प्रेम हा विषय खरंतर ऊहापोह करण्याचा नव्हेच. शब्दांची, चर्चांची गरजच नसते या भावनेला. ‘शब्दांवाचून कळले सारे’ अशीच ही अनुभूती. प्रेमाकडं वेगळ्या नजरेनं पाहणारा हा विशेष लेख खास आजच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त...
सुरवातीपासून आपल्यावर हिंदी चित्रपटसृष्टीचा पगडा आहे. अगदी ‘पडोसन’ चित्रपट गाजला आणि त्यात सायरा बानू मैत्रिणींचा मेळा सोबत घेऊन ‘मै चली मै चली’ करत सायकलवरून हुंदडली. लगेच मुलींचे गट तेव्हा ठिकठिकाणी सायकलवरून हुंदडताना दिसायला लागले होते. ‘बंदीश’मध्ये हेमा मालिनीनं पायातलं पैंजण हातात अडकवलं होतं, त्याचंही अनुकरण काही दिवस चाललं.
‘व्हॅलेंटाइन्स डे’चंही असंच. हा ‘प्रेमदिवस’ साधारणतः १९९३-९४ च्या काळात आपल्याकडं साजरा केला जाऊ लागला. मला वाटतं ‘कुछ कुछ होता है’नं हे फॅड आणलं आणि तरुणाईपेक्षा व्यापारीवर्गानं आणि मीडियानं ते टिकवलं. आपल्यावर तर काय चित्रपटांचा पगडा सुरवातीपासून होताच. ‘दिल चाहता है’मध्ये नायिका नायकाला सारखी मारत असते. त्याचंही अनुकरण बरेच दिवस इथं-तिथं भर रस्त्यात पाहायला मिळत होतं; मग व्हॅलेंटाइन्स डे हा तर खास प्रेमीजनांनी, प्रेमीजनांना वाहिलेला... मग त्याचं गारुड दिवसेंदिवस वाढेल नाहीतर काय? त्यात संस्कृती, परंपरा यांचा विचार येतच नाही. विचार करायचाच तर त्या आदिम, अलौकिक भावनेचा करू या.. जिला चित्रपटसृष्टीमुळेच काहीसं सवंग रूप आलं आहे. ही भावना म्हणजे अर्थातच प्रेम!
तुझ्यासाठी श्वास घेऊ शकत नाही
हीसुद्धा माझ्यासाठी उणीव आहे
तुझ्यावरचं प्रेम हीच फक्त
माझ्या जगण्याची जाणीव आहे...
तुला वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही
तुझ्याशिवाय आयुष्य
मी आयुष्यच धरत नाही..
अशी उत्कटता ही ज्या भावनेचं सामर्थ्य आहे... ज्या भावनेत फक्त समर्पण आहे, तिला प्रदर्शनाची गरज पडावीच का? आमचे एक सर होते. आंबेकर सर. ही गोष्ट आहे साधारणतः ३५-४० पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीची. त्या काळी व्हॅलेंटाइनचं नावही फारसं कुणाला माहीत नव्हतं. त्या काळात आमचे हे सर असाच एक दिवस साजरा करायचे... ज्या दिवशी त्यांनी मुलगी बघण्याचा कार्यक्रम केला, ज्या दिवशी त्यांनी त्यांच्या ‘सौ’ला पहिल्यांदा बघितलं, तो दिवस त्यांच्यासाठी उत्सवाचा दिवस असे आणि त्या दोघांनी तो जन्मभर साजरा केला. दोघं खूप आनंदात असायचे. नवे कपडे, नवे दागिने, जे आहे त्यात ते दोघं तो दिवस आनंदात घालवायचे. सर खाऊन-पिऊन सुखी होते आणि आपल्या मनाजोगत्या जोडीदाराबरोबर आनंदीही होते...
प्रेम साजरं करता येत नाही, आनंद साजरा करता येतो आणि आनंद साजरा करायला ठराविक दिवसाचं बंधन कशाला?
तू फक्त समोर यायचा अवकाश
की माझ्यापुरता काळ सरतो
संथ, मुलायम आणि सावकाश...
असा हा क्षणाक्षणानं फुलणारा आनंद आहे. त्याचा नेमका दिवस ठरवून त्या आनंदालाही नियम घालून टाकण्यात आले आहेत! नियमानं परंपरा तयार होतात आणि पुन्हा परंपरा नियमानुसार पाळल्या जातात...परंपरा पाळल्या जातात...पद्धती पाळल्या जातात. पण खरंच, प्रेमाची अलौकिक जादू या सोपस्कारात जाणवत नाही.
तुझी सावलीसुद्धा ओळखेन
कधी तू हरवलास तर
अरे, पण मी मागे राहीनच कशी
तू माझ्यापास्नं दुरावलास तर?
असे निरुत्तर करणारे प्रश्न फक्त या भावनेपोटीच पडू शकतात.
हात धरून रस्ता अडवत नाहीस
पण नजरेचा गुंताही सोडवत नाहीस
तुझं प्रत्येक स्वप्न साकार होताना पाहायचंय
अन् तुझं साकार झालेलं स्वप्न बनून
कायम तुझ्या सोबत राहायचंय...
अशी पूर्णतेकडे नेणारी भावना म्हणजे प्रेम आहे. ज्याला ही भावना उमगली, तो खरा रंगला!
आणि खरी रंगलेले गडीच मग वेडेपणा करतात.. प्रेमाचे दोन प्रकार आहेत ः वेड्यासारखं प्रेम करणं आणि प्रेमात वेडं होणं...! आणि व्हॅलेंटाइन्स डेला हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात!
संजय दत्तनं ‘व्हॅलेंटाइन्स डे’चाच मुहूर्त साधून रिया पिल्लईशी लग्न केलं होतं. घरातून निघताना त्याला कल्पनाही नव्हती की आपण आज चतुर्भुज होऊ.. त्यानंतर तो वेगळ्या प्रकारे अनेकदा अनेक कारणांसाठी ‘चतुर्भुज’ झाला; पण त्याचं ते व्हॅलेंटाइन्स डेला चतुर्भुजं होणं हे अनोखं होतं! त्याच्याबाबतीत बहुतांश प्रतिक्रिया अशा होत्या की ‘काय हा मूर्खपणा आहे?’
पण मी म्हणतो, ते म्हणतात ना ‘बुरा ना मानो होली है...’ तसंच या प्रेमाचंही असतं! त्या प्रेमात रंगलेले जे असतात, ते तो क्षण फार उत्कटतेनं जगत असतात. संजय-रियाचं लग्न टिकलं नाही हा भाग वेगळा; पण त्या क्षणाला त्यांनी ‘न्याय’ दिला होता! पण अशा क्षणांची अखंड मालिका म्हणजेच आयुष्य आहे...आणि ते भिरकावून देता येत नाही.. झुगारून चालत नाही. ते निभावावं लागतं आणि प्रेम बरेचदा तेच बळ देतं...
१९८० च्या दशकातली बी ग्रेडच्या चित्रपटांमधली एक नायिका होती; म्हणजे ती अजूनही आहे; पण आता ती वृद्धा आहे. तेव्हा ती नायिका होती. तिचा अशाच एका स्ट्रगल करणाऱ्या दिग्दर्शकावर जीव जडला, तेव्हा तो तिच्याकडं सोय म्हणून बघत होता आणि ती मात्र पुरती गुंतली होती. व्हायचं तेच झालं. ती गरोदर राहिली आणि हा दिग्दर्शक बिथरला.. एक से एक लव्हस्टोरी त्याच्या डोक्यात घोळत असताना त्याला त्याची स्वतःची लव्हस्टोरी लक्षातच येत नव्हती...!
मी तुझं व्हायचं तर
तुलाही माझं व्हायला हवं
हेही खरं की कुणाचं होऊन जाणं
मनापासून यायला हवं..
हे अस्सल प्रेमातलं गमक त्या दिग्दर्शकाच्या लक्षातच आलं नाही. यथावकाश त्या नायिकेनं-प्रेमिकेनं एका मुलीला जन्म दिला आणि अभिनय सोडून ती डबिंग करायला लागली. त्यात तिनं खूप नाव-पैसा कमावला. मुलीला तिनं छान सांभाळलं. दिग्दर्शकही जरा नावारूपाला आला; मग दोघं परत आमनेसामने आले. तो इतकी वर्षे बघत होता... तिनं कधीही त्याच्याबद्दल अपशब्द उच्चारला नव्हता की त्याला शिव्या-शाप दिले नव्हते. मग आपल्या लहानग्या मुलीला बघून त्यालाही पाझर फुटला असेल. त्यानं लग्नाचा प्रस्ताव ठेवला त्या नायिकेसमोर. वाटलं की ती आता लगेच होकार देईल; पण तसं झालं नाही. तिनं जगावेगळी मागणी केली. ती म्हणाली ः ‘‘आता अजून एक बाळ दे; मग लग्न करू. नाहीतर मोठीला उगाच कॉम्प्लेक्स येईल!’’ तेव्हासुद्धा अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या, ‘काय मूर्ख बाई आहे!’ ही मागणी ऐकून तो दिग्दर्शकही हैराण झाला होता... मात्र, प्रेमाची हीदेखील एक छटा आहे. असते. जोडीदाराच्या भरवशावर बेफिकीर होऊन जायचं. व्हॅलेंटाइन्स डेसारखा दिवस या अशा वेड्यांनाच शोभून दिसतो! त्या दिग्दर्शकानं त्या नायिकेची-प्रेमिकेची ती अट मान्य केली. मधल्या काळात त्याचं एक ठरलेलं लग्न मोडलं होतं... तो पुन्हा मनापासून या नायिकेत-प्रेमिकेत रमायचा प्रामाणिक प्रयत्न करायला लागला आणि त्याला जाणावलं, की तसा प्रयत्न करायची गरजच नाही. आपण मनपासून हिच्यातच रमलो होतो म्हणूनच आपले सूर दुसरीकडं कुठं जुळलेच नाहीत. मग त्यांना दुसरी मुलगी झाली. मग त्यांनी लग्न केलं. आता त्या दोघांची मोठी लेक जाहिरातींमध्ये आणि मालिकांमध्ये धमाल करतेय...
सगळं तुला देऊन पुन्हा
माझी ओंजळ भरलेली
पाहिलं तर तू तुझी ओंजळ
माझ्या ओंजळीत धरलेली..
अशी कृतार्थ भावना त्या दोघांना नक्कीच जाणवत असेल.
प्रेमाची सार्थकता असं कृतार्थ वाटण्यातच आहे आणि कृतार्थ असं उगीचच वाटत नाही. त्यासाठी अथांग होण्याची क्षमता असावी लागते.. माफ करा; पण हल्ली बरेचदा अशी क्षमता युगुलांमध्ये दिसून येत नाही...त्यांचे व्हॅलेंटाइन्स डेचे बेत ऐकतानासुद्धा हेच जाणवतं. जी गोष्ट निर्मळपणे व्यक्त करण्याची आहे ती गोष्ट, ती भावना ते सिद्ध करायचा अट्टहास करत असतात! पण सरसकट असं विधान करून मी मोकळा होत नाहीये..नाहीतर माझीच कविता मलाच लागू पडायची. मी एका कवितेत म्हटलंय ः
आपण नदीकाठी बसायचो
तिथे अजूनही तो खडक आहे
पण हल्ली बसणाऱ्यांचं
वागणंच जरा भडक आहे...
मित्रांनो, हा ऊहापोह न संपणारा आहे.
मुळात प्रेम हा विषय ऊहापोह करायचा विषयच नाही; पण व्हॅलेंटाइन्स डेची जादूच अशी आहे, की न चाहते हुए भी सब उस की लपेट मे आ जाते है ।
पण तरी खऱ्या प्रेमाचं खरं गमक सांगू?
आधी कळायला वेळ लागतो
मग मान्य करायला वेळ लागतो
तुला माहीत आहे?
इथे जिंकण्यापेक्षा हरायला वेळ लागतो...
चंद्रशेखर गोखले
0 comments:
Post a Comment