Showing posts with label fb post. Show all posts
Showing posts with label fb post. Show all posts

Saturday, July 25, 2026

धर्मेंद्र प्रधान यांचं कार्य

शेवटी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आहे.... 
चला, त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे वडील देवेंद्र प्रधान RSS चे आजीवन कार्यकर्ते होते, ज्यांनी ओडिशामध्ये भाजपाचा पाया घातला!

ओडिशामध्ये भाजपाला उभे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता! 1998 मध्ये देवेंद्र प्रधान देवगड मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री बनले!

धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या विद्यार्थी राजकारणाची सुरुवात ABVP मधून केली आणि 2004 मध्ये वडिलांनी आपली जागा मुलाला दिली आणि धर्मेंद्र प्रधान पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले!

प्रधान कुटुंबाने सलग दोन पिढ्या संघाच्या विचारधारेला या भागात पसरवून भाजपाला मजबूत केले आहे आणि ओडिशाच्या आदिवासी भागात धर्मांतर रोखण्यासाठी खूप काम केले आहे!

मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली! शिक्षणमंत्री झाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी पाठ्यपुस्तकांच्या पुनरावलोकनाचे काम सुरू केले!

परदेशी आक्रमणकर्त्यांना नायकांऐवजी खलनायक म्हणून दाखवले आणि भारतीय महापुरुषांना नायक म्हणून स्थापित केले, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर आहेत!
धर्मेंद्र प्रधान जी यांच्या कार्यकाळातील प्रमुख सुधारणा, कामगिरी आणि धोरणांचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे आहे.

NEP 2020 संरचनात्मक सुधारणा  
नवीन रचना: 3 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी "10+2" रचना बदलून "5+3+3+4" प्रणाली लागू केली.

प्राथमिक शिक्षण: पायाभूत शिक्षण (वय 3-8 वर्षे) आणि व्यावहारिक अनुभवात्मक शिक्षणावर भर दिला.

पीएम श्री शाळा: 13,000 पेक्षा जास्त शाळांना स्मार्ट क्लासरूम, ICT आणि विज्ञान प्रयोगशाळांनी अपग्रेड केले.

एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट: विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्रीसह शिक्षण मधेच सोडून पुन्हा सुरू करण्याची सुविधा दिली!

आंतरराष्ट्रीयीकरण आणि तांत्रिक शिक्षण  
जागतिक कॅम्पस: परदेशी विद्यापीठांना (जसे डीकिन, वोलोंगोंग) भारतात प्रवेश दिला आणि IIT चे परदेशात विस्तार केला.

भाषिक प्रवेश: B.Tech ची पाठ्यपुस्तके आणि तांत्रिक अभ्यासक्रम 12 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले.

प्रवेश परीक्षा: NEET, JEE आणि CUET 12 भाषांमध्ये तर CTET 19 भाषांमध्ये घेण्यास सुरुवात केली.

भाषा आणि पायाभूत साक्षरता उपक्रम  
निपुण भारत: इयत्ता 3 च्या अखेरीस सर्व मुलांसाठी सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञानाचे लक्ष्य ठेवले.

भारतीय भाषा उत्सव: दरवर्षी 4 ते 11 डिसेंबर दरम्यान होणारा भाषा उत्सव सुरू केला.

समर कॅम्प: एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकण्यासाठी 4.7 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना या अभियानाशी जोडले.

संस्थात्मक पाठबळ: UGC, CBSE आणि NCERT स्तरावर स्थानिक भाषांमध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली.

अभ्यासक्रम आणि उत्तरदायित्व सुधारणा  
अभ्यासक्रमात बदल: आणीबाणी आणि सर्जिकल स्ट्राइकवर धडे समाविष्ट केले; प्रादेशिक राजघराण्यांना प्राधान्य दिले.

सामग्री हटवणे: स्थानिक आणि राष्ट्रीय नायकांना प्राधान्य देण्यासाठी मुघल इतिहासाची सामग्री कमी केली.

झिरो टॉलरन्स: पेपरफुटीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा देण्याचे धोरण स्वीकारले.

संस्थात्मक सुधारणा: वैयक्तिक घटनांऐवजी शिक्षण व्यवस्थेत दीर्घकालीन आणि मोठ्या सुधारणांवर लक्ष केंद्रित केले.

NEET चा पेपर लीक झाला तेव्हा 13 गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकले, आणि 1 महिन्यातच पूर्ण ताकदीने NEET ची परीक्षा पुन्हा घेतली आणि ती यशस्वी झाली.

स्वातंत्र्यानंतरपासूनच शिक्षण विभाग मौलानांऐवजी, एखाद्या राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी व्यक्तीच्या हात द्यायला हवा होता, तर आपला इतिहास काही वेगळा असता.
पण आज दुर्दैवाने त्यांचा राजीनामा झाला आहे..

मित्रांनो आपले वैचारिक मतभेद काहीही असुद्या...पण आज आपण शिक्षण क्षेत्रातील एक अमूल्य हिरा गमावलेला आहे.

जय हिंद!🇮🇳
जय श्री राम!🚩

-Mahesh Kawale


देश विरोधी ताकतें फायदा न उठाए 
इसलिए फैसल लिया ! धर्मेद्र प्रधान 

Wednesday, May 6, 2026

शब्दरंग

सकाळी वॉकला गेले असता वॉकिंग  ट्रॅकवर एक आजी दिसल्या. समोरुन येताना दिसल्या त्याच क्षणी मला यांच्या बद्दल कुतूहल वाटले. वयाच्या मानाने लहान वगैरे काही दिसत नव्हत्या पण वयाला लाजवेल एवढा उत्साह मात्र नक्की होता.
 वेशभूषा नक्कीच तरुणांसारखी होती. सर्वप्रथम त्यांना पाहिल्यावर या वॉकिंगला आल्या आहेत की ट्रीपला हेच लक्षात येईना.
     ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, गॉगल आणि कॅप.. तयारी तर सगळी ट्रीपला निघाल्यासारखीच होती. त्यांचा फोटो काढण्याची मनोमन इच्छा झाली. पण त्यांना हे आवडेल की नाही? फोटो साठी कसे विचारावे .... असा विचार करत मी पुढे चालू लागले. थोड्यावेळाने गणपती मंदिराजवळ थोडावेळ बसून परत एखादा राऊंड मारावा असा विचार करून मी गणपतीच्या मंदिराजवळ आले तर समोरच आजी उभ्या. स्वतःहून माझ्याशी काहीतरी बोलल्या. संवादाचा हाच धागा पकडत मी त्यांना विचारले, " आजी, वय काय हो 
तुमचे? "
      खरे तर त्यांच्याकडे बघून त्यांना आजी म्हणावं की नाही हाच प्रश्न होता. " सांगा बर किती असेल? "..... आजींनी मलाच प्रतिप्रश्न केला. "तुमचा उत्साह बघून नक्की तुमचे वय कळत नाहीये म्हणूनच विचारते आहे ".... असे मी म्हणताच...." 81 "... आजी उत्तरल्या.
      वयाच्या 81 व्या वर्षी इतका उत्साह! 
 "आजी, तुमचा एक फोटो काढायचा होता. काढू का?".... मी विचारले.
 तसे खुश होत आजी म्हणाल्या," अरे वा... काढा की. कुठे उभी राहू सांगा. "
 मी म्हणाले... " वॉकिंग  ट्रॅकवर उभ्या रहा." 
 तर आजी म्हणतात कशा.... " अहो, थांबा.. थांबा. जरा केस नीट करते आणि घाम पुसते. "
 बोलता बोलता आजींनी रुमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि केस व्यवस्थित केले.
 डोळ्यावर पुन्हा गॉगल चढवला आणि डोक्यावर कॅप. त्यादिवशी मी नेमकी चष्मा घरी विसरले होते. त्यामुळे फोटो काढताना मलाच थोडी सर्कस करावी लागली. मी म्हणाले... "आजी, माझे मिस्टर फोटो छान काढतात. इथेच कुठेतरी ट्रॅक वर फिरत आहेत. " तर म्हणतात कशा...  "अहो,मग शिट्टी मारा की... येतील ते लगेच."
 असे म्हणून त्या स्वतःचा हसू  लागल्या. आजींच्या आतले खट्याळ लहान मूल अजूनही जागे होते.
     फोटो काढून झाल्यावर मला म्हणाल्या,  "आता हा फोटो मला कसा मिळणार? "
 मी तुमचा फोन नंबर द्या म्हणाल्यावर लगेच माझे नाव आशा शहा आहे म्हणाल्या व मोबाईल नंबर सांगितला. मी काढलेला त्यांचा फोटो बघून तो कसा क्रॉप केला पाहिजे वगैरे सूचना द्यायला आजी विसरल्या नाहीत.
 पाच-दहा मिनिटांच्या भेटीमध्ये आजींनी स्वतःबद्दल बरीच माहिती सांगितली. तरुणपणी प्राध्यापक असणाऱ्या आजी पंधरा-वीस  वर्षे अमेरिकेत राहून आल्या होत्या. 
" आयुष्यात मी बराच स्ट्रगल केला आहे ".... हे सांगायला आजी विसरल्या नाहीत. 
 म्हणजे आजींचं आयुष्य अगदी सरळ साधं नव्हतं तर. पण तरीही आजींनी स्वतः मधलं लहान मूल जपलं होतं हे त्यांच्या वागण्या बोलण्यातून कळत होते.
 तरी मला आता पहिल्यासारखे काम जमत नाही म्हणाल्या. 
 मी काही म्हणण्यापूर्वीच " तुम्हाला भेटून छान वाटले. नवीन ओळख झाली. ".... असे आजींनी मलाच सांगितले.
 खरे तर आजींना भेटून माझी दिवसाची सुरुवात छान झाली होती. 
 पुन्हा भेटण्याचे आणि आजींविषयी मी लिहिलेली पोस्ट त्यांना पाठवण्याचे आश्वासन देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
 आजींकडे बघून... Age is just a number... याचा  प्रत्यय आला. 
 म्हातारपण असावं तर आजींसारखं असं मनातल्या मनात म्हणत मी घरी आले.
 त्या दिवशी दिवसभर राहून राहून सारख्या आजी डोळ्यासमोर येत होत्या. 
 आपल्या संपर्कात आलेला प्रत्येक माणूस आपल्याला नक्कीच काहीतरी देऊन जातो हे नक्की.

©️®️स्मिता मुंगळे.

Monday, May 4, 2026

स्वामी विवेकानंद

सध्या स्वामी विवेकानंद यांचे भारतीय व्याख्याने वाचनात आहे. मद्रास येथील "भारताचा भावी काळ" हे व्याख्यान वाचले. खरंतर स्वामीजींचे प्रत्येक व्याख्यान सकारात्मक विचार  प्रदान करणारे आहे. भारताचा भावी काळ यात स्वामीजी म्हणतात, 

" जेव्हा अशी एखादी प्रभावी व्यक्ती निर्माण होते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे तिचे विचार आपल्यापैकी पुष्कळांच्या मनात उत्पन्न होतात व अशाप्रकारे आपण सामर्थ्यसंपन्न होतो. संघटना ह्या एवढ्या शक्तिशाली, कशामुळे होत असतात ? संघटना ही काही जड वस्तू नव्हे. उदाहरणच द्यावयाचे तर, चार कोटी इंग्रज लोक येथील तीस कोटी लोकांवर राज्य कसे करू शकतात ? याचे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण कसे कराल ? हे चार कोटी लोक आपली इच्छाशक्ती एकत्र करतात व त्यामुळे अपार सामर्थ्य निर्माण होते, आणि तुम्हा तीस कोटी लोकांपैकी प्रत्येकाची इच्छाशक्ती वेगवेगळ्या रीतीने कार्य करीत असते. म्हणून, भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे रहस्य संघटना, शक्तिसंचय व इच्छाशक्तीचे परस्पर सहकार्य यांतच साठलेले आहे.

याच वेळी ऋग्वेदातील पुढील अपूर्व मंत्र माझ्या मनात येत आहे:
सं गच्छध्वं सं वदध्वं सं वो मनांसि जानताम्
देवा भागं यथा पूर्वे ..." (१०-१९१-२)

हा मंत्र आपल्याला सांगतो, "तुम्ही सर्वजण मनाने एक व्हा, तुमचे विचार एक असोत, कारण विचाराने एक असल्यामुळेच पूर्वी देव यज्ञातील हविर्भाग घेऊ शकत असत. मनुष्याकडून उपासना ग्रहण करण्यास देव योग्य होते, कारण ते एका विचाराचे होते". मनाने एक होणे यात समाजाच्या स्थैर्याचे रहस्य आहे. आणि जर तुम्ही आर्य-द्रविड, ब्राह्मण- अब्राह्मण यांसारख्या क्षुल्लक प्रश्नांवरून कलह माजवीत बसाल, तर भारताचे भविष्य घडविण्यासाठी आवश्यक असलेल्या शक्तिसंचयास तुम्ही मुकाल. कारण, लक्षात ठेवा की, भारताचे भविष्य सर्वस्वी ह्या गोष्टीवरच अवलंबून आहे. इच्छाशक्तींचे संमीलन, त्यांचे परस्पर सहकार्य व त्यांचे केंद्रीकरण हेच रहस्य होय."

बहुत काय लिहीणे..४ मे ऐतिहासिक परिवर्तनाची नांदी असल्याचा दिवस आहे. गंगा - गंगासागर- माँ काली-अनन्य भक्त ठाकूर- माँ शारदा, स्वामीजी, या साऱ्या आणि सार्धशती वर्ष असणाऱ्या वंदे मातरम् या महामंत्राची संपूर्ण शक्ती एकवटली आणि क्रांतिभूमीतून परिवर्तन अद्भुत अविस्मरणीय ठरले आहे.. जय माँ..🚩🙌

-  सर्वेश फडणवीस

Sunday, May 3, 2026

तामसी वृत्ती स्त्री वर अत्याचार

मन खंतावून गेलंय, भावना तीव्र आहेत. पण तोकड्या शब्दांत व्यक्त करता येत नाहीत. प्रत्येक विचारी, सजग माणसाची आज हीच अवस्था आहे. भेदाभेदांना विचारी मनुष्य कंटाळला आहे. गुन्हा आणि शिक्षा हा सरळ न्याय असला पाहिजे. अर्थात प्रत्येक घटना घडताना सरकारलाच दोष देणं हेही योग्य होणार नाही.

मुळात मनुष्याची अशी अमानुष प्रवृत्ती होण्याच्या कारणांचाही शोध घेतला पाहिजे - म्हणजे रोगाच्या मुळाशी गेलं पाहिजे. ('अमानुष' किंवा 'पाशवी' असं संबोधन तरी का करायचं? कारण पशूही आपल्या धर्माप्रमाणे - म्हणजे सहजप्रेरणेने जगत असतो. पण सारासार विवेक करण्याची शक्ती मिळालेला मनुष्य मात्र अनिर्बंध होऊ शकतो हेच कालच्या घटनेवरून समजून येतं.) त्यामुळे 'अमानुष'ऐवजी 'नराधम' हेच संबोधन योग्य वाटतं.

नराधम, बेलगाम प्रवृत्ती होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हेतुपुरस्सर रुजवली गेलेली, वासना बळावणारी भोगवादी जीवनशैली. अशा कालखंडात कोणती माध्यमं, विविध गोष्टी-दृश्यांमधून नको त्या गोष्टी  मुद्दाम आपल्या माथी मारत आहेत हे ओळखून आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण अशा गोष्टी तामसी भोग मिळवण्यासाठी मनुष्याला प्रवृत्त करत असतात.

तामसी वृत्तीचा कळस (नव्हे तळ!) म्हणजे प्रचंड आसक्ती, अपरिमित वासना आणि अविवेकी स्पर्धावृत्ती वाढीला लागणं हा असतो! कितीही मिळालं तरी समाधान होत नाही. वासना संपत नाहीत किंवा मनाला तृप्ती मिळतच नाही. अधिकाधिक भोगवासना मिळवण्यासाठी बाह्य जगात दिवस-रात्र दिशाहीन, निर्बंधरहित धावत राहणं हेच जीवनाचं उद्दिष्ट झालं तर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजालाही भोगावे लागतात. (काहींना नाईलाजानं पोटासाठी रात्रीचा दिवस करावा लागतो त्यांच्या संदर्भात हा विचार नाही.) रात्र ही विश्रांतीसाठी असते. अनेक प्राणी-पक्षी हा निसर्गनियम पाळतात; फक्त माणूस नाही. रात्रीचा अंधकार हा तामसी प्रवृत्तीला उत्तेजन देत असतो. 

मोठ्या शहरांमधून रात्रीचं जीवन हे भयकारी होत चाललं आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. पहाटे सात्त्विक वातावरण असतं, दुपारी राजसी तर रात्री तामसी वृत्तीचा जाेर असताे. जन्मदिवसही सूर्याच्या साक्षीनं साजरे केले तर ते खरे लाभदायक ठरू शकतात. आसुरी शक्ती रात्री कार्यरत हाेत असतात, असं महाभारतातही अनेक ठिकाणी म्हटलं आहे. दिवसापेक्षा रात्री जीवितहानी सुद्धा अधिक हाेते असं जगातले अनेक रिपाेर्ट्स् सांगतात. (Search on Google.) यामागे अनेक नकारात्मक लहरीही काम करीत असतात.

रात्रीचे तामसी संस्कार मनात रुजतात आणि दिवसाही ते मनुष्याच्या हातून कुकृत्यं घडवून आणतात. त्या बिचाऱ्या चिमुरडीचा अशाच वृत्तीतून बळी घेतला गेला - अनेक जीव आजपर्यंत अशाच वृत्तीतून बळी पडलेले आहेत. सरकार infrastructure देईल, नोकऱ्या निर्माण करेल, मदत देईल, सर्वप्रकारच्या व्यवस्था देईल; पण योग्य तर्हेने जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे हे ज्या-त्या मनुष्यालाच ठरवावं लागेल.

त्या आणि नराधमांच्या वासनांना बळी पडलेल्या अशाच पीडितांना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.

Rajendra Kher

https://www.facebook.com/rajendra.kher.79

Saturday, May 2, 2026

सुमी... २७ ०४ २४

सुमी... २७ ०४ २४

सुमती जोग ही माझी चुलत बहीण. आधीची सुमती फडके, लग्नानंतर जोग. ती जवळपास माझ्यापेक्षा दहाएक वर्ष मोठी आहे, अजूनही अंतर तेवढंच बाकी आहे आमच्या वयातलं. हे तीच म्हणालीये. अतिशय हजरजबाबी, विनोदी, फटकळ आणि एकूणच बिनधास्त आहे ती. कोकणी मातीतले सगळे गुणावगुण तिच्यात ठासून भरलेले आहेत. माझ्या काकांची ती एकुलती एक मुलगी. वांड आणि आडदांड. मुलीच्या जन्माला आली म्हणून नाहीतर सुमंत फडकेच तो. काका तिला तशीच हाक मारायचे. गुणावगुणसुद्धा उपजत असतात काही. आम्ही कोळीस-याचे मूळ. चाफ्यावरून पुढे गेलात की आमचं गाव लागतं. शिकायला म्हणून बाहेर पडलेलो आम्ही शिकल्यावर नोकरी करत शहरातच राहिलो आणि गाव फक्त सुट्टीला, होळीला, गणपतीला जाण्यापुरतं उरलं. काही वर्षांनी तो सुद्धा इतिहास होईल कारण जाण्यासाठी गावात घर, नातेवाईक हवेत की. आमचंही आता गावात सुमी सोडल्यास कुणी नाही. सुमीसुद्धा एकटीच आहे तशी आता. आई, वडील, काका काकू कधीच गेले. ती ही आता पंचाहत्तरच्या जवळ आलीये. पण वर्षातून मी एकदा तरी जातोच गावाला. काम काही नसतं पण सुमी आहे म्हणून जातो.

ती वयाने वाढली पण अजून गुणावगुण सगळे तसेच आहेत. अजूनही कुणी तिच्या अंगणात पडलेला आंबा उचलायचं, जास्वंद काढायचं धाडस करणार नाही. भुतासारखी कुठून बघेल आणि झोड उठवेल हे कळणार नाही. सगळी फुलं ती काढणार आणि वाटणार पण तुम्ही काढलंत की संपलं. इतकी बोलेल की झक मारली आणि फूल तोडलं असं वाटलं पाहिजे तुम्हांला. सुमी आता एकटीच रहाते. जोग गेल्याला पण चारेक वर्ष झाली. समोरच्या वाडीत जोग रहायचे आणि इकडे फडके. तेंव्हाच ते लादलेलं लव्ह मॅरेज होतं. विद्याधर जोग म्हणजे अगदी शहाळ्यासारखा नरम आणि गोड माणूस, त्यांना घरी हाक मारायचं नाव मिलिंद उर्फ मिलू होतं. सुमी अठराची असेल तेंव्हा आणि जोग एकवीस. तसे दोघे एकाच शाळेत शिकलेले. घरी लग्नाचा विषय सुरु झाल्यावर सुमीने स्पष्ट सांगितलं, 'वसंतकाकांना विचारा, मला आवडतो मिलू. त्याला मी आवडते का माहित नाही'. काकू विचारात पडली ते कार्टीने प्रेमाचे चाळे काय केले असतील यामुळे नाही तर मिलू हो म्हणाला तर त्याचे किती हाल होतील याने. सगळे जोग मिटल्या तोंडाचे होते आणि ही बोलभांड. घरच्या आंबा, काजूच्या बागा होत्या दोन्हीकडे. दोघेही एकुलते एक. त्यांचं दुकान पण होतं बाजारात. जोग बी.ए. झाले होते आणि सुमी बारावी.

एके दिवशी काका आणि काकू वसंतरावांना भेटले आणि लग्न ठरवून आले. त्याचवेळी सुमी दुकानात गेली होती, हक्क दाखवायची पद्धत पण अफाट, 'ए मिलू, आईबाबा तुझ्या घरी गेले आहेत आपल्या लग्नाचं बोलायला, मीच सांगितलं त्यांना, तुझं कुठे काही झेंगट नाही ना, रत्नागिरीला कॉलेजला होतास म्हणून विचारलं'. जोग गल्ल्यावर आडवेच झाले. कसाबसा धीर एकवटून ते म्हणाले, 'ठरवायला म्हणजे? मी हो म्हणायला पाहिजे ना पण?' 'माझ्यात काय वाईट आहे सांग नाही म्हणायला? तुमच्या सगळ्यांपेक्षा गोरी आहे मी, सगळी कामं येतात, झाडावरून आंबे, काजू काढता येतात, वीस पंचवीस माणसांचा स्वयंपाक एकटी करू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तू आवडतोस. नाही म्हण फक्त मग बघ तुझं तरी लग्न ठरू देतीये का ते. आलेल्या मुलीला सांगेन, माझं आणि याचं प्रकरण होतं म्हणून'. 'तू काहीही सांगशील, पुरावा हवा ना. आणि इथे दुकानात बोलायच्या गोष्टी आहेत का या? बोलतो मी आधी घरी'. 'हो, नाही, जे असेल ते उद्या संध्याकाळी सातला देवळात ये सांगायला, तेंव्हा नसतं कुणी'. जोगांनी कपाळावर हात मारून घेतला आणि कामाकडे वळले ते. सुमी घरी रीतसर सांगून देवळात गेली होती. 'मिलू येणारे सांगायला, हवं तर तू ही चल' असं ती काकूला म्हणाली होती. तिने डोक्यावर हात मारून घेतला आणि 'जा तूच' म्हणाली.

लग्नाला सगळं गाव लोटलं होतं. भर लग्नात सुमी म्हणाली होती, 'गावक-यानू दोनदा जेवा, दोन्हीकडे आहेर दिलाय ना तुम्ही'. मी लहान होतो तेंव्हा पण गोरीपान सुमी अगदी पिवळी धम्मक दिसत होती दागिन्यांमुळे, ते आठवतंय. माहेर समोर आहे म्हणून ती कधीच उठसूट जायची नाही. कारण असेल तरच. तिचे मानापमान अगदी कोकणी होते. चार दिवस आधी मदतीला गेली आईला पण दिवाळसणाला रीतसर आमंत्रण दिल्यावर येईन म्हणाली. दिवाळीत चार दिवस जोग घर बंद करून फडक्यांकडे रहायला होते. नियम म्हणजे नियम. बोलभांड असली तरी ती प्रचंड मायाळू आहे, ते दिसू न देण्यासाठी सगळी धडपड असते तिची. लग्न झाल्यावर ती भरपूर आहे म्हणून बसून राहिली नाही. आंबे गावोगाव पाठवणे, आंब्या फणसाच्या पोळ्या, पल्प तिने गावात तयार करण्यासाठी छोटा कारखाना काढला आणि अनेक लोकांना रोजगार पण दिला. तिथेही मालकीण आहे की कामाला आहे कळणार नाही अशी उपस्थिती असायची तिची. ती ही बरोबरीने काम करायची इतर बायकांच्या. बाई गर्भार असेल तर चार तास काम आणि आठ तासाचा पगार असा तिचा कायदा होता. कुणी कुठे हात पसरले पैशासाठी हे समजलं तर ती चारचौघात त्याला झोडायची आणि पैसे द्यायची. आपल्याकडच्या माणसाने बाहेर पैसे मागावेत हा तिला अपमान वाटायचा. तिच्या दृष्टीने ते एक कुटुंब होतं आणि ती कुटुंबप्रमुख. तिच्याकडे काम करणा-या लोकांच्या मुलांनी, सुनांनीही काम केलं तिथे.

कुणालाही औषधाला, बाळंतपणाला, मुलीच्या लग्नाला, कळलं की पैसे ती न मागता द्यायची. ते परत देवोत न देवोत ती काहीही बोलायची नाही पण उसने घेतले असतील तर पठाणासारखी दारात जाऊन उभी रहायची मागायला. मुलाच्या लग्नाला मात्र पैसे द्यायचे नाही ती उसने, 'पोरग्याला कमवायला सांग मग लग्न कर म्हणावं', असं म्हणायची. एकूणच विचित्रं रसायन आहे ते. खोटेपणा, अस्वच्छता याचा तिला भयंकर राग. कामाला असलेल्या गड्याने अंगण नीट झाडलं नाही तर ती स्वतः त्याला कडेला उभा करून झाडून दाखवायची, झाडून होईस्तोवर त्याला तोंडाने झोडकाम चालू. रांगोळी म्हणजे फक्त 'श्रीराम' लिहायची, बाकी नाजूक काम तिला कधी जमलं नाही. झाडावर मात्र खारीसारखी चढायची अगदी. लग्न झाल्यावर सासूमुळे एकच बदल केला तिने. घरात किंवा बाहेर ती सगळ्यांसमोर मिलू म्हणायची नाही. 'ओ जोग' अशी खणखणीत हाक मारायची. एवढ्या सगळ्या सुखात तीट लावल्यासारखं एकच दुःखं होतं. तिला मुलबाळ काही झालं नाही. बरेच उपचार करून झाले. नवस वगैरे मी करणार नाही, दत्तक घेणार नाही हे तिने आधीच सांगितलं होतं. सासूने आणि तिच्या आईने केले नवस, उपास पण उपयोग झाला नाही काहीच. विषय निघाल्यावर तिने सगळ्यांसमोर विचारलं होतं, 'ओ जोग, तुम्हांला अपत्यासाठी दुसरं लग्न करायचं असेल तर करा बरं का, मी विनातक्रार समोर रहायला जाईन. अजिबात लुडबूड करणार नाही तुमच्या आयुष्यात पण घटस्फोटही देणार नाही, समोरून बघेन तुम्हांला'. जोग भरल्या गळ्याने म्हणाले होते, 'घरात तू एक लहान वांड बाळ आहेस ते पुरे आहे, आणखी नको कुणी मला'. आयुष्यात पहिल्यांदाच सुमी रडली असेल त्या दिवशी.

बोलणं सरळ म्हणून नाहीच कधी. एकदा असेच अंगण्यात बसलो होतो. एका म्हाता-याने जाताजाता अंगणात पडलेल्या बारक्या काटक्या सरपणासाठी गोळा केल्या. पुढचे संवाद नेहमीचे होते. 'रे मेल्या, माझंच अंगण दिसलं काय तुला? तुझ्यासाठी करतोयस का गोळा? गेलास तर लोकांना काळजी, स्वतःसाठी कशाला लाकडं गोळा करायला पाहिजेत'? 'अगो सुमे, तुझ्यासाठी पण ठेवेन गो बाय चार काटक्या तिथे'. 'मी इतक्यात नाही जायची. पोरगा कसा आहे रखमीचा?' 'चांगला हाये. तुझी आठवण काढली गो तिने, परवा गेलेलो ना तिच्या सासरी, निवलीला'. 'अरे बोलायचंस तरी, बस जरा. परवाच डिंकाचे लाडू केलेत ते देते चार तिच्यासाठी'. रखमी तिच्याकडे कामाला होती घरी लग्नाआधी. तिचा बाप दुकानात होता त्यांच्याच. ती बाळंतपणाला आलेली चार महिन्यामागे. सगळा खर्च सुमीचा. 'दात किती शाबूत आहेत तुझे?' 'छे गो, दोनचार हायेत, का ते'? 'लाडू रखमीसाठी दिलेत, तूला दात नाहीत म्हणजे पोचतील तिच्याकडे. आणि ती तुपाची बरणी पण ने. तिला म्हणावं लपवून खा हवंतर पण तब्येत सुधारू दे'. 'लाडू पोचिवतो, बरनी घरीच ठेवतो, आमच्या काय अंगी लागायचं नाय का तूप? आणि लगेच कुठून जाऊ परत. येष्टी काय आता सस्त -हायलीये काय?' 'तर तर, चार दिवस विड्या ओढू नकोस की, चहा घे हा. मी मागच्या जन्मीची देणेकरी आहे तुमची आणि हे पन्नास घे पण जाऊन ये उद्या तिच्याकडे'. म्हाता-याने डोळे पुसत वस्तू हातात घेतल्या आणि तो निघाला पण सुमी ती सुमीच. 'सरपण सोड ते आधी, जंगलात पडलंय ते आण, सगळं नुसतं फुकट हवं मेल्यांना'. म्हाता-याने दोन काड्या टाकल्या आणि तो हसत हसत निघून गेला.

काळ झटझट सरला. गावातली माणसं विरळ होत चालली. जवळपास पन्नासेक वर्षांचं तिचं सहजीवन एका रात्री संपलं. कुठलंही व्यसन नसलेले, आजार नसलेले जोग हार्ट अटॅक येऊन गेले. सुमीने एकदाच काय ते रडून घेतलं, कुणी हाक मारायला आल्यावर पाण्याच्या टिपूस काढला नाही. 'वय नव्हतं फार पण कोण कधी जाणार हे आपल्या हातात नसतं, दुःखं होतंच पण सतत रडून माणूस परत येणारे का?' असं तिचं स्पष्टं मत होतं. त्यानंतर तिने सगळे उद्योग विकून टाकले, जमिनी विकल्या, दागिने विकले आणि राहण्यापुरतं घर ठेवलं. तिच्या हयातीत व्याज आणि पश्चात रक्कम अनेक सेवाभावी संस्थांना मिळावी असं मृत्युपत्र तिने तयार करून ठेवलंय. शिक्षण नसेल फार पण तिचे विचार स्पष्ट होते, आतबाहेर काहीही नाही, कपट नाही, दुजाभाव नाही. एकदा असाच आमचा कशावरून तरी वाद झाला. मी रागाने म्हणालो, 'आता अजिबात येणार नाही तुला भेटायला'. 'नको येऊस, काही अडलं नाहीये माझंही'. मी ही रागाने निघालो तर दारात आडवी येऊन म्हणाली, 'थांब, परत येऊ नकोस असं म्हटलंय, आत्ता जा म्हटलंय का?' आणि हसत सुटली. मग मी ही दात काढले आणि भांडण मिटलं. तिचा कुणावर आणि कुणाचा तिच्यावर कायमस्वरूपी राग असणं शक्य नव्हतं. 

मी इतकी वर्ष जातो भेटायला पण कधीही कुणाबद्दल कुचेष्टेचं बोलणं नसतं, बोलण्यात कायम गंमतीजंमती असतात. अलीकडे जरा हळवी झालीये पण. आईवडील, सासूसासरे आणि तिचा मिलू यांच्याबद्दल जास्ती बोलते आताशा. एकदा म्हणालेली, 'तुला माहितीये जया, जोग मला काय म्हणाले होते लग्न झाल्यावर? सुम्या आहे तशीच रहा, मला पण तू त्यामुळेच आवडतेस पहिल्यापासून. पहिल्यापासून? म्हणजे मी मेलीने विचारलं नसतं तर या बाबाने सांगितलंच नसतं आणि आमचं लग्नही झालं नसतं. पण अत्यंत प्रेमळ माणूस रे, बोलायचा कमी पण माया त्याच्या त्या पिंग्या डोळ्यात बघावी. नुसता नजरेने बोलायचा तो. मी दहा वाक्य सांडेन पण तो महाचिकट. एखाद वाक्यं पुरायचं त्याचं. पण कधी माझा निर्णय चुकला ना तरी रात्री समजावून सांगायचा काय चुकलं ते. त्यामुळे आर्थिक नुकसान झालं कधी तरी बोलायचा नाही'. सुमीही आता थकलीये, मलाही वरचेवर जायला होत नाही पण एकदा तरी जायलाच हवं वर्षातून. तिच्या इतक्या वर्षांच्या गंमती जंमती अजून अर्ध्याच ऐकून झाल्यात. येतोय हे कळवलं की वाट बघत असते अगदी पण दाखवत नाही तसं. पण जेवायला साग्रसंगीत करते दोन माणसांसाठीसुद्धा. दिवसभर दोघे खातपीत नुसत्या गप्पा झोडत असतो. निघताना रडत नाही पण चेहरा सांगतोच कितीही आव आणला तरी. पण बोलते मात्र 'असलास पुढच्या वर्षी तर ये परत' असं आणि हसण्याच्या आड डोळ्यातलं पाणी लपवते.

इतकं गोष्टीवेल्हाळ, मायेचं आणि नितळ मनाचं कुणी आपलं माणूस भेटणं आता या जगात दुर्मिळ आहे त्यामुळे आहे तोवर भेटायलाच हवं. सुमी जोग, आहेच तशी, खाष्ट तेवढीच प्रेमळ.

जयंत विद्वांस

'रविवारची रंगत'


'रविवारची रंगत'
'दृक काव्य' या अलीकडे प्रकाशित झालेल्या संग्रहातून.
व्हिज्युअल पोएट्री या विषयाचा अभ्यास करता करता 19 व्या शतकाच्या सुरुवातीला  Guillaume Apollinaire या फ्रेंच कवी आणि नाट्य लेखकाने त्याच्या 'कॅलिग्राम' या कवितासंग्रहात केलेला एक प्रयोग पाहण्यात, वाचण्यात आला.
जो कदाचित पहिल्यांदा झालेला असावा.
त्या पूर्ण संग्रहात प्रत्येक कवितेची अक्षररचना अशी केली आहे की त्यातून दृक अनुभव सुद्धा घेता येतो. ( जो  मी रविवारची रंगत या मालिकेत काही कवितांमधून सादर केला आहे)
ती कविताच अक्षर- दृक- काव्य झाली आहे.

 
असे कला प्रवाह अभ्यासता अभ्यासता मला त्यातलं भारतीयत्व जाणवलं ते रवींद्रनाथांच्या गिरगीट चित्रांमध्ये. असं म्हटलं जातं की कविता लिहिता लिहिता ते काही शब्द खोडत तर काही ओळीच्या ओळी सुद्धा गिरगिटवून खोडत.
त्या शब्द विरहित अवकाशाला गिरगीटण्यातून अमूर्त अशा विविध आकारांचे चित्ररूप मिळत गेले.  त्यांची ही 'पूरबी' ह्या हस्तलिखितातील गिरगिट चित्र जागतिक कला प्रवाहात सन्माननीय झाली. लिहिता लिहिता गिरगीटण्यातून चित्र दिसू लागली. 
अगदी या उलट मांडणी करत गेलो म्हणजे चित्रावर कविता उतरत असताना त्यातले शब्द त्या चित्राला त्याची स्पेस देत आहेत असं भासवू लागलो.
ह्या चित्रकाव्यात मांडण्याचा प्रयत्न.

Hemant Joshi

https://www.facebook.com/share/14dAXjJGj5o/

Sunday, March 23, 2025

शब्दरंग १

येडचॅप.... २३ ०३ १६

आबा म्हणजे माझे आजोबा. केवढं मोठ्ठ नाव आहे त्यांचं 'मधुसूदन'. ओल्ड स्टाईल. मी 'आरोह', पहिलीत आहे. एकदा मी गमतीने म्हटलं, ए आबा,  करायचं का जरा तुझं नाव छोटुस्स. आधी म्हणाले कर. म्हटलं 'मॅडी' कसं वाटेल तर म्हणाले, ये तुझ्या कुल्यावर लिहून दाखवतो. ख्या ख्या हसत म्हणाले, अरे हे नाव मी लहान असताना सुचायला हवं होतं रे, तसाही मी शहाणा नव्हतोच कधी. काय रे तुमची नावं हल्लीची. अर्थ माहित असो नसो, चिकटवतात नुसती. चल सांग बरं, तुझ्या नावाचा अर्थ. आता मला कसा कळणार. काहीतरी सुराच्या खालच्या पट्टीतून सुरवात करत वरच्या पट्टीत नेत घेतलेल्या आलापाला आरोह असं म्हणतात, असं म्हणाले. मला काही कळलं नाही. 'अरे, पण तू रडतोस तेंव्हा मात्र नाव सार्थकी लावतोस. चला म्हणजे आपल्या दोघांच्याही नावात अर्थ आहे आणि बसले हसत म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत. 

पण माझी आणि आबांची जाम गट्टी आहे. दिवसभर माझ्याशी खेळतात, अभ्यास घेतात, कोडी घालतात, (स्पेलिंग पण घालतात, वाईट्ट आहेत अगदी), घोडा घोडा पण खेळतात, मला शाळेतून आलो आणि कंटाळा आला (तो रोजच येतो) तर भरवतात पण नंतर घोग-या आवाजात गाणं म्हणून झोपवतात पण. मला झोपवून आरामखुर्चीत बसून पुस्तकं वाचतात आणि तिथेच झोपतात. पण आबांना ना सगळ्यातलच सोल्लिड कळतं. माझ्या दोस्तांनी काही विचारलं आणि मला येत नसेल ना तर मी आबांनाच विचारतो, बाबापेक्षा जास्त माहिती आहे आबांना. बाबा आबा नसताना म्हणतो, त्यांना 'गुगलोबा' म्हणत जा तू. (जळकू आहे नुसता). आबांना सांगितलं मी एकदा बाबा ओरडल्यावर. आबा म्हणाले, अरे हो, पण आमच्या वेबसाईटची एक्सपायरी आता जवळ येत चालली आहे, रिन्यू नाही होणार. मधेच ना असं मला कळत नाही असं बोलतात. म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.

परवा पण असच झालं. आई म्हणाली होती, आज शनिवार, मी लवकर येते, आज आपण बागेत जाऊ. आलीच नाही सहा वाजले तरी. आबा म्हणाले, मी नेऊ का? मी नाहीच म्हटलं, आई नेहमीच असं करते. आली की मीच देणार आज तिला धम्मक लाडू. एकतर आबांनी मला साडेचार पासून तयार करून ठेवलं. दोघं कंटाळलो खिडकीत बसून वाट बघत. मला रडू यायला लागलं तर लागले मला चिडवायला 'कुकुल्ल्या बाळाला आईची आठवण आली का?' मग मला अजूनच् रडू आलं. असं चिडवतात का कुणी लहान मुलाला? म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.

मला खूप खूप राग आला होता त्यांचा त्या दिवशी. परवा आरामखुर्चीत असेच शांत बसले होते, पुस्तक छातीवर ठेवून. मी पण त्यांना चिडवलं त्यांच्यासारखच, आजीची आठवण येते का मोठया बाळाला? तर अचानक रडायलाच  लागले, मग मलाही रडू आलं. म्हटलं पण मी, आबा सॉरी म्हणून. तर म्हणाले,  असू दे रे. मग मला जवळ घेतलं आणि म्हणाले 'तू रडतोस, आईला उशिर झाला म्हणून पण ती येणार हे निश्चित आहे रे'. पुढे काही बोललेच नाहीत डोळे पुसत खिडकीतून बाहेर बघत बसले दुपारभर...

म्हटलं ना मी, जरा येडचॅपच आहेत काहीही बोलतात, मला न समजेलसं....

जयंत विद्वांस

भगतसिंग दिवस

हा भगतसिंग ! हाय हा ! !

सरदार भगतसिंग दि. २३ मार्च १९३१ या दिवशी फाशी गेले. त्या वेळी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे रत्नागिरी येथे स्थानबद्ध होते. त्यांना भगतसिंग यांच्या फाशीची बातमी दुसऱ्या दिवशी मिळाली आणि त्या बातमीने निर्माण झालेल्या मनःक्षोभातून सावरकरांनी प्रस्तुत कविता रचली. लगोलग रत्नागिरी मधील 'हिंदु तरुण मंडळा'तील तरुणांनी ती गुप्तपणे पाठ केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी पोलिस सावध होण्यापूर्वीच त्या निवडक तरुणांनी हे गीत गात-गात रत्नागिरी नगरातून प्रभातफेरी काढून सारे रत्नागिरी नगर भगतसिंगाच्या नि स्वातंत्र्यलक्ष्मीच्या जयजयकाराने दणाणून सोडले.

हा भगतसिंग, हाय हा
जाशि आजी, फांशि आम्हांस्तवचि वीरा, हाय हा !
राजगुरु तूं, हाय हा !
राष्ट्र समरी, वीर कुमरा, पडसि झुंजत, हाय हा !
हाय हा, जयजय अहा !
हाय हायचि आजची, अुदयीकच्या जिंकी जया ॥
राजमुकुटा तो धरी
मृत्यूच्या मुकुटासि आधी बांधि जो जन निजशिरीं !
शस्त्र धरूचि अम्हि स्वतः 
धरुनि जें तूं समरिं शत्रुशि मरसि मारित मारतां !
अधम तरि तो कोणता?
हेतुच्या तव वीरतेची जो न बंदिल शुद्धता ॥
जा हुतात्म्यांनो, अहा !
साक्ष ठेवुनि शपथ घेतों आम्हि अुरलो ते पहा !
शस्त्रसंगर चंड हा
झुंजवुनि कीं, जिंकुची स्वातंत्र्यविजयाशी पहा !
हा भगतसिंग, हाय हा ! ! ॥

भगतसिंगाचा विजय असो... स्वातंत्र्यलक्ष्मीचा विजय असो !!!

सौमित्र लिखित

आता मी हे लिहितो आहे पण हे प्रसिद्ध करे पर्यंत मी असेन का ?
प्रसिद्ध झालं हे तुमच्या वाचनात येई पर्यंत तरी असेन का ? 
आपण कधीही जाऊ शकतो या शक्यते सोबत आता आता आपण सगळेच जगत नसतो का ?

मृत्यू यावा तर मांजराच्या पावलांनी 
कळूही नये कधी उडून गेला आपल्यातला 
हंस अकेला....

गुलज़ार साहेबांची एक नज्म़ आहे...

" मिटा दो सारे निशाँ कि थे तुम
उठो तो ऐसे कि कोई पत्ता हिले न जागे
लिबाज़ का एकेक तागा उतारकर यूँ उठो
कि आहट से छूँ न जाओ

अभी यहीं थे
अभी नहीं हो

ख़याल रखना कि ज़िंदगी की कोई भी सिलवट
न मौत के पाक़ साफ़ चेहेरे के साथ जाए....!!
_______________________

धर्मराज. धर्मराज पाटील. 
वय वर्ष अवघं चाळीस.
मी याला ओळखत नव्हतो 
जो गेल्या  एक मार्चलाच निघून 
गेलाय या जगातून. 

तो रानावनात फिरायचा .. पक्षांशी बोलायचा .. एक नामवंत पक्षीतज्ञ होता तो.. त्याची या विषयात पीएचडी होती. उद्या, म्हणजे एकवीस मार्चला त्याचा वाढ दिवस. आणि एकवीस मार्च म्हणजे 'वनदिन'. फॉरेस्ट डे.

त्याच्या बद्दल वाचून आणि ऐकून पुशी रेग्यांची कविताच आठवते.

" पक्षी जे झाडावर गाणे गातो 
आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात 
झाडावर गाणे जे पक्षी गातो 
आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा ..."

असेल .. तो कुठल्यातरी झाडाच्या कुठल्यातरी फांदीवर बसून कुठल्यातरी पक्षाशी गप्पा मारत बसला असेल. म्हणूनच ....

"मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ ध डे धर्मराज. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."
________________________

दिनांक : अगदी परवा परवाची तेवीस फेब्रुवारी.रात्री पावणे  दहा.
मला अमित भंडारी या माझ्या जिवलग मित्राचा एक मेसेज येतो .. त्यात फक्तं एक वॉइस क्लिप असते..आवाज एका मुलीचा असतो. खूप असहाय आणि रडवेला ..

" हाय अमित मी तुला माझ्या फ्रेंड विषयी सांगितलं होतं ना जो गुलज़ारचा  एकदम फॅन आहे आणि खूप छान पोएट्री लिहितो तो फ्रायडेला त्याच्या घरात बेशुद्ध सापडला ही हॅड ब्रेन हॅमरेज चौदा तास तो तसाच पडून होता अनमॅरीड आहे त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं तर तो फ्रायडे पासून कोमात गेल्याचं सांगितलं आम्ही सगळे ट्राय करतोय कि तो कोमातून बाहेर यायला पाहिजे तर माझी एक अशी रिक्वेस्ट होती की तो जस्ट महिनाभरापूर्वी भेटला होता आणि म्हणाला होता कि मी खूप वर्ष मी गुलजारांना भेटायचा प्रयत्न करतोय पण जमलं नाही पण आता आयुष्यात एकदातरी त्यांना भेटायलाच पाहिजे असं डेस्परेटली वाटतं आहे तर मी त्याला म्हटलं आपण ट्राय करू कसं पण गुलजारांना भेटणं त्याचं एकदम काय म्हणतात लाईफ ॲम्बीशन होतं तर माझी अशी रिक्वेस्ट होती की तो कोमातून बाहेर येण्यासाठी कॅन गुलज़ारजी सेंड हिम वन वॅाइस मेसेज अड्रेसिंग धर्मराज जो त्याला रिपीटेडली ऐकवला तर कदाचित काहीतरी फायदा होईल तो कोमातून बाहेर येईल आणि त्याची लाईफ हे होऊ शकेलकॅन यू हेल्प प्लिज ? ….”

एका अनोळखी माणसासाठी किशोरला कसं सांगायचं हा कॉम्प्लेक्स घेऊनच अमितने नुस्ती ती वॅाइस क्लिप पाठवली असावी.. 

मी ऐकून सुन्न होतो. रात्रीचे पावणे दहा वाजलेले असतात.
" गोंधळ " नावाच्या चित्रपटाच्या शूटला मी राजगुरू नगर मधल्या व्हिट्स कामत ह्या हायवे लगतच्या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरल्या  ३०१ नंबरच्या रूममध्ये असतो .. 

ते वाचून काय वाटलं अजून कळत नाही कदाचित कोमात गेलेल्या माणसालाही असच होत असेल. 

मी खूप वेळ नुस्ता हायवे वरलं ट्राफिक पाहत खिडकीशी उभा राहतो .. काळ सेकंदांचा आवाज करत प्रत्यक्ष जातांना जाणवत राहातो .. मला गुलज़ार साहेबांच्याच ओळी अचानक आठवू लागतात .. 

"वक्त को आते ना जाते ना गुज़रते देखा 

ना उतरते हुए देखा कभी इलहाम की सुरत 

जमा होते हुए एक जगह मगर देखा है....

शेवटी न राहून मी गुलज़ार साहेबांना फोन लावतोच .. रिंग वाजत राहते .. त्यांनी फोन उचलावा ... प्रत्येक रिंग नंतर आता उचलावा...  आता उचलावा .. उचलावा असं मनोमन म्हणत  राहातो .. पण खूप वेळ रिंग वाजून थांबते  .. झोपले असतील कदाचित .. कारण ते दहालाच झोपतात हे मला माहित असतं ..
मी पुन्हा ट्रॅफिक पहात राहातो .. त्यांना मेसेज करावा असं वाटतं पण मेसेजमध्ये या घटनेचं गांभीर्य वा मला जे होतंय ते कळेल का त्यांना म्हणून मेसेज करत नाही .. आणि इतक्या रात्री गुलज़ार साहेबांना परत फोन करून उठवावंच. मन धजत नाही ..

मी त्या धर्मराजला ओळखत नसतो पण तो कोमात  आहे .. अजूनही जगू शकतो .. फक्त गुलज़ार साहेबांचा आवाज .. पण  ..मी असह्य होतो .. खिडकीशी उभा राहुन नुस्ते ट्रॅफिकचे दिवे इकडून तिकडे तिकडून इकडे पळतांना पाहात राहातो ... पाय दुखू लागतात .. मोबाईल पाहातो तर रात्रीचे बारा वाजलेले असतात .. मग बेशुद्ध होण्यासाठी मी खूप पितो .. सकाळी सातचा कॉलटाइम असतो .. हायवेवर सैरावैरा पळणारे दिवे पाहात कधी कोमात जातो कळत नाही.

पहाटे कधीतरी झोप उचटते .. पाच वाजलेले असतात .. उठून झटपट अंघोळ करून गाडीची वाट पाहतो .. गाडी सात वाजता येणार असते आणि आता पावणे सहा वाजलेले असतात .. मी पुन्हा तो वॉइस मेसेज ऐकतो .. पुन्हा ट्रॅफिक पाहत राहातो  ... पुन्हा पापण्या जड होतात मी पुन्हा बिछान्यावर कोलमडतो.

आठला अचानक जाग येते .. खडबडून जागा होतो .. एवढ्या सकाळी करावा का फोन गुलज़ार साहेबांना ? .. मन धजावत नाही .. 
साढे आठला गाडी येते .. मी त्यात बसतो .. लोकेशन "वळद"  नावाचं सत्तेचाळीस किमी लांबचं गाव असतं .. मी गाडीत बसतो.पुन्हा डोळे मिटतात .. गाढ झोप लागते .. 

"सर लोकेशन आलं ".. माझा  हेल्पर बॉय जयराम सांगतो ..मी उठतो .. कुठे आलोय कळत नाही मग क्षण दोन क्षणात मेंदू भानावर येऊन मी उतरतो .. माझे डोळे लाल असतात .. माझ्याकडे सगळे कसनुसं बघतात .. मी नजर खाली करून मेकपरूमच्या दिशेने जातो .. 

यंत्रवत कॉस्ट्यूम,मेकप, कॉफी सगळं होत राहतं .. कधी दहा वाजतायत याची मी मनोमन वाट पाहात असतो .. तितक्यात असिस्टंट येऊन मला सीन सांगतो .. सीन विनोदी ढंगाचा असतो .. ( इतक्या गंभीर मनःस्थितीतुन रात्रभर गेल्या नंतरही हे असं... असच फिल्मी वाटणारं घडत असतं कितीकदा आपल्या आयुष्यात पण तेच पडद्यावर पाहून आपण हसतो ) मी नुसता ऐकून घेतो दहा कधी वाजतात याची मी वाट पाहत राहातो. 

दहा वाजायला दोन तीन मिनिटं असतांना मी चालू सीन थांबवतो आणि सगळ्यांना काय झालंय आणि मला आता काय करावं लागेल ते सांगतो .. आक्ख युनिट गंभीर होतं .. मी गुलज़ार साहेबांना फोन लावतो .. ते उचलतील का नाही .. सकाळच्या मिटिंग मध्ये असतील तर ... या संभ्रमात असतांनाच चार रिंग नंतर ते उचलतात .. मी त्यांना रात्री फोन केल्याचं सांगतो... 'तुम्ही रात्रीच का उचलला नाहीत फोन ' हे न बोलता बोलण्याच्या सुरात सांगू पाहातो .. मग मी ती वॉइस क्लिप , तो मुलगा, तो कोमा हे सगळं सांगतो ... ते शांतपणे ऐकून घेतात .. माझं संपत .. मध्ये काही क्षण फक्त आमचे श्वासोच्छवास ऐकू येत राहातात.

मग ते म्हणतात " ठिख हैं चलो करते हैं .. पर एक काम करो उस लड़के के आसपास कोई जो होगा उसका नंबर मुझे दे दो .. मैं उससे बात करके उस लड़के ..क्या नाम उसका ....धर्मराज के कान पर फोन ले जाने को केहेता हूँ और बात करता हूँ .. उसके जितना करीब पोहोंच पाऊँ उतना अच्छा है ना बेटा ?" 

"पर सर ..मैं शूट कर रहा हूँ .. मैं उस लडकी का नंबर आपको देता हूँ और आपका नंबर उसको शेअर करता हूँ .. आप प्लिज कोऑर्डिनेट कर लीजिये प्लिज मैं शायद फिर फोन पर नहीं आ सकूँ .." 

" अच्छा तुम बम्बई मे नहीं हो ? कहाँ हो ?"
" यहाँ राजगुरूनगर मे सर.." 
" ये कहाँ पडता है ? " 
" पुणे के पास सर "
" तो हिमाचल मे तो नहीं हो ना ? " 
" हाँ सर पर यहाँ नेटवर्क का बहोत प्रॉब्लेम है सर " 
ते पॉज घेतात.. मग म्हणतात " अच्छा चलो ठीक है मुझे भेजो उस लडकी का नंबर और मेरा उसको देना .. क्या नाम उसका ?" 
" रुपाली सर .. वो पुलिस सुप्रिटेंडन्ट ऑफ ठाणे है सर " 
" अच्छा .. ? ओके उसको कहो कोई अच्छा रेकॉर्डिंगवाला फोन उस हॉस्पिटल मे अरेंज करें और मुझे फोन करें .. मै रेडी रेहेतां हूँ इधर " 
" ओके सर ..." असं बोलून मी फोन कट करतो. अमितला फोन लावतो .. त्याचा फोन एंगेज येतो .. सतत अंगेजच येत राहातो .. 
सगळं युनिट सीन अर्धवट ठेऊन माझ्या समोर समोर उभं असल्याचा प्रचंड गिल्ट येऊन मी वैतागून फोन ठेऊन सीन  सुरु करणार इतक्यात अमितचा फोन येतो .. तो रुपालीशीच बोलत असल्याचं सांगतो .. मी त्याला गुलज़ार साहेबांचा नंबर देतो ..रुपालीचा नंबर मला पाठवायला सांगतो .. बाकी कोऑर्डिनेट करून घ्या  ' मी सीनमध्ये ..'  असल्याचं सांगतो. फोन ठेवतो .. सीन सुरु होतो. पण सीन करतांना सतत  'तिकडे काय झालं असेल'  ची उत्सुकता.. की निराशा.. की हतबलता घेरून टाकते .. फोन परत वाजतो .. तो रुपालीचा असतो .. मी तिला पुन्हा सगळं एक्सप्लेन करतो .. ती तिच्याकडे आयफोन असल्यामुळे फोनवरून रेकॉर्डिंगचं कळत नसल्याचं सांगते . .. आयफोनला कंटाळलेला मीही आयफोनला शिव्या घालत फोन ठेवतो .. सीन सुरु होतो .. तरी मी सीनमध्ये जितकं विनोदी राहाता येईल तितकं राहण्याचा प्रयत्न करतो .. सकाळचं ऊन आता तापायला लागलेलं असतं .. आम्ही भर उन्हात एका घराच्या अंगणात हा विनोदी सीन करत असतो .. पण काय झालं असेल तिकडे .. काय .. काय .. कायकायकायकाय.. च्या माशा मस्तकातल्या पोळ्या भोवती घोंघावत राहातात ..

पंधरा मिनिटाने रुपाली कडून एक वॉइस  क्लिप येते ..  त्या क्लिप खाली " धर्मराज रिसायटींग हिज पोएम " असं लिहिलेलं असतं .. आता युनिटभर सगळी उत्सुकता उन्हा सारखीच पसरलेली असते ... सगळं युनिट जमा होतं .. मी ती क्लिप ऑन करतो ..येणारा आवाज धर्मराजचा असतो .. तो गुलज़ारांसाठी लिहिलेली कविता त्याच्या दणकट आवाजात म्हणत असतो .... 

" काफी वक्त़ बीता गुलजाऱ 
तुम्हारा इंतज़ार करते करते 
शायद चंद सदीयॉं बीती हों 
मैं वहीं बैठा हूँ उस मोडपर 
जहाँ तुम्हारे छाँव की उँगली 
पहली बार थामी थीं मैंने 
सोचा के तुम आओगे कभी 
ख़ुद की छाँव कि तलाश मे 
जिस पेड़ के नीचे मै बैठा रहा 
उसकी सारीं पत्तीयॉं अब 
सुख़कर गिर चुकी हैं गुलज़ार
हजारों बारिशें आकर चली गईं 
लाखों मुसाफ़िर गुज़रे यहॉं से 
फिर भी एक पत्ता नया न आया 
इस पेड की शांख आज भी 
उसी तरह कॉंप उठती है गुलजा़र 
समझा बुझाकर सुला देता हूँ 
आओ कूछ बातें कर लें 
नज़्म के छाले देखें दिखॉंए
कब तक मैं अपनी छाँव 
घूमता रहूँगा ऐसे 
जगाओ मुझे यहॉं से 
जहॉं इंतजा़र भी पिघलने को है 

काफ़ी वक़्त बीता गुलजा़र ...

तो आवाज ज्याच्या गळ्यातून येतो तो तिकडे कोमात आहे ही जाणीव प्रत्येक ओळीमागून सरपटत येते. 
________________________

तो कोमात आहे त्याला  नक्की काय होत असेल ? 
तो फक्तं जिवंत असेल की त्याला जाणवत असतील आसपासच्या हालचाली ? 
त्याला फट्कन उठून बसावं असं वाटत असेल ? 
तसा प्रयत्न त्याचं मन करत असेल ? 
त्याचं शरीर काहीकेल्या हलत नसल्याचं जाणून त्याला काय वाटत असेल ? 
कोमातून जागे होऊन पुन्हा नॉर्मल आयुष्य जगणाऱ्यांच्या गोष्टी त्याला आठवत असतील ? 
स्वतःच्या डाव्या उजव्या हाताचं कुठलं तरी एक बोट हलवून पाहावं म्हणून तो सगळं भान त्या बोटा पर्यंत नेत असेल ? 
ते भान तिथपर्यंत पोहोचत असेल ? 
________________________

पंधरा मिनिटांनी रुपालीचा गुलजा़र साहेबांची क्लिप रेकॉर्ड झाल्याचा मेसेज येतो. सुगंधा नावाच्या त्या वेळी हॉस्पिटलमध्ये धर्मराज जवळ असलेल्या मैत्रिणीने गुलजा़र साहेबांशी बोलून…तिचा  फोन धर्मराजच्या कानाशी नेउन तो त्याला ऐकवत असतांनाच ती क्लिप रेकॉर्ड झाल्याचं सांगते .. 
आणि फोन धर्मराजच्या कानाशी असतांनाच त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळल्याचं ...त्याने एक दीर्घ श्वास घेतल्याचं सांगते. 

जवळजवळ अर्धा तास जातो .. आणि मला रुपाली कडून पुन्हा एक वॉइस क्लिप येते .. 
 " गुलजारजीज् एडिटेड क्लिप"  असं तिने त्या खाली लिहिलेलं असतं.मी सगळ्या युनिटला होल्ड करून वॉइस क्लिप ऑन करतो ..आक्खं युनिट माझ्या फोन भोवती गोळा होतं .. क्लिप सुरु होते. गुलज़ार साहेब बोलत असतात..

" धर्मराज ..! धर्मराज .. सुनो धर्मराज मैने सुना है~~ तुम मुझसे मिलना चाहते थे .. तुम्हे मेरीं कविताएँ अच्छीं लगतीं थीं .. तुम अच्छे हो जाओ जल्दी से … और अपने भाई के साथ आ जाओ मिलने .. मैं तुमसे केहेता हूँ तुम्हारी पसंद का कोई भी गाना सुना दुँगा मैं .. जो~~ तुम्हें पसंद था .. धर्मराज… आँखें खोलो धर्मराज और सुनो~~....जब आओगे ना तो नईं कविताएँ भी सुनाऊँगा… बस जल्दीसे अच्छे हो जाओ धर्मराज .. मेरी आवाज़ सुन रहे हो ना धर्मराज .. “ 

 क्लिप संपते .. 
कडकडीत उन्हात माझ्या सकट आक्ख्या युनिटच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी असतं.

धर्मराजने एकदाचा गुलजारजींचा आवाज ऐकला या आनंदात आम्ही पुढला सीन शूट करून संपवतो ... दुपारी पुन्हा गुलज़ारजींचा फोन येतो .. ते सगळं नीट झाल्याचं .. वॉइस क्लिप झाल्याचं सांगतात आणि त्याची तब्बेत कशीये ते दर तासा भराने कळव असा आदेश सोडून फोन ठेऊन देतात. 

दुपारी लचंच्या आसपास रुपालीचा आभाराचा फोन येतो. माझ्याशिवाय ते शक्य नव्हतं असं ती म्हणते. मी फक्तं निमीत्तमात्र असल्याचं तिला सांगतो. 
आपण सगळे निमित्तालाच जगत असतो असं वाटत राहातं. 

पंचवीस तारखेला रुपालीचा सकाळी दहा अठ्ठावनला मेसेज येतो.

गुड मॉर्निंग किशोरजी ! टुडे गुलज़ारजी इन्क्वायर्ड अबाउट धर्मराजस् हेल्थ.. ही इज स्टिल इन आयसीयू.. फायटिंग फॉर लाईफ.. प्लिज प्रे फॉर हिम.." 

“सर्टनली .. आय एम ऑलरेडी .." तिला रिप्लाय करतो.

मध्ये दिवस जात राहतात .. सबकॉन्शस माईंडमध्ये धर्मराज गुलजा़रजींच्या आवाजाच्या लाटांवर तरंगताना दिसत राहातो .. 

एक मार्चच्या दुपारी साढेतीनला रुपालीचा मेसेज येतो ..

" वी लॉस्ट हिम टुडे .. अवर बिल्व्हेड फ्रेंड धर्मराज पाटील पास्ड अवे पीसफुली धिस आफ्टरनून ट्वेल्व्ह पीएम .. ऑन मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू..ॲट दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इन पुणे. हिज लास्ट राईट्स विल बी कंडक्टेड ॲट वैकुंठ क्रिमेटोरियम.. नवी पेठ पुणे .. ॲट फाईव्ह पीएम .. ऑल आर रीक्वेस्टेड टु बी प्रेझेंट फॉर ध सेम". 

धर्मराज ! 
मृत्यू नंतर आयुष्य असतं कि नाही ठाऊक नाही. .. अजून तरी माणसांवर पक्षी बसत नाहीत .. ते झाडावरच बसतात .. ज्या झाडांवर पक्षी बसतात,  त्या झाडांना सेलिब्रेट करतात ,  त्या दिवशी तू जन्मलास हे काय कमी आहे ..! 

धर्मराज ! झाडांमध्ये, पक्षांमध्ये राहिलेल्या कवितेच्या माणसा....  
" आनंद " मधली गुलज़ार साहेबांची कविता त्यांच्या वतीने तुला सादर अर्पण  .. 
 

" मौत तू एक कविता है 
मुझसे एक कविता का वादा है 
मिलेगी मुझको 
डूबतीं नब्जोंमे जब दर्द को नींद आने लगे 
ज़र्द सा चेहेरा लिए जब 
चाँद उफक़ तक पहुँचे 
दिन अभी पानी में हों 
और रात किनारे के क़रीब 
ना अभी रात ना दिन 
जिस्म जब ख़त्म हों 
और रूह को जब सॉंस आए 
मुझसे एक कविता का वादा है 
मिलेगी मुझको….. " 

                                                                                         
सौमित्र.




Saturday, March 15, 2025

कमी आणि नेमकं बोलणं महत्वाचे

जेव्हा आपण कमी आणि नेमकं बोलतो, तेव्हा आपल्या शब्दांना किंमत निर्माण होते.

मानसशास्त्रानुसार, लोक ज्या गोष्टी दुर्मिळ किंवा मोजक्याच प्रमाणात मिळतात, त्यांना अधिक महत्त्व देतात. 

यालाच scarcity principle म्हणतात. कमी शब्दांत नेमकेपणा ठेवल्याने आपल्या संभाषणाची गुणवत्ता वाढते आणि ऐकणाऱ्या व्यक्तीला आपल्या बोलण्याकडे अधिक लक्ष द्यायला भाग पाडते.

संशोधनानुसार, कमी बोलणाऱ्या लोकांकडे अधिक आत्मविश्वास आणि प्रगल्भतेचे लक्षण मानले जाते. 

त्यांचे शब्द सहजासहजी वाया जात नाहीत, त्यामुळे त्यांची मते आणि सूचना इतरांना अधिक महत्त्वाच्या वाटतात. 

शिवाय, अकारण बोलणे टाळल्याने सामाजिक नातेसंबंध सुधारतात आणि गैरसमज कमी होतात. 

कमी बोलण्याची सवय आपल्याला अधिक संवेदनशील, चातुर्यपूर्ण आणि विचारशील बनवते. 

त्यामुळे संवाद साधताना कमी आणि योग्य शब्दांचा वापर केल्यास आपण स्वतःला अधिक प्रभावीपणे मांडू शकतो.

राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ

#selfrespect #SelfCare #आपलंमानसशास्त्र #RakeshVarpe

Thursday, March 13, 2025

जोशी कुटुंब

जुनी पोस्ट 

हे व्हायरल झालेले पिशव्यावाले जोशी काका आणि काकू. मी अनेक दिवस त्यांच्याकडून जेवणाचा डबा घेतो. दोघं अफाट आहेत. काका ८७ वर्षाचे आणी काकू ८२. काका सुंदर शिवणकाम करतात आणी काकू अत्यंत रूचकर जेवण बनवतात. आज डब्यात पालकाच्या पुर्या होत्या. परिस्थिती मध्यमवर्गीय पण पुरेशी. एक मुलगा व एक मुलगी येऊन जाऊन असतात, त्यांची काळजी घेतात. दोघांची लग्न झालेली, सुस्थितीत. पण ही दोघं एकमेकांना धरून आहेत. 'स्वयंपुर्ण' आणी 'स्वाभिमानी'. काकू डबे देतात, काका हात पाय चालू रहावेत यासाठी कापडाच्या पिशव्या शिवतात आणी आठवड्यात दोन वारी ठराविक जागी जाऊन विकतात. 
सिन काय झाला कि काही दिवसांपूर्वी कोणीतरी पिशव्या विकत घेताना त्यांचा फोटो काढला आणी सोशल साईट्सवर टाकला. काकांना पत्ताच नाही. लिहिणार्या माणसाने लोकांनी काकांपासून श्रम प्रतिष्ठा व जगण्याची प्रेरणा घ्यावी या उद्देशाने पोस्ट टाकली पण लोकांनी त्याचा आपापल्या पद्धतीने अर्थ काढला. फोटोत गोड हसणारे काका व्हायरल झाले. आता काकांच्या घरी लोकांची रीघ लागलेय, फोन खणाणतायत. कोणी त्यांच्या पोरांना नावं ठेवतायत, कोणी २०० पिशव्यांच्या ऑर्डर्स देतायत, परदेशातून फोन येतायत, मदतीची तयारी दाखवतायत. काका सांगत होते सगळ्यात भारी म्हणजे दुबई च्या एका ग्रुहस्थांनी त्यांना व्रृध्दाश्रमात ठेवण्याची तयारी सुरू केली. सिरीयल मधले दोन तीन नट येऊन गेले, पेपर वाले आले, न्यूज वाले आले. सगळी गंमत चाल्लेय. 

आता यात त्यांना आणि त्याच्या मुलांना मनस्ताप होतोय खरा, पण मला आपला समाज अजूनही किती संवेदनशील आणी जिवंत आहे हे बघून भरुन आलयं. एक कुटुंब म्हणून आपण अजुनही किती बांधलेले आहोत. कोण कुठल्या जोशी काकांसाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लोकांनी धाव घ्यावी हि कसली भारी गोष्ट आहे. 
आता या ठिकाणी जरी आमचे काका काकू स्वयंपूर्ण असले तरी दुसरे कुणीतरी काका खरच गरजवंत असतील.. त्यांना मदत व्हायलाच हवी. त्यामुळे यावेळेस जसं आपण मदतीचा हात पुढे केला तसाच प्रत्येक वेळी करायला हवा.
We rise by lifting each other.

**बाकी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे उभयतानी कुंठल्याही पध्दतीची पैशाची मदत किंवा निधी संकलन अपेक्षिली नाही. त्यामुळे त्यांच्या नावाने किंवा नावावर कोणीही पैसै गोळा करत असल्याचे निदर्शनास आल्यास ताबडतोब काकांच्या खालील नंबरवर संपर्क साधावा.**

- #बोलेगोड

सिध्देश्वर जोशी 8291036120

18 march 2020

Tuesday, September 24, 2024

फेसबुक कट्टा १

फेसबुक वर बायका का फसतात ह्यावर वर्षा आणि माझे एकदा गॉसिपिंग चालू होते. फार फार पूर्वीची गोष्ट आहे ही तेव्हा नवीन असल्याने उत्सुकता होती. आता कुणी फसत नाहीत.
" Don't be so harsh. अनेकदा घरात काहीही प्रेम वाट्याला येत नाही ग मग माणसे गोड बोलण्याला भुलतात " माझा कळवळा .

" तुझा आवाज किती मधुर आहे म्हणून त्याला गायला सांगून, त्याच्या चोचीतला मांसाचा तुकडा पळवणारा कोल्हा पंचतंत्र मध्ये वाचत नाही का?" वर्षा. 

" Actually एक आयडिया आहे. अशी कोणी स्तुती केली ना की, आधी मांसाचा तुकडा खाऊन टाकायचा आणि मग भसाडा आवाज उघडायचा. थांबला तर बंदे में दम आहे नाही? " मी.

" असा फक्त नवरा करतो. पर्याय नाही. आता या वयात कुठे जाणार तो पण मला असे बाटलीत घालायचा प्रयत्न केला तरी मी काय करेन माहीत आहे तुला?
तुकडा तर खाईनच पण कान किटून, बहिरा होई पर्यंत काव काव करत त्याच्या मागे लागेन.. परत हिंमत करणार नाही" वर्षा.

अक्च्युअली हे बोलून आम्ही खो खो हसत होतो. 
आज गौरीचा लेख वाचून आठवले.

लेख सुंदर आहे . Breadcrumbs टाकणाऱ्या कोल्ह्याला अशी कावळीण मिळू शकते का? विचार करायला हरकत नाहीं!😁

लेख उत्तम आणि गंभीर आहे.  जरूर वाचा. 

By Gauri Salvekar 

#breadcruming

मित्र आशिष चासकर यांची कृष्णमूर्ती यांच्या वरची पोस्ट वाचून  एक मानसशास्त्रीय संज्ञा आठवली. त्यात त्यांनी multiple पार्टनर्स वर थोडं भाष्य केलं आहे.त्यामुळे हा एक शब्द आठवला.
त्याला म्हणतात ब्रेडक्रमिंग! हा अनुभव साधारणपणे आकर्षण किंवा प्रेम यांमध्ये असणाऱ्या 30-40% लोकांना कोणत्याही वयात येतो. यामध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला असे clues पाठवते, तुमच्याशी असं फ्लर्ट करते ज्यामुळे तुम्हाला वाटेल ही व्यक्ती आपल्यात गुंतली आहे. पण त्या व्यक्तीचा तुमच्यात खरोखरच गुंतण्याचा दुरुनदुरुन हेतू नसतो. फक्त असं दाखवून 'फ्रेंड्स विथ बेनेफिट' होता येतंय का? याची चाचपणी समोरची व्यक्ती करत असते.फ्रेंड्स विथ बेनेफीट म्हणजे एक स्त्री व पुरुष मित्र असताना संमतीने झालेले शरीरसंबंध. इथे आधी चांगली मैत्री असू शकते (निदान तसं दाखवलं जातं) किंवा थोड्याफार ओळखीवर देखील असे सिग्नल्स पाठवायला सुरुवात केली जाते,अर्थात समोरच्या व्यक्तीचा कल बघून! मग पुढे गेल्यावर शारीरिक संबंध सोपे होतात.

यात कुणी कुणावर दोषारोप करण्याचा प्रश्न किंवा संबंधांनंतर आलेला गिल्ट देखील नसतं कारण सगळंच concensual असतं.
खरी गंमत होते इथेच. गुंतायचं नसतं मग ती व्यक्ती पुढे जायला का बघते? याचं एक कारण हे की आपण या व्यक्तीला आवडतोय याचे काही व्हाईब्ज त्याला मिळू शकतात. दुसरं म्हणजे त्या व्यक्तीला कोणतेही डीप कनेक्शन्स नकोच असतात कारण मग answerable राहावं लागतं.समोरची व्यक्ती आपल्यात शरीरसंबंधांनंतर गुंतणार आहे हे माहिती असतं (culprit : oxytocin) म्हणून मग दुसरीकडे जाता येत नाही किंवा त्या व्यक्तीची आपल्याला  अडचण होऊ नये म्हणून पटकन संबंध संपवले जातात. त्यासाठी कोणतंही फुटकळ कारण पुरतं. मग 'आपण असेच आहोत,असेच डिझाईन झालोत 'म्हणून आभाळ हाणता येतं, आणि एकाच वेळी कितीही लोकांसोबत हे ब्रेडक्रमिंग करता येतं.कोणत्याही नात्यात इतकी inconsistancy असेल तर ती व्यक्ती मानसिकदृष्टीने कायमच अस्थिर असते ,फक्त दाखवत नसते इतकंच.
डीप कनेक्शन्सचा अर्थ 'मै दुनियासे नही डरता' टाइप हिरोगीरी करणं नव्हे;तर  त्या व्यक्तीपाशी आपला सुखाचा शोध थांबलाय हे मान्य करून तिच्याशी कमिटेड राहणं आणि नवे पार्टनर्स न शोधणं. त्या व्यक्तीच्या सुखदुःखाशी, त्या नात्याशी आणि मुख्य म्हणजे आपण त्या व्यक्तीची निवड केली आहे आणि का केली आहे, या विचाराशी बांधील राहणं.

 सोशल मीडियावर असलेल्या विशेषतः 35-55 मधल्या लोकांनी हा एक घोळ इथे घालून ठेवलाय. मग त्यातून कृष्णसखा, राधासखी, सोलमेट इत्यादी आयटम निपजलेत.भर घालायला सिनेमे आहेतच.
 Soulmate is a pure myth.हॉस्पिटलमध्ये तुमच्या उशाशी बसून जो पैशाची जुळवाजुळव करतो, निव्वळ चहावर दिवस काढत डॉक्टरांकडे आशाळभूत नजरेने बघत थांबतो किंवा थांबते तो माणूस आपला आहे याचा विसर इथे बहुतेक अशा लोकांना पडलेला असतो.
पूर्वी हे नव्हतं का? तर होतं. पण माणसांच्या हातातील या साधनांमुळे आलेली accessibility तेव्हा इतकी नव्हती. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीसोबत स्थिरावणे हेही एकवेळ समजून घेता येईल पण हे ब्रेडक्रमिंग म्हणजे आपली बुद्धी आणि integrity यांचा नावाप्रमाणेच झालेला भुगा आहे! 
Integrity फक्त शरीराची असते का? अजिबात नाही. ज्या क्षणी मनात 'हा' हवा किंवा 'ही' हवी हा विचार शिरतो त्याक्षणी integrity संपलेलीच असते.त्यादृष्टीने आपण सगळेच कसे आहोत ही विचार करण्याजोगी गोष्ट आहे.पण कुठे थांबायला हवं हे ज्याला समजतं त्याला ब्रेडक्रमिंग का करू नये हेही समजतं. 

पुन्हा सांगते की Soulmate is a pure myth!
 ज्यांना या ब्रेडक्रमिंगचा अनुभव आला असेल त्यांना फार हेल्पलेस आणि cheated वाटतं हे उघड आहे. पुन्हा सगळंच concensual असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार. त्यामुळे जर आपण अशा कोणत्याही नात्यात असू जिथे समोरच्या व्यक्तीला कोणतेही डीप कनेक्शन्स नको आहेत आणि हेतू फक्त फ्रेंडझ विथ बेनेफिट आहे तिथे प्रत्येकाने आपला निर्णय घ्यावा किंवा त्या बेगडी नात्याची किंमत मोजावी. थोडे थोडे ब्रेडक्रमस् टाकत राहणं आणि त्या व्यक्तीला आपल्याकडून आशा राहील अशी व्यवस्था करणे हे या व्यक्तीचं वैशिष्ट्य असतं. ही लोक कधीही काहीही स्पष्ट सांगत नाहीत. 

अशा व्यक्तींमध्ये विवाहसंस्था नाकारण्याची किंवा अशी नाती निभावण्याची देखील उघड हिम्मत नसते. त्यामुळे यांना ब्रेडक्रमिंग हा पर्याय सुरक्षित वाटतो.हे एक प्रकारचं इमोशनल अब्युजच असतं पण समोरच्याच्या संमतीने घडलेलं! अनेकांना वाटेल की हे कसं शक्य आहे? तर ,दुसऱ्याला जराही शंका न येऊ देता, नातं ठेवताना लॉयल्टी या शब्दाचा दुरानव्याने संबंध न येऊ देणं, फक्त वेगळी चव चाखायला मिळते म्हणून दुसऱ्याला वापरून घेणं याला काय म्हणता येईल? 
इथे मी कोणत्याही मूल्यव्यवस्था इत्यादींवर बोलत नाहीये ,मी फक्त अशा नात्यातून येणारं मानसिक नैराश्य आणि जी व्यक्ती हे ब्रेडक्रमिंग  खरं मानून चाललीय तिचं नुकसान याबद्दल बोलतेय. या ब्रेडच्या चुऱ्यात स्वतःला घोळवून घ्यायचं का हे आपापलं ठरवा.
ब्रेड इथे एक संकल्पना म्हणून वापरला आहे. ब्रेडची एकूण किंमत आणि त्याची उपयुक्तता (पोट व्यवस्थित भरणे) ,करायला लागणारे कष्ट, वेळ आणि संयम यांच्या तुलनेत ब्रेडच्या चुऱ्याचं मूल्य आणि उपयोग ते काय? असा विचार या शब्दमागे असावा ,असं वाटतं.

-गौरी


Fb @ Priya Prabhudesai

Thursday, March 25, 2021

मराठी माणूस १

श्री.मोरेश्वर केशव कुंटे व सौ. विजया मोरेश्वर कुंटे यांनी१८ नोव्हेंबर १९९१ पासून वानप्रस्थाश्रम स्वीकारला. यात त्यांनी देवदर्शन घ्यायला सुरुवात केली पण ती वेगळ्या प्रकाराने, एक-एक जिल्हा ठरवून त्यातील प्रत्येक शहरात, खेडेगावात जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती, पूजेची पद्धत, सध्याची परिस्थिती याची माहिती घेऊन त्या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण फोटो घेऊन त्यावर पुस्तक काढतात आणि मंदिर कोष रूपाने सादर करतात. 
1991 पासून आजपर्यंत ३३ जिल्ह्यांतील १८ हजाराहून अधिक मंदिरे त्यांचे २५ हजाराहून अधिक फोटो व M८० या दुचाकीने १,१५ लाख किलोमीटर चा प्रवास केला असून याविषयावर ४० पुस्तके लिहिली आहेत.त्यांच्या या कार्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ने दखल घेतली आहे. मंदिर कोषाचे गेली 20 वर्ष अथक पणे काम केले. 


सौजन्य  : fb 

Saturday, March 21, 2020

कोरोना प्रभाव असताना घरी राहणं योग्य !

स्वतःच्याच घरात सगळ्या सोयी असताना देखील काही दिवसातच कंटाळलात??? 

कल्पना करा “११ वर्ष अंदमान” किती जीवघेणे असेल.
धन्य ते तात्याराव
#अनामिक #fbshare

Sunday, March 15, 2020

मुलांचं शिक्षण

#विजयखाडिलकर 
जुनंच, परत एकदा, 
६ फेब्रुवारी २०१५ चे विचार   ...
घडंण  ..
असं होऊ नये खरं तर, मुलांचं शिक्षण आणि आपल्या इच्छेनुसार त्यानां विविध छंद जोपासायला लावतानां!

आपल्या लेकाला/लेकीला अभ्यासाशिवाय अनेक खेळात, गोष्टीत प्राविण्य मिळालंच पाहिजे. हे दिवस त्याने फक्त शिकलच पाहिजे, जराही वेळ फुकट घालवता नये.

आम्हाला ह्यातल काहीही करता आल नाही इच्छा असुनही

आज आम्हाला काही कमी नाही आणि आमची कितिही खर्च करायची तयारी आहे.

आम्ही त्याची प्रत्येक डिमांड लगेच पुरी करतो, आणि आमची अपेक्षा त्यानेच  पुर्ण करायचीये एकुलता एकच तर आहे!

या आणि अशा इच्छांमधे त्या लहानग्याची खरंच घुसमट होते.

आपल्याच मुलगा-सुन किंवा लेक-जावयाला आई-वडिल काही सांगतील तर 'तुमचा काळ वेगळा होता, आणि आम्ही नाहिका तुमच्याच इच्छेनुसार वागलो तेव्हां' असा प्रश्नही गर्भित असतो मुलांच्या नजरेत!

आम्ही मात्र आमच्या मुलींना दरवर्षी चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणं एवढीच सक्ती केली आणि उच्च शिक्षणही त्यांच्या आवडीनुसारच दिलं.

https://www.facebook.com/vijay.khadilkar.96

Thursday, March 12, 2020

इजरायल चे राजदूत रॉन मालका यांची भेट

इजरायल चे राजदूत रॉन मालका यांनी माझ्या दिल्ली येथील घरी भेट दिली. यावेळी मी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे पुस्तक भेट दिले. तसेच त्यांना छत्रपती घराण्याचा इतिहास  समजावून सांगितला. 19 फेब्रुवारी ला दिल्ली शिवजयंती मध्ये ते इतर 11 राजदूतांमध्ये उपस्थित होते. त्यानंतर आमची मैत्री अधिक घट्ट झाली झाली.माझे आजोबा छत्रपती शहाजी महाराजांनी दुसऱ्या महायुद्धावेळी हिटलर च्या विरोधात लढा दिला होता. हा एक समान आणि भावनिक धागा आमच्यात तयार  झाला आहे. या मैत्रीचा सदुपयोग महाराष्ट्रासाठी, देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे, असा माझा उद्देश आहे. 

गडकिल्ले संवर्धनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महाराष्ट्रातील शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळमुक्तीवर उपाययोजना करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा लाभ कसा घेता येईल?  यावर सखोल चर्चा झाली. ग्राम विकासाबाबतही त्यांचा दृष्टिकोन समजून घेता आला.

देशाची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याकरिता त्यांनी केलेली उपाययोजना ऐकून थक्क व्हायला होतं. आपल्याला याबाबतही खूप काही शिकावं लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची गुप्तहेर पद्धत आणि इजरायल च्या मोसाद सारख्या गुप्तहेर व्यवस्थेमध्ये साम्य दिसून आल्याचे मी त्यांना नमूद केले. त्यांनी त्यास होकारार्थी उत्तर दिले. 

औरंगजेबाच्या तुलनेत शिवाजी महाराजांचे राज्य अत्यंत छोटे होते. चहू बाजूंनी दुश्मनांचा वेढा होता. अगदी तीच परिस्थिती आज इजरायल ची आहे. स्वराज्याचा विकास करण्यात त्याकाळी महाराज यशस्वी झाले आणि आज इजरायल सुद्धा सर्वार्थाने यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.

एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ती म्हणजे, विकास हा सर्वसमावेशक विचार करून, त्यावर व्यापक उपाययोजना करून साधता येतो.  सुटा सुटा विचार करून साधता येत नाही. 
जसे, इजरायल च्या सरकारांनी, त्या देशाचा दक्षिण भाग जो, वाळवंटी आहे, त्यावर वेगळ्या पद्धतीने मात केली, आणि उत्तर भाग जो निम्न वाळवंटी आहे त्यावर वेगळ्या उपाययोजना केल्या. त्या दोन्ही मध्ये एकप्रकारे सुसूत्रता ठेवली गेली. व्यापक दृष्टिकोन ठेवण्यात आला.

आपल्या राज्यात सहसा असे दिसून येते, की ज्या भागातील शक्तिशाली नेता सत्तेत त्याच्या मतदारसंघात किंवा विभागात पैसा जास्त वळवला जातो. केवळ पैसा वळवला म्हणजे विकास साधला असा समज आपण करून घेतो. त्या पैश्यांच पुढे नेमकं काय झालं? याच उत्तर सापडत नाही. म्हणून आपल्या राज्यासमोरील किंवा लोकांसमोरील मूळ प्रश्न तसेच  शिल्लक राहून जातात. 

रॉन माल्का यांचा मला आग्रह आहे, की मी त्यांच्या देशाला भेट द्यावी. काही गोष्टी पहाव्यात. मी म्हणालो की, मी केवळ भेट देणार नाही, तर अभ्यास दौरा करेन. मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. आणि त्या शिकलेल्या गोष्टीचा फायदा माझ्या महाराष्ट्राला कसा करून देता येईल यावर कामही करायचे आहे. 

एवढासा देश पण तो एवढा शक्तिशाली कसा? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यांच्या राजदूतांच्या सहवासातून मला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सापडून गेली. अजूनही खूप काही शिकायला मिळालं. माझ्या महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या दृष्टिकोनात सुद्धा बराच सुधार झाला.

यावेळी आमच्या सौ. संयोगीताराजे, चिरंजीव शहाजी राजे, कल्याण चे खासदार श्रीकांत शिंदे, पंजाब चे खासदार प्रतापसिंह बाजवा, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार रोहित गांधी, व तसेच दिल्ली मधील माझे दोन मित्र उपस्थित होते.
छत्रपती संभाजीराजे 

Saturday, March 7, 2020

मराठी एकीकरण समिती १

अखेर लेखी तक्रार दाखल

कारवाई करून मराठी बोलणारा अधिकारी  मुंबई शहरासाठी नेमावा मुख्यमंत्री महोदयांकडे करणार मागणी - गोवर्धन देशमुख

"मुंबई शहराचे नवनिर्वाचित #पोलीस आयुक्त सेवेवर असताना माध्यमांशी बोलताना किंवा इतर ठिकाणी #मराठी भाषेचा वापर करत नसल्याबद्दल #मराठीएकीकरणसमिती महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष आनंदा पाटील आणि सहकारी यांनी मा. गृहमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली"


Wednesday, August 15, 2018

स्वातंत्र्यवीर सावरकर


#‌स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर : कदाचीत तुम्हाला नसेल पण या देशाला आजही सावरकरांच्या विचाराची गरज आहे देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या थोर क्रांतिकारकांची गाथा एकदा जरूर वाचा देशासाठी या सावरकर कुटूंबाच्या माणसांनी काय त्याग केलाय याची जाणीव होऊद्या : (२८ मे १८८३–२६ फेब्रुवारी १९६६).
भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ विनायक दामोदर सावरकरम्हणून विख्यात. जन्म नासिकपासून काही अंतरावर असलेल्या भगूर ह्या गावी. सावरकर कुटुंब हे कोकणातील गुहागर पेट्यातून देशावर आले. गुहागरजवळ सांवरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. त्यावरून ‘सावरकर’ हे आडनाव आले असावे, असा अंदाज प्रत्यक्ष सावरकरांनीच केला आहे. थोरले गणेश आणि सर्वांत धाकटे डॉ.नारायण हे त्यांचे दोन भाऊ. सावरकरांचे शिक्षण भगूर, नासिक, पुणे आणि मुंबई येथे एल्एल्.बी. पर्यंत झाले. पुढे ‘बॅरिस्टर’ ही पदवी त्यांनी लंडनला जाऊन घेतली. विद्यार्थिजीवनाच्या आरंभापासूनच सावरकरांचा वाचनाकडे ओढा होता. त्यात विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, रामायण-महाभारत, विविध बखरी आणि इतिहासग्रंथ, तसेच मोरोपंत, वामनादिकांचे काव्यग्रंथ इ. साहित्याचा समावेश होता. संस्कृत साहित्याचाही त्यांचा अभ्यास चांगला होता. विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून देश-विदेशांतील परिस्थितीचे तल्लख भानही त्यांना येत गेले होते. सावरकर हे वृत्तीने कवी होते आणि लहान वयापासून त्यांनी उत्तम वक्तृत्वही अभ्यासपूर्वक कमावले होते.



१८९७ साली पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीत इंग्रज सैनिकांनी घरोघरी जाऊन तपासण्या करताना नागरिकांवर जे अत्याचार केले, त्याचा सूड घेण्यासाठी चाफेकर बंधूंनी ह्या तपासण्यांवर देखरेख करणारा पुण्याचा कमिशनर रँड ह्याचा खून केला आणि ह्या संदर्भात सरकारला माहिती देणाऱ्या गणेश आणि रामचंद्र द्रविड ह्यांनाही ठार मारले. चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आले. त्यांच्या बलिदानाचा सावरकरांच्या मनावर खोल ठसा उमटला आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्घ करण्याची शपथ घेतली. १८९९ मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी ‘राष्ट्रभक्त समूह’ हे गुप्तमंडळ स्थापन केले; तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी, ह्या हेतूने त्यांनी जानेवारी १९०० मध्ये ‘मित्रमेळ्या’ची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यांत कवी ⇨ गोविंद ह्यांचा समावेश होता. शिवजयंत्युत्सव, गणेशोत्सव, मेळे ह्यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदांच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले. पुढे १९०४ मध्ये ह्या मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ ह्या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून ⇨ जोसेफ मॅझिनी ह्या इटालियन देशभक्ताचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण; सैन्यांत व पोलिसांत गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे; रशियासारख्या परराष्ट्रांशी गुप्त संधान बांधणे; इंग्रजी सत्तेच्या केंद्रांवर आणि प्रतिनिधींवर हल्ले करणे; शस्त्रास्त्रे साठवणे इ. मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे, असे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते.



‘मित्रमेळ्याचे ’ काम करीत असताना सावरकरांचे लेख, कविता इ. साहित्य ठिकठिकाणी प्रसिद्घ होत होते आणि प्रभावीही ठरत होते. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी विदेशी कपड्यांची होळी करण्याचा एक कार्यक्रम पार पाडला होता. परिणामतः त्यांना दंड भरावा लागला आणि महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आले.



एल्एल्.बी. झाल्यानंतर लंडनमध्ये बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी ९ जून १९०६ ह्या दिवशी सावरकरांनी भारताचा किनारा सोडला. लंडनमध्ये असलेले क्रांतिकारक ⇨ श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे हे त्यांना शक्य झाले. लंडनमध्ये असताना सावरकरांनी जी कामे केली, त्यांचे तीन भाग सांगता येतील : (१) साहित्यनिर्मिती (२) प्रकट चळवळी आणि समारंभ, (३) गुप्त क्रांतिकार्य.



लंडनमध्ये असताना विहारी आणि काळ ह्या मराठी नियतकालिकांसाठी सावरकरांनी वार्तापत्रे पाठविली. त्याचप्रमाणे जोसेफ मॅझिनी यांचे आत्मचरित्र व राजकारण (१९०७) हा ग्रंथ अनुवादित केला. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर ह्या ग्रंथाचे हस्तलिखितही पूर्ण केले (सु. १९०८).



ह्या हस्तलिखितावर पोलिसांची नजर होती. त्यामुळे ते सहजासहजी प्रसिद्घ होईना. तो ग्रंथ इंग्रजीत अनुवादून परदेशात प्रसिद्घ करणेही अवघड गेले. अखेरीस हॉलंडमध्ये त्याच्या अनुवादाच्या छपाईची व्यवस्था झाली. ह्या ग्रंथाच्या मराठी हस्तलिखिताचा पहिला मसुदा लंडनमध्ये ‘अभिनव भारत’चे सभासद झालेल्या डॉ. कुटिन्हो ह्यांच्याकडे होता. तो १९४९ मध्ये सावरकरांना परत मिळाला. ह्या ग्रंथाची आवृत्ती २००८ मध्ये निघाली आणि तिच्या एक लाखांहून अधिक प्रती ती प्रसिद्घ होताच खपल्या.



१८५७ च्या उठावाचा व्याप फार मोठा होता आणि ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का देणारा तो पूर्वनियोजित संग्राम होता अशी सावरकरांची धारणा होती. तसेच उठाव कसा केला पाहिजे, ह्याचा एक वस्तुपाठच ह्या उठावाने निर्माण केला, असेही त्यांचे मत होते. लंडनमधील वास्तव्यकालात सावरकरांनी शिखांचा इतिहासही लिहिला; पण तो प्रसिद्घ होऊ शकला नाही. त्याचे मूळ हस्तलिखितही गहाळ झाले. मात्र शीख पलटणीत उठावाची प्रवृत्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारक पत्रके लिहून ती गुप्तपणे तिकडे पोहोचतील अशी व्यवस्था केली. स्वातंत्र्याकांक्षी आयरिश लोक न्यूयॉर्क येथून चालवीत असलेल्या गेलिक अमेरिकन ह्या वृत्तपत्रात त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लेखही लिहिले. लंडनमधील आपल्या प्रकट स्वरूपाच्या कार्यासाठी ‘फ्री इंडिया -सोसायटी’ ची स्थापना करून त्या संस्थेतर्फे शिवोत्सव, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराचा महासोहळा, श्रीगुरूगोविंदसिंग ह्यांचा जन्मदिवस, विजयादशमीचा उत्सव असे विविध उत्सव सावरकरांनी घडवून आणले.

लंडनला सावरकरांच्याबरोबर असलेले ⇨ सेनापती बापट ह्यांनी बाँब तयार करण्याची विद्या काही रशियन क्रांतिकारकांच्या साहाय्याने माहीत करून घेतली होती. ही माहिती भारतात क्रांतिकारकांच्या विविध केंद्रांवर पाठविण्यात आली होती. पुढे वसई येथे बाँबचा कारखाना काढण्यात आला. सावरकरांनी काही पिस्तुले मिळवून तीही भारतात पाठविली होती. त्यातली काही सर सिकंदर हयात खान ह्यांनी आणली होती. ब्रिटनविरुद्घ जागतिक पातळीवर मोठे षड्‌यंत्र उभारण्याचाही सावरकरांचा प्रयत्न होता.



ब्रिटिशांच्या दडपशाहीचा एक भाग म्हणून ⇨ बाबाराव सावरकर ह्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांची सारी मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनीच ‘अभिनव भारत’ चे एक सदस्य ⇨ मदनलाल धिंग्रा ह्यांनी भारतमंत्र्याचे स्वीय सहायक कर्झन वायली ह्यांचा लंडनमध्ये गोळ्या झाडून खून केला (१ जुलै १९०९). ह्याच्या निषेधार्थ ५ जुलै रोजी लंडनच्या ‘कॅक्‌स्टन हॉल’ मध्ये भरलेल्या सभेत सावरकरांनी निषेधाच्या ठरावाला विरोध केला. ठरावावरच्या भाषणात न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वीच धिंग्रांना गुन्हेगार ठरविणे हे न्यायालयाच्या अधिकारांवर अतिक्रमण होते, असा युक्तिवाद सावरकरांनी वृत्तपत्रांना पत्र पाठवून केला. सावरकरांच्या हालचालींमुळे त्यांना बॅरिस्टरीची सनद मिळण्यातही अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. अहमदाबाद येथे व्हॉइसरॉयवर बाँब टाकण्याच्या प्रकरणात त्यांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकर ह्यांनाही अटक झाली होती. ह्या सर्व घटनांचा ताण सावरकरांच्या मनावर पडला. या सुमारास त्यांना न्यूमोनियाही झाला. त्यातून उठल्यावर ते पॅरिसला गेले. तेथे ते ⇨ भिकाजी रुस्तुम कामा ह्यांच्याकडे राहिले. दरम्यानच्या काळात नासिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन ह्याचा खून झाला. ह्या वधासाठी वापरलेली पिस्तुले सावरकरांनी भारतात पाठविलेल्या पिस्तुलांपैकी असल्यामुळे हे सर्व प्रकरण सावरकरांपर्यंत पोहोचले. त्यानंतर तेथे सावरकरांच्या आप्तांचा आणि सहकाऱ्यांचा पोलिसी छळ सुरू झाला. ह्या परिस्थितीत पॅरिसला राहून अटक टाळण्यापेक्षा लंडनला जाऊन अटक होण्याचा धोका आपण पत्करावा असे त्यांनी ठरविले. १३ मार्च १९१० रोजी त्यांना अटक झाली. पुढे चौकशीसाठी त्यांना भारतात नेले जात असताना मार्से बंदरात त्यांनी प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुपात जाऊन तिथल्या ‘पोर्ट होल’ मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. अशी अटक कायदेशीर नाही, ह्या मुद्यावर सावरकरांतर्फे द हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात मागितलेली दादही व्यर्थ ठरली.



सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर दोन खटले चालविण्यात आले. जॅक्सनच्या वधाला साहाय्य केल्याचा तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केल्यामुळे तसेच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तेव्हा आलेला नसल्यामुळे आपण ह्या खटल्यांच्या कामात भाग घेणार नाही, अशी सावरकरांची भूमिका होती. ह्या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना पन्नास वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली; त्यांची सगळी मिळकतही जप्त करण्यात आली (२४ डिसेंबर १९१० आणि ३० जानेवारी १९११).



सावरकरांना अंदमानात ४ जुलै १९११ रोजी आणण्यात आले. छिलका कुटणे, काथ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे त्यांना तुरुंगात करावी लागली.तिथल्या हालअपेष्टांमुळे त्यांचे शरीर खंगत गेले, पण अशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचावयास घेतले. अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या काही मागण्यांची तड लावली. ग्रंथाभ्यासाची संधी उपलब्ध होताच त्यांनी अफाट वाचन केले. त्यात भारतीय तत्त्वज्ञान, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मिल, स्पेन्सर आदींचे ग्रंथ तसेच ज्ञानेश्वरी, कुराण, बायबल ह्यांच्या वाचनाचा समावेश होतो. बंदिवानांमध्येही त्यांनी अभ्यासाची आवड उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला.



सावरकर हिंदीचे अभिमानी होते. हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.



१९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व (मूळ ग्रंथ इंग्रजी; मराठी अनुवाद, १९२५) आणि माझी जन्मठेप (१९२७) हे ग्रंथ लिहिले. अंदमानात असताना सावरकरांनी एक ग्रंथालय उभे केले होते. येथेही त्यांनी सरकारकडे प्रयत्न करून ग्रंथालय उभारले. सावरकरांची १९२४ मध्ये दोन अटींवर तुरुंगातून मुक्तता करण्यात आली : (१) रत्नागिरी जिल्ह्यात ते स्थानबद्घ म्हणून राहतील. (२) पाच वर्षे ते राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळपास साडेतेरा वर्षे सावरकर रत्नागिरीत होते. ह्या काळात त्यांनी अस्पृश्यतानिवारण, धर्मांतर करून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेणे, भाषाशुद्घी आणि लिपीशुद्घी ह्या चळवळी केल्या.



अस्पृश्य व उच्चवर्णीय ह्यांच्यात सामाजिक अभिसरण घडून यावे, ह्यावर त्यांच्या अस्पृश्यनिवारण चळवळीचा विशेष भर होता. त्यासाठी स्पृश्यास्पृश्यांची सहभोजने, सर्व जातींतील महिलांचे हळदीकुंकवांचे समारंभ, शाळांमधून स्पृश्यास्पृश्य मुलांचे सहशिक्षण इ. उपक्रम त्यांनी राबविले. हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिरप्रवेशबंदी असल्यामुळे त्यांनी भागोजीशेठ कीर ह्या दानशूर सद्‌गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बांधविले (१९३१). रत्नागिरीतील विठ्ठलमंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेशमूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश देऊन त्यांनी त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला, त्यासाठी आर्थिक साहाय्यही दिले.



सावरकरांना हिंदू समाजात प्रबोधन घडवून आणावयाचे होते; दबलेल्या हिंदूंना आपल्या स्वत्वासह पुन्हा उभे करायचे होते. भाषाशुद्घी, लिपीशुद्घी ह्या त्यांच्या चळवळीही त्यासाठीच होत्या. अरबी, फार्सी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषांवर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्घ रूप प्राप्त करून दिले पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचविल्या होत्या.



सावरकरांची बिनशर्त मुक्तता १० मे १९३७ रोजी करण्यात आली. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले आणि त्या पक्षाचे नेतृत्वही त्यांच्याकडे आले. सावरकरांनी हिंदुमहासभेतर्फे निःशस्त्र प्रतिकाराचे दोन लढे दिले : एक, भागानगरचा आणि दुसरा, भागलपूरचा. भागानगरचा लढा निझामाच्या अत्याचारांविरुद्घ होता. परिणामतः निझामाच्या कायदेमंडळात जिथे हिंदूंना पूर्वी शून्य जागा होत्या, तेथे त्यांना पन्नास टक्के जागा निझामाला द्याव्या लागल्या. भागलपूरचा सत्याग्रह इंग्रजांविरुद्घ होता.



सावरकर सनदशीर मार्गांनी आपल्या चळवळी चालवीत होते, तरी सशस्त्र लढ्यावरचा त्यांचा विश्वास ढळला नव्हता, इंग्रजांविरुद्घ अखेरची लढाई सशस्त्र लढायची वेळ आली, तर आपल्या भारतीय तरुणांना सैनिकी शिक्षण असणे आवश्यक आहे, ही त्यांची स्पष्ट धारणा होती. त्यामुळे दुसरे महायुद्घ सुरू होताच, त्यांनी अशी निःसंदिग्ध भूमिका घेतली, की आपल्या समाजाच्या सैनिकीकरणास आणि औद्योगिकीकरणास साहाय्यभूत होणाऱ्या सर्व युद्घकार्यात आपण पूर्णपणे सहभागी झाले पाहिजे. सैन्यात आपल्या तरुणांना भूदल, नौदल, वायूदल ह्यांत दाखल होता येईल. शस्त्रास्त्रे बनविण्याचे आणि चालविण्याचे तंत्र त्यांना आत्मसात करता येईल. भारताचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरण ह्यांचे महत्त्व त्यांना अपरंपार वाटत होते.



‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ ही सावरकरांची ठाम भूमिका होती. ती त्यांनी ‘क्रिप्स कमिशन’पुढेही मांडली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, ह्याचा त्यांना आनंद झाला; तथापि देशाची फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, ह्याचे त्यांना परमदुःख झाले. फाळणीनंतर हिंदूंवर झालेले अत्याचार, रक्तपात ह्यांनीही ते व्यथित आणि संतप्त झाले होते, ह्या भावना त्यांनी उघडपणे व्यक्त केल्या.



दिल्लीत महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८). तीत सावरकरांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांना अटक करण्यात आली; तथापि त्या खटल्यात सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.



घटना समितीकडे १९४९ मध्ये त्यांनी तीन सूचना केल्या : देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरीलिपी ही राष्ट्रलिपी करावी; तसे घडले.



भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्याची प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ ह्या संघटनेचा सांगता समारंभ १९५२ च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला.



त्यांची प्रकृती १९६६ मध्ये ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरविले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. सावरकर हे हिंदुराष्ट्रवादी होते. आरंभी नव्हते; तथापि अनुभवांच्या ओघात भारतीय वास्तवाचे त्यांना जे आकलन झाले, त्यानुसार ते हिंदुराष्ट्रवादाच्या भूमिकेवर आले. हिंदुत्व ह्या आपल्या ग्रंथात त्यांनी हिंदुत्वाच्या मूलभूत तत्त्वांचे विवेचन केले आहे.



सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सु. १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. माझी जन्मठेप ह्या त्यांच्या ग्रंथात अंदमानातील तुरुंगवासाचा आत्मचरित्रपर इतिहास आहे. माझ्या आठवणी (जन्मापासून नाशिकपर्यंत, १९४९), भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने (२ खंड, १९६३) आणि शत्रूच्या शिबिरात (१९६५) हे त्यांचे अन्य काही उल्लेखनीय ग्रंथ होत. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने ह्या ग्रंथात बौद्घकाळाच्या आरंभापासून इंग्रजी राजवटीच्या अखेरीपर्यंत ज्या स्त्री-पुरुषांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पराक्रम केला, त्यांचा इतिहास आहे. शत्रूच्या शिबिरात हे त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकांपैकी एक. मला काय त्याचे ? अथवा मलबारांतील मोपल्यांचे बंड (आवृ. दुसरी, १९२७) आणि काळे पाणी (१९३७) ह्या त्यांच्या दोन कादंबऱ्या. उःशाप (१९२७), संन्यस्त खड्‌ग (१९३१) आणि उत्तरक्रिया (१९३३) ही त्यांनी लिहिलेली नाटके. सावरकरांचे जात्युच्छेदक निबंध (१९५०) त्यांची जातिभेदनिर्मूलक भूमिका स्पष्ट करतात. त्यांच्या इंग्रजी ग्रंथांत वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स १८५७, हिंदुपदपादशाही, हिंदुराष्ट्र दर्शन, हिस्टॉरिक स्टेटमेंट्स आणि लेटर्स फ्रॉम द अंदमान (जेल) ह्यांचा समावेश होतो. हे सर्व साहित्य समग्र सावरकर वाङ्‌मय (खंड १ ते ८, १९६३–६५)ह्यात समाविष्ट आहे.



मुंबई येथे १९३८ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भाषाशुद्धी आणि लिपीशुद्घी ह्यांचे महत्त्व सांगितले. वाङ्‌मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ असे दोन भाग कल्पून त्या दोहोंचे त्यांनी विवरण केले. भाषणाच्याअखेरीस ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’, असा संदेश त्यांनी दिला. १९४३ मध्ये सांगली येथे भरलेल्या नाट्यशताब्दी महोत्सवाचे तेअध्यक्ष होते. त्याच वर्षी त्यांना नागपूर विद्यापीठाकडून डी.लिट्. ही सन्माननीय पदवी देण्यात आली.



संदर्भ : १. करंदीकर, शि. ल. सावरकर-चरित्र (कथन), पुणे, १९४३.

२. कीर, धनंजय; अनु., खांबेटे, द. पां. स्वातंत्र्यवीर सावरकर, मुंबई, १९८३.

३. गावडे, प्र. ल. सावरकर : एक चिकित्सक अभ्यास, पुणे, १९७०.

४. जोगळेकर, ज. द. स्वातंत्र्यवीर सावरकर : वादळी जीवन, पुणे, १९८३.

५. नवलगुंदकर, शं. ना. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, पुणे, २०१०.

६. फडके, य. दि. शोध सावरकरांचा, पुणे, १९८४.

कुलकर्णी, अ. र.

Monday, December 25, 2017