वय हे मनाला असतं. शरीराला वय असतं असं मला वाटत नाही.
.
.
मी आपल्याला एक उदाहरण सांगतो.
पंडित सातवळेकर होते - ज्यांनी वेदांचं भाषांतर केलं.
.
त्यांना जेंव्हा शंभरावं वर्ष लागलं तेंव्हा मला असंच मनात आल की ह्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या पायावर नमस्कार करुन यावं. म्हणून मी पारडीला गेलो.
.
.
शंभरावं वर्ष लागलेल्या माणसाला भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो. आजारी असतील, आपण दोन मिनिटात नमस्कार करावा,बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो. पण मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या छापखान्यामध्ये वेदांच्या शेवटल्या खंडाच्या पुस्तकाची प्रुफं तपासत बसले होते.
.
.
तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते.
.
.
मी नमस्कार वगैरे केला. मला म्हणाले "मी वाचलं आहे तुमचं साहित्य".
.
मी घाबरलोच एकदम. "असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा" असा शाप देतात की काय असं मला वाटलं. पं. सातवळेकर हे माझं साहित्य वाचत असतील असं मला कधीही वाटलं नव्हतं. ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे - म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.
.
.
ते म्हणाले "आता काय आहे, ही प्रुफं करेक्ट करत आहे. हे काम एकदा झालं (हे शंभराव्या वर्षी) की वेदातले सुंदर वेचे आपल्या तरुण पोरांना माहित नाहीत ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक वेच्यांचा एक ग्रंथ तयार करणार आहे. त्यात पुढली आठ-दहा वर्ष जातील".
.
.
शंभराव्या वर्षी पुढल्या आठ-दहा वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता. पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं...
.
.
-(पं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्तीसमारंभात पुलंनी केलेल्या भाषणातुन)
0 comments:
Post a Comment