येडचॅप.... २३ ०३ १६
आबा म्हणजे माझे आजोबा. केवढं मोठ्ठ नाव आहे त्यांचं 'मधुसूदन'. ओल्ड स्टाईल. मी 'आरोह', पहिलीत आहे. एकदा मी गमतीने म्हटलं, ए आबा, करायचं का जरा तुझं नाव छोटुस्स. आधी म्हणाले कर. म्हटलं 'मॅडी' कसं वाटेल तर म्हणाले, ये तुझ्या कुल्यावर लिहून दाखवतो. ख्या ख्या हसत म्हणाले, अरे हे नाव मी लहान असताना सुचायला हवं होतं रे, तसाही मी शहाणा नव्हतोच कधी. काय रे तुमची नावं हल्लीची. अर्थ माहित असो नसो, चिकटवतात नुसती. चल सांग बरं, तुझ्या नावाचा अर्थ. आता मला कसा कळणार. काहीतरी सुराच्या खालच्या पट्टीतून सुरवात करत वरच्या पट्टीत नेत घेतलेल्या आलापाला आरोह असं म्हणतात, असं म्हणाले. मला काही कळलं नाही. 'अरे, पण तू रडतोस तेंव्हा मात्र नाव सार्थकी लावतोस. चला म्हणजे आपल्या दोघांच्याही नावात अर्थ आहे आणि बसले हसत म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.
पण माझी आणि आबांची जाम गट्टी आहे. दिवसभर माझ्याशी खेळतात, अभ्यास घेतात, कोडी घालतात, (स्पेलिंग पण घालतात, वाईट्ट आहेत अगदी), घोडा घोडा पण खेळतात, मला शाळेतून आलो आणि कंटाळा आला (तो रोजच येतो) तर भरवतात पण नंतर घोग-या आवाजात गाणं म्हणून झोपवतात पण. मला झोपवून आरामखुर्चीत बसून पुस्तकं वाचतात आणि तिथेच झोपतात. पण आबांना ना सगळ्यातलच सोल्लिड कळतं. माझ्या दोस्तांनी काही विचारलं आणि मला येत नसेल ना तर मी आबांनाच विचारतो, बाबापेक्षा जास्त माहिती आहे आबांना. बाबा आबा नसताना म्हणतो, त्यांना 'गुगलोबा' म्हणत जा तू. (जळकू आहे नुसता). आबांना सांगितलं मी एकदा बाबा ओरडल्यावर. आबा म्हणाले, अरे हो, पण आमच्या वेबसाईटची एक्सपायरी आता जवळ येत चालली आहे, रिन्यू नाही होणार. मधेच ना असं मला कळत नाही असं बोलतात. म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.
परवा पण असच झालं. आई म्हणाली होती, आज शनिवार, मी लवकर येते, आज आपण बागेत जाऊ. आलीच नाही सहा वाजले तरी. आबा म्हणाले, मी नेऊ का? मी नाहीच म्हटलं, आई नेहमीच असं करते. आली की मीच देणार आज तिला धम्मक लाडू. एकतर आबांनी मला साडेचार पासून तयार करून ठेवलं. दोघं कंटाळलो खिडकीत बसून वाट बघत. मला रडू यायला लागलं तर लागले मला चिडवायला 'कुकुल्ल्या बाळाला आईची आठवण आली का?' मग मला अजूनच् रडू आलं. असं चिडवतात का कुणी लहान मुलाला? म्हटलं ना जरा येडचॅपच् आहेत.
मला खूप खूप राग आला होता त्यांचा त्या दिवशी. परवा आरामखुर्चीत असेच शांत बसले होते, पुस्तक छातीवर ठेवून. मी पण त्यांना चिडवलं त्यांच्यासारखच, आजीची आठवण येते का मोठया बाळाला? तर अचानक रडायलाच लागले, मग मलाही रडू आलं. म्हटलं पण मी, आबा सॉरी म्हणून. तर म्हणाले, असू दे रे. मग मला जवळ घेतलं आणि म्हणाले 'तू रडतोस, आईला उशिर झाला म्हणून पण ती येणार हे निश्चित आहे रे'. पुढे काही बोललेच नाहीत डोळे पुसत खिडकीतून बाहेर बघत बसले दुपारभर...
म्हटलं ना मी, जरा येडचॅपच आहेत काहीही बोलतात, मला न समजेलसं....
जयंत विद्वांस
0 comments:
Post a Comment