Tuesday, January 21, 2025

भक्ति

तुम्ही अशा एखाद्या चमत्कारी व्यक्तीला ओळखता का.? कि.. कॅमेरा मध्ये त्यांचा फोटो टिपला असता, ते फोटोमध्ये दिसतच नसत. विशेष म्हणजे.. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या व्यक्ती, फोटोमध्ये अगदी स्पष्ट दिसत असत. आज आपण अशाच एका संत महात्म्याची ओळख करून घेणार आहोत. 

इसवीसन अठराशे साठ ते सत्तरचं दशक.. पब्लिक वर्क डिपार्टमेंट इंजीनियरिंग ऑफिस ठिकाण दानापूर.
ऑफिस मधील एक क्लार्क बाबु..  इंग्रज ऑफिसरच्या ऑफिस बाहेर थांबून विचारतात, सर मी आतमध्ये येऊ का.? आतमधुन कसलाच आवाज न आल्याने क्लार्कने त्या सगळ्या फाईली आतमध्ये जाऊन टेबलावर ठेवल्या, आणि तो गुपचूप बाहेर निघून आला. 
थोड्या वेळाने क्लार्कने साहेबांना आवाज दिला, त्यावर साहेब म्हणाले.. आज माझं कामात मन लागत नाहीये तुम्ही जाऊ शकता. क्लार्कने साहेबांना पुन्हा विचारलं तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम आहे.? मला झेपेल असं काही काम असेल तर सांगा.

साहेब म्हणाले.. इंग्लंड वरून पत्र आलं आहे, माझी बायको भयंकर आजारी आहे. समजत नाहीये मी काय करू.? तिकडे असतो, तर किमान तिची देखभाल तरी केली असती.

क्लार्क म्हणाला.. तरीच मी विचार करत होतो, की साहेब फाईलला हात का लावत नसतील.? असू देत मी थोड्या वेळाने परत येतो.
क्लार्कशी बोलून झाल्यावर इंग्रज साहेब थोडे ताजेतावणे झाले. ऑफिसमधील सगळे बाबू या क्लार्क बाबुला.. 

" पगला बाबू म्हणत असत "

हे बाबू नेहेमी आपल्याच धुणकीत असायचे, त्यांचा चेहरा देखील सतत हसतमुख असायचा. त्यामुळे काही लोकं यांना.. " आनंदमग्न बाबू " असं देखील म्हणत, कारण ते नेहेमी आनंदात बुडालेले असत. त्यांना कसल्याच गोष्टीची चिंता नसायची.
तितक्यात ते इंग्रज अधिकारी बाहेर आले आणि म्हणाले.. आज मी कसलंच काम करणार नाही, जे काही काम असेल ते आपण उद्या पाहुयात.
साहेबांचं बोलून झाल्यावर.. क्लार्क बाबू त्यांना म्हणाले,
साहेब आपण निश्चिंत राहा.. मेमसाब अगदी ठीक झाल्या आहेत. आजच्या तारखेला त्या तुम्हाला पत्र देखील लिहीत आहेत, काही दिवसातच तुम्हाला त्यांचं पत्र मिळेल. इतकच नाही, तर तिकीट मिळाल्यावर त्या इंग्लंडहुन पुढील जहाजाने भारताकडे रवाना देखील होणार आहेत.

इकडे क्लार्क बाबू बोलत होते, तर दुसरीकडे इंग्रज अधिकारी त्यांच्याकडे पाहून मंद स्मित करत होते. साहेब म्हणाले.. तुम्ही तर असं बोलताय, जसे की तुम्ही माझ्या बायकोला भेटून आले असावेत. 
ते काहीही असो, पण.. पगला बाबू तुमच्या या बोलण्याने माझ्या मनाला भरपूर आनंद दिला आहे. ईश्वर करो आणि तुमचे बोल खरे होवोत.

पगला बाबू म्हणजेच.. " श्यामाचरण लाहिरी महाशय "

साहेबांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास केला नाही. पण त्यांना तरी काय माहित, कि मधील काळात नेमकं काय घडलं आहे.? वेळ आल्यावर ते नक्कीच चकित होणार होते.

एका महिन्यानंतर एके दिवशी इंग्रज साहेबाचा शिपाई लाहिरी महाराजांपाशी आला आणि म्हणाला, साहेबांनी तुमची आठवण काढली आहे. लाहिरी महाशय साहेबांकडे गेले.. त्यावेळी साहेब त्यांना म्हणाले, पगला बाबू तुम्ही कमालीचे व्यक्ती आहात.. तुम्ही ज्योतिषी वगैरे आहात कि काय.? तुम्ही म्हणालात ते सगळं खरं झालं.. 
लाहिरी महाराजांनी मुद्दाम वेड्याचं सोंग घेतलं आणि म्हणाले.. तुम्ही कोणत्या विषयावर बोलत आहात.?
त्यावेळी साहेब म्हणाले.. माझी बायको आता बिलकुल ठीक आहे, आणि ती भारतात यायला रवाना देखील झाली आहे. आजच तिचं पत्र माझ्या हातात पडलं, मी खरोखर खूप आनंदी आहे, माझी बायको भारतात आल्यावर मी तुमची आणि तिची भेट घडवून आणेल.

विसेक दिवसांनी.. पगला बाबू यांना साहेबाच्या घरी बोलावणं आलं. घरी गेल्यावर पगला बांबूना साहेब म्हणाले.. आतमध्ये या, हे पहा इंग्लंड वरून माझी बायको आली आहे. आणि ते बायकोला त्यांची ओळख करून देणार.. तितक्यात, त्या मॅडम त्यांना पाहून आश्चर्यचकित झाल्या..एकदम खडबडून खुर्चीवरून उठल्या आणि म्हणाल्या.. 

माय गॉड..

साहेब देखील हैराण झाले आणि म्हणाले..का, काय झालं.?
त्यावर त्या मॅडम पगला बांबूना म्हणाल्या.. तुम्ही कधी आलात.?
साहेब त्यांच्या बायकोला म्हणाले.. तू हे काय बोलत आहेस, पगला बाबू कधी आले म्हणजे काय.? 
हे सगळं घडल्यावर..मंद स्मित करत पगला बाबू तेथून गुपचूप बाहेर पडले.

त्यानंतर साहेब त्यांच्या बायकोला म्हणाले.. हा नेमका काय प्रकार आहे.? त्यावेळी त्यांची बायको बोलती झाली.. मला असं वाटतंय मी काहीतरी चमत्कार पाहत आहे. 
ज्यावेळी मी इंग्लंडमध्ये होते त्यावेळी.. एकेदिवशी हेच महाशय, माझ्या बेडशेजारी उभं राहून, माझ्या मस्तकावरून हात फिरवत होते. मला आश्चर्याचा धक्का बसला.. कि हा अपरिचित व्यक्ती माझ्या घरात आलाच कसा.?
पण दुसऱ्याच क्षणी यांनी मला अंथरुणावरून उठवत बसतं केलं, त्यावेळी अचानकपणे माझ्या शरीरातील सगळे आजार आपोआप नाहीसे झाले. मला सगळं काही अगदी अजब वाटत होतं, आणि हे महाशय मला म्हणाले.. 
बेटी तू आता अगदी ठीक झाली आहेस. आता तुला कसलाच त्रास होणार नाही,  तिकडे तुझे मिस्टर फार चिंतेत आहेत. आजच त्यांना तू पत्र लिहायला घे.. आणि ताबडतोब जाऊन भारतात जाण्यासाठी जहाजाचं एक तिकीट बुक करून घे. लवकर जा. नाहीतर साहेब नोकरी सोडून इकडे निघून येतील. येवढं बोलून मी काही विचारायच्या आत, अचानक हा माणूस त्या ठिकाणाहून अदृश्य झाला.

लाहिरी महाशयांनी त्यांच्या जीवनात असे असंख्य चमत्कार दाखवले..
लाहिरी महाशय यांचा जन्म, ३० सप्टेंबर १८२८ मध्ये, बिहार मधील घुरणी गावातील एका ब्राह्मण कुटुंबात झाला. यांच्या वडिलांचं नाव, श्री. गौरमोहन लाहिरी, आणि आईचं नाव.. मुक्तकेशी देवी असं होतं. लाहिरी महाशय यांचे आईवडील अत्यंत धार्मिक होते. त्यांच्या वडिलांचा संपूर्ण दिवस.. धार्मिक चर्चेतच निघून जात असे, तर दुसरीकडे त्यांची आई देखील फार मोठी शिवभक्त होती. रोज सकाळी शिवलिंगावर अभिषेक केल्याशिवाय त्या पाणी देखील ग्रहण करत नसत. त्यांच्या आईवडिलांनी यांचं शामाचरण नाव ठेवण्यामागे हेच कारण होतं, कि मुलाचं नाव घेताना आपल्याला मुखातून परमेश्वराचं नाव यावं. श्री शामाचरण हे लहानपणापासूनच धार्मिक विचारांचे होते, त्यांची आई जेंव्हा पूजा अर्चना करायची, त्यावेळी ते अगदी शांतपणे सगळी पूजा मन लाऊन ऐकत असत.

काही वर्षानंतर.. त्यांच्या गावात नदीला फार मोठा पूर आला, आणि नेमकं नदीकिनारीच त्यांचं घर असल्याने, त्या पुरामध्ये त्यांचं राहतं घर आणि शेत देखील वाहून गेलं. या आघाता नंतर, त्यांच्या वडिलांनी आपलं गाव सोडलं आणि ते बनारसला निघून आले.
लाहिरी महाशय यांचे वडील शिक्षित असल्याने.. त्यांनी यांच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिलं. त्यांनी आपल्या मुलाला, बनारस मधील सरकारी संस्कृत शाळेत घातलं.
शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी.. बंगाली, परशियन, उर्दू, फ्रेंच आणि इंग्लिश भाषांवर आपलं प्रभुत्व सिद्ध केलं. याचबरोबर त्यांनी.. संस्कृत मधील ग्रंथाचा देखील बराच अभ्यास केला.

कॉलेजमध्ये शिक्षण सुरु असताना.. वयाच्या अठराव्या वर्षी, बनारस येथील.. पंडित देवनारायण सान्याल वाचस्पती यांची मुलगी काशीमणी हिच्यासोबत त्यांचा विवाह जुळून आला. काही वर्षात लाहिरी महाशय यांना.. दोन मुलं आणि तीन मुली झाल्या.
वयाच्या तिसाव्या वर्षी.. लाहिरी महाशय यांना, मिलिटरी इंजिनियरिंग विभागात क्लार्कची नोकरी मिळाली. ज्यामुळे त्यांची बदली भारतातील विविध भागात होऊ लागली. सुरवातीची काही वर्ष त्यांनी बनारस येथे काम केलं. पण त्यानंतर त्यांची बदली.. हिमालय पर्वत शृंखलेच्या जवळ असणाऱ्या राणीखेत या गावात झाली. याठिकाणी ते हेडक्लार्क म्हणून रुजू झाल्याने, त्यांच्या पगारात देखील बरीच वाढ झाली होती.

एके दिवशी ते राणीखेत येथील कार्यालयात निघाले असता.. त्यावेळी त्यांच्या नावाने आवाज देऊन त्यांना कोणीतरी बोलवत होतं. त्यांनी हिमालयाच्या पाहाडावर पाहिलं असता, एक संन्यासी त्यांना बोलवत असताना दिसले. ते संन्यासी अत्यंत वेगाने त्यांच्याकडे आले.. हे संन्यासी अगदी धष्टपुष्ट असे आजाणूबाहू व्यक्ती होते. त्यांच्या शांत दृष्टीमध्ये विचित्र असं आकर्षण होतं. त्यांच्या चेहेऱ्यावर एक मधुर हास्य होतं. ते संन्यासी त्यांना म्हणाले..घाबरू नकोस शामाचरण, मला माहित होतं, कि तू याच रस्त्याने जाशील, मी तुझी वाटच पाहात होतो. आणि ते संन्यासी महाराज त्यांना घेऊन आपल्या गुफेत गेले. लाहिरी महाशय यांना आपल्या गुरुदेवांची भेट झाली, या भेटीदरम्यान गुरुदेवांनी ( बाबाजी ) त्यांना आपल्या शक्तीने निर्माण केलेल्या हिमालयातील शांग्रीला महालात क्रिया योग शिकवला, त्या जादूई महालात बऱ्याच महान संत विभूतींचं त्यांना दर्शन मिळालं. गुरुदेवांच्या आज्ञेनुसार.. त्यांनी समस्त जणांना क्रिया योग शिकवला, आजही समस्त भारत वर्षात.. क्रिया योग केला आणि शिकवला जातो. 

लाहिरी महाशयांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात असे अनेक चमत्कार दाखवले, २६ सप्टेंबर १८९५ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या नश्वर देहाचा त्याग करून इहलोकीची यात्रा संपवली, आणि ते अनंतात विलीन झाले. 
बनारस येथे दशाश्वमेध घाटाशेजारी त्यांच्या राहत्या घरात, त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. लाहिरी महाशय आजही आपल्या कित्येक भक्तांना याची देहा दर्शन देत असतात.!!

आज लाहिरी महाशय यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांचा स्मरणार्थ हा लेख लिहावयास घेतला. 
लाहिरी महाशय यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी प्रणाम.!!

( लाहिरी महाशय यांच्या आज्ञेनुसार काढण्यात आलेला हा एकमेव फोटो आहे. )

©️ #PΔΠDIT_PΩTTΣR

0 comments: