जी एंच्या कथांची तोंडओळख
शब्दांजली(marathi katha,gadya) orkut
आपण सर्वांनी इथे जी एं च्या कथांची ओळख करून द्यायची का ?
मी सुरुवात करतो.. माझ्याकडे त्यांचे सर्व संग्रह आहेत. कुणाला रेफ़रंस हवा असेल तर संपर्क करा.
===============
कथा : गिधाडे , संग्रह : हिरवे रावे
गिधाडे : बापू काळुस्कर : म्युनिसिपल क्लार्क. दुसर्याचे पैसे घेऊन जात असता मोहात पडतो आणि मुंबईला पोचतो. पैसे संपवून घरी येतो आणि सारे आयुष्य अपमानित जगत असतानाच...
... त्याला एक असाच अफ़रातफ़र करणारा माणूस दिसतो ... आणि बापू त्याला छळायला निघतो.
वैशिष्ट्य : मोह, आकर्षण ही मानवी सहज प्रवृत्ती असण्याचं जी ए प्रणित तत्त्वज्ञान. त्या एका क्षणासाठी उर्वरित आयुष्य छळ सहन करण्याची साहजिकता. आणि दुसर्याला छळण्याची सहज प्रवृत्ती
आवडलेली वाक्यं : आपल्या अशक्त मुलीला फ़्रॉक नाही म्हणून स्वतःचा शर्ट देतानाची :
त्याने हळूच तिच्या पोटाला हात लावला तेव्हा झगा टाकून अशक्त हातांनी अंग बांधून शैलू हुळहुळून हसली. ’डुरमी गं बाई , ढमाबाई !’ बापू म्हणला व त्याने तिला एकदम जवळ घेतले. ती एकदम एवढीशी, कानवल्या एवढी. ती त्याच्या छातीला अगदी चिकटून राहिली, आणि हातात चिमणी धरल्यासारखी तिच्या उराची धडधड त्याच्या अंगाला जाणवली. त्याला एकाएकी फ़ार अपराधी वाटले . आपण आयुश्यात हिलाच फ़ार मोठॊ शिक्षा दिली हे जाणवले. आणखि अठरावीस वर्षांनी कशी असेल शैलू ? स्वतःच्या घरी ? सुखी ? की अशक्त, निराश अंगात मन कणाकणाने झिजत, इतरांच्या आयुष्याकडे दुरुनच पहात ?
(गिधाडे : हिरवे रावे )
===
कथा : शिक्षा, संग्रह : हिरवे रावे
शिक्षा : शोभाची कथा. एकेकाळच्या श्रीमंत बापाची आता शिक्षिकेची नोकरी करणारी तरूण मुलगी. एक पानवाला तिची छेड काढतो आणि पोलिस केस झाल्यावर उलट तिच्यावरच नाहि नाही ते आरोप करतो. गांवभर चर्चा होऊन तिलाच अपराधी असल्यासरखं होतं. प्रियकरही सोडून जातो. शेवटी तो मवाली शिक्षा भोगून सुटून येतो. पण हिची अपमानित जगण्याची शिक्षा सुरुच रहाते.
वैशिष्ट्य : कथेचं वातावरण, व्यक्तीरेखा अत्यंत सजीव. पण कुठेही ढोबळपण नाही. प्रत्येकच जण आपापली शिक्षा भोगतो आहे.
आवडलेली वाक्यं : (शोभाने लावलेल्या फ़ुलझाडाची कुंडी तिच्या आईच्या हातून पडून फ़ुटते)... कुणाच्याही हातून तसे झाले असते. शिवाय झाडाला तर धक्कासुद्धा लागला नव्हता. पण सारा दिवसभर तिने शोभाकडे अशा कुत्र्यासरख्या दीन ओलसर डोळ्यांनी पाहिले की शोभाला भडभडून आले. ती कुंडी तिच्या वाटेत ठेवल्याबद्दल स्वतःच्याच तोंडात मारून घ्यावे असे तिला वाटले. निव्वळ कपडे धुण्यासाठी परटाला दोन काळीभोर नदीकाठ राने देऊन टाकणार्या देसाई घराण्यातील आपली आई. पण चार पाच वर्षे घरचे सारे काम स्वतः करू लागली होती. पहिली घागर ओढली त्यावेळि ती एकटीच तासभर हातांवर फ़ुंकर घालत बसली होती. पण आता झगडण्याची तिची सारी इच्छाच गेली होती. शेवटी शांतपणे पसरण्यापुर्वी तिचे आयुष्य बसकू लागले होते.
================
कथा : तुती , संग्रह : हिरवे रावे
तुती : हिरवे रावे
(ही कथा मी आजवर शंभर एक वेला वाचली असेल. तरीही पुन्हा वाचताना अनावर होतो.)
एका कुटुंबाच्या वाताह्तीची कथा एका मुलाच्या नजरेतून. वडलांना घरभाडे झेपेना, म्हणुन घर बदलले. बहिणीला दुसरेपणाचा (पहिली बायको हुंड्यापायी मेलेली) नवरा पाहिला म्हणून भाऊ घर सोडून जातो. आणि बहिण लग्नानंतर वर्षभरात विहीरीत जीव देते. वडलांना अर्धांगवायू होतो.
वैशिष्ट्य : यातून समाजत्ल्या भयाण वास्तवाची, मध्यमवर्गाच्या संस्कारांची, आंबट,कडू गोड सारी चव येते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद, निष्ठा दिसतात. तुतीच्या चवीचा आस्वाद घ्यायला गरिबी आड येत नाहि. आणि कितीही उपास घडले तरी भाकड गायीला चारा देण्यात कुचराई होत नाही. अशा छोट्या गोष्टीतून व्यक्ती , कुटुंब, समाज यांच्या भावभावनांचं आणि मूल्यांचं नेमकं टिपण जीएंनी काढलं आहे. याच्याच दुसर्या भागाचं नाव आहे ’कैरी’ .. ज्यावर नंतर अमोल पालेकरांनी सिनेमा काढला.
आवडलेला भाग : या कथेतला प्रत्येकच शब्द जीवघेणा आहे. पण सांगायचाच तर हा भाग:
आई मुलगा शाळेत पास जाल्यावर म्हणते, ”कारट्या , तू बी ए हो अगर होऊ नकोस. पण आतून बाहेरून मात्र अगदी दगड हो !,” तिने माझ्या छातीवर टिचकी मारली, व ती पुन्हा म्हणाली, अगदी घट्ट, डोंगरी दगड हो बघ !”
====================
कथा : अनामिक , कथासंग्रह : सांजशकुन
कथा : अनामिक , कथासंग्रह : सांजशकुन
तो ज्या गांवाला जायचंय त्याचं नांव विसरतो. आणि मग स्वतःचंही नांव विसरतो. आणि एका अनोळखी रस्त्यावर स्मृतिभ्रंश होऊन अडकतो. त्याला सोबत असते एका वेडसर म्हातार्याची. आनि मग स्वतःला आलेलं फ़्र्स्ट्रेशन तो त्या म्हातार्यावर काढतो. त्याची मालकाची वाट बघण्याच्या आशेची अखेर करतो. आणि त्या म्हातार्याला कोलमडताना बघतो. आनंदित होतो.
वैशिष्ट्य : मी ही कथा जीवनमुल्यांच्या संदर्भात वाचली. आयुष्य़भर जपलेल्या मुल्यांबाबतच कधी कधी प्रश्नचिन्ह उभं रहातं. आपण आजवर केलेलं सगळं व्यर्थ होतं असा भास होतो. भिती वाटते. अशावेळी इतरांचंही जीवन तितकंच व्यर्थ आहे हा विचार मनाला दिलासा देतो.
जी एंच्या कथांतून वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात. वाचणार्याच्या पिंडाप्रमाणे. हेच त्यांच्या कथांचं वैशिष्ट्य. पण याचा अर्थ जी ए सारं काही वाचकावर सोपवतात असंही नाही. त्यांची स्वतःची विचारसरणी प्रत्येक कथेच्या पार्श्वभुमीला असतेच. nihilistic , deterministic existentialist.
आवडलेलं वाक्य : ...म्हातारा अडखळत घोगरेपणाने म्हणाला. दूध नासल्याप्रमाणे त्याचे सारेच अंग बिघडून ताठर झाले...तो निर्जीव ओठांनी पुटपुटला...त्याने वठलेल्या हाताने पत्र्याचा खांबाचा आधार घ्यायचा प्रयत्न केला, परंतू आखडून वाकड्या चोचीसारखी झालेली बोटे कशावरच स्थीर झाली नाहीत,...
... वीष उतरल्याप्रमाणे त्याचे अघोरी समाधान उतरले.
कथा : अनामिक , कथासंग्रह : सांजशकुन
या कथे वरून एक द्विपात्री एकांकिकाही बनली आहे. आणि ती दोन तीन वर्षांपुर्वी सर्वोत्कृष्ट म्हणुन गौरवली गेली.
====================
स्वामी : कथासंग्रह: पिंगळावेळ
या कथेवर अख्खं एक पुस्तक लिहीता येईल अशी एक भव्य कथा. शेकडो वेगवेगळे अर्थ काढता येतील...
गोष्ट अशी आहे : आपल्या मुळ गांवी गेलेला एक माणुस रात्र काढण्यासाठी एका मठात जातो. आणि तिथला प्रमुख स्वामीच बनतो. पण कसा ? एका तळघरात कोंडून ठेवून. त्याला सुग्रास खाणं पिणं मिळतं. पण जिवंतपणा नाही. गाठभेट नाही. आणि त्याच्या नांवावर तो मठ चालवला जातो. भजनं चालतात. स्वामी फ़क्त नांवाला जिवंत.
पण स्वामी मात्र या निर्जीवतेवर मात करतो. आणि एक वेल लावतो. जीवन वेल. आणि ती वाढवताना स्वतःचा जीव अर्पण करतो. प्राणवायू त्या वेलीला देऊन.
वैशिष्ट्य : काहींना हि कथा साम्यवादी शासनप्रणालिवरचं भाष्य वाटलं. तर काहींना अध्यात्माच्या नावाने चालणार्या व्यापारावरचं. काहींना मानवी दडपशाहीला गांधीवादी उत्तर वाटलं तर काहींना यात निराशा आणि आशा यांतला संघर्ष. काहींना यात existentialist determinism ची विकसीत सूत्रं दिसली. काहींना यात फ़्रिड्रीश नित्शेची छाया आढळली. तर काहींना मायावाद. मला तर प्रत्येक वेळी ही कथा वेगळीच भावते.
मला या कथेवर इतरांची मतं ऐकायला आवडेल.
आवडलेला भाग : मरतेसमयी स्वामीचं झाडाच्या कोंबाशी संभाषण...
==============
तू असाच वर जा
अंधार्या सांदरीतून निघालेले तुझे आयुष्य न चिरडल्या जाणार्या ईर्ष्येने वर वर जाऊन एका तृप्त क्षणी सुर्यप्रकाशाला भेट दे
तुला जर फ़ुले येतील-
आणि तुला सोन्याच्या लहान पेल्यांसारखी फ़ुले यावीत आणि त्यांच्या स्पर्शाने पराग सांडून बोटांची टोके पिवळी सुगंधी व्हावीत.
तुला जर फ़ुले येतील, तर अशा सहस्त्र फ़ुलांना घेऊन तू तुझ्यावर वाकलेल्या आभाळाला सामोरे जा व त्याच्या निळ्या साक्षीने तू त्यांच्यात सूर्यप्रकाश साठवून घे.
तुला जर फ़ळे येतील-
आणि तुला दर पानाआड लहानसे लाल फ़ळ यावे व ते इतके रसरशीत असावे की त्या प्रत्येकाच्या लाल रंगात सुर्यप्रकाशाचा एक एक कण सुखाने नांदावा.
तुला जर फ़ळे येतील , तर त्यांच्यासह तू क्षितिजाकडे पहा. कारण अशा अंधारातून त्याचाच शोध घेत त्याच्याकडे आला आहेस.
मग तुझ्या बीजाची फ़ळे सर्वत्र विखरून त्या तुझ्या विजयाच्या खुणा सर्वत्र रुजू देत. जर कणा एवढ्या प्रकाशाचा काजवा तुला कधी दिसला तर तू त्याचे स्वागत कर.
त्या कणाच्या अभिमानाने त्याने रात्रीच्या अमर्याद अंधाराला आव्हान देऊन त्याचा एक कण जिंकून प्रकाशित केला आहे.
आभाळात एखादे लहान पाखरू दिसले तर त्याला आतिथ्य दाखव. कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.
जर कधी एखाद्या मुलाने तुझे एक रसरशीत पान घेऊन दुमडून ते पुन्हा आडवे उघडले, व पानाचा आरसा केला, किंवा कधी तुझे पिवळे फ़ूल तोडून बोटे पिवळ्या धुळीने माखुन घेतली, अगर तुझे एक लाल फ़ुल खुडुन ते दोन बोटांत चेंगरत रसाचा लाल धागा काढला , तर तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
कारण, कुणास ठाउक, अब्जांमध्येच एक असे आढळणारे ते मूल असेल, ते देखील भोवतालच्या अंधार्या अजस्त्र भिंती फ़ोडून सूर्यप्रकाशाकडे येण्याची कधीतरी धडपड करणार असेल.
आणि तसे असेल तर ते तुझ्या रक्तानात्याचेच आहे.
म्हणून तू त्याच्यावर क्रुद्ध होऊ नकोस.
एक पान गेल्याने तुला दारिद्र्य येणार नाही.
एक फ़ूल गेल्याने तुझे सौंदर्य उणॆ भासणार नाही.
एक फ़ळ गेल्याने तुझ्या आयुष्यात नैराश्य येणार नाही.
इतके तुला वैभव आहे. इतके तुला वैभव मिळो !
=========
या सार्यात मला विशेष सुख आहे, कारण तुझे एकेक पान म्हणजे माझाच एकेक श्वास आहे. म्हणुन तु म्हणजे मीच स्वतः आहे. मी संपलो नाही तर मी केवळ बदललो आहे. तू आपले सारे सामर्थ्य घेऊन आभाळाखाली सूर्यप्रकाशात वर आला आहेस एवढे इतरांना समजू दे.
मी अंधारात लाल प्रकाशात दडपून चिरडला गेलो नाही, तर मीच हिरव्या कारंजाप्रमाणे वर आलो आहे, हे देखिल इतरांना कळू दे.
म्हणून तू असाच वर जा....कथा : स्वामी :: कथासंग्रह: पिंगळावेळ
==========================
कथा : राणी :: संग्रह : निळासावळा
एक अंध आजोबा.अंथरुणाला खिळून. खोलीबाहेर जाणं नाही. विधुर. दोनच आधार. एक, पत्नीची आठवण, दुसरी, गोडशी नात , राणी.
एकदा आठवडाभराच्या बेशुद्धीतून बाहेर येतात. आठवडाभर बेशुद्ध असल्याचीही शुद्ध नाही. अचानक आघात होतो, राणी गेल्याच्या बातमीचा. मन टाहो फ़ोडत असतं. त्याच वेळी एक बाहेरचा माणुस घरात आल्याची चाहूल. घरात काही कुजबुज. त्या माणसाला धक्का बसतो. तोही कळ्वळतो, आणि एक वाक्य निघतं. ’देवाची ईच्छा. म्हातार्याला उदंड आयुष्य आहे. आणि सोनकेळी सारखी मुलगी वाया गेली’. हे ऐकताच आजोबांचा टाहो विरून जातो. राहते ती अपार वेदना. वाचकाचे डोळे ओलावणारी.
वैशिष्ट्य : जी एं च्या कथांतून एक वेदना, असहायता, नियतीशी लढताना मानवाची शक्तीहीनता यांचं दर्शन सतत होतच असतं. या कथेत मानवी संबंधातलं असहाय्यपण, अभावितपणे दुसर्याला दुखावणं, चिंतेच्या अनंत छटा, प्रेमाच्या छटा... इतक्या विविध प्रकारे आल्या आहेत ... मन निःस्त्ब्ध होतं...
आवडलेला भाग : राणि गेल्याचं कळल्यावर आजोबा पत्नीला उद्देशून स्वतःशीच बोलतात ....‘ तू ज्यावेळी गेलीस त्याच वेळी मीही आलो असतो तर बरं झालं असतंबघ--- ”ते पुटपुटले “ फ़ार बरं झालं असतं ! मला जगण्याची बिलकुल हौस नव्हती गं ! मी इथे भणंग होत चालल्याप्रमाणे शेवटचे क्षण या घड्याळापुढे अगदी एकेक वाजवून परत परत देत बसलो, आणि फ़ुंकर मात्र पडली ती त्या पोरीवर. राणी,, मला जगायचं नव्हतं. मला एक दिवसाचं सुद्धा आयुष्य नको होतं.जर माझ्या रक्तानं तुझ्या अंगठीच्या बोटाला मेंदी चढली असती, तर मी माझं रक्त तुला दिलं असतं. पोरी, मला उदंड आयुअष्य नको होतं . सपथ देवाची, तुझी, तुझ्या आजीची ! --- मला जगायचं नव्हतं ग... मला जगायचं नव्हतं. ...”
-----
कथा : राणी :: संग्रह : निळासावळा
===========================
कथा : खुळा बाळ्या :: संग्रह : ओंजळधारा
मनोरंजक कथा. एक खुळाबाळ्या असतो. कायम वेडसरपणाची कृत्यं करून गांवात हसण्याचा विषय बनतो. त्याने केलेल्ल्या एक एक करामतींसमोर (Mr Bean type) आपणही हसून हसून लोटपोट होतो. अशातच त्याचे लग्न होते आणि मग बायकोही निघून जाते. पण त्याच्यावर माया करणारी त्याची आई मात्र तशीच त्याच्या बरं होण्याची वाट बघत रहाते.
एक दिवस एक साधू येतो. तो त्याला बरं करण्याचं आश्वासन देतो. पण एक किंमत मागतो. तिने तिचं उरलेलं आयुष्य त्या साधूला द्यावं. लगेच स्वतःचं प्राणार्पण करून.
आईच ती. लगेच तयार होते. मुलगा बरा होतो. आणि आई संन्याशाकडे जाते. प्राणार्पणाला. संन्याशी मात्र नकार देतो. पुढचं मुळातच वाचावं असं त्याचं भाषण आहे.
वैशिष्ट्य : जी एंच्या इतर कथांपेक्षा वेगळ्या कथा ओंजळधारामध्ये आहेत. ही कथा तर आशादायक, सुखांत. पण जी एं चं तत्त्वज्ञान मात्र इथेही तेवढ्याच ताकदीने येतं
आवडलेला भाग : (आई आयुष्य द्यायला येते तेव्हा साधू नकार देतो घ्यायला ... आणि म्हणतो) : “मी भ्रमाने आंधळा झालो होतो. म्हणून कुणाचे तरी उरलेल्या आयुष्याची भीक मागत होतो. परंतु आता माझेदेखिल डोळे स्वच्छ झाले आहेत. माझे आयुष्य संपणार याचेच मला समाधान आहे. माझे तुझ्यावर उपकार नाहीत. तु पुर्णपणे ऋणमुक्त आहेस. उलट , तुझेच माझ्यावर उपकार आहेत, कारण आता मी माझ्या शेवटच्या क्षणाकडे , हत्येसाठी ओढून नेत असलेल्या पशूप्रमाणे भेदरून असहाय्पणे जात नाही , तर, निर्माल्याचे विसर्जन करण्यासाठी पायर्या उतरत पाण्यात जावं त्याप्रमाणे निरामय शांतीने जात आहे. तुझ्या भेटीआधी तसे घडले नसते. आयुष्याच्या लक्तरांना आसक्तीने, ईर्ष्येने, चिकटून राहण्याचा उपदेश देणारे गुरु , रानातील भोकरफ़ळांप्रमाणे उदंड असतात. पण पोक्तपणे मृत्युला सामोरे जाण्याचे शिकवणारे गुरु दुर्मिळ. आणि तसला एक, शेवटी शेवटी का होईना, मला भेटला , हेच माझे यश आहे.”
कथा : खुळा बाळ्या :: संग्रह : ओंजळधारा
========================
कथा : पेरू :: कथासंग्रह : ओंजळधारा
एका बाजारात एक पेरूवाला पेरू विकत असतो. त्याच्याकडे एक साधू एक पेरू फ़ुकट मागतो. पेरूवाला देत नाही. तेव्हा तो साधू एक बी मधून पेरूचे झाड लावतो आणि क्षणात त्याला पेरू येतात ते सर्वांना वाटून टाकतो. तेव्हढ्यत त्याला पेरू देणार्या शिपायाला बढतीही मिळते. सगळे लोक आनंदाने नाचतात. आणि पेरूवाल्याचा मात्र एक पायच लाकडाचा होऊन जातो.
वैशिष्ट्य : म्हटलं तर ही एक बालकथा. म्हटलं तर एक हितोपदेश. पण त्यातही जी ए टच आहेच. त्यांची मिथ्यावादाची बैठक येतेच. एक पेरू द्यायला काय जातं... किंवा पोलिस शिपाई फ़ौजदार होतो... यातून दिसणारं माणसाचं बाहुला असणं त्यांच्या मूळ विचाराचीच बैठक आहे.
आवडलेला भाग : त्यांची कल्पनारम्यता. पेरूवाल्याच्या डोक्याचा पेरू होणं आणि त्याला दाताशिवाय पेरू खायला मिळणं...
कथा : पेरू :: कथासंग्रह : ओंजळधारा
====================
कथा : छोट्या किकोसचा मृत्यु ::: संग्रह : अमृतफ़ळे
एका गावात एका माण्साला तीन मुली असतात. त्यातली मोठी पाणी आणायला विहीरीवर जाते. तिथे तिला एक झाड दिसते. आणि ती विचार करते. जेव्हा कधी माझे लग्न होईल आणि मला मुलगा होईल तो या झाडावर चढेल. आणि तिथीन तो खाली पडेल. तेव्हा खडकावर आपटून मरेल. या विचाराने ति रडत सुटते. तिचे ऐकून एकेक बहीण व आई येतात आणि त्याही भाचा आणि नातवाचा मृत्य़ू ऐकून रडायला लागतात. तिथून एक घोडेस्वार येतो. आणि त्या नातवाच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून गांवजेवण घालायला सांगतो.
जेव्हा त्या मुलींचे वडील घरी येतात तेव्हा गांवजेवण झालेले असते. तेव्हा चिडून वडील बाहेर पडतात. तर त्यांना वाटेत त्या घोडेस्वाराची बायको भेटते. आणि आपल्या गरातले सारे पैसे आणि घोडा आपल्या आईला (स्वर्गात) पोचवण्याची विनंती करते. तेव्हा तो माणूस या जगातल्या मुर्खांची गणती पाहून हसतो आणि परत येतो.
वैशिष्ट्य. : Leon surmeleun यांच्या कथेचा हा अनुवाद. मानवी मुर्खपणा आणि भाबडेपणा आणि त्यावर पोसलेल्या लबाडांची ही कथा. तशी गंमत. तशी खोलवर मनुष्यस्वभाव सांगणारी. आपण यात कुठे असतो ते आठवून पहावे. पण आपण सहजासहजी स्वतःला ना मुर्ख म्हणू शकत ना लबाड. पण यातला एक ना एक रोल आपण आपल्या नकळत सदोदित करत असतो.
कथा : छोट्या किकोसचा मृत्यु ::: संग्रह : अमृतफ़ळे
==================
जी एंच्या कथांची तोंडओळख ~ सुनील सामंत
http://orkut.google.com/c1818478-t334e4824146c3090.html