Showing posts with label नाम गुम जायेगा. Show all posts
Showing posts with label नाम गुम जायेगा. Show all posts

Wednesday, November 22, 2017

तिहाई

तिहाई...

मरणाचा क्षण असा असावा
नितळ निळे आभाळ दिसावे
मुसळधार बरसाती नंतर
स्वच्छ कोवळे ऊन पडावे

निसर्ग गंधीत आसुसलेला
स्वागतास मधु अधीर असावा
मातीने बाहू पसरावे
आकाशाने आ वासावा

कळ हृदयाशी यावी अंधुक
कळले किंवा कळू न यावे
आह मुखातून येता येता
आहा आहा वाह निघावे

आत्ता चालत बोलत होता
लोकांमध्ये कुजबुज व्हावी
गर्दी जराशी इकडे, तिकडे ...
दर्द भरी शांती पसरावी

फांदीवरच्या पक्ष्याचाही
सूर अलविदा व्हावा हळवा
निरोप घेण्यासाठी वळतो
मरणाचा क्षण तसा दिसावा

नाम

पाऊस गाणे

पाऊसगाणे
=======

------------
धुम्मसधारा कडेकपारी
काजळ्काळ्या अंधाराला
गंधाराची गंधीत बाधा
पाऊसगाणे

पाऊसगाणे गातो पाऊस
धिड्‍ धित्तांग कधी रिं झिं रिं झिं
कधी कधी म्हणतो तालसुरातून
कधी भटकतो बेतालातून वेताळागत
पाडून भिंती दिक्कालाच्या
वाहून नेतो कधीचे पाणी
कुठ्ल्या सहस्त्र वर्षांपुर्वी बनलेल्या त्या थेंबाची तो वाफ़ बनवतो
कुठल्या सहस्त्र मैलांवरती वाहून नेतो
थेंब कुणाच्या गालावरचा
कुठल्या गच्चीवरती पडतो
यक्ष कधीचा शब्द लादतो मेघांवरती
गडगडती ते, सरसर सरसर,
रस रस रस रस
आणि बरसतो आज इथे तो पाऊसगाणे.

मल्हाराचे घनघनांत घन स्वागत करती
आणि बरसती पाऊसगाणे
घन बरसे
धन बरसे वर्षा
मन तरसे
तन तरसे वर्षा-नुवर्षे

गाणे गातो पाऊस गंभिर
गातो पाऊस गंभिर गाणे
उथळ जलाची गहन निराशा
उथल पुथल करणार्‍या लाटा
नृत्यामध्ये मग्न होऊनी
नाचती तालावर मेघांच्या
हृदयामध्ये भग्न अशा त्या
जिव्हार लाटा उसळत उधळत नाचनाचती
पाऊसगाण्याच्या तालावर

चुकार पक्षी
भिजके पंख
आकाशाचा
शोधी रंग
घेई ठाव
नव्या दिशेचा
पत्ता नाही
कशाकशाचा
मुक्त उधळतो
(वार्‍याच्याही विरुद्ध जाऊन काय शोधतो
वरच्याच्याही विरुद्ध जाऊन काय मिळवतो)
ऐकत आहे
मनभावाने
सुप्तसुरांचे
मुक्तसुरांचे
सप्तसुरांचे
पाऊसगाणे
-----------

=======
-नाम

Friday, June 27, 2014

परछाई




जेव्हा बुलंद करणे जमले स्वतःस नाही
परछाई मी स्वतःची करतो बुलंद आहे

क्षितिजाशी सुर्य जाता परछाई होत मोठी
पण हाय दो क्षणांनी जाते पुसून आहे

जाता दिव्यासमीप होतेच तीही मोठी
जवळीक जास्त करता चटकाच येत आहे

परछाई होय परकी मग कोण होय जवळी
आशा कुणाकुणाची मी बाळगून आहे
~ नाम
fb@ https://www.facebook.com/naamagumjaayegaa
Blog ~ http://marathikavyanama.blogspot.com

Tuesday, June 24, 2014

जीवन




जीवन

मरगळलेले शब्द नसावे
सळसळणारे गीत असो
नफ़ा फ़ायदा सोडून देऊन
कळवळणारी प्रीत असो

विलक्षणावर प्रेम असावे
ऐरे गैरे साथ नसो
जिवंत उत्साहात मरावे
कोमेजून शंभरी नको

सदा सजन आकाश दिसावे
पंखावर काजळी नको
भुषण येवो दूषण येवो
मार्गावर कुंपणे नको

जाईन आज किंवा मी उद्या
उरेल ना काही माघारी
पण जे जगलो क्षणभर त्याचा
किंचित पश्चात्ताप नको



- नाम गुम जायेगा
उर्फ सुनील सामंत
https://www.facebook.com/naamagumjaayegaa