मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज ~ चंद्रशेखर गोखले
-----------------
मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.
मैत्री ही एक प्रामाणिक आणि तरल संकल्पना. जिथे आपलं मत व्यक्त करायला पूर्ण स्वातंत्र्य मिळतं तीच खरी मैत्री. प्रत्येकाने मैत्रीचं वेगवेगळं रुप पाहिलं आहे. जीवाला जीव देणारा घनिष्ठ मित्र असावा असं प्रत्येकालाच वाटतं. 'तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे' असं समर्पण मैत्रीमध्ये अभिप्रेत असतं. 'मी माझा' हा माझा चारोळी संग्रह खूप गाजला. या चारोळ्या लिहिल्या तेव्हा मी खूप एकटा पडलो होतो. वाईट प्रसंगांमध्ये साथ देणारं कुणीच नव्हतं. तेव्हा मनात बरेच चित्रविचित्र विचार यायचे. मी बराच वेळ चितन, मनन करण्यात घालवायचो. मी तेव्हा खूप उदास आणि निराश झालो होतो. त्यावेळीच मैत्रीचं खरं मूल्य कळलं आणि मनातले विचार कागदावर उतरवले.
माझ्या आयुष्यातील मैत्रीबद्दल बोलायचं झालं तर पत्नी ही माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आजपर्यंत पावलोपावली तिने मला साथ दिली आहे. आपल्याला समजून घेणारी व्यक्तीच खरा मित्र बनू शकते हे मी अनुभवलं आहे. आयुष्यातली सगळी नाती आपल्याला जन्मापासूनच मिळत असतात. मैत्रीचं एकच नातं निवडायला आपल्याला पूर्ण वाव मिळतो. त्यामुळे आपला जिवलग मित्र कसा असावा हे ठरवता येतं. मैत्री ही खूप छान भावना आहे असं मला वाटतं. मैत्रीला काळाची, वेळेची, वयाची बंधनं नसतात. लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत कुणाशीही घट्ट मैत्री होऊ शकते. मैत्री जितकी जुनी आणि दणकट तितकीच नाजूकही असते. त्यामुळे ती काळजीपूर्वक जपावी लागते. माझ्या मते पती-पत्नीची मैत्री हे सर्वोच्च नातं ठरू शकतं. कारण पती-पत्नी एकमेकांना आणि कुटुंबाला समजून घेणारे असतील तर सध्या अस्तित्वात आलेली विभक्त कुटुंबपद्धती लुप्त होईल आणि सशक्त समाज निर्माण होईल.
आजकालच्या चित्रपटांमध्ये मैत्रीची बरीच छान रुपं पहायला मिळतात. 'अजब प्रेम की गजब कहानी', 'वेक अप सिद' अशा चित्रपटांमधून मैत्रीचं सुरेख चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून घनिष्ठ मैत्रीची उत्तम उदाहरणं पहायला मिळतात. आजच्या पिढीमध्ये मैत्री खोल रुजलेली आहे. पूर्वी मैत्री करण्यासाठी तितकसं स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं. आजच्या पिढीला ते स्वातंत्र्य मिळालं आहे आणि तरुणाई त्याचा उपभोगही घेत आहे. आजकाल मुलामुलींमध्ये निकोप आणि निखळ मैत्री पहायला मिळते. समाजानेही त्यांच्या मैत्रीला मान्यता दिली आहे. काही ओंगळ प्रकार सोडले तर मैत्रीचं फुललेलं नातं पहायला मिळतं. मैत्री केवळ आनंद आणि समाधान देणारी असते असे नव्हे तर मैत्रीतून बरंच काही शिकायला मिळतं. दृष्टी विस्तारित होते. विचारांच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे मैत्री हे आयुष्याचं सर्वस्व आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
आजकाल मित्र-मैत्रिणींशी संपर्कात राहण्याचे बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मैत्री निभावणं सोपं झालं आहे असं म्हणता येईल. फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मित्रपरिवाराशी सहजपणे संपर्कात राहता येतं. अशा मनमोकळ्या आणि निकोप मैत्रीची सुरूवात घरापासूनच झाली तर किती मजा येईल ! 'जीवाला जीव देणारे मित्र' असा शब्दप्रयोग बरेचदा केला जातो. पण, ती मैत्री खरोखरच इतकी अतूट आहे का याचा विचार करणंही आवश्यक असतं. 'नुसतं बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही' हे सूत्र मैत्रीच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतं. कारण केवळ एकत्र वावरणारी मुलं-मुली मैत्री निभावू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये मैत्रीचे सूर जुळणं आवश्यक असतं. मैत्री ही निर्व्याजच असली पाहिजे. त्यामध्ये काही स्वार्थ असेल तर त्याला मैत्री म्हणताच येणार नाही. चोवीस तास एकत्र राहिलं म्हणजे मैत्री झाली असं म्हणता येणार नाही. तो केवळ सहवास ठरू शकतो. याउलट वर्षानुवर्षे एकमेकांना न भेटणार्या मित्रांमध्येही अतूट नातं टिकून असतं. मी माझ्या बर्याच मित्रांना वर्षा-दोन वर्षांनी भेटतो. पण, या कालावधीत आमच्या मैत्रीमध्ये काहीही फरक पडलेला नसतो. एकमेकांना भेटण्यातील आतुरता आणि आपुलकी तितकीच टिकून असते. मनामध्ये मैत्रीचा अंश कायम असतो. त्यामध्ये कोणताही फरक पडत नाही.
लहानपणापासून केल्या गेलेल्या संस्कारांनुसार 'पोटात माया असली पाहिजे' असं म्हटलं जातं. मैत्रीच्या बाबतीत मात्र हे गणित थोडं वेगळं आहे. मैत्रीमध्ये प्रवाही रहायचं असेल तर ती व्यक्त झालीच पाहिजे. ती व्यक्त केल्याने भावनांना मूर्त स्वरुप प्राप्त होतं. मैत्री अनेक पद्धतींनी व्यक्त करता येते. आपण कोणती पद्धत अवलंबतो यावर मैत्रीचं पुढचं गणित अवलंबून असतं. पूर्वीच्या आणि आताच्या मैत्रीत बराच फरक आहे. वाङमयात आणि साहित्यात मैत्रीच्या कथा वाचायला मिळत असल्या तरी पूर्वीच्या मैत्रीमध्ये थोडा मोजकेपणा होता. मैत्री जपून केली जायची. मैत्री करण्याआधी बर्याच बंधनांचा विचार करावा लागायचा, मोकळं होण्याची मुभाही नव्हती. मैत्रीमध्ये मात्र मोकळं होणंच अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने आजची मैत्री खर्या अर्थाने आदर्श ठरते. ती उथळ झाली आहे असं काही जणांचं म्हणणं असतं. पण, उथळपणाचं हे प्रमाण नगण्य आहे. कॉलेजमध्ये असताना आमचा ग्रुप खूप दंगा घालायचा, मस्ती करायचा. 'झुकझुक गाडी' म्हणून हा ग्रुप प्रसिद्ध होता. आम्ही एका टाळीने सगळ्या मित्र-मैत्रिणींना गोळा करायचो आणि एकमेकांना धरून सगळीकडे झुकझुक गाडीप्रमाणे पळायचो. तेव्हा लोक आम्हाला नावं ठेवायचे. पण, आमच्यासाठी ती एन्जॉयमेंट होती. अभ्यास, असाईनमेंट यासाठी सगळे मित्र-मैत्तिणी एकमेकांवर अवलंबून असायचे. सुख-दु:ख, आनंद अशा कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकमेकांची साथ सोडली नाही. म्हणूनच आमच्यामध्ये सशक्त बंध निर्माण झाले. आजकाल अशीच सशक्त मैत्री पहायला मिळते. मुलं-मुली एकमेकांबरोबर मोकळेपणाने वावरतात. इतर लोक त्यांना नावं ठेवत असले तरी एकमेकांच्या मैत्रीची महती केवळ त्यांनाच माहिती असते. शेवटी प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. त्यापैकी कोणती बाजू निवडायची हे आपल्यावर अवलंबून असतं. स्वातंत्र्य मिळालं र जबाबदारी पार पाडता यायला हवी आणि जबाबदारी अंगावर घेतली तर स्वातंत्र्यही अनुभवता आलं पाहिजे. शेवटी प्रत्येकाचा दृष्टीकोन संस्कारांवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. 'फ्रेंडशिप डे' च्या निमित्ताने मैत्रीचं भावविश्व उलगडता येतं. हा दिवस साजरा करावा की नाही, याबाबत बराच उहापोह केला जातो. पण, तो साजरा करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. वास्तविक वर्षाचे ३६५ दिवस मैत्रीचेच असतात. पण तरीही एखाद्या विशिष्ट दिवसाला मैत्री दिन मानायला काय हरकत आहे? मैत्रीचं स्वरुप खूप सुंदर असलं तरी काही ठिकाणी ते खटकतंही. भारत-पाकिस्तान संबंधांबाबत असंच काहीसं म्हणता येईल. हे दोन देश वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. त्यांच्यामध्ये ओढून-ताणून मैत्री निर्माण केली जात आहे. वास्तविक मुळातच जिथे द्वेष असेल तिथे मैत्री होणं शक्य नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तानसारखे दोन शत्रू मित्र होऊ शकत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे.
(अद्वैत फीचर्स)
चंगो
0 comments:
Post a Comment