भक्ति कशी ?
भक्ति हा द्वैतभावातला प्रकार आहे, असं बर्याच अडाण्यांना वाटतं. ते म्हणत असतात, भगवंत वेगळा आणि भक्त वेगळा ! अशी वेगळीक असल्याखेरीज भक्ति होणारच नाही. ही मंडळी सतत अथ पासून ते इति पर्यंत द्वैतभावातच डचमळत असतात.
भागवतधर्म मंदिराचा पाया घालणारे ज्ञानोबाराय [पुढील सगळे वैष्णव यांच्या तत्त्वज्ञानाला अनुसरणारे असून त्याचेच पाईक आहेत] त्यांना मात्र द्वैता-अद्वैताच्या चांदण्या गिळून द्वैतभावाच्या पलिकडे गेलेला, ईश्वराशी पूर्णत्वाने एकरूप झालेला भक्त कळला आहे.
हा भक्त आहे तरीही त्याला विश्वव्यापी चेतनातत्त्वाची जाण आहे. त्याचबरोबर सगुणाचे विलक्षण प्रेम ही आहे.
सर्वव्यापी परतत्त्वाचे भान असल्याने, आणि सर्वत्र तेच एकमेव परतत्त्व अनुभवत असल्याने, हा ज्ञानी भक्त कुणाचाही द्वेष करत नाही. कारण द्वेष भावना ही परकेपणातच असते. या ज्ञानी भक्ताला सारे विश्वच स्वकीय झालेले असते. "किंबहुना चराचर आपणचि जाहला" - त्यामुळे तो सर्वांचाच मित्र असतो. प्रत्येक भूतमात्राबद्दल त्याच्या मनात अपार करुणाच असते. आत्मीयताच असते.
चराचर सृष्टीच्या ठिकाणी, ज्ञानी भक्ताची ऐक्यभावाची भूमिका असते. त्यामुळे तो निरहंकारी असतो. तो अत्यंत निःस्वार्थी असतो. त्याचा "स्व" मर्यादित न राहतां आत्मस्वरूपी विसर्जित झालेला असतो. त्याचा "मी"पणा एका विश्वात्मक भावनेने पुसून गेलेला असतो. पृथ्वी, प्राण, पाणी, दीप या दाखल्यांनी ज्ञानराजांनी १२व्या अध्यायांत, या ज्ञानी भक्ताची अपूर्व गुणवत्ता, त्यांनी मूर्तिमंतपणे साकार केली आहे.
हा ज्ञानी भक्त कायम संतृप्त असतो. वर्षाकाळ असो अथवा नसो, सागराची पातळी नेहमी तेवढीच असते ना ! तो सतत संतुष्ट असतो. या संतोषाचे कारण म्हणजे जीव आणि परमात्मा हे दोघेही त्याच्या हृदयांत एकाच आसनावर विराजमान झालेले असतात.
" जीवू परमात्मा दोन्ही । बैसोनि ऐक्यासनी ।
जयाच्या हृदयभुवनी । विराजति ॥ "
जीव व परमात्मा, देव आणि भक्त, श्रीगुरु सत्शिष्य यांचे ऐक्य त्याने जाणलेले असते. तसेच जगाचे व आपले ऐक्यही त्याने ओळखलेले असते, नुसते ओळखलेले नसते तर तो ते प्रत्यक्ष जगतच असतो. " हे विश्वचि माझे घर " अशी त्याची मति स्थिर झालेली असते.
या ऐक्य भावनेमुळेच भवतीच्या व्यक्तीची, परिसराची त्याला भिती वाटत नाही. कारण सार्या चराचरातून एकच चैतन्याचा/ ब्रह्मचैतन्याचा [म्हणजे फक्त गोंदावलेकर महाराज नव्हेत तर एकच एक सच्चिदानंद प्रेममय भगवंताचा] स्त्रोत वहात असतो, ह्याचे त्याला ज्ञान आहे. सागर खवळला तरी माशांना (माशी नव्हे, मासा याचे अनेकवचन) त्याची भिती वाटत नाही.
आपले शरीर आणि आपलेच हात-पाय आदि अवयव यांच्यात जी ऐक्यता/एकता असते तशीच एकरसता जग व ज्ञानी भक्त यांच्यात असते. याच्या ठायी समग्र विश्वाविषयी कोणताच दुरावा नसतो. आज आपण बोलघेवडे, सामाजिक बांधिलकीचे कोरडे गोडवे गातो, पण ज्ञानी भक्त मात्र विश्वात्मक बांधिलकीचा पुरस्कार करतो, आचार करतो. ही विश्वात्मकता त्याच्या ठायी इतकी भिनलेली असते की जगच त्याचा देह झालेला असतो, त्यामुळे द्वैतबुद्धीच निखळून पडलेली असते.
"हे जगचि देह झाले । म्हणौनि प्रियाप्रिय गेले ॥" हा भक्त "कैवल्याचा अधिकारी" असून "मोक्षाची सोड-बांध करणं ही त्याची लीला असते. तो म्हणेल त्याच्यापाशी महाबोधाचा सुकाळ होत असतो / झालेला असतो. मात्र हा बोध ओळखता आला पाहिजे.
-- अण्णा
एकोहम्
http://harichintan.blogspot.in/2008/01/?m=1
0 comments:
Post a Comment