Showing posts with label चंद्रशेखर गोखले. Show all posts
Showing posts with label चंद्रशेखर गोखले. Show all posts
Tuesday, June 23, 2026
Sunday, February 16, 2025
आपलं माणूस
आपलं माणूस
चंद्रशेखर गोखले यांची खास व्हॅलेन्टाईन दिनानिमित्ताने ही कथा आणि काही चारोळ्या
‘‘आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला. असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जीवच करू शकतो. त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता, पण त्याचा आजचा आविष्कार तिच्यासाठी नवा होता. मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवजी माझं स्वागत करायला तो आतुर झाला.. आपलं माणूस कोणाच्याही सक्तीशिवाय किंवा मजबुरीशिवाय अधिक आवडणं यासारखं भाग्य नाही..’’ तिला वाटून गेलं. सुप्रसिद्ध कवी चंद्रशेखर गोखले यांची खास व्हॅलेन्टाईन दिनानिमित्ताने ही कथा आणि काही चारोळ्या..
तो आज घराची किल्ली न्यायची विसरला. आणि नेमका तिला आज यायला उशीर होणार होता.
बंद दाराशी जरा वैतागून बसल्यावर जरा वेळाने त्याला मनापासून आपलं घर पाठीशी उभं असल्यासारखं वाटायला लागलं. तिची वाट बघता बघता तिचा राग यायच्या ऐवजी त्याला त्या दोघांचं सवयीचं झालेलं नातं नव्यानं उमगलं..
तिचं आयुष्य पूर्णपणे त्याच्या भोवतीच फिरत होतं, आतासुद्धा ती फक्त आपलाच विचार करीत असेल, या विचारानं तो सुखावला आणि खंतावलाही, कधी कधी एकांतात आपल्याला स्वत:जवळ कबुली देणं सोपं जातं तसं त्याचं झालं. आपण तिला फार गृहीत धरतो याची त्याला नव्यानं जाणीव झाली आणि उगीचच बोच लागून राहिली..
‘लवकर ये भूक लागली आहे.’, ‘लवकर ये मला चीक चीक होतंय. घरात जाता येत नाहीए.’ असे एक-दोन मेसेज पाठवून झाले होते. आता त्यानं मेसेज केला.. ‘सावकाश ये. उगीच जिवाची तगमग करून येऊ नकोस. आठच वाजतायत..’ नेमका तो मेसेज तिला जात नव्हता.
त्याला उगाचच उत्साह आल्यासारखं झालं. इतक्या दिवसांत कधी घराभोवतीच्या बागेत तो फिरला नव्हता. साधं लक्षही द्यायला त्याला जमलं नव्हतं. ‘हौस त्याची आणि मेहनत तिची’ या तत्त्वावर ती घराभोवतीची बाग फुलली होती. अनंत, मोगरा, दहा जातीचे गुलाब आणि त्याने गावाहून आणलेला कृष्णकमळाचा वेल हे तिच्या मेहनतीनं बहरून आलेलं वैभव बघायचं तर दिवे लावणं गरजेचं होतं..
बागेत तसे दोन दिवे होते, पण ते लावायचे तर घरात जायला हवं होतं. या विचाराने तो अधिकच घरी जायला आतुर झाला.
ही आज सकाळी आपल्या आधी गेली, नाही तर ती घरी असताना किल्लीशिवाय आपण बाहेर पडलोच नसतो.. आता आल्या आल्या ती ओटय़ाशी उभी राहील, चहा करते म्हणेल. आपण घरी असतो तर चहा केला असता, निदान तिच्या वॉशसाठी गिझर तरी ऑन केला असता.. चार वर्षांत काय केलंय आपण यातलं?
‘आता शक्य नाही म्हणून पुळका आलाय..’ त्यानं परखडपणे स्वत:वरच केलेल्या आरोपानं तोच पेटून उठला. काही करून ती घरात शिरायच्या आत घरात शिरायचंच.
कसं शक्य होतं ते..
त्यानं घराला दोन प्रदक्षिणा घातल्या. आणि देवघराच्या खिडकीची व्हेंटिलेटर्स त्याला उघडी दिसली. त्या खिडकीला ग्रील नाहीये. हे लक्षात आल्यावर तो अंधारातच वर चढला. अंग तिरपं करून, हात वाकडा करून त्याने दाराचा एक बोल्ड उघडला, मग खिडकी उघडली, मग बुटांसह देवघरात प्रवेश केला म्हणून देवाची क्षमा मागितली आणि आधी जाऊन त्यानं बूट काढले. परत देवासमोर उभा राहिला. त्याला हात जोडले. ‘सॉरी’ म्हटलं. देवाचे आभार मानले. या घरानं, या देवानं आपल्याला खूप सुखात ठेवलंय या जाणिवेनं त्याला उभारी आली. त्यानं गॅस पेटवला. तोही सिलेंडर खालून बंद असताना खटपट करून डोकं चालवून तो गॅस पेटवण्यात यशस्वी झाला. त्याने दोघांचा तीन कप चहा ठेवला, कारण चहाबरोबर मस्का खारी असली की चहा जास्त लागतो इतकं त्याला माहीत झालं होतं आणि कालच ती मस्का खारी घेऊन आली होती.
इथे हा रंगात असताना ती घरापाशी पोहोचली. गल्लीच्या तोंडाशी आल्या आल्या तिला तिचं टुमदार घर दिसायचं. रिक्षातूनच तिनं नोटीस केलं. किचनचा दिवा लागलाय म्हणजे आज आपण दिवा विसरलो? कसं शक्य आहे? का हा जाऊन ताईकडून किल्ली घेऊन आला. इतक्यात तिला त्याचा मेसेज मिळाला, ‘सावकाश ये. जिवाची तगमग करत येऊ नकोस..’ क्षणभर त्या मेसेजेची दखल घेण्यात गेला.. मेसेज वाचताना तो तिला चक्क डोळ्यांसमोर बोलताना दिसला. ‘सावकाश ये’ म्हणताना त्याचा स्वर, त्याचा आविर्भाव तिला प्रत्यक्ष जाणवून गेला. त्याच्या मिठीतून सुटताना जशी तिची तारांबळ उडायची तसंच काहीसं आता झालं..
ती दाराशी आली तर मेन डोअर, सेफ्टी डोअर, दोन्ही बंद. कुलूप जसंच्या तसं. आणि घरात तर खुडबुड सुरू.. ही प्रचंड घाबरली. भोवतीचा नीरव परिसर तिच्या अंगावर आल्यासारखं तिला झालं.. हाक मारायची तरी कुणाला..आणि कोण येईल धावून? तिनं त्याला फोन केला तर लागेचना. तिनं धीर करून पोलिसांत फोन लावला. त्यांना सांगितलं, मी एकटी बाहेर उभी आहे आणि घरात कोणी तरी शिरलंय. मी सेफ आहे पण घरात कोण शिरलंय याची कल्पना नाही. तत्परतेने पोलीस आले.
..आणि पोलीस म्हणजे कोण?
जो पोलिसात आहे म्हणून तिने ज्याला नकार दिला होता, तो सावळा, दणकट अभिजित नानल.. त्याचा फोटो बघताच तिला तो आवडला होता. सावळा, भरगच्च मिश्या असलेल्या त्याच्या भुवयाही नाकाशी जुळत होत्या. हसताना त्याचा तुटका दात उघडय़ावर पडल्यासारखा दिसायचा. एका क्षणात तिने त्याला या सर्व तपशिलासह न्याहाळलं, याला नाकारलं आपण? तिने स्वत:लाच प्रश्न केला. त्याचीही अवस्था वेगळी नव्हती. तोही तिला तसाच न्याहाळत राहिला, ती समोर असून तिला शोधत राहिला.. तिचा नकार मिळाल्यावर त्याने एकदा भेटायची इच्छाच व्यक्त केली होती, पण ती त्यालाही नाहीच म्हणाली होती. त्याही परिस्थितीत तो हलकंसं हसत म्हणाला, ‘शेवटी असे भेटणार होतो आपण.’ त्याने बरोबरच्या हवालदारांना सूचना केल्या. त्यांना पोझिशन घ्यायला सांगितलं.
..आणि तिला धीर देत म्हणाला, ‘‘तुम्ही अगदी सेफ आहात. आता दरवाजा उघडा. ज्या अर्थी आत वावरल्याचा आवाज येतोय त्या अर्थी तो बेसावध आहे. आवाजावरून तरी एकच व्यक्ती असावी, असं वाटतंय.. तुमचे मिस्टरच नसतील ना?’’ त्याने शंका व्यक्त केली.
तिने लगेच त्याचे आलेले मेसेज दाखवले. ‘ओ. के.’ म्हणत तो कारवाईला सज्ज झाला. तिने दार उघडलं. दाराचा आवाज आल्याबरोब्बर तो तसाच टॉवेलवर उघडाबंब बाहेर आला. तो ‘ढाण टॅडाण’ करायच्या बेतात असताना तिच्याबरोबर पोलीस बघून त्याचंच ‘ढाण टॅडाण’ व्हायची वेळ आली. तो गोंधळला.. पोलीस?
तीही गोंधळली, ‘‘तू तू तू घरात कसा शिरलास?’’ अभिजितही लक्ष देऊन ऐकत होता. मग त्यानेसुद्धा थॉट प्रोसेससह सगळा घटनाक्रम सांगितला. हा वेडू आहे याचा अंदाज तिला होताच, आज खात्री पटली. थोडं हसून बोलून झालं आणि तिनेही आपण अभिजितला आधीपासून ओळखत असल्याचं सांगितलं. अभिजितने हवालदारांना परत जायला सांगितलं आणि तो त्याच्या आग्रहाखातर चहासाठी थांबला.
त्याने तिला अभिजितशी बोलत बसायला सांगितलं आणि अनायसे केलेला तिसरा कप तो बाहेर घेऊन निघाला. तो जेव्हा या दोघांसमोर आला तेव्हा त्याच्या कानावर पडलं, ती अवघडून विचारत होती, ‘‘तुम्ही लग्न केलंत की नाही?’’
अभिजित हसून म्हणत होता, ‘‘आमच्याशी कोण करणार लग्न? आम्ही पडलो पोलिसातले. मुलींना वाटतं आम्ही काही कामाचे नाहीत..’’ ती उगीचच खजील झाल्यासारखी झाली.
तो चहा घेऊन आल्यावर ती काहीच व्यक्त झाली नाही. पण दोघे समोर बसल्यावर तुलना होणारच आणि तुलनेत आता तोही पूर्ण मार्काने पास झाला होता. ताई तेव्हा सांगत होती, केवळ पोलिसात आहे म्हणून नाही म्हणायचं याला काही अर्थ नाही. तू आईच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू स्वत: विचार कर. तिने स्वत: विचार केला आणि तिला सेफ लाइफ योग्य वाटली होती. सेफ लाइफची व्याख्या तेव्हा कुठे माहीत होती. मग तिचं गप्पांतलं लक्षच उडालं. पद्धतीचे चार शब्द बोलून तो गेला आणि तिच्या जवळ बसत यानं विचारलं, ‘‘तू त्याला लग्नासंबंधी का विचारत होतीस?’’ ती चपापली, ते त्याच्या लक्षातही आलं नाही. आपल्या दोघांमध्ये कोणी येऊ शकतं याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. तो अगदी सहज होता आणि ती? ती सहज नव्हती. मुंग्यांची एका लयीत जाणारी रांग विस्कटली की पुन्हा सलग व्हायला जसा वेळ लागतो, तसं तिचं झालं. ती त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतानाच त्यानं तिच्यासमोर चहा धरला.. ‘‘काय झालं?’’ असं खुणेनच विचारलं.
ती काही बोलत नाही म्हटल्यावर तोच म्हणाला, ‘‘आपल्या उजूसाठी विचार करतेस का त्याचा?’’ उजू म्हणजे त्याची धाकटी बहीण. ‘‘पण बघ बुवा पोलिसातला आहे. उजूला चालेल का?’’
ती फणकाऱ्यात म्हणाली, ‘‘नं चालायला काय झालं, पोलिसात असला म्हणून काय झालं?’’ पुढेही ती दोन-तीन वाक्यं सलग बोलली पण मनातून याविरुद्धच बोलत होती.
कोणत्याही संदर्भाने तो आता नकोच आपल्या आयुष्यात, असं ती मनाशी घोकत राहिली. भोवती जे आहे ते आपलं आहे आणि ते किती छान आहे. ते छान तिला नेहमीपेक्षा अधिकच छान वाटायला लागलं, मग तोही अधिकच छान. नुसता छान नाही खूप जवळचा हक्काचा वाटायला लागला. हा किती विसंबून आहे माझ्यावर, याला बोलून दाखवता येत नाही, पण याचं आयुष्य पूर्ण आपल्या भोवतीच फिरत असतं.
आजही तो केवळ आपल्यासाठी हे दिव्य करत घरात शिरला. असा वेडेपणा प्रेमात ओथंबलेला जीवच करू शकतो. त्याचा उतावळेपणा तिच्यासाठी नवा नव्हता पण त्याचा आजचा आविष्कार तिच्यासाठी नवा होता. मला उशीर होतोय म्हणून माझ्यावर चिडायच्या ऐवजी माझं स्वागत करायला तो आतुर झाला. तुलना करणं स्वाभाविक आहे पण त्यानंतर आपलं माणूस आपल्याला कोणाच्याही सक्तीशिवाय किंवा मजबुरीशिवाय अधिक आवडणं यासारखं भाग्य नाही.
अतीव सुखाच्या जाणिवेने तिला हुंदकाच फुटला. त्याच्या गळ्यात पडून ती मुसमुसायला लागली आणि तो त्याच्या परीनं, त्याच्या पद्धतीनं तिची समजूत काढण्यात रमला. त्यात..बागेतले दिवे लावायचे राहून गेले..
फार थोडं अंतर असतं
तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी
पण मधे बराच वेळ जातो
येण्याचं कारण सुचण्यासाठी
लांबलचक रात्रीनंतर
येणारा दिवस चिमटीत मावणारा
त्यात माझा तोळाभर जीव
तुला पाहण्यासाठी धावणारा
तू भोवती वावरल्याचा भास
दर दोन क्षणांमागे होतो
कितीही सावध राहिलं तरी
तो क्षण दोन क्षणांमागून येतो
बघावं तेंव्हा ती..
फुलं वेचत असते
सर्वामते बघावं तेंव्हा
मला कविता सुचत असते
तुझं बघणं पुरेसं असतं
जगण्यासाठी
आणि जगणं जरुरी होऊन बसतं
केवळ तुझ्या बघण्यासाठी.
chandrashekhargokhale18@gmail.com
Thursday, October 10, 2024
मुलाखत
१) आपण लिहू शकतो याची जाणीव कधी झाली?
लहानपणापासूनच घरामध्ये काहीसे अलिप्त राहिलेले आणि कुणोही मार्ग न दाखवता न शिकवता श्री साईबाबांवर गाढ निष्ठा ठेवून आयुष्याची वाटचाल करत अनेक टक्केटोणपे खाऊन ही लेखनाच्या क्षेत्रात स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारे चंद्रशेखर गोखले यांच्याशी शर्वरी प्रधान यानी साधलेला मनमोकळा संवाद.
अगदी अडीच तीन वर्षांचा असल्यापासून सतत काहीतरी सुचत असे. काहीतरी रचून गडबड चालू असायची असं आई सांगते, एक होती मनीमाऊ, तिला हवा होता खाऊ अशी बरीच बडबडगीतं स्वतःच रचून बोलत असे. लिखाण करणे म्हणजे भिकेचे डोहाळे असंच तेव्हा वातावरण होतं, 'किशोर आणि चांदोबा' मासिके प्रसिद्ध होती. सुसंस्कृत लोकं आवर्जून आणत, किशोर, मी १०-१२ वर्षाचा असताना किशोरमध्ये माझ्या काही गोष्टी छापून आल्या होत्या. मी एकटाच दादरला जाऊन, दादर ते वरळीला चालत जाऊन लिखाण देऊन यायचो, ज्ञानदा नाईकांचं पत्र आलं, की तुझ्यात लेखक दडलाय त्याला वाव मिळू दे असं त्यांनी कौतुक केलं होतं. माधव मनोहर एका लग्नात भेटले नीला-रवींद्रच्या लग्नात. ते म्हणाले, 'ओ चंद्रशेखर गोखले म्हणजे किशोरमध्ये गोष्ट तू लिहीलीय', हो म्हटल्यावर ते इतकं भरभरून बोलले. गोष्ट आवडल्याचं सांगून त्यांनी माधव गडकरींना भेटायला सांगितलं.
२) पहिली चारोळी कशी सुचली, ती कोणती? पाण्याचं वागणं... मोठ्या बहिणीकडे राहत होतो. तिची मुलगी २ ते ३ वर्षांची होती. तिची बाहुली पाण्याच्या बादलीत पडली. तेव्हा मला अचानक वाटलं, बापरे! असं निर्जीव होवून तरंगणं किती भयंकर आहे. तिथे पहिली चारोळी सुचली. मी बहिणीला ऐकवली. मग लिखाण सुरूच झालं. बहिणीने माईने नीट जपून ठेवलं.
३) समाजातली कोणती गोष्ट बदलाची असं वाटतं?
समाजातल्या जुनाट परंपरा, कालबाह्य रूढी बदलाव्याशा वाटतात. कारण त्यामुळे समाजातील दांभिकता वाढते. हे सभ्य संस्कार सोडून समाजाने भानावर यावे असे वाटते.
४) नवोदित लेखक किंवा कवी यांना काय मार्गदर्शन कराल?
सुचेल तेव्हा, सुचेल तसं लिहा. प्रसिद्धीसाठी लिहीण्यापेक्षा मनाला समाधान मिळण्यासाठी लिहा, स्वतःसाठी लिहा.
५) आपल्या विचार-आचारांवर कोणाचा प्रभाव आहे?
ईश्वरावर श्रध्दा अपार, त्याचाच प्रभाव लहानपणापासून. साईबाबांवर अपरंपार श्रद्धा, या श्रद्धे वरचं आयुष्य तरलं गेलं.
६) मालिका लिहीताना आलेले बरे-वाईट अनुभव ?
चटका देणारा आहे. तेव्हा मी जनसहायची मालिका डीडी १ ला लिहीत होतो. त्यात 'दिलीप धवन' होता. तो गेल्याची बातमी आली. तेव्हा त्याच्यासाठी लिहीलेला एपिसोड मला ते दुःख दाबून ठेवून संपूर्ण एपिसोड लिहावा लागला. तेव्हा मला जागीव झाली की आपण किती व्यवहारी वागतो आणि भावनाशून्य होऊन आपण आपली प्रतिभा जागृत ठेवून लिखाण केल्याची खूपच विचित्र भावना मनात होती.
७) फुरसतीचे क्षण कसे व्यतीत करता?
पत्नीबरोबर भरपूर गण्या मारतो. गाणी ऐकतो, रेसिपीचे कार्यक्रम बघायला मला खूप आवडतात, डिस्करहरी चैनल आवडतं. नाटक बघायला, सिरीयल लिहायला आणि चित्रपटांवर चर्चा करायला आवडतं.
८) शोभा डे यांच्या स्वतंत्र मुंबईच्या वक्तव्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय ?
ही फैशनच झाली आहे. काहीही बिनबुडाचं बोला आणि प्रसिद्धी मिळवा. हा त्यातलाच प्रकार आहे. याकडे चक्क दुर्लक्ष करावं.
९ ) डान्सबारबंदीवर आपलं काय मत ?
विकृतीला मान्याता देऊच नये. बंदी घातलीच पाहिजे. शंभरापैकी दहाजण तरी या वाममार्गाला लागून त्यातले पाच तरी आयुष्यातून उठतात, चाणक्यनीती नुसार मद्यालयात काम करणाऱ्या स्त्रियांना वयाची अट असे. त्याच्या हावभाव, हातवाऱ्यांना मर्यादा असे. अशा मद्यालयांना दुप्पट तिप्पट कर आकारला जात असे.
१०) सध्याच्या राजकारणाबाबत काय सांगाल ?
उदासीन आहे. बीट, कळस, उबग येतो. काहीही आशावादी चित्र नाही, बऱ्याच राजकारणी लोकांना वैयक्तिक पातळीवर ओळखतो. ते खूप छान असतात. त्यांना चांगलं बोलायची, चांगलं ऐकायची, चांगले वागायची आवड असतेच पण. राजकारण म्हटलं की यांना काय होतं काही कळत नाही.
११) खास नवीन सुचलेली चारोळी
मी कधीचा सोडून दिलेला एक प्रश्न
पुन्हा माझ्यासमोर येवून ठाकलाय
कोण जाणे मी माझा रस्ता चुकलो
की तो त्याचा रस्ता चुकलाय.
'अजिंक्य महाराष्ट्र ' ला माझ्या शुभेच्छा. हा पेपर सर्वांना आपलासा वाटू दे
घेतला वसा टाकू नये, पत्रकारिता हे धाडस आहे. हे तुम्हाला छान जमू दे.
#मुलाखत
Tuesday, April 4, 2017
Monday, October 31, 2016
Sunday, July 17, 2016
Wednesday, January 6, 2016
आज तेंडुलकर बाबांचा वाढदिवस.......
आज तेंडुलकर बाबांचा वाढदिवस
खरा तो सात तारखेला साजरा होतो पण एकदा तेंडुलकर आईने सांगितल्याचं आठवतय की बाबांचा खरा ज्न्मदिवस सहाच आहे.. शाळेत सात तारीख लागली
बाबा गेले तेंव्हा मी तरुणभारत या दैनिकासाठी त्यांच्या स्मरणार्थ हा लेख लिहिला होता..
प्रिया तेंडुलकरची ’रजनी’ ही दूरदर्शन मालिका अैन प्रसिद्धीच्या शिखरावर असताना प्रिया तेंडुलकरने डी. डी. -१ साठी स्वयंसिद्धा या दूरदर्शन मालिकेची निर्मिती करायला घेतली आणि मॉडेल को-आर्डीनेटर म्हणून तेंडुलकरांच्या प्रशस्त आणि मोकळ्या घरात मी प्रवेश केला.
पण योग असा की माझ्याकडचा अेकही कलाकार प्रिया दिदीच्या कुठल्याच मालिकेत कधीही चमकला नाही तरी मला तेंडुलकरांच्या घरात ’चंद्रशेखर गोखले’ म्हणून आश्रय मिळाला.
विजय तेंडुलकरांची माझी ओळख झाली ते प्रियादिदीचे बाबा म्हणूनच. त्यामुळे लेखक, नाटककार, पत्रकार, पटकथाकार या सगळ्या बाबांच्या ओळखी माझ्या दृष्टीने कायम दुय्यम स्थानावरच राहिल्या. ते बाबा आणि मी शेखर आमचं हे नातं माझ्या दृष्टीने खरं आणि माझ्यापुरतं पुरेसं राहिलं.
मी तेंडुलकरांच्या घरात प्रवेश मिळवला तेंव्हा माझ्या आधी कितीतरी निराधार जीव या घरात आश्रय मिळवून होते. पंख तुटलेली घार, जायबंदी झालेली कोकीळा, घरटं मोडलेल्या चिमण्या, दृष्टी गेलेले कासव असे जीव या घराने सामावून घेतले होते. मी हाती पायी धड होतो पण घरातून बाहेर पडलेला होतो. माअीकडे राहत होतो म्हणून निराधार नव्हतो अेवढच.
माझं तेंडुकलरांच्या घरी स्थान पक्क झालं ते आअीमुळे. सीमा, सुषमा, प्रिया, राजू अितकाच मोकळा संवाद आअीने माझ्याशी ठेवला त्यामुळे त्या घरात माझं रेंगाळणं सुरू झालं.
बाबांची तेव्हा मला जाणवलेली खासियत अशी की बाबा कायम निटनेटके आणि प्रसन्न असायचे.
तमाम तेंडुलकर परिवार गाडीघोड्याशिवाय फिरत नसताना बाबा मात्र सपासप रस्ता काटत स्टेशन गाठायचे आणि अगदी सहज रेल्वेच्या सेकंड क्लासच्या गर्दीत शिरायचे. त्यांचं ते चालण मला आता जरा जास्तच ठळक आठवतंय.
तसं बाबांची एक गोष्ट मला खूप आवडायची म्हणजे घरी परत आल्या आल्या ते आअीला शोधत(शोधावं लागण्या इतकं मोठं घर बाबांच होतं) आअीसमोर जायचे. अगदी तिच्याशी बोलतील असे नाही पण तिला बघायचे, तिचं लक्ष गेलं तर हसायचे आणि आपल्या खोलीकडे वळायचे. तेव्हा त्यांच्याकडे टायसन नावाचा निरागस आल्सेशियन कुत्रा होता. त्याला थोपटल्याशिवाय आणि त्याच्या पाणी प्यायच्या भांड्यात पाणी आहे की नाही हे पाहिल्याशिवाय ते खोलीत जात नसत.
मी थोडफार लिहितो हे त्यांनी माझ्या बोलण्यावरून ओळखलं होतं. "काय काय वाचतोस?" बाबांनी विचारलं. मी वाचत नाही हे शब्दात सांगायच्या अैवजी ’नाही’ अशी मी मान हलवली. त्यावर "जे मनाला रुचेल ते वाचत जा", असे ते म्हणाले.
आणि खरंच बाबांच्या खोलीत असंख्य विषयांवरची असंख्य पुस्तकं निटस पद्धतीने मांडलेली असायची. बाबांची खोली पर्यायाने छोटी पण मोठी सुबक होती. मला बाबांच्या खोलीत बसायला आवडायचं आणि त्याच बरोबर दडपण ही यायचं.
अठरा पगडची माणसं बाबांना भेटायला येत आणि सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अवधान राखून तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाची ओळख बाबा आवर्जून करून द्यायचे. ओम पुरी, गोविंद निहलानी, गिरिश कर्नाड, श्याम बेनेगल अश्या कितीतरी मान्यवर लोकांची ओळख त्याच घरात झाली.
मान्यवरांवरून एक आठवलं, अशीच एक चित्रपट क्षेत्रातील मान्यवर हस्ती अेकदा बाबांकडे आली होती. मेन डोर मधून बाबांच्या खोलीत जायचं तर हॉल पासनं जरा प्रवास करत जावं लागायचं. स्वैपाकघर, मग पॅसेज, मग राजूची खोली, मग उजवीकडे गेल्यावर बाबांची खोली असा प्रवास असायचा. तर हे महाशय बाबांच्या मागून अगदी अदबीने चालले होते तेवढ्यात टायसन मधे आला. टायसन जातीने आल्सेशियन होता. देहाने गब्दूल होता. पण त्याच्या उरात सशाचं काळीज होतं… एकदम दहा माणसं घरात शिरली तर आमचा टायसन कॉटखाली जाऊन बसायचा आणि एखाद दुसरा पाहुणा असेल तर हा बहादुर मागे दौडायचा(बहादूर हा बाबांकडचा इमानी नोकर) हा इसम आला तेव्हा टायसन पॅसेज मधे होता आणि बहादुर कडे धावायच्या नादात तो या पाहुण्यांच्या पायात आला… तुच्छतेने त्या पाहुण्याने आमच्या टायसनला लाथेने दूर लोटलं… माझ्या लक्षात आलं तसच ते बाबांच्याही लक्षात आलं. त्या क्षणी बाबांची बनलेली तीक्ष्ण नजर… मीच काय तो पाहुणाही विसरला नसेल.
पाहुण्यांवरून आणखी एक किस्सा आठवला. एकदा फ्रांस वरून बाबांची मुलाखत घ्यायला काही पत्रकार आले होते. तेव्हा हॉलमधे एक नक्षीदार पार्टीशन होतं… पार्टीशनच्या अलीकडे मी जेवायला बसलो होतो. पलिकडे बाबा त्या पत्रकारांशी बोलत होते.
बहादुर मला जेवायला वाढत होता मुळात मी उशीरा आलो होतो आई दुपारची पडली होती मी बहादुर कडे पोळी मागितली. त्याला दोन हात आणि दहा कामं त्यामुळे पोळी मागूनही दोन चार मिनिटं झाली तरी बहादुर येईना…
आणि पत्रकारांशी बोलणारे बाबा अनपेक्षितपणे अुठले, आत गेले आणि माझ्या ताटात पोळी वाढून पुन्हा बाहेर जाऊन त्या पत्रकारांच्या संभाषणात सहज सहभागी झाले. मी अवाक होऊन पहातच राहिलो. आपण काही केल्याचा आविर्भाव नाही. कसला आव नाही. मला सुद्धा या घटनेतलं वर्म कालांतराने अधिक तीव्रतेने जाणवलं.
तसे अेकदा त्यांच्या नातवाने कुठून तरी रातराणीची फांदी कुंडीत आणून खोवली. नशिबाने ती तगली तर त्याचंही बाबांना किती कौतुक. त्यांचे जवळचे कोणी स्नेही आले की ते त्यांना आवर्जून ती फांदी दाखवत. आदित्य मनोमन खूश होऊन जायचा… पाहुणे फांदी बघत असताना बाबा आदित्यचा मोहरलेला चेहरा बघत रहायचे. त्यांचा तो आनंद होता. त्यांनी आपल्या मुलांना "सध्या काय चाललंय?" असा सरधोपट प्रश्न कधीच विचारला नाही पण त्यांना जाणून घ्यायला आवडायचं.
मी तेंडुलकरांकडे प्रवेश मिळवला त्या आधिच, तनुजाचं लग्न झालं होतं. ती तिच्याघरी छान रमलेली होती. त्यामुळे तिचं जाणं येणं कमी असायचं. सुषमाने काम करण जवळ जवळ थांबवलं होतं. तर प्रिया मराठी, गुजराथी आणि हिंदी चित्रपटात बिझी होती.
तू सुषमाला पुन्हा काम करायला तयार कर. एकदा रात्री ते मला म्हणाले. त्या वाक्यातला स्वर त्यातील आर्तता अेवढी विलक्षण होती. राजू सुद्धा काहीबाही लिहायचा पण बाबांना दाखवायचा नाही. आणि विरोधाभास असा की जगभर चे तरूण कथा, पटकथा घेऊन बाबांचं मत घ्यायला त्यांच्या समोर येऊन बसायचे.
तासंतास त्यांच्याशी चर्चा करायचे...
बाहेरगावाहून आलेली मंडळी जेवल्याशिवाय तेंडुलकरांच्या घरातून जायची नाहीत. आअी स्वयंपाक छान करायचीच पण राजूच्या बायकोच्या हातालाही छान चव होती. जेवायला खायला घालायाला तेंडुलकर परिवार सदैव तत्पर असायचा. अेकदा पायनॅपलचं आअिस्क्रीम कोणीतरी पाठवलं होतं…. तर आअी म्हणाली खातांना बाबांनी दोनदा सांगितलं थोडं शेखरला ठेव त्याला आअिस्क्रीम खूप आवडतं.
स्वतः बाबांना खाण्या पिण्याच्या बाबतीत अेवढा अिंटरेस्ट नसायचा. जरा अगोड असा चहा आणि हलकसं बटर लावलेले ब्रेडचे दोन स्लाअिस असा नाष्टा घेताना मी त्यांना बरेचदा बघितलंय.
शहाळ्याचं पाणी आवडीने प्यायचे,गोड कधी विशेष खाताना बघितलं नाही पण देशाविदेशात फिरलेले असल्याकारणाने अनेक विविध पदार्थांच्या चवी बाबांनी चाखल्या होत्या.्तसच फोर्ट मधले इराणी पदार्थ त्याना आठवायचे
मार्निंग वॉक बाबत सुद्धा ते तसेच आग्रही होते. स्वतःचं रूटीन ते स्वतःच सांभाळायचे. त्यामुळे कुणाला त्यांचा त्रास व्हायचा नाही. पहाटे साडेपाच पावणेसहाला ते सरळ बाहेर पडायचे आणि सपासप चालून घरी यायचे. म्हणजे अगदी राजू अकाली गेला तरी त्यांच्या या नियमात फरक पडला नाही. मला वाटतं दुसऱ्या दिवशीच ते सकाळी मॉर्नींग वॉकला जाताना लोकांना दिसले. याचा अर्थ ते मनाने कोरडे होते असा नाही पण विशिष्ट अवस्थेत स्वतःपासून अलिप्त होण्याची किमया त्यांना साध्य होती.
मधे सांगलीला पुरस्कार घेण्यासाठी त्यांना जायचं होतं. हो नाही हो नाही करताना शेवटी बाबा गेलेच नाही. त्यावरून बराच अुहापोह झाला. पण बाबा तेंव्हाही अलिप्तच होते… शांत… स्तब्धं.
मी थोडेफार लिहितो याची त्यांना कल्पना होती पण प्रियादिदीच्या हाती माझी चार ओळींची बंद वही लागली आणि जणु सारं जग माझ्यासाठी खुलं झालं… बाबा तेंव्हा मला कौतुकाने शेखरशंभू म्हणाल्याचं आठवतंय. १८ अेप्रिल १९९० ला ’मी माझा’चं औपचारिक प्रकाशन झालं त्यावेळी प्रियादिदी माझ्याशी बोलत नव्हती, ती मला शिरिष पैं कडे नेणार होती. प्रकाशनासाठी तिला बोलावणार होतो. पण शेवटी ते जाणं राहिलंच तेंव्हा मी घराबाहेर राहत होतो. माझ्या तिघी बहिणी सोडल्या तर या पुस्तकाबद्दल ना कुणाला खात्री होती ना अुत्साह. अशावेळी प्रकाशनासाठी कुणाला बोलवायचं?… सुषमा म्हणाली मी बाबांना आणते आणि खरंच अगदी सहज बाबा आले त्या आधी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना हवी असं समजून सुषमा ने बाबाना गळ घातली बाबा तयारही झाले पण मला कोणाचीच प्रस्तावना नको होती मी घाई घाईने म्हणालो नको नको प्रस्तावना नको त्यावेळी बाबानी कलती केलेली मान आणि ओंचावलेल्या भुवया मी अजूनही विसरलेलो नाही तरीही बाबा आले आणि ’मी माझा’चं प्रकाशन करून गेले. कुठे आढेवेढे नाहीत की… तेंव्हा ते सहज बोलल्यासारखे आअीला म्हणाले… शेखरला घराबाहेर का ठेवलंय? आअी म्हणाली त्याचा तोच गेला. बाबा म्हणाले… "शेखर आअीसाठी घरी जा!", अेवढ्या व्यक्तिगत बाबतीत लक्ष घालताना मी बाबांना प्रथमच बघत होतो. मी त्यांचं अैकलं आणि घरी गेलो. घरी काही मनापासून स्वागत झालं नाही पण आता मी बाबांच्या शेजारीच रहायला आलो.
मी लग्न जमवलं तेव्हा बरेच दिवसासाठी बाबा यूरोप दौऱ्यावर जायचे होते. त्या गडबडीत बाबांनी मला अुमाला घेअुन यायला सांगितलं. मला बाहेर बसवुन तासभर ते तिच्याशी काय बोलले हे अजून मला कळलेलं नाही. पण ज्या अर्थी चौदावर्ष आमचा सुखाचा संसार सुरु आहे त्याअर्थी काहीतरी कानमंत्रच दिला असणार हे नक्की.
आमच्या लग्नालाही बाबा आवर्जून आले. आम्ही दोघे पाया पडल्यावर आम्हाला आशिर्वादही भरभरून दिला. नाहीतर अेरवी पाया पडलेलं मनापासून त्यांना आवडत नसे.
राजू गेला आणि बाबांचं घर रिकामं झालं. पिंजरे रिकामे झाले, फिशटँक्स रिकाम्या झाल्या, कासवं नाहीशी झाली. प्रिया दिदी आणि आअी दोघींचं आजारपण सुरू झालं. मग आअी जाणार असे वाटत असताना प्रियादिदीच गेली…
त्यानंतर बाबांना भेटायचं धाडस माझ्यात नव्हतं.. पण तरी संध्याकाळी मी आअीला भेटायला म्हणून गेलो. सांजवेळ झाली होती… घर अंधारलं तरी दिवे लावले नव्हते… बहादुर ने दार उघडलं आणि त्याच्या लक्षात आल्यावर त्याने दिवे लावले… पहिल्यांदा बाबांच्या घरातला प्रकाश मला मलूल वाटला… फरशीवरचं जाजम गुंडाळून ठेवलं होतं… आअी अडखळते… बदाहुरने खुलासा केला आणि आता टायसन ही नाही तो निर्विकार पणे म्हणाला म्हणजे?… मी विचारलं.
बाबा म्हणायचे… नुसत्या फरशीवर चालून कुत्र्यांना संधिवात होतो म्हणून हर जगह कारपेट डाला था…
टायसन गेला? अुमाने विचारलं. हो म्हणत त्याने उत्तर द्यायचं टाळलं… आअीचा या संभाषणाशी, त्यातल्या तपशीलाशी काही संबंध नव्हता… तिच्या दृष्टीने प्रिया पन्हाळ्याला शुटींग करत होती. राजू ग्यान सहाय च्या शुटींग मधे बिझी होता आणि आमच्या दोघांचं अजून लग्न व्हायचं होतं… तिचं म्हणणं खरं मानून हे संदर्भ लक्षात घेत तिच्याशी बोलणं खूप जड जात होतं. प्रियाचं लांड्रीवाल्याशी भांडण झालं, राजू पहाटे घरी येअून परत दुपारी गेला. त्याच्यासाठी रावसाचं तेलतीखं केलं पण जेवलाच नाही… बापरे! जगातून नाहीशी झालेली माणसं अजून तिच्या परिघात होती… खरंच आपलं अस्तित्व दुसऱ्याच्या मानण्यावर असतं. मी घर सोडताना माझे वडील मला म्हणाले होते… तू आमच्यासाठी मेलास. या वाक्यातील दाहकता तेव्हा मला कळली.
बहादुर ने चहा समोर आणून ठेवला म्हणून जाताही येअीना आणि तेवढ्यात बाबा आले थोडे थकल्यासारखे वाटले. पण बाकी काही त्यांच्यात विशेष बदल नव्हता… त्यांच्याकडून कळलं सुषमा पुण्याला असते. सीमा दुसरीकडे राहते आणी बंटी आणखीन तिसरीकडे. बाबा नेहमी प्रमाणे खोलीत गेले नाहीत ते तिथेच बसले. आअीच्या सगळ्या (निरर्थक) प्रश्नांना प्रमाणिक उत्तर देत होते.
तेव्हाच मला कळलं बाबांनी बद्रीधाम मधलं प्रशस्त घर आता विकायला काढलं होतं… मला अेकदा बाबांची ती छोटीशी खोली डोळेभरून पहावीशी वाटली. मी अभावितपणे तिथे जायला लागलो. बहादुर घाअिने म्हणाला अुधर कुछ नही है.
मी बाबांकडे बघीतलं, आम्ही बाहेर पडलो. तेव्हा त्यांच्या पाया पडायला हवं होतं असं आता वाटतंय. कारण नंतर अशी भेट झालीच नाही. मधे माटुंग्याला यशवंतराव नाट्यगृह पाशी भर पावसात ते बाल रंगभूमीच्या बाजुने आंदोलनासाठी अुभे होते तेव्हा मी त्यांना बघीतलं, भेटलो नाही.
त्या आधी आअी गेल्याचं कळल्यावर मी शेरे पंजाब च्या हिलटन टॉवर कडे धावलो होतो. पण त्या घराला कुलूप होतं.
मग प्रसिद्ध व्यक्तीच्या बातम्या कानावर येत राहतात तश्या येत राहील्या. कधी कुठल्या क्लिपींग मधे बाबा दिसत राहीले.
.. आणि आज आत्ता बाबा गेल्याचं कळल्यावर डोळ्यांना त्यांना बघायची तहान लागली. "मी माझा" या माझ्या पहिल्या काव्यसंग्रहावर बाबांची प्रस्तावना मी नको म्हटल्यावर बाबांनी खट्याळपणे अुंचावलेल्या भुवया आठवताहेत.
मी घरी राहायला आल्यावर मॉर्निंग वॉक वरून परतताना माझ्याघरी येअुन माझ्या वडिलांना शेखर कसा आहे? विचारणारे बाबा आठवताहेत. बाहेर पडायचं असताना आदित्य बरोबर तन्मयतेने टॉम अॅंड जेरी पाहणारे बाबा, फोटो काढण्यात रमलेले बाबा, वाचनात दंग झालेले बाबा, टायसन शी खेळणारे, आदित्यशी खेळणारे, कुणाशी म्हणजे अगदी कुणाशीही बोलायला सदैव तत्पर असणारे बाबा मला आठवतात आणि आठवत राहणार.
त्यांचं असं शांत निश्चल रूप मला पाहायचंच नव्हतं. आपलं अस्तित्व जर दुसऱ्याच्या मानण्यावर अवलंबून राहणार असेल तर माझ्या दृष्टीने तेंडुलकर बाबा अजून आहेत, मी असे पर्यंत बाबा राहणारच…
विजय तेंडुलकरांविषयी तर आता सारंच जग बोलेल, त्यांचं कर्तुत्वही तसंच आहे. पण आमच्या बाबांविषयी बोलायचं तर त्यानी आपलं झपाटलेपण लिलया पचवलं होतं म्हणूनच आमचे बाबा खरच ग्रेट होते, स्वतःच्या कथेचे हिरो होते........... आधी ते परीपूर्ण माणूस होते आणि मग बाकी सगळे काही होते. .....
~ चंद्रशेखर गोखले
Wednesday, June 25, 2014
चारोळी
मधे..
थोडं अंतर राहुदे
क्षणभर तुला
डोळेभरून पाहुदे
============
तसा वाद नेहमीचा...
माझा माझ्याशी चालणारा
तुझा निसटता कटाक्ष...
मनाला छळणारा…
======
तू...
कानात सांगितलेली गोष्ट
मला अजून
ऐकू येते स्पष्ट…
============
कोणी विचारलं तू कसा आहेस?...
तर काय उत्तर द्यायचं मला कळत नाही
कळत नाही म्हणण्या पेक्षा या प्रश्नाचं उत्तर
मलाच कधी मिळत नाही…
==================
आभाळभर पाखरं
आणि ओंजळभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे…
===============
तू म्हणालीस आपण पाहिलेली स्वप्नं
उधार राहिली तुझ्यावर....
मी म्हटलं ठीक आहे हे ही ओझं
ठेऊन देईन आठवणीन्च्या ओझ्यावर.
===============
मनाची तहान....
पाण्याने भागत नाही
हे बरं की मनाची तहान
सगळ्यांनाच लागत नाही.
=================
आपलंच मन असून आपल्याला
मनापर्यंत पोहोचता येत नाही
ते कसं आपल्याला सारखी बोच लावतं
तसं त्याला जाऊन काही टोचता येत नाही
=================
चंद्रशेखर गोखले
fb @ https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7
थोडं अंतर राहुदे
क्षणभर तुला
डोळेभरून पाहुदे
============
तसा वाद नेहमीचा...
माझा माझ्याशी चालणारा
तुझा निसटता कटाक्ष...
मनाला छळणारा…
======
तू...
कानात सांगितलेली गोष्ट
मला अजून
ऐकू येते स्पष्ट…
============
कोणी विचारलं तू कसा आहेस?...
तर काय उत्तर द्यायचं मला कळत नाही
कळत नाही म्हणण्या पेक्षा या प्रश्नाचं उत्तर
मलाच कधी मिळत नाही…
==================
आभाळभर पाखरं
आणि ओंजळभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे…
===============
तू म्हणालीस आपण पाहिलेली स्वप्नं
उधार राहिली तुझ्यावर....
मी म्हटलं ठीक आहे हे ही ओझं
ठेऊन देईन आठवणीन्च्या ओझ्यावर.
===============
मनाची तहान....
पाण्याने भागत नाही
हे बरं की मनाची तहान
सगळ्यांनाच लागत नाही.
=================
आपलंच मन असून आपल्याला
मनापर्यंत पोहोचता येत नाही
ते कसं आपल्याला सारखी बोच लावतं
तसं त्याला जाऊन काही टोचता येत नाही
=================
चंद्रशेखर गोखले
fb @ https://www.facebook.com/chandrashekhar.gokhale.7




































