हा भगतसिंग ! हाय हा ! !
सरदार भगतसिंग दि. २३ मार्च १९३१ या दिवशी फाशी गेले. त्या वेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते. त्यांना भगतसिंग यांच्या फाशीची बातमी दुसऱ्या दिवशी मिळाली आणि त्या बातमीने निर्माण झालेल्या मनःक्षोभातून सावरकरांनी प्रस्तुत कविता रचली. लगोलग रत्नागिरी मधील 'हिंदु तरुण मंडळा'तील तरुणांनी ती गुप्तपणे पाठ केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी पोलिस सावध होण्यापूर्वीच त्या निवडक तरुणांनी हे गीत गात-गात रत्नागिरी नगरातून प्रभातफेरी काढून सारे रत्नागिरी नगर भगतसिंगाच्या नि स्वातंत्र्यलक्ष्मीच्या जयजयकाराने दणाणून सोडले.
हा भगतसिंग, हाय हा
जाशि आजी, फांशि आम्हांस्तवचि वीरा, हाय हा !
राजगुरु तूं, हाय हा !
राष्ट्र समरी, वीर कुमरा, पडसि झुंजत, हाय हा !
हाय हा, जयजय अहा !
हाय हायचि आजची, अुदयीकच्या जिंकी जया ॥
राजमुकुटा तो धरी
मृत्यूच्या मुकुटासि आधी बांधि जो जन निजशिरीं !
शस्त्र धरूचि अम्हि स्वतः
धरुनि जें तूं समरिं शत्रुशि मरसि मारित मारतां !
अधम तरि तो कोणता?
हेतुच्या तव वीरतेची जो न बंदिल शुद्धता ॥
जा हुतात्म्यांनो, अहा !
साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि अुरलो ते पहा !
शस्त्रसंगर चंड हा
झुंजवुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्यविजयाशी पहा !
हा भगतसिंग, हाय हा ! ! ॥
भगतसिंगाचा विजय असो... स्वातंत्र्यलक्ष्मीचा विजय असो !!!
0 comments:
Post a Comment