात मोठा, सगळ्यात गंभीर प्रश्न कोणता आहे?" मी आमच्या एका मुला-मुलींच्या गटचर्चेत प्रश्न विचारला. एकजण म्हणाला "अविश्वास", "निष्ठा नसणे", एकीने सांगितलं, तर दुसरी एक मुलगी म्हणाली "अहंकार". वेगवेगळी उत्तरं आली. मोठी यादीच बनली. त्यातलं एक उत्तर होतं 'संवादाचा अभाव'. हळूहळू गटचर्चेत सगळ्यांनीच एक निष्कर्ष काढला. तो म्हणजे संवादाचा अभाव असल्यानेच अविश्वास तयार होतो, एकमेकांशी संवाद नसणं हे अहंकार फुलवतं. अनेक प्रश्नांच्या मूळाशी संवाद नसणं हाच मुद्दा असल्याचं त्या चर्चेत सहभागी झाल्याचं सगळ्यांनी मांडलं.
नात्यांमधला संवाद हरवला आहे असं म्हणणारी जोडपी अगदी रोजच भेटतात. प्रगतीच्या टप्प्यात कधीकाळी माणसाला भाषा नामक गोष्टीचा शोध लागला. भाषाही वस्तूंना, भावनांना, अनुभवांना शब्द शोधत संपन्न होत गेल्या आणि माणसाने माणसाशी संवाद साधणे ही व्यवहारासोबतच भावनिक गरजही बनत गेली. नव्हे, आपण त्यावर अधिकाधिक अवलंबून होत गेलो आणि अर्थातच व्यक्ती म्हणून अधिक समृद्धही झालो. या सगळ्या प्रवासात कधीतरी शहरं वसली, मोठी झाली, महानगरं बनली, नवनवीन तंत्रज्ञान आपल्या विश्वात अवतरलं, अर्थकारण बदललं तसा समाजही बदलला. त्याबरोबर आपल्या जगण्याने एक गती पकडली. ही गती हळूहळू वाढत जाऊ लागली. रस्त्याने वेगानं जाताना आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी बघायच्या राहून जातात तसंच काहीसं संवादाचं होत गेलं. संवाद हरवत गेला आणि मग पुढच्या समस्या मोठ्या होत गेल्या.
खरं तर इथपर्यंतचं सगळं मी आजवर अनेकदा लिहिलं आहे. अनेक भाषणांत, चर्चांमध्ये मांडलं आहे; पण तरीही आज पुन्हा या विषयावर मी का आले? याचं कारण म्हणजे नुकतीच माझ्या पाहण्यात आलेली एक वेबसाइट. 'सेव्हन कप्स ऑफ टी' की, असंच काहीतरी नाव आहे त्या वेबसाइटचं. इथे तुम्हाला तुमची ओळख न सांगता कोणाशीही बोलता येतं. अगदी हव्या त्या विषयावर. बोलायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला कशाविषयी बोलायचं आहेत हे विचारलं जातं. म्हणजे मग त्या विषयानुसार तुम्हाला 'ऐकणारा' मिळू शकतो. आता हे ऐकणारे कोण आहेत? तर तुमच्या माझ्यासारखेच लोक. याच वेबसाइटवर तुम्ही 'ऐकणारे' म्हणूनही काम करू शकता. हे सगळं मोफत आहे. यावर कोणती नोंदणीही करावी लागत नाही, ना तुमची माहिती कुठे द्यावी लागते. तुम्ही अगदी निश्चिंतपणे मनातलं सगळं इथे बोलू शकता. मनातलं सगळं काही बोलायची कुठे सोयच नाही, असं वाटल्यानं इथे हजारो लोक रोज भडाभडा बोलतात. मोकळे होतात. ही वेबसाइट बघून माझ्या मनात अनेक विचार आले. "काय ही आपली अवस्था," असा एक साहजिक विचार डोक्यात आला. त्याचबरोबर असाही विचार आला, की आपलं बोलणं 'ऐकण्यासाठी' आपल्या जवळ कोणीही नाही, असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी हा मोठा आधार ठरत असेल का? पण खरंच आधार मिळत असेल, की उलट लोक अधिकच नैराश्यात जात असतील? मागे एकदा एका चर्चेत 'सोशल मिडिया हा एकटेपणा दूर करण्यासाठी उपयोगी पडतो का' हा विषय आला होता. वेळ घालवण्यासाठी सोशल मिडिया उपयोगी पडत असेल कदाचित; पण त्या आभासी दुनियेतही सदैव स्वतःला प्रेझेंट करण्याची, 'दाखवण्याची' धडपड आपण करत राहतो. आपण जे नाही ते दाखवण्याचा प्रयत्न. यातूनच मग सोशल मिडियावर एक मुखवटा धारण करून वावरणाऱ्या लोकांना मुखवटा सोडून स्वतःच्या खऱ्या भावना, स्वतःचे खरे विचार मांडायची संधीच मिळत नाही. मात्र, जर आभासी जगाच्या बाहेर, प्रत्यक्षातील जगात व्यक्ती-व्यक्तीमधलं नातं तितकं खुलं आणि प्रामाणिक असेल. आपलीच जवळची म्हटली जाणारी व्यक्ती आपल्या बोलण्याला, आपल्या विचारांना आणि शेवटी यातून आपल्यालाच एक व्यक्ती म्हणून जोखणार असेल, त्यावर आधारित आपलं मूल्यांकन करणार असेल, तर मला त्या व्यक्तीबरोबर मोकळेपणाने बोलता येईल का? की मी सदैव अमुक अमुक बोलले, तर आता याला/हिला काय वाटेल असेच विचार माझ्या मनात येतील? दुसऱ्याचीच शक्यता जास्त आहे, माझ्या मते.
"मी जे सांगते आहे त्याचं अॅनालिसिस न करता नुसतं ऐकून घेऊ शकतच नाही हा," अशी नवऱ्याची तक्रार तरुण मुली आणि मोठ्या बायकांनाही करताना ऐकलं आहे. त्याचबरोबर "बघ, तरी मी सांगत होतेच की नै...," अशी सुरुवात करून बायका नवऱ्यांशी बोलतात. अनेकदा हेही आपण बघितलं असेलच. अशा वेळी मग हिला/याला सांगण्यात काही अर्थच नाही, असं म्हणत संवाद कमी व्हायला सुरुवात होते. इथेच समानुभूती हा भाग येतो. आपल्या सगळ्यांना सहानुभूती हा प्रकार परिचयाचा आहे. अनेक गोष्टींचा आपण सहानुभूतीने विचार करतोच; पण समानुभूती म्हणजे सहानुभूती नव्हे. सहानुभूतीमध्ये एक त्रयस्थपणा आहे. थोडं अंतर आहे. समानुभूतीमध्ये 'दुसऱ्याच्या जागी जाऊन विचार करणे' अंतर्भूत आहे. इंग्रजीमध्ये ज्याला "getting in to one's shoes" असं म्हणतात. माणसाला आपल्या जवळच्या माणसांकडून जोडीदाराकडून सहानुभूतीची नव्हे; तर समानुभूतीची आवश्यकता असते. समान भावनेने, समजून घेत आपलेपणाने ऐकणाऱ्या 'कानाची' आवश्यकता असते. हा कान जिथे मिळाला तिथे तो भडाभडा बोलू लागतो. ज्याच्याशी बोलतो, ज्याच्याशी आपण मनातल्या गोष्टी शेअर करतो त्या माणसाशी आपलं नातं घट्ट होत जातं.
नाती समृद्ध करायची असतील, तर समानुभूतीने ऐकणाऱ्या कानांची उणीव राहू न देण्याची जबाबदारी आपलीच आहे. नाहीतर कानांच्या शोधात आपली माणसं या 'सेव्हन कप्स'सारख्या वेबसाइट्स शोधतील. उत्तम संवाद म्हणजे नुसते बोलणे नव्हे; तर ऐकणंसुद्धा! हे आपण विसरता कामा नये. 'कान'सेन नसतील, तर तानसेनाची कदर कोणाला असणार ! नात्यांच्या गरजेनुसार कधी कानसेन, कधी तानसेन अशी भूमिका आपण घेत गेल्यास नात्याचे सूर जुळतील आणि आयुष्याची मैफल रंगायला लागेल यात शंका नाही !
~ गौरी कानिटकर (महाराष्ट्र टाईम्स, १२ जुलै २०१५)