Wednesday, April 1, 2026

काव्यरंग २० शाळा

आठवते मला ती शाळा,
आठवतो तो फळा,

आठवते शाळेत
जाण्यासाठी होणारी घाई,

उशिरा आल्यावर
ओरडणाऱ्या बाई,

आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे
दिलेले ते रट्टे,

शाळेतले ते कट्टे .....

आठवते मधल्या सुट्टीची ती बेल,

खेळून कसा जायचा तो वेळ,

आठवतो तो मधल्या सुट्टी नंतरचा आळस,

अभ्यासाचा वाटणारा तो कळस,

आठवते ती घरी जाण्याची घाई,

आपली घरी वाट
पाहणारी ती आई...

अनामिक

काव्यरंग १९ यांचं असं का होतं कळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही 
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

निळं निळं वेल्हाळ पाखरू, 
आभाळात उडणार रूपेरी वेलाण्टी घेत मासा,

पाण्यात बुडणार याचं सुख नसतंच मुळी, 
कधी त्यांच्यासाठी एकच गोष्ट त्यांची असते, "कपाळावर आठी"

कधीसुद्धा यांची पापणी ढळत नाही
यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

मोठ्याने हसा तुम्ही, त्यांना नैतिक त्रास होतो वेलची खाल्लीत तरी, यांना व्हिस्कीचा वास येतो.

यांचा घोषा सुरू असतो, "अमकं खाणं वाइट की डोकं जडसं होतं" "तमकं मुळीच पिऊ नका, त्याने नक्की पडसं होतं"
संयमाचे पुतळेच हे, त्यांचं मन चुकूनही चळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

सगळेच कसे बागेमधे, व्यायाम करीत बसणार? किंवा हातात गीता घेऊन, चिंतन करीत बसणार? बागेतल्या कोप-यात कोणी, घट्ट बिलगून बसतंच ना? गालाला गाल लाऊन, गुल गुल करीत असतंच ना?

नैतिक सामर्थ्याचं त्यांच्या वेगवान घोडं असतं पण यांना मुलं होतात हेच एक कोडं असतं ! या कठीण कोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

कसल्याही आनंदाला ते, सतत भीत असतात एरंडेल प्यावं तसं, आयुष्य पीत असतात एरंडेल प्यायलयावर, आणखी वेगळं काय होणार ? एकच क्षेत्र ठरलेलं, दुसरीकडे कुठे जाणार?

कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही किंवा त्यांना कळतं पण वळत नाही ?

मंगेश पाडगावकर

काव्यरंग १८ निळे नी सावळे मोकळे

गीतरंग

निळे नी सावळे मोकळे आभाळ 
भिजते रंगात सांजवेळी..... 

सुदूर रुळते डोंगराची माळ 
मध्येच गुलाल सांडलेली

निळे नी सावळे मोकळे आभाळ....

जवळ नी दूर उभे तरुवर 
सय पावसाची साठवूनी 

श्वास ओलसर वाऱ्याचा मंदसा 
मातीस सुगंधी आठवणी

मोकळे आभाळ, मोकळे आभाळ 
निळे नी सावळे मोकळे आभाळ....

दिठीची लेवून नाजुक चौकट 
चित्रमय जग उभे आहे अशब्द, 
निःशब्द विश्वरुप मौन भासते सचित्र बोलू पाहे

मोकळे आभाळ, मोकळे आभाळ 
निळे नी सावळे मोकळे आभाळ....

गीतकार : सुधीर मोघे

#eaksharman

काव्यरंग १७ अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला

आत्मबल

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं
मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं
अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो
भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो
खुळा रिपू । तया स्वयें 
मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला
नम्र दाससम चाटिल तो पदांगुला
कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी
हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली
आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें
यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते
हलाहल । त्रिनेत्र तो
मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।

स्वातंत्र्यवीर सावरकर

काव्य १६ ती गेली

ती गेली तेव्हा रिमझिम, 
पाऊस निनादत होता 

मेघांत अडकली किरणे, 
हा सूर्य सोडवित होता । 

ती आई होती म्हणुनी, 
घनव्याकुळ मीही रडलो

@eaksharman
त्यावेळी वारा सावध, 
पाचोळा उडवित होता | 

अंगणात गमले मजला, 
संपले बालपण माझे

खिडकीवर धुरकट तेव्हा, 
कंदील एकटा होता |

कवी ग्रेस

काव्य १५ असता समीप दोघे हे

असता समीप दोघे हे ओठ मूक व्हावे 
शब्दांविना परंतु बोलून सर्व जावे

अतृप्त मीलनाचे, विरहातही 
सुखाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

फसवा वरून राग, रुसव्यात गाढ प्रीती होता क्षणिक दूर वेडी मनात भीती दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

@eaksharman
दूरातही नसावा दोघांमध्ये दुरावा स्पर्शाविना सुखाने हा जीव मोहरावा ओठी फुलून यावे स्मित गोड सार्थकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे !

- शांता शेळके

काव्य १४ ओळखलत का सर मला ?



ओळखलंत का सर मला? पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, 
गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतींत नाचली, 
मोकळ्या हाती जाईल कशी? बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते-नव्हते नेले, 
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेऊन संगे, सर, आता लढतो आहे, 
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, 
पैसे नकोत, सर; जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, 
पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त 'लढ' म्हणा!

कुसुमाग्रज
#eaksharman

काव्य १३ रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा !
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा !

भोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो;
अन् कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा !
@eaksharman
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा !

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा !

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
"चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा !"

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

सुरेश भट

काव्य १२ चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे



चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे ;
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे .

मी चालतो अखंड चालायचे म्हणून ;
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे .

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे ;
हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे .

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा ;
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे .
@eaksharman
चुकली दिशा तरीही आकाश एक आहे ,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे .

आशा तशी निराशा , हे श्रेय सावधांचे ;
बेसावधास कैसे डसणार हे निखारे..

विंदा करंदीकर

काव्य ११ देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे

देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

@eaksharman

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणाऱ्याने देत जावे;
घेणाऱ्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणाऱ्याचे हात घ्यावे !

विंदा करंदीकर

काव्य १० केले कुणास्तव ते किती,हे कधी मोजू नये

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;

होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी वागेल तो,
बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही !
त्याला तयारी पाहिजे.

@eaksharman

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

विंदा करंदीकर

काव्य ९ निळा पक्षी

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.

प्रकाशाचे
पंख सान;
निळी चोच
निळी मान;
निळे डोळे
निळे गान;
निळी चाल
निळा ढंग;
त्याने चढे
आकाशाला
निळा रंग.
@eaksharman

असली ही
जात न्यारी
बसे माझ्या
निंबावरी;
पृथ्वीमध्ये
पाळे खोल;
तरीसुद्धा
जाई तोल;
...अनंताचा
खड्डा खोल.

तर्काच्या या
गोफणीने
फेकितसे
काही जड;
आणि पाने
आघाताने
करतात
तडफड;
टिकाळीला
निळा पक्षी
जसा धड
तसा धड;
...उंच जागा
अवघड.

याचे गान
याचे गान
अमृताची
जणू सुई;
पांघरूण
घेतो जाड,
तरी टोचे;
झोप नाही
जागविते
मेलेल्याला;
जागृतांना
करी घाई.

याचे गान
याचे गान
स्वरालाच
नुरे भान.
नाही तार
नाही मंद्र;
...चोचीमध्ये
धरी चंद्र.

काही केल्या
काही केल्या
निळा पक्षी
जात नाही.


विंदा करंदीकर

निळा पक्षी

काव्य ८ एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा

निळा

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

@eaksharman
असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.

बा. भ. बोरकर

काव्य ७ माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्याकपारीमधुनी घट फुटती दुधाचे

माझ्या गोव्याच्या भूमीत आंब्याफणसांची रास
फुली फळांचे पाझर फळी फुलांचे सुवास

माझ्या गोव्याच्या भूमीत उन्हाळ्यात खारा वारा
पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा

माझ्या गोव्याच्या भूमीत येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आकाश सागरा
@eaksharman
माझ्या गोव्याच्या भूमीत चाफा पानावीण फुले भोळाभाबडा शालीन भाव शब्दावीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे
भात वाढी आईच्या मायेने सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत लाल माती, निळे पाणी
खोल आरक्त घावांत शुद्ध वेदनांची गाणी

बा. भ. बोरकर

काव्य ६ देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे, या मोल नाही फारसे ॥

तेच डोळे देखणे, जे कोंडीती साऱ्या नभा ।
वोळिती दुःखे जनांच्या, सांडिती नेत्रप्रभा ॥

देखणे ते ओठ की जे ओविती मुक्ताफळे।
आणि ज्यांच्या लाघवाने, सत्य होते कोवळे ॥

देखणे ते हात ज्यांना, निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे ॥
@eaksharman

देखणी ती पाऊले, जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा, स्वस्तिपद्म रेखिती ॥

देखणे ते स्कंध ज्या ये, सूळ नेता स्वेच्छया ।
लाभला आदेश प्राणां, निश्चये पाळावया ॥

देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके ।
चांदणे ज्यातुन वाहे, शुभ्र पाऱ्यासारखे ॥

देखणा देहान्त तो, जो सागरी सुर्यास्तसा ।
अग्निचा पेरुन जातो, रात्रगर्भी वारसा ॥

बा. भ. बोरकर

काव्य ५ अर्थेविण पाठांतर कासया करावें

अर्थेविण पाठांतर कासया करावें । 
व्यर्थचि मरावें घोकूनियां ।। 

घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । 
अर्थरूप राहे होऊनियां ।। 

@eaksharman

तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी । 
नाहीं तरी गोष्टी बोलों नका ।।

संत तुकाराम
#eaksharman

काव्य ४ छोटेसे बहीणभाऊ

छोटेसे बहीणभाऊ 
उद्याला मोठाले होऊ 
उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला 
नवीन आकार देऊ

ओसाड उजाड जागा
होतील सुंदर बागा 
शेतांना, मळ्यांना, फुलांना, 
फळांना नवीन बहार देऊ

@eaksharman

मोकळ्या आभाळी जाऊ 
मोकळ्या गळ्याने गाऊ 
निर्मळ मनाने, आनंदभराने 
आनंद देऊ अन् घेऊ

प्रेमाने एकत्र राहू 
नवीन जीवन पाहू 
अनेक देशांचे, भाषांचे, वेशांचे 
अनेक एकच होऊ

वसंत बापट
#eaksharman

 

काव्य ३ चारोळ्या


माझी गोष्ट नेहमीची...
तुम्हाला साधी सुद्धा वाटेल
कारण जे तुम्हाला ऐकायचय
सांगताना तेच माझ्या हातनं सुटेल

सुखी माणसाच्या मनात कायम
दू:ख गाठेल ही भीती
मग मला सांगा जगामध्ये
सुखी माणसं किती? 

आभाळभर पाखरं
आणि मुठभर दाणे
आता कुणाला अधिक
तर कुणाला उणे.....

@eaksharman
सरायला आलेल्या रात्रीचं 
वर्णन काय करू?
चंद्र तारे इतक्या जवळ
की कळेना कोणता तारा धरू?

सरायला आलेल्या रात्रीचं 
वर्णन काय करू?
चंद्र तारे इतक्या जवळ
की कळेना कोणता तारा धरू?

#चंगो

काव्य २ इंद्रायणी काठी, देवाची आळंदी

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी 
लागली समाधी, ज्ञानेशाची


ज्ञानियाचा राजा भोगतो राणिव 
नाचती वैष्णव, मागेपुढे


मागेपुढे दाटे ज्ञानाचा उजेड 
अंगणात झाड कैवल्याचे


@eaksharman

उजेडी राहिले उजेड होऊन 
निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई


ग. दि. माडगूळकर


काव्य १ कानडा राजा पंढरीचा

कानडा राजा पंढरीचा
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटिवर, पुतळा चैतन्याचा

@eaksharman

परब्रह्म हे भक्तांसाठी
मुके ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव,
जणू की पुंडलिकाचा

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा

ग. दि. माडगूळकर (गदिमा)