पाऊसगाणे
=======
------------
धुम्मसधारा कडेकपारी
काजळ्काळ्या अंधाराला
गंधाराची गंधीत बाधा
पाऊसगाणे
पाऊसगाणे गातो पाऊस
धिड् धित्तांग कधी रिं झिं रिं झिं
कधी कधी म्हणतो तालसुरातून
कधी भटकतो बेतालातून वेताळागत
पाडून भिंती दिक्कालाच्या
वाहून नेतो कधीचे पाणी
कुठ्ल्या सहस्त्र वर्षांपुर्वी बनलेल्या त्या थेंबाची तो वाफ़ बनवतो
कुठल्या सहस्त्र मैलांवरती वाहून नेतो
थेंब कुणाच्या गालावरचा
कुठल्या गच्चीवरती पडतो
यक्ष कधीचा शब्द लादतो मेघांवरती
गडगडती ते, सरसर सरसर,
रस रस रस रस
आणि बरसतो आज इथे तो पाऊसगाणे.
मल्हाराचे घनघनांत घन स्वागत करती
आणि बरसती पाऊसगाणे
घन बरसे
धन बरसे वर्षा
मन तरसे
तन तरसे वर्षा-नुवर्षे
गाणे गातो पाऊस गंभिर
गातो पाऊस गंभिर गाणे
उथळ जलाची गहन निराशा
उथल पुथल करणार्या लाटा
नृत्यामध्ये मग्न होऊनी
नाचती तालावर मेघांच्या
हृदयामध्ये भग्न अशा त्या
जिव्हार लाटा उसळत उधळत नाचनाचती
पाऊसगाण्याच्या तालावर
चुकार पक्षी
भिजके पंख
आकाशाचा
शोधी रंग
घेई ठाव
नव्या दिशेचा
पत्ता नाही
कशाकशाचा
मुक्त उधळतो
(वार्याच्याही विरुद्ध जाऊन काय शोधतो
वरच्याच्याही विरुद्ध जाऊन काय मिळवतो)
ऐकत आहे
मनभावाने
सुप्तसुरांचे
मुक्तसुरांचे
सप्तसुरांचे
पाऊसगाणे
-----------
=======
-नाम
0 comments:
Post a Comment