Saturday, July 16, 2016

ज्ञानेश्वर मुळे यांचा साहित्यिक परिचय


मराठी साहित्यिक परिचय


ख्यातनाम लेखक-कवी आणि भारताचे अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २७व्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले .
ज्ञानेश्वर मुळे यांचा साहित्यिक परिचय :
ज्ञानेश्वर मुळे यांची साहित्य आणि विदेश सेवेतील कारकीर्द कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटावी अशी आहे. वारकरी परंपरा असलेल्या कुटुंबात अब्दुल्लाट (ता. शिरोळ) येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अब्दुल्लाट, कोल्हापूरचे विद्यानिकेतन, शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठात झाले. मूळचे कवी असलेल्या मुळे यांचे जोनाकी (१९८४), दूर राहिला गाव (२०००), रस्ताच वेगळा धरला (२००५), स्वतःतील अवकाश (२००६) हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. ओरिया साहित्यिक रमाकांत रथ यांच्या 'श्री राधा' या खंडकाव्याचा त्यांनी अनुद केला आहे. 'माती, पंख आणि आकाश'(१९९८) हे त्यांचे आत्मचरित्र मराठी तरुणांसाठीचे प्रेरणादायी पुस्तक म्हणून लोकप्रिय आहे. माणूस आणि मुक्काम, रशिया - नव्या दिशांचे आमंत्रण (२००६) , ग्यानबाची मेख, नोकरशाईचे रंग (२००९) ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. मुळे यांनी हिंदीमध्येही काव्यलेखन केले असून ऋतु उग रही है (१९९९), अंदर एक आसमान(२००२), मन के खलिहानो में (२००५), सुबह है की होती नही (२००८) हे हिंदी कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. हिंदी, उर्दू, कन्नड, अरेबिक भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचा अनुवाद झाला आहे.
~ म .टा.
==============

अमेरिकेतील कौन्सुल जनरल ज्ञानेश्वर मुळे
fb page@ https://www.facebook.com/Ambassador-Dnyaneshwar-M-Mulay-553116941406057/

Friday, July 1, 2016

पालकांची शाळा


********************
पालकांची शाळा

मुलं लहान होती तेव्हा त्यांना घेऊन फिरायला निघाले की येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नजरा माझ्यावर हमखास खिळत. मुलं तिळी आहेत हे कळल्यावर तर अर्धे लोक माझ्याकडे अनुकंपेने तर अर्धे 'काय ग्रेट बाई आहे ही' अश्या नजरेने बघत. 'तीन-तीन मुलांना कसं हो मेनेज करता एकटीने' हा प्रश्न मला हमखास विचारला जायचा, आणि ह्या प्रश्नाला माझं एकच उत्तर असायचं कायम, 'खरंतर हा प्रश्न तुम्ही माझ्या मुलांना विचारला पाहिजे, की ते तिघं कसं मेनेज करतात एकट्या आईला?'

असं मानलं जातं की आई ही मुलांची पहिली गुरु असते. काही अंशी ते खरंही आहे,  आयुष्यातले सगळे पहिले धडे आईच्या मांडीवरच तर आपण गिरवतो. पण मूल आईकडून शिकतं तेव्हढंच ते आईला शिकवतंही. मुलंही आईची गुरु असतात हेही तितकंच खरंय. रोजच्या आयुष्यातला प्रत्येक क्षणनक्षण समरसून जगताना, पडलेल्या लाख प्रश्नांची उत्तरं शोधताना, आपल्या कुतूहलाच्या तेजस्वी, लखलखीत भिंगातून आसपासच्या प्रत्येक गोष्टीकडे बघताना एखादं मूल त्याच्या आईला किती मौल्यवान धडे देत असतं! फक्त आपली शिकायची तयारी मात्र हवी! मी ह्या बाबतीत खरंच भाग्यवान आहे कारण एकाहून एक सरस असे तीन इवले गुरु माझ्या घरात आहेत! माझी मुलं आता नऊ वर्षांची आहेत. मी मुलांना काय शिकवलं हे महत्वाचं नाहीये पण ह्या नऊ वर्षात एक पालक म्हणून मी मुलांकडून बऱ्याच गोष्टी शिकले. माझ्या तिळ्या मुलांच्या चष्म्यातून जगाकडे बघता बघता आई म्हणून माझ्याही नकळत मी घडत गेले. प्रगल्भ होत गेले. त्या प्रवासातले हे काही महत्वाचे धडे.

गोष्टी महत्वाच्या नसतात, माणसं महत्वाची असतात

मुलं चार-साडेचार वर्षांची असताना एक दिवस अर्जुनने अनन्याच्या आवडत्या पुस्तकावर रंगीत खडूने आडव्या-तिडव्या रेघा मारून ते पुस्तक पार खराब करून टाकलं. अनन्याचा चेहेरा कोमेजून एवढासा झाला. तिला मनापासून वाईट वाटलं होतं. 'अर्जुन वाईट मुलगा आहे', स्फुंदत स्फुंदत ती म्हणाली. मी तिला जवळ घेऊन समजावलं की अर्जुनने मुद्दामहून तिला त्रास द्यायला म्हणून तिचं पुस्तक खराब नव्हतं केलं. 'आपण अजून एक पुस्तक आणू अस्संच. पुस्तक एक निर्जीव गोष्ट आहे राणी, आणि गोष्टींपेक्षा माणसं महत्वाची असतात'. अनन्याला कुशीत घेऊन मी समजावत होते, अर्जुन हिरमुसलं तोंड करून जवळच उभा होता. मी दोघानांही कुशीत घेऊन दुसरं कुठलंतरी पुस्तक वाचायला लागले. थोड्या वेळाने मुलं हा प्रसंग विसरून गेली आणि नव्या पुस्तकात रंगून गेली. एक समरप्रसंग चांगल्या रीतीने निभावून नेल्याबद्दल मी माझंच कौतुक केलं. त्यानंतर थोड्याच दिवसांनी मी काहीतरी लिहीत बसले होते, तेवढ्यात माझ्या खोलीतून 'खळ्ळ' असा मोठा आवाज झाला. मी धावत खोलीत गेले, माझ्या ड्रेसिंग टेबलवर असलेली नवी, कोरी-करकरीत महागडी सेंटची बाटली फुटली होती, सगळीकडे काचांचा खच, सेंटचा वास पसरलेला आणि त्या सगळ्या पसाऱ्यात भेदरलेलं तोंड करून उभा असलेला आदित! मी आधी त्याला लागलं नाही याची खात्री करून घेतली आणि नंतर मात्र माझ्या रागाचा पारा चढला. मी अजून ते सेंट उघडलं देखील नव्हतं. 'आदित', मी कडाडले, पण पुढे काही बोलू जाणार तेव्हढ्यात कोवळ्या हातानी कुणीतरी मागून माझा कुर्ता खेचला. मी वळून पाहिलं तर अनन्या होती. 'मम्मा, आदीवर रागावू नकोस, त्याने मुद्दामहून नाही फोडली बाटली. आपण दुसरी आणू. तूच म्हणतेस ना, गोष्टी महत्वाच्या नसतात, माणसं महत्वाची असतात'? माझी गुढघ्याएवढी लेक मला समजावत होती. मी मुकाट पुढे होऊन घाबरलेल्या आदितला आधी जवळ घेतलं. अनन्याने मला फार महत्वाचा धडा दिला होता की आई म्हणून मी काय बोलते त्यापेक्षाही मी काय करते हे जास्त महत्वाचं होतं. अजूनही घरी काही फुटलं, तुटलं तर मी स्वतःलाच बजावते, की गोष्टी महत्वाच्या नसतात, तर माणसं महत्वाची असतात.

तुमची दानत तुम्ही किती देताय ह्यावरून ठरत नाही तर तुम्ही काय देताय ह्यावरून ठरते.

आम्ही दुबईला होतो तेव्हाची गोष्ट, अनन्याला तिथल्या एका खेळाच्या दुकानातलं लाकडी फार्म खूप आवडलं होतं, पण त्याची किंमत फार जास्त होती. जवळ जवळ अडीचशे दिरहम. अनन्याला पैशांची किंमत कळावी म्हणून मी तिला सांगितलं की ते फार्म मी तिला पुढच्या दिवाळीला घेऊन देईन, पण त्यासाठी काही पैसे तिलाही तिच्या पिगी बँक मधून द्यावे लागतील. अनन्यालाही ते पटलं आणि तिने घरातली बरीचशी छोटी-छोटी कामं स्वतःच्या अंगावर घेतली. तिला मी महिन्याला एखादं पुस्तक विकत घ्यायला पैसे द्यायची, ते पैसे देखील ती नेमाने पिगी बँक मध्ये टाकायला लागली. चारेक महिन्यांनी तिच्या पिगी बँक मध्ये जवळ-जवळ पन्नासेक दिरहम जमा झाले होते. दिवाळीला आता महिनाभर उरला होता. अनन्या अधून मधून माझ्या मागे लागून त्या खेळण्यांच्या दुकानात जायची, त्या फार्म मधल्या छोट्या गाई-बैलांना कुरवाळून सांगायची, 'आता लवकरच मी तुम्हाला घरी नेणार आहे हां'. दुबईला आमच्याकडे मुख्तार नावाचा ड्रायव्हर काम करायचा. अत्यंत चांगल्या स्वभावाचा माणूस. हसतमुख, सुस्वभावी मुख्तारदादा मुलांना तर खूपच आवडायचा. एका शुक्रवारी सकाळी मुख्तार अचानक घरी आला. त्याची सुट्टी होती त्या दिवशी, तरीही.  त्याचे डोळे पाण्याने डबडबले होते. 'काल घरून फोन आला, गावात दोन-तीन दिवसांपासून खूप पाऊस पडतोय. सर आमचं मातीचं घर अचानक कोसळलं. घरवाले ठीक आहेत, शेजारी आहेत सध्या पण डोक्यावर छप्पर नाही. थोडी मदत पाहिजे होती पैशांची', मुख्तार म्हणाला. त्याने आम्हाला फोटो दाखवले. मुलं तिथेच होती. सगळं ऐकत होती. त्यांनाही ते फोटो बघून खूप वाईट वाटलं. आम्ही मुख्तारला जितक्या रकमेची गरज होती ती रक्कम दिली, काही उसनी, काही आमच्यातर्फे मदत म्हणून. आमचे वारंवार आभार मानत मुख्तार जायला निघाला, तेवढ्यात अनन्या त्याला म्हणाली, 'मुख्तारदादा, जरा थांब.' पळत वर जाऊन ती आपली पिगी बँक घेऊन आली आणि ते सगळे पैसे तिने मुख्तारच्या हातात ठेवले. 'माझी मदत म्हणून तुझ्या घराला', अनन्या मुख्तारला म्हणाली. एव्हढा कणखर पठाण मुख्तार, पण त्या दिवशी ढसढसा रडला, म्हणाला, 'हे पैसे मी कधीच खर्च करणार नाही'. माझ्याही डोळ्यात पाणी होतंमी आणि नवरा अवाक होऊन बघतच राहिलो. गरजवंताला मदत आम्हीही करत होतोच यथाशक्ती, पण तीन-चार महिने साठवलेले सगळेच्या सगळे पैसे दुसऱ्या कुणाच्या हातावर असेच ठेवण्याइतकी आमची दानत खचितच मोठी नव्हती.

चल, फिरायला जाऊया ना

तो दिवसच तसा होता. घरी वीज नव्हती, कामवाली बाई आली नव्हती, माझी आई जवळ नव्हती, नवरा बाहेरगावी होता आणि मुलं जेमतेम चारची होती. सगळ्या घरात पसारा होता, मोरीत खरकटी भांडी आणि पूर्ण दिवस माझ्यापुढे आ वासून उभा होता. मला रडायलाच यायला लागलं. कामाला कुठून सुरवात करावी तेच समजेना. मुलं  घरभर पळत होती आणि मी हताश होऊन त्यांच्याकडे बघत होते, एकदम अर्जुन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, 'चल ना, फिरायला जाऊया', आणि एकदम माझे सगळे प्रश्न सुटले. घरचा सगळा पसारा तसाच ठेवून मी मुलांना गाडीत घातलं आणि सरळ पुणे विद्यापीठात घेऊन गेले. तिथे दिवसभर आम्ही खूप हुंदडलो, दुपारी तिथल्याच उपहारगृहात जेवलो, खेळलो आणि संध्याकाळी घरी परतलो. मुलं एव्हाना पार थकून गेली होती. मुलं झोपली आणि शांत चित्ताने मी घर आवरायला घेतलं. सकाळी जे काम मी चिडून, करवादून, कंटाळून केलं असतं, कदाचित मुलांवर ओरडलेही असते, तेच काम मी आता संगीत लावून आनंदाने करत होते, कारण माझा पूर्ण दिवस मुलांबरोबर आनंदात भटकण्यात गेला होता आणि तेव्हढी उर्जा मला पुरेशी होती.   

मुलांबरोबर अशी निरूद्देश भटकंती हा माझ्या पोतडीतला सगळ्यात मोठा पालकत्वाचा महामंत्र! बालमानसशास्त्र असं सांगतं की जे पालक त्यांच्या मुलांबरोबर आवर्जून वेळ घालवतात त्यांची मुलं त्यांच्या अडनिड्या वयात सहसा वाईट सवयींच्या आहारी जात नाहीत. पण मुळात आपल्या मुलांबरोबर भरभरून वेळ घालवणं, त्यांची कोवळी स्वप्नं त्यांच्या डोळ्यात उमलून येताना बघणं, स्वतः मूल होऊन मुलांच्या खेळत रममाण होणं हा किती आल्हाददायक अनुभव असतो! मुळात, पालक म्हणून आपल्या हातात जेमतेम पहिली दहा-बारा वर्षेच काय ती असतात, त्याच्यानंतर आपण वेळ काढू म्हटलं तरी मुलांना आपल्यासाठी वेळ नसतो, इतकी तीआपल्या शाळा, अभ्यास, खेळ, छंदवर्ग, मित्र मंडळी इत्यादी व्यापात गर्क असतात. हाती आहे तो क्षण बोटांच्या फटीतून निसटून जायच्या आत त्याची सोन्याची आठवण घडवायची एवढंच आपल्या हातात असतं. मुलं फार भरभर मोठी होतात, कधीतरी पंख पसरून उडून जातात आणि आपण मात्र उघड्या बाटलीतल्या अत्तरासारखं सुगंधी आठवणी मागं ठेवून भर्रकन उडून गेलेलं त्यांचं बालपण हुंगत राहतो! घरकाम नंतरही होऊ शकतं, ऑफिसचं काम एक दिवस उशिरा झालं म्हणून जग चालायचं थांबत नाही, पण मुलं मात्र दिवसागणिक मोठी होत राहतात. शक्य असेल तर मुलांबरोबर फिरायला जावंच.

भावना कुणाच्या जपायच्या

अवी, माझा मित्र एकदा घरी आला होता. मी मुलांची ओळख करून दिली.  अवीकडे एकटक रोखून बघत अनन्याने खडा सवाल केला, ' अवीकाका ता? अवीआजोबा का  नाही'? मला क्षणभर काय बोलावं ते सुचेचना! वयाने माझ्याइतकाच, पण सुटलेलं पोट आणि अकाली पांढरे झालेले केस ह्यामुळे अवी दिसायला बराच पोक्त दिसायचा, पण ह्या बयेने त्याचा पार आजोबाच करून टाकला होता! अवी गेल्यावर मी तिन्ही मुलांना पुढ्यात बसवून त्यांचं बौद्धिक घ्यायला सुरवात केली. 'असं धाडकन कुणाला विचारू नये बाळा', मी म्हटलं. 'का पण'? आदिने विचारलं,  'कारण वाईट वाटतं लोकांना.' मी समजावणीच्या सुरात म्हटलं. 'पण मम्मा, तूच तर सांगतेस, प्रश्न विचारणं चांगलं असतं. यु शुड ऑलवेस आस्क क्वेस्चन्स, अर्जुन म्हणाला. 'कारण, काही प्रश्न अवघड असतात राजा, लोकांना वाईट वाटतं'  तो विषय तिथेच संपला.

त्या प्रसंगानंतर दोन-तीन महिन्यांनी आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. आसपासच्या गावातली बायका-पोरं चहा, मातीच्या गडव्यात लावलेलं घट्ट दही, भाजलेल्या शेंगदाण्याच्या पुड्या, मक्याची कणसं असं काहीबाही विकत होती. एक बाई आमचा पिच्छा काही सोडेना! ' अवं ताई, घेवा की चणे -फुटाणे, गरम हैती बघा' तिची अव्याहत भुणभुण सुरु होती. सौम्य शब्दात तिला कितीदा तरी सांगून बघितलं, पण ती काही ऐकेना. शेवटी माझा पारा चढला, 'नको मला तुमचे चणे-फुटाणे, जा बघू तुम्ही इथून' मी तिच्यावर खेकसले. तेवढयात मुलांनी माझी बाही खेचली. 'मम्मा, का ओरडतेस त्या आजीवर? घे ना थोडे चणे-फुटाणे? तिला वाईट वाटलं असेल ना. किती वर चढून आली ती आजी, पाय दुखले असतील ना तिचे?', आदित म्हणाला.  मी मुकाट चार पावलं खाली उतरून त्या आजीची माफी मागितली आणि त्यांच्याकडून चणे-फुटाणे विकत घेतले. 

राग कसा आवरायचा

काही माणसं जन्मजात आनंदाची कवच कुंडलं अंगावर लेऊनच ह्या जगात येतात. माझा मुलगा, आदित अश्या भाग्यवान लोकांपैकी एक आहे. एखादी गोष्ट त्याच्या मनासारखी घडली नाही तरी तो सहसा फार चिडचिड करत नाही किंवा खूप वेळ फुगून बसत नाही. त्याचा राग जास्तीत  जास्त दोन मिनिटं टिकतो, नंतर परत त्याच्   या गोबऱ्या गालावरची खळी डोकवायला लागते. मी त्याला विचारलंही होतं एकदा, की तू सदैव इतका आनंदी कसा असतोस? 'सोप्पं आहे मम्मा, मला खूप राग आला न की मी मनातल्या मनात मला आवडलेलं एखादं पुस्तक आठवतो आणि ते वाचायला लागतो, माझा राग पळून.   जातो लगेच', तो शांतपणे म्हणाला. मला स्वतःला राग आवरणं फार कठीण जातं पण आदितकडे पाहिलं की मला स्वतःचीच लाज वाटायला लागते आणि मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न करते.

आजकाल सुजाण पालकत्व हे खरोखरच एक आव्हान होऊन बसलंय. मुळात मूल होण्याअगोदर आपण पालकत्वावर फार विचार करत नाही आणि मुलं झाली की ह्या विषयावर विचार करायला वेळ मिळत नाही, बरं मुलांच्या वाढीच्या एका टप्प्यात बरेच धक्के खाऊन आपण स्थिर होतो न होतो, मुलांच्या वाढीचा दुसरा टप्पा सुरु होतो. त्यांच्या पालकांकडून असणाऱ्या अपेक्षा बदलतात आणि त्या नवीन साच्यात स्वतःला घडवण्याची पालकांची नव्याने धडपड सुरु होते. आजकाल 'मुलांना चांगल्या रीतीने कसं शिकवावं' ह्या विषयावर ढीगभर कार्यशाळा असतात, पुस्तकं असतात पण मुलं चांगली घडवायची असतील तर पालकांना स्वतःला आधी एक चांगला पालक म्हणून घडवावं लागेल. मी पालक म्हणून, एक आई म्हणून घडतेच आहे, कारण मुलं मोठी झाली तरी पालक मात्र लहानच राहतात! 

- शेफाली वैद्य