"वरती" गेल्यावरही उत्तर देता यायला हवं !
**
सुश्री निर्मलाताई पुरंदरे
उच्चस्तरीय पुरस्कारांकित व आयुष्यभर समाजभान जपणारे हे नाव.
डोंगराइतकं काम उभं करूनही आयुष्यात त्यांनी कधीच कुणाला मुलाखत दिली नव्हती. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्वाची. असं त्यांच मत.
मात्र जीवनात त्यांनी एकमेव मुलाखत दिली ती मला. "कर्तृत्वाला सलाम" या पुस्तकात मी काही उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा परिचय करून देण्याचं मिशन घेतलेलं. त्यासाठी मला ताईंची मुलाखत हवी होती. मलाही सुरुवातीला नकारच मिळाला. पण जवळपास पंधरा दिवस पाठपुरावा केल्यावर शेवटी त्या हसत हसत म्हणाल्या, "किती चिवट रे तू पण"
आणि तब्ब्ल दोन अडीच तास मस्त मुलाखत दिली.
यथावकाश त्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी त्यांनाच निमंत्रित केलं. आणि त्यांनी त्यांच्या भाषणात देखील माझ्या त्या एकूणच "चिवटपणाचा" उल्लेख पॉजिटिव्हली करून "ध्येय गाठायचे असेल तर असा चिवटपणा अंगी असावा" हे सर्वाना सांगितलं.
तर त्यांच्या त्या मुलाखतीत त्यांनी इतके सुंदर विचार दिले की त्याचीच एक मोठी सिरीज होईल. पण एक विचार फारच आवडला.
मी त्यांना विचारलं होत की, "घरी सगळं उत्तम, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेसारखे पती, माधुरी सारखी गुणवान गायिका / लेखिका मुलगी,. प्रसाद अमृत सारखी ध्येयवादी मुलं, हे सगळं करत करत किंवा याना प्रसंगी थोडं बाजूला ठेवून तुम्ही बाकी सामाजिक काम इतकं कसं करू शकला?"
तर त्या म्हणाल्या होत्या, "कसे आहे न की, देवाने आपल्याला इतके चांगले आयुष्य दिले, इतकी चांगली बुद्धी दिली. मग ती वापरली नाही तर काय उपयोग? इथलं सगळं आटोपून "वर" गेल्यावर त्याने जर विचारलं की, बाई ग, इतकं सगळं चांगलं आयुष्य दिल होत, काय केलं तू त्याच? तर मला त्या देवाला किमान एक तरी काम सांगता आलं पाहिजे."
समाजसेवेची हि अनोखी व्याख्या ऐकून मी निशब्द !
अजून एक असाच सुंदर विचार त्यांनी दिलेला (जो पुस्तकात पण मी लिहिला आहे)
मी विचारलं होत, "बाबासाहेब इतिहासात मग्न, तुम्ही वर्तमान व भविष्यकाळ घडवण्यात दंग. पण मग दोघेही जाहीर ठिकाणी कधीच पती पत्नी असा परिचय / उल्लेख करत नाही. असं का ?"
त्या म्हणाल्या, "हे बघ धनंजय, रेल्वेचे दोन रूळ समांतर असतील तरच त्यावरून रेल्वे नीट धावेल न. रूळ एकमेकांना चिकटत बसले तर अपघात होईल. तसेच दोघेही आपापल्या कार्यात, विश्वात मग्न असतील तर उगीच एकमेकांच्या जगण्यात, कामात लुडबुड करू नये. जन्माला आलेला प्रत्येकजण तसाही स्वतंत्र येतो व जातो. मग उगीच पायात पाय कशाला?"
आजकाल अनेक घरात पती पत्नी दोघेही करियर करत असतील तर त्यापैकी ९०% घरात विसंवाद आणि काही ठिकाणी पराकोटीचा वाद झडत असतो. त्यांच्यासाठी निर्मलाताई किती छान संदेश देऊन गेल्या न ?
अंगणवाडीच्या माध्यमातून हजारो महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या "वनस्थळी" संस्थेच्या संस्थापक व जिथे मी घडलो वाढलो त्या विद्यार्थी सहायक समितीच्या ज्येष्ठ विश्वस्त आदरणीय निर्मलाताई पुरंदरे, यांचे नुकतेच "वरती" प्रयाण झाले. त्यावरून मला त्यांचे हे विचार आठवले तेच तुमच्यासोबत शेयर केले.
"पोरकं होणं म्हणजे काय?" हे मला पुन्हा एकदा जाणवलं. दोन वर्षांपूर्वी मातृछत्र हरवलं तेव्हा आणि आता निर्मलाताई गेल्यावर एकदा! कारण माझ्या हॉस्टेल जीवनात कायमच ताईंनी जणू आईची भूमिका घेतली. प्रसंगी कठोर तर प्रसंगी हळव्या होऊन जपलं. माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी असेच जपले.
शेवटी शेवटी त्या आजारी असताना आम्ही भेटायला गेलेलो. थोडा विकनेस वाढल्याने विश्रांती घेत होत्या तरी स्मरणशक्ती तल्लख होती. समोर पाहताच म्हणाल्या, "आलास का रे बाबा, कसा आहेस? आता खोड्या कमी केल्यास न"?
अशा या निर्मलाताई.
त्यांच्या कार्याला हि शब्दांची सुमनांजली !!
- धनंजय देशपांडे (dd)
*
फोटो : हाच तो पुस्तक प्रकाशन समारंभ (सर्वात डावीकडे आदरणीय निर्मलाताई)
(पोस्टमधील विचार आवडले असतील तर प्लिज शेयर करा, जेणेकरून त्यातून इतर अनेक घरातील विसंवाद कमी होऊन सुसंवाद सुरु होतील)
0 comments:
Post a Comment