Showing posts with label मीमराठी उपक्रम. Show all posts
Showing posts with label मीमराठी उपक्रम. Show all posts

Saturday, October 11, 2014

पुर्वी मोबाईल नावाचं

काय गम्मत असते पहा !
पुर्वी मोबाईल नावाचं यंत्र भारतात नव्हतं तेव्हा महिला आपल्या चेहर्‍यावरचा मेकअप, ओठांवरची लिपस्टिक , डोळ्यांला लावणारे काजळ, केसांचि बटा, कानातले डूल हे सगळं एकाच वेळी न्याहाळायला पर्स मधी किंवा पावडरच्या डब्यावरील काँप्लिमेंटरी मिळणार्‍या आरशाचा वापर व्हायचा. आता मोबाईल आला आणि सगळं रुपंच बदललं. पिढी इतकी अद्ययावत झाली की मोबाईलमध्ये कानाला हेडफोन लावून गाणी ऐकत असताना मोबाईलच्या बंद स्क्रीन कडे बघत मेकअप चेक् करण्याची लगबग दिसते.
अस्पष्ट स्क्रीनमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्वत:ला न्याहाळण्यापेक्षा आपल्या प्रगत यंत्रामध्ये फ्रंट कॅमेरा उर्फ सेल्फी कॅमेरा नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे त्याचा उपयोग मेक अप चेक करण्यापासून ते बेडवर बसून दात घासेपर्यंत आणि मोबाईल फ्लॅशचा वापर टाॅर्च म्हणून बर्‍याच ठिकाणि वापरता येऊ शकतो.
तंत्रज्ञान आपल्याला हवं तसं वापरता येत असतं पण आपण त्याच्याकडे फक्त एक करमणूकीचं उपकरण म्हणून वापरतो
असो.
आतातरी मेकअप साठी बंद स्क्रीन पाहून स्वत:चीच होणारी कूचंबना थांबवा.

प्रथमेश सुरेश शिरसाट
https://www.facebook.com/prathmesh.shirsat21071988

Friday, October 10, 2014

विचार


भरत दादा -
आपण जितके साधे राहत जाऊ,आपल आयुष्य तितक सोप आणि सुंदर होत जात.
मोठेपणा मिरवणारी माणस नंतर एकलकोंडी होत जातात..!!
~ Bharat Jadhav 
https://www.facebook.com/maharashtrachasahinayak

Thursday, October 9, 2014

माझ्या मराठीचा बोल कौतुके

माझ्या मराठीचा बोल कौतुके

मराठी माणसाला मराठी भाषेचा तीव्र आभिमान आहे. शिवाजी महाराजांच नाव घेतल तरी आपलं मन आभिमानाने भरून येत. पण मराठी बोलताना मात्र आमची जाम पंचाईत होते. शिकली सवरलेली चार मराठी माणस एकत्र आली की त्यांच्या गप्पा रंगणार त्या इंग्रजीतूनच. बर मराठी भाषा वाचली पाहीजे असही त्यांना मनापासून वाटत पण मराठी चित्रपट बघायला बायको बरोबर कींवा मैत्रीणी बरोबर जाण त्यांना जाम "लो स्ट्याडर्ड" वाटत. "मराठीच आता कस होणार?"अशा परीसंवादात तावातावाने बोलणार्यांची मुल, नातवंड शिकणार मात्र इंग्रजी माध्यमातून. मराठी भाषा कशी वाचेल याचा गांभीर्याने कुणी विचारच करत नाही. कधी आपण मुलांना आभिमानाने ज्ञानेश्वरी दाखवून म्हणत नाही की "बघ पोरा वयाच्या १६व्या वर्षी हे अनमोल धन त्या सन्याशाच्या पोराने आपल्या साठी साठवून ठेवलय. याचा वापर कीतीही केलास तरी हे संपणार नाही"तुकारामांचे अभंग खरच अभंग आहेत कधीही भंग न पावणारे. ते आमृत आपण लहानपणा पासून मुलांना पाजतच नाही. बहीणाबाई चौधरी आपल्यालाच ऊशीरा उमगल्यात. पु. ल., व. पु. यांच्या कडेखांद्यावर आपण मुलांना बसवतच नाही...हो पण आपण पाहूण्यासमोर मुलांना इंग्रजी पोयेम जरूर म्हणायला लावतो.त्या वेळी आपला चेहरा आभिमानाने कसा फुलून येतो. तर थोडक्यात काय तर मराठी वाचायला पाहीजे पण आमची पुढची पीढी काही मराठी वाचणार नाही.... मग कशी वाचणार मराठी? मला कृपा करून कुणी सांगेल?

ता. क. माझा मुलगा मराठी माध्यमातून शिकलाय आणि आता मराठी भाषेत लिखाणाच काम तो करतोय.
~ Vasundhara Sable
https://www.facebook.com/vasundhara.sable.3

तेरी यादोंमें मैंने क्या क्या


हिंदी दिन के अवसर पर मेरी एक हिंदी कविता पेश करता हूॅ |

◆ बहोत दिल रोया ◆

तेरी यादोंमें मैंने क्या क्या है खोया
आसुओंमें रात गुजरी बहोत दिल रोया |

चलते चलते नदियाका पानी कुछ कहेता हैं
साथ तेरी तुट गयी चेहरा मन में रहेता हैं
ना कभी चैनसें निंदमें हैं सोया
आसुओंमें रात गुजरी बहोत दिल रोया ||

कैसें जिऊं तेरेबिन प्यार मेरा कहेता हैं
तेरे पास आऊं कैसे यार नैन बहेता हैं
बस जिंदगीमें मैंने तुझको तो हैं पाया
आसुओंमें रात गुजरी बहोत दिल रोया ||

- मुक्तविहारी
(लिखान तारिख. 05.09.2003).
केशव कुकडे ऊर्फ मुक्तविहारी

Wednesday, October 8, 2014

आजी कोड़े घालायची लहानपणी


#मराठी

आजी कोड़े घालायची लहानपणी
" टोपल्यात तीन भाकरी आहेत , पण खायला सहा जणी .... कोण कोण ?
तर , माय - लेक / नणंद- भावजय / सासू - सुन
आन हां एकेकी ला एकेक भाकर पायजे , टुकड़ा मोडायचा न्हाय "
आमची शालेतल्या गणिताच्या बाई वर पूर्ण श्रध्हा असल्याने पाटी पेन्सिल घेउन आकडेमोड सुरु
नाहीच सुटायच कोड ते
मग ती पाटी हातात घ्यायची आणि समजुन सांगायची
" अग म्हणजे मी , तुझी आई , आणि तुझी मामी अश्या आमी तिघी आहोत न तसच . मी आणि तुझी आई माय - लेकी , तुझी आई आणि तुझी मामी नणंद - भावजय , आणि मी आणि तुझी मामी सासू - सुन . मग आम्हा तिघीं ना तीन भाकरी झाल्या की बरोबर "
खटकन ट्यूब पेटायची डोक्यात
आजकाल चे राजकारणी, त्यांचे निष्क्रिय विचारवंत पाठीराखे आणि अडाणचोट अतिउत्साही कार्यकर्ते पाहिले की ही तिन्ही नाती आठवतात
आणि त्या भाकरी च्या ऐवजी दिसतात सामान्य लोक ज्यांच मन विचारवंत खातात, धन राजकारणी खातात आणि तन कार्यकर्ते खातात
टोपले भरते च आहे प्रत्येक पिढीने
पिढ्या संपतील ........
यांची भूक संपेल ?
~ Roshni

Saturday, October 4, 2014

लेख

#मराठी

मला नेहमी साधं सरळ जगायला आवडतं. जेव्हा आजच्या सारखा खूप पाऊस पडतो, तेव्हा आत्ताच्या सारखा मी खिडकी शेजारी माझी आरामशीर खुर्ची टाकून बसतो आणि मी आधी कधी न वाचलेल्या पुस्तकांची वाफाळलेल्या कॉफीबरोबर चव घ्यायला लागतो. खिडकीबाहेर पावसात उभा असलेला पिंपळ वाऱ्याने उगाच सळसळू लागला आणि त्याची नुकतीच नवीन जन्मलेली कोवळी नाजूक मऊशार तपकीरी हिरवी पानं पाहिली, की मग मला उगाच काहीतरी रंगवावंस वाटू लागतं. एखादा कागद घेऊन मी उगाच काहीतरी त्यावर मिळेल त्याने रंगवतो. तसं काही खास कारण नसतं आणि मला काही सिद्ध वगैरे पण करायचं नसतं. बस्स! मला फक्त काही तरी रंगवायचं असतं. असंच एखादं जुनं भावगीत मला आठवतं, ते आत्ता यावेळी का आठवावं याला काही उत्तर नसतं. कोणी प्रेम करायला जवळ नसतानाही एखादं पावसात भिजलेलं गीत मनातून उमलून का बाहेर यावं यालाही काही स्पष्टीकरण नसतं. खिडकीतून आत येणाऱ्या पावसाच्या आवाजात सुस्पष्ट ऐकता यावं म्हणून मग मी आवाज थोडा मोठा करतो आणि ऐकत राहतो. मला गीताचे शब्द ऐकू येतातच असं नाही. पण काही तरी कुठं तरी मनात उगाच हिरव्या कच्च पानावर पहाटे एखादा दवबिंदू पडल्यावर पान जसं थरथरतं तसं थरथरल्यासारखं वाटतं. मग मला उगाच बेडवर लोळायची हुक्की येते. सबंध दिवस मी काही काम करत नाही. डोळे मिटून बेडवर लोळत पडतो. कधी झोपतो, कधी जागा होतो. पावसांच्या सरींबरोबर स्वत:च स्वत:ला ऐकत स्वत:च स्वत:शी स्वत:लाच गुणगुणत राहतो. दिवसभर पडला की पाऊस पण दमतो आणि संध्याकाळी विश्रांती घेतो. रात्री आकाशातले काळे ढग थोडे विरळ होतात आणि चंद्र हळूच उगवतो. मी हळूच उठून बसतो आणि डोळे किलकिले करून इकडे तिकडे पाहतो. मी बिलकूल घाईत नसतो. मला कधीच कुठेच कोणाकडे जायचं नसतं. मानवी मनाला निर्जीव करून टाकणारी पैसा, घड्याळ आणि इतर कृत्रिम बंधनांनी माझं आयुष्य नियंत्रित करणं मला मान्य नसतं. मी स्वैर होतो सळसळणाऱ्या पिंपळासारखा...पावसांच्या सरीसारखा...मी एक धबधबा होतो माझ्या आतमध्ये फेसाळणारा पांढरा शुभ्र...चैतन्याने भरलेला आणि उर्जेने सळसळणारा...कोसळायला लागला की प्रचंड ताकदीने कोसळणारा...मला माहित आहे मला कोणी रोखू शकत नाही...आयुष्य जगण्यापासून. मी अनंत होतो थोडासा माझ्या आतमध्ये...आणि परत एकदा थंडगार धुकं दाटून येतं चहूबाजूने माझ्या. मी हरवून जातो स्वत:तच काही क्षण का होईना अनंत काळासाठी...

~ MKs Kimantu Omble
https://www.facebook.com/profile.php?id=100001951428644

Friday, October 3, 2014

मनाच्या आरशात आपल प्रतिबिंब


#मराठी

मनाच्या आरशात आपल प्रतिबिंब पहाताना परिवारातील .शेजारातील इतर अनेक सख्यांची प्रतिबिंब गॊळा झाली .....त्या प्रतीबिम्बांकडे आरपार नजर गेली आणि जाणवल यानां बघत, निरखत तर आपण मोठे झालो .त्यांची तन्मयता , आपुलकी ,नात्यांना फुलवत जपण्याची शर्थ .....आपला संसार आनंदी करत दुसऱ्यालाही आनंदी करण्याची वृत्ती.... ..नकळत मन गुंतत गेल .एक छंदच जडला जणू यानां निरखण्याचा . त्या वयात कामचुकार पणा करून पळ काढताना गम्मत यायची पण हे कष्टाळू चेहरे समोर यायचे अन अलगदमनावर ठसायचे.ते चेहरे काम तर करायचेच, पण त्यात भावनेचा ओलावाही असायचा .झोकून देऊन कार्य करण्याची क्षमता !!
...त्या चेहऱ्यांनवरचे ते स्मित आजही आठवते . समोरच्या साठी खूप काही करून काही केलेच नाही हे भासवणे .. ...'.प्रकाशून अप्रकाशित रहाणे '.स्वतःच्या कर्तुत्वाची कोणतीही टिमकी न वाजवता अप्रकाशित राहिलेल्या.......या सख्या आज अचानक त्यांच्या प्रतीबिम्बांचा खेळ रंगला !!
~ Neeta Jaywant
https://www.facebook.com/neeta.jaywant

Wednesday, October 1, 2014

विचार

विचार 
==============


उद्यापासून आसपासच्या समाजाचा विचार करून आवाजावर नियंत्रण व शांत गीतांची निवड करतील तेच संस्कृतीचे रक्षक ठरतील. बाकीच्यांनी आपण 'विकृतीची संस्कृतीभक्षक बांडगुळे' आहोत हे समजून चालावं.



==============


प्रामाणिकपणाने जगताना घरातील प्रत्येकाची छोटी छोटी स्वप्ने पूर्ण करताना जरी ऊर फुटेपर्यंत धावावं लागत असलं, तरी ऊर भरून यावा एवढा आनंद त्या धावण्यात नक्कीच सामावलेला असतो. फक्त त्यासाठी घरच्यांच्या भावनांच महत्व तेवढं समजून घ्यावं लागतं एवढंच.
~ Vikram Raut 
https://www.facebook.com/vikram.raut.75

Tuesday, September 30, 2014

Sunday, September 28, 2014

आठवले शब्द मरणाच्या दारी

आत्मन
आठवले शब्द मरणाच्या दारी
आता उराउरी भेटताती.
जगावे मरावे अजाणता कोणी
त्वां - मी कोण योनी आकळावी.
कुणाचे कशाला जपावे आत्मन
नादावले मन भार वाही.
अर्थ अस्थी अस्थी स्मशान समष्टी
शब्द शब्द कष्टी राखेतून.
~ शरद...
Fb @ https://www.facebook.com/sharad.deoray

Saturday, September 27, 2014

तारका झोपायचा संकेत काही देत नाही

तारका झोपायचा संकेत काही देत नाही, 
पेरलेले चांदणे माझे हृदय की शेत नाही,

वाहला नाही कधी आवेग माझ्या भावनांचा,
कारणाने सागराच्या याच मी अटकेत नाही,

हाल केले फार ताव्याने जळाल्या भाकरी,
घास या पोटातले ते आजही निवलेत नाही,

तू तशी आहे कुठे? मी शोधतो आहे तुला पण,
ठार वारा हिंडणारा मी कुणी अनिकेत नाही,

ज्ञान, नामा नी तुकोबा जाहली पोरे तुझी रे,
विठ्ठ्ला मी आज माझ्या मायच्या काखेत नाही,

भावना असतात काही वेगळ्या माझ्या तुझ्याही,
ह्या मिटायाला कुणी मी सागराची रेत नाही,

प्राण जडला ह्या गुलाबावर कसा माझा सखे गं?
मोगर्याचा गंध माझ्या दूरवर बागेत नाही,

- किशोर रायबोले
http://www.kishraibole.blogspot.in/
Wednesday, June 18, 2014

Friday, September 26, 2014

वेदने तुज स्मरावे किती


वेदने तुज स्मरावे किती ! 
पापण्यांनी भिजावे किती! 

दाब वेड्या तुझे हुंदके...
सांत्वनांनी रडावे किती?

श्वान सारे तुझ्या भोवती
आंधळ्या तू दळावे किती !

रोज डोळे तुझे बोलती...
मी मुक्याने रहावे किती !

दुःखितांना विचारा जरा -
वेदनेशी लढावे किती !

सुंदरी तू किती देखणी !
बारकावे टिपावे किती !

PRAKA$H M@R€
https://www.facebook.com/prakash.more.9465

Thursday, September 25, 2014

अंबराला अंग थोड़े मागतो




--- अंबराला अंग थोड़े मागतो
आसवांना पंख थोड़े मागतो

हॊत आहे जखम आता कोरडी
मोग-याला डंख थोड़े मागतो

व्यर्थ देतो सागराला आहुती
ईन्द्रधनुष्या, रंग थोड़े मागतो

धावती ईच्छा पुढे, उन्हात मी
कल्पवृक्षा, मंत्र थोड़े मागतो

वादळांची पार घुसखोरी सदा
कुंपनाला बंध थोड़े मागतो

भाबड्यास दिला महंतांनी दगा
पांडुरंगा, संत थोड़े मागतो

कापुराला कोंडले देवालयी
माय गझले, गंध थोड़े मागतो

*** चंद्रशेखर भुयार ***
@https://www.facebook.com/chandrashekhar.bhuyar

Tuesday, September 23, 2014

अचानक जाग येते मनाला काही होते




अचानक जाग येते मनाला काही होते
लाजेला घेऊन ओठी मनाला घाई होते

क्षण जिव्हाळ्याचे बांधून घेते पैंजणातं
मग हळूच धावत येते मन अंगणातं

निजलेले गाव तरीही धुके जरासे जागे
चाहुल मिळे वाटेला जीवाला ओढ लागे

पसरून देता देता हाकेला वाटेवरती
घाट उतरता थोडा नजर यमुनेवरती

यमुनेच्या त्या काठाला नसे तसे कोणीही
माझ्याच इतके कासावीस असे पाणीही

त्यात साद नुसती येते दूर तरी कुठुन
ओंजळीत घेते सारे तेव्हा प्राण भरून

पण पसरत नाही हात कुणी समोर
पिसारा फुलवत नाही आधारचा मोर

मग पदर नुसता डोळ्यांना समजून घेतो
तो आहे येथे तरीही ना समोर कधीही येतो

परतून घरी जाताना उरते मागे काही
जे उरले असेल तेही माझे म्हणवत नाही

- विजय बेंद्रे (एक वादळी पाऊस)
https://www.facebook.com/vijay.bendre.52

Monday, September 22, 2014

नात्यांचा अर्थ




नात्यांचा अर्थ किती जणांना समजतो ?
श्वासांचा स्पर्श किती जणांना उमजतो ?
जीवनाचे हे गहीरे सत्य जाणले ज्यांनी
प्रेमाचा सागर लिलया पार केला त्यांनी

- विनोद
https://www.facebook.com/vinod.bhatte

Sunday, September 21, 2014

नजरेतुनी शोध

#काव्यतरंग #Marathi #मराठी

नजरेतुनी शोध
प्रीत अंतरमनाची
नकोस घेऊ साथ
मला देण्या विरहाची.....

-राम पळसकार....
https://www.facebook.com/ram.palaskar.9

Sunday, September 14, 2014

ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?


#काव्यतरंग #Marathi
● प्रयोजन ●
ही गुलामांची रोपं कोण करतंय विकसित ?
कोण करतंय वाहतूक ग्रंथामधून कधीची?
बजेटमधून रस्त्यात अर्थ नसलेल्या वस्त्यांत ?
हे दु:खी लोक अन् ह्या जाहिराती
हे चौकाचौकातील मड आयलंड्स
हे एक्सचेंज मेळावे अन् ढुंगण घोळावे
ही तृष्णा,हा सिकंदर,हा हिटलर , हा बुद्ध
तृष्णा नाहीशी झाली तर काय होतं
सोन्याचा आणि पाण्याचा भाव डाऊन होतो?
काय असतं आयुष्य ?
एक पंचांग ,एक कँलेंडर ,एक तारीख
मग मृत्यू काय एक्झिटचं गेट असतं कोलँप्सिबल
अन् सुरक्षितता
सुका काथ ,सातारी हरी-पत्ती
वर बंदुकीची एक गोळी
काय असतं अंतिम...
विचार ,तत्त्व की कपडेलत्ते
संध्याकाळ झाली की...
आपले हात आपल्या बटनांकडे जातातच !
कुणी अक्षर सुधारण्यासाठी
कविता लिहीत नसतो.
●कवी -अरुण काळे
(संदर्भ : नंतर आलेले लोक पृष्ठ १ /लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई .)
सौजन्य : Ramesh Mane

Friday, September 12, 2014

जमला जन समुदाय अपार

वैराग्याचा मेळा(गमन)

जमला जन समुदाय अपार, मूक, उदास, गंभीरं
कोणी उधळती अबीर बुक्का, कोणां मुखी रामं

राग, लोभ, नाती, गोती, काम, क्रोध न उरला काही
सर्व संग परित्याग करुनी, निजला जणूकि संन्यासी

आयुष्य भर जो दिसला, तो देह समोरी निजला
सोडून गेला जो देहाला, तोच कधी ना दिसला

अज्ञाताच्या या प्रवासाला, आत्मा नंगाच गेला
तिरडीवती केवळ पसरला, देह रुपी हा अंगरखा

जमविला गोतावळा जरी, सारे प्रवासी घडीभरचे
अज्ञाताच्या या वाटेवर, अखेर एकटेच निघायचे

असतील अनेक जरी, सखे, सोयरे मित्र, सोबती
संपणार रे साथ तयांची, स्मशान प्रवेश द्वारी

सारे प्रवासी घडीभरचे, पाव्हणेच रे या जगी
काढले तिकीट परतीचे, जन्मा आलो ज्या क्षणी

ना रद्द व्हायचे तिकीट, ना गाडी कधी चुकायची
परतीच्या प्रवासाची ती, वेळ कधी न टळायची

उगवतील चंद्र तारे, चालेलच जग रहाटी
राहतील अंधुक आठवणी, भिंतीवर फोटो जोवरी

मृत्यूचीच असे ओढ जीवा, तोच शाश्वत मित्र त्याचा
भेटता देती आलिंगन दोघे, जीव तत्काळ सोडी काया

चिंतेनी किती जाळला देह, न जळला आयुष्य भरी
होता मुक्त चिंतेतून, तो देह जळला चितेवरी

राखले शरीर जन्मभरी हे, राख करण्याच स्मशानी
राख पसरता मनावरी ती, राखण्याची जिरली उर्मी

धडाडून पेटली चिता, वैराग्य धूर उडाला
कोण म्हणे ही अंत्ययात्रा, जमला वैराग्याचा मेळा

केदार....
(माझ्या "गमन" ह्या संग्रहातून)
https://www.facebook.com/kedar.mehendale.3

Wednesday, September 10, 2014

माझ्या जात्याला जात्याला


माझ्या जात्याला जात्याला हळूच बाई फ़िरवा
ओल्या हळदीचे हळदीचे शिक्के घरात गिरवा....

दारी करावल्या करावल्या बसल्या जेवायाला
थोड्या शेवाया शेवाया लावा गं ताटाला
नवीन नवरीला नवरीला बेसन पोळी वाढा
माझ्या लेकीची लेकीची नजर कोणी काढा
एका हातानं हातानं साखर पोळी भरवा ...माझ्या जात्याला

मोठ्या थाटानं थाटानं वाढवले लेकीला
माथा अंबेच्या अंबेच्या मंदिरी टेकीला
आली हौशीनं हौशीनं मोठी विहिणबाई
कुंकू चमकीचा चमकीचा मळवट लावा बाई
भरल्या ओटीत ओटीत देते शालू हिरवा....माझ्या जात्याला

गजरा लाविला लाविला केसावरती बाई
साडी नेसून नेसून सजली ही गौराई
गोर्‍या गालाला गालाला हळद लावा वहिनी
आल्या हळदीला हळदीला घरुन माझ्या बहिणी
मांडव आंब्याचा आंब्याचा गल्लुगल्ली मिरवा...माझ्या जात्याला

-- संतोष वाटपाडे (नाशिक)
FB Page : काव्यसंतोष
Blog : http://santoshwatpade.blogspot.in/
You Tube Channel :https://www.youtube.com/user/khaini009

Monday, September 8, 2014

जिजाऊच्या पोटी | शिवबा जन्माला


#मराठी

"शिवबा "

जिजाऊच्या पोटी | शिवबा जन्माला
सारा आंनदला | गोतावळा...

जिजाऊने दिले | लढाईचे धडे
धावे पुढे पुढे | तलवार...

आई भावानीने| आशीर्वाद दिला
बळ लढण्याला | येत गेले...

म-हाठी मातीचा | लावोनिया टिळा
एकेक मावळा | उभा केला...

देख रे माणसा | शिवबाची रीत
पाहे पर स्रीत |माऊलीला ...

नेहमी जपला | कल्याणाचा ध्यास
शेवटचा श्वास| जिंकण्याचा...

ध्वज खांध्यावर | घेऊन लढला
भगवा गाडला | मुलुखात...

माथ्यावर सारे | उन्हाळ झेलले
म्हणुनच किल्ले | हे दिसले...

धन्य धन्य झाली |जिजाऊ माउली
देऊन सावली | महाराष्ट्राला...
- रमेश माने
https://www.facebook.com/ramesh.mane.7739814