Monday, June 24, 2019

बातमी

राज्यातील एसएससी, आयसीएससी आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं सक्तीचं आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. २४ जून रोजी राज्यातील प्रमुख साहित्यिक मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करावी यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. याबाबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी शिकवणं बंधनकारक आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही ही बाब समोर आली आहे. यासाठी कायद्यात बदल करून अतिशय कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘मराठीच्या भल्यासाठी’या मंचाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मराठीची सक्ती तामिळनाडूच्या धर्तीवर झाले पाहिजे यासाठी विकास प्राधिकरण कायदा पावसाळी अधिवेशनात मंजूर करणे, मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी, शाळा बंद पडू नये यासाठी मराठी शाळांच्या गुणवत्तेबाब सक्षमीकरण करणे, मुंबईत मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करण्यासाठी परिपत्रक काढणे अशा मागण्या मराठीच्या भल्यासाठी या व्यासपीठाने केल्या आहेत. दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी सक्तीचे करण्यात यावे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/20/marathi-language-is-compulsory-in-all-education-boards.html

Wednesday, June 19, 2019

नव्या मराठी संख्या वाचन पद्धतीवर आक्षेप

महाराष्ट्रातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे ह्यांनी महाराष्ट्र शासनाच्या 'नव्या मराठी संख्या वाचनाच्या पद्धतीवर' आक्षेप घेत, ह्या तकलादू बदलाबद्दल मुद्देसूद मांडणी केली आहे. नक्की वाचा...  

मराठी संख्या वाचनात जोडाक्षरांचा अडथळा येतो,  विद्यार्थ्यांना जोडाक्षरे उच्चारण्यात समस्या येते असा दावा करून शालेय विद्यार्थ्यांना संख्या वाचनाची नवी आणि वेगळी पद्धत शिकवावी, असा सल्ला महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक निर्मितीशी संबंधित गणित अभ्यास मंडळातील तज्ञांनी दिल्याचे समजते. या निर्णयाची समाजात कोणती व्यापक चर्चा झाली, ती कोणत्या पातळीवर झाली सदर चर्चेत शिक्षक, पालक, विद्यार्थी, शिक्षण खात्यातील  अधिकारी सहभागी होते याची माहिती प्रसिद्ध झालेली  नाहि.  संख्या वाचनातील ही नवी पद्धत थेट पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून जाहीर करण्यात आली आहे. या नव्या पद्धतीनुसार ६३ त्रेसष्ठ, ७३ त्र्याहत्तर  किंवा ३२ बत्तीस या संख्यांचे वाचन अनुक्रमे साठ तीन,  सत्तर तीन किंवा तीस दोन  असे  करावे हे इयत्ता दुसरीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात म्हटले आहे. 

जोडाक्षरे उच्चारणे विद्यार्थ्यांना जमत नाही हे या बदलासाठी दिलेले कारण फारच तकलादू आहे आणि समर्पक नाही. महाराष्ट्र शासनाने पुढील मुद्यांचा विचार करून सदर नवी पद्धत तातडीने मागे घ्यावी अशी मा
गणी मी संबंधित शासकीय यंत्रणेकडे केली आहे. माझ्या मागणीच्या पुष्ट्यर्थ मी पुढील मुद्दे मांडत आहे.

मुद्दा क्र. १ - जोडाक्षरे नको व जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील   पानावर ज्या टिपणात हे सुचवले आहे त्या  टिपणातच भरपूर जोडाक्षरे आहेत.  महाराष्ट्र, राज,  मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,  अभ्यासक्रम, गुणोत्तर, संख्या, स्पर्शिका, वर्तुळ, क्रम, प्रश्न, उत्तर, चक्रीय चौकोन, वक्रपृष्ठभाग, वक्रपृष्ठफळ, क्षेत्रफळ, त्रिकोणमिती या गणिताशी संबंधित सर्व शब्दांमध्ये भरपूर जोडाक्षरे आहेत. केवळ गणित नव्हे तर सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये मिळून हजारो जोडाक्षरे आहेत.  ती सर्व जोडाक्षरे उच्चारण्याचे शिक्षण सर्व शाळांमध्ये देतात आणि बहुसंख्य विद्यार्थी त्या सर्व जोडाक्षरांचा उच्चार व्यवस्थित करतात. जोडाक्षरे हा सर्वच भारतीय  भाषांचा आत्मा आहे. जोडाक्षरे हद्दपार करायची असतील तर सर्व भारतीय भाषांमधून शिक्षणच नव्हे तर भारतीय भाषांमधून सर्व व्यवहार  थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. भारतातून भारतीय  भाषा हद्दपार करण्याचा निर्णय अजून तरी महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने घेतलेला   नाही. असा दुर्दैवी निर्णय घेतल्यानंतर आपोआपच संख्या वाचनातील जोडाक्षरे हद्दपार होतील.

मुद्दा क्र. २ -  संख्या वाचनातील जोडाक्षरांचे प्रमाण शालेय अभ्यासक्रमातील व पाठ्यपुस्तकातील एकूण जोडाक्षरांच्या तुलनेत लाखात एक या प्रमाणाहून कमी आहे.  असे असताना जोडाक्षरे अवघड जातात या किंचितही संयुक्तिक नसलेल्या युक्तिवादाच्या आधारे संख्या वाचनातून जोडाक्षरे वगळण्याचा निर्णय सर्वथैव अयोग्य आहे.

मुद्दा क्र. ३ - संख्यावाचन सोपे करावे असा  उपरोक्त  प्रस्तावित बदलांचा हेतू आहे असे सदर बदल सुचवत असलेल्या इ. २ रीच्या पाठ्यपुस्तकातील टिपणात नमूद  आहे.  प्रत्यक्षात, या प्रस्तावित बदलानुसार संख्यावाचन अतिशय गुंतागुंतीचे आणि अवघडच  होणार  आहे.  ६३ ला साठ तीन  म्हणायचे  असेल तर ६३४५ चे  वाचन कसे करायचे ?  साठ तीन चाळीस पाच  की सहा हजार तीनशे चाळीस पाच  ?  याचा  उलगडा सदर टिपणात नाही. 

मुद्दा क्र. ४ - जोडाक्षर विरहित अक्षरांसह संख्या वाचन केले जावे असे सुचवणाऱ्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील   पानावर ज्या टिपणात अशी सुचवलेली पद्धत केवळ पन्नास ( याला काय म्हणावे ? कारण या पन्नास मध्ये देखील जोडाक्षर आहे.) या संख्येपर्यंतच वापरावी असे म्हणले आहे, पण  प्रस्तावित संख्या वाचन पद्धत सुचवण्यासाठी ६३ त्रेसष्ठ,  ७३  त्र्याहत्तर   यातील  उच्चार अवघड जातात अशी अडचण  मांडली आहे. 

मुद्दा क्र. ५ - सुचवलेली नवी पद्धत अधिक  गुंतागुंतीची, अवघड व अधिक  वेळखाऊ  आहे.  ११ +१/४ सव्वा अकराचे वाचन  कसे करावे  याबाबत  काहीही  सुचवलेले नाही. त्याचे  शालेतील कोवळ्या, अजाण  बालकांनी  ११.२५  हे रूपांतर करून मग त्याचे वाचन दहा एक पूर्णांक वीस पाच  करावे असे गणित  अभ्यास  मंडळाचे  मत  आहे  का ?

मुद्दा क्र. ६ - ९. ३१४५६ या  संख्येचे वाचन  पुढील  वरच्याइयत्तेतील  मुलांनी कसे करावे याबाबात गणित  गणित  अभ्यास  मंडळाचे  काय मत  आहे ? 

मुद्दा क्र. ७ - महाराष्ट्र शासनाने ६ नोव्हेंबर २००९ या दिवशी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या शासन निर्णयात मराठी वर्ण चिन्हे, मराठी अक्षरे, मराठी जोडाक्षरे, मराठी वाक्यरचना, मराठी अंक,  अंकातील मराठी संख्या,  अक्षरी मराठी संख्या  आणि या दोन्ही प्रकारे संख्या कागदावर कशा लिहाव्यात किंवा उमटवाव्यात याविषयी प्रत्यक्ष उदाहरणे  देऊन सविस्तर आणि पुरेसे मार्गदर्शन केलेले आहे. महाराष्ट्र या शासनाच्या शासन निर्णयात यात नमूद केलेल्या प्रकारे संख्या वाचन न करता अन्य पद्धतीने करावे असा निर्णय घेण्याचा सल्ला देण्याबाबतचे अधिकार गणित अभ्यास मंडळाला आहेत का ? याचा प्राथमिक आढावा घेतला असता उपरोक्त गणित अभ्यास मंडळाला असा अधिकार दिलेला नसावा असे अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.                                                                                    

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता मराठी संख्यांचे वाचन करण्याची नवी, अशास्त्रीय पद्धत केवळ अनुकरणाच्या हौसेने   आणि  “  आली लहर, केला कहर “ या तत्वावर सुचवलेली  असावी,  असे मला वाटते.

शासनाच्या ६ नोव्हेंबर २००९ या दिवशीच्या शासन निर्णयाशी पूर्णपणे विसंगत आणि संख्या वाचन   आत्ताच्या पद्धतीपेक्षा प्रचंड प्रमाणात अधिक गुंतागुंतीचे करणारी ही नवीन पद्धत पाठ्यपुस्तकातून काढून टाकावी आणि ती वापरण्याचा जो सल्ला शिक्षकांना दिला आहे तो स्वतंत्र परिपत्रकाद्वारे मागे घ्यावा अशी मागणी मी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागाकडे केली आहे.

मुद्दा क्र. ८ - जोडाक्षरे हे मराठी तसेच सर्व भारतीय  भाषांचे महत्वाचे वैशिष्ट्य असून जगातील इतर  भाषा आणि लिप्यांच्या तुलनेत  जोडाक्षरांमुळेच मराठी तसेच सर्व भारतीय भाषांतून अधिक वेगाने लेखन, वाचन, बोलणे करता येते. जोडाक्षरे हा  भारतीय  भाषाच्या  तसेच मराठीच्या मूलभूत रचनेशी जोडलेले जगात दुर्मीळ असे एकमेव वैशिष्ट्य  आहे.  महाराष्ट्र शासनाच्या गणित अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी नेमलेल्या  गणित  अभ्यास मंडळाला भारतीय भाषांच्या आणि विशेषत:  मराठीच्या मूलभूत  रचनेतच  बदल करण्याचा अधिकार आहे  का ?  या मुद्द्यावर देखील  शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही  मी शासनाकडे  केली आहे. गणित अभ्यास मंडळाची नेमणूक करताना त्यांनी पाठ्यपुस्तकाचा  आराखडा अथवा संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे प्रारूप  तयार करून  देताना भाषेच्या  मूलभूत  रचनेतील बदल भाषा तज्ज्ञांशी विचारविनिमय  करून  समाविष्ट केले  की भाषा तज्ज्ञांशी  विचारविनिमय न करता केले आहेत याचा आढावा  शासनाने घ्यावा  आणि मगच व्यपक विचरविनिमय  झाल्यावरच इतका मूलभूत बदल लागू  करावा, अशी मागणी मी  शासनाकडे  केली आहे. भाषा तज्ज्ञांशी असा औपचारिक  विचारविनिमय  न करताच इतका मूलभूत बदल केला असेल तर तो बदल तातडीने स्थगित कारावा  आणि या संबंधीचा  आशय पाठ्यपुस्तकातून वगळण्याचे परिपत्रक  ( शुद्धिपत्रक ) तातडीने काढावे, अशी मागणीही मी शासनाकडे केली  आहे. 

वर उल्लेखित मुद्द्यांचा विचार करून अधिकाधिक विद्यार्थी, पालक, समाजसेवक, शिक्षक, विचारवंत, मराठी लेखक, गणिताचे शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक यांनी याबाबत सदर नवीन पद्धत तातडीने रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे शिक्षण संचालकांकडे समक्ष पत्राने करावी असे मी सर्वांना आवाहन करतो.

| शिक्षणतज्ज्ञ श्री. रमेश पानसे.