आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो
-----------------------------------------
---------- वसंत दत्तात्रय गुर्जर
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
आम्ही बोलू शकतो वाचू शकतो अन् ऐकूही शकतो।
आणखी एक।
आम्ही माणसांत राहू शकतो।
नाहीतर पशुपक्षी।
फक्त पहातात ऐकतात ऐकून घेतात न् समजूनसुद्धा।
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
====
====
आम्ही प्रेम केलं।
चांगल्या मुलीवर।
तीही चांगली गोष्ट झाली।
ती गोष्ट काही माणसांना सांगावीशी वाटली सांगितलीही।
नाहीतरी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही।
एक दिवस समजणारच।
आम्ही प्रेमात फसलो।
तीही गोष्ट काही माणसांना सांगितली।
कुणाचाच दोष नव्हता।
होतं ते सगळं भल्यासाठीच।
आता प्रेमबिम करायचं नाही।
तसं कधी वाटलं तरीसुद्धा
=====
=====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
आम्ही ओरडू शकतो गाऊ शकतो हसू शकतो रडूही शकतो।
काहीकाही वेळा मुद्दाम अशाही गोष्टी कराव्या लागतात।
शेजारच्या खोलीतला माणूस एक दिवस देवाघरी जातो तेव्हा रडावं लागतं सगळे रडतात म्हणून।
नाही रडलं तर म्हणतात ह्याला भावना नाहीत।
मी गेलो तर कुणी रडू नये खरंखरं न् कृत्रिमही।
कारण सर्वच माणसं देवाघरी जाणारायत।
मग रडायचं का नि कशासाठी।
जन्माला आला मरेपर्यंत जगला मेला एवढंच।
जन्माला आला।
काहीतरी झालं पाह्यजे त्याच्या हातनं तेही एवढ्यासाठीच
====
====
आम्ही हसू शकतो।
केळाच्या सालीवर जेव्हा नायलॉनी स्त्री पडते तेव्हा।
खरंच खरंच बरं वाटतं तेव्हा पाहताना अन् आम्ही हसतोही।
हसलंच पाह्यजे चालता येत नसलेल्या उंच टाचांच्या सॅंडल्स घालणा-या स्त्रियांना।
नाही।
एका दृष्टीने आम्हीही चुकतो।
लिपस्टिकनं एखाद्या स्त्रीची शान वाढत असेल ओठ काळे न होता तर लावायला हरकत नाही।
उंच टाचांच्या सॅंडल्स घालून चालता येत असेल तर वापरायला हरकत नाही।
क्रेप नायलॉनचा आखूड बाह्यांचा ब्लाउझ अन् बिजली नायलॉन साडी नेसून।
चांगली दिसत असेल तर नेसायला हरकत नाही।
तेवढी समंजस सौंदर्यदृष्टी असलीच पाह्यजे
====
====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो। चांगलं झालं।
डोळ्यांना मोहवणारे क्षण आम्ही पकडू शकतो।
किती किती चांगलं वाटतं मनात गुदगुल्याही होतात।
एखादी अनाहूत मुलगी रस्त्यात भेटते।
अन् म्हणते।
आपण त्या दिवशीचे 'तुम्ही'च का?।
काव्यवाचन केलेले?
आवडलं मला।
कशा हो कविता लिहिता?
हे तुम्हाला जमतं कसं?।
एकापाठोपाठ एक प्रश्न।
उत्तर एकच।
आता जपून वागलं पाह्यजे।
प्रेमबिम काही नाही।
वाटलं तरीसुद्धा।
ती चांगली आहे।
मीही चांगला आहे।
माणसं चांगली आहेत।
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
तेही चांगलंच आहे।
कधी रंगात आलो की आम्ही गाऊ शकतो।
आमच्याबरोबर इतरांच्या कविता।
तेव्हा आवाज आपोआप आपला चांगला वाटतो गळा नसूनसुद्धा।
काय गंमत आहे नाही।
आम्ही ओरडू शकतो।
झालाच पाह्यजे झालंच पाह्यजे।
अमक्यातमक्याची दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी।
जो हमसे टकराएगा मिट्टीमे मिल जाएगा।
हमारी माँगे हमको दो नहीं तो कुर्सी छोड दो।
अमकातमका मुर्दाबाद अमकातमका झिंदाबाद।
आम्ही ओरडू शकतो
=====
=====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
ओरडू शकतो गाऊ शकतो हसू शकतो रडूही शकतो।
अन् आणखीनही काही करतो निसर्गानं दिलेल्या शक्तीनुसार
====
====
सवय सवय म्हणून।
सकाळी दात घासतो।
किडू नयेत म्हणून।
सकाळी टमरेल घेऊन रांगेत उभं राहतो शारीरिक शुद्धीसाठी।
सकाळी आंघोळ करतो।
रोग होऊ नयेत म्हणून।
सकाळी वर्तमानपत्र वाचतो।
जगाचं ज्ञान होण्यासाठी।
मग साडेनवाला आम्ही जेवतो। जगण्यासाठी।
मग ऑफिसात जातो।
काम करतो।
एकशे एकसष्ट रुपयांसाठी।
संध्याकाळी घरी येतो।
आईवडलांनी लग्न लावून दिलेल्या मुलीबरोबर फिरायला जातो।
चौपाटीवर फिरायला जातो।
नारियलका पानी पितो।
घरी येतो जेवतो।
मी माझ्या खाटेवर झोपतो।
ती तिच्या खाटेवर झोपते।
सवयीनुसार मी तिच्या खाटेवर जातो।
कधीकधी तीही माझ्या खाटेवर येते।
सकाळी मात्र आम्ही।
ती तिच्या खाटेवर असते।
मी माझ्या खाटेवर असतो।
आई बाहेरच्या खोलीत असते।
वडील गॅलरीत असतात।
मग मी दार उघडतो।
दुधाच्या दोन बाटल्या हातात घेतो।
आदल्या रात्रीचा शर्ट घालतो।
तीन जिने उतरतो।
दूधसेंटरवर येतो।
चोपन्न पैसे देतो।
दोन बाटल्या घेतो।
दुधाच्या।
तीन जिने चढून पहिल्या खोलीत येतो।
तेव्हा बायको स्टोव्ह पेटवते।
मग मी दात घासतो।
आदल्या दिवसाप्रमाणंच सर्व करतो
====
====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
आम्ही माणूस म्हणून मरणार।
तेही चांगलंच आहे।
सहा हातांच्या तीन तोंडांच्या ईश्वरानं मला शांती द्यावी।
हेही चांगलंच आहे।
खूप चांगलं आहे।
ईश्वर मला शांती न् सद्गती देवो।।
====
====
वसंत दत्तात्रय गुर्जर
0 comments:
Post a Comment