शुभ दिपावली!
सर्वांना ही दीपावली, येणारं नवीन वर्ष आणि सर्व आयुष्यात, सुख, समाधान, यश, आनंद लाभो, या शुभेच्छा! - अशी माझी ‘शुभ दिपावली’ची शुभेच्छा!
या शुभेच्छा व्यक्त करतानाची माझी भावना आहे, की एका अत्यंत धोकादायक कालखंडातली ही दीपावली आहे. एका अत्यंत धोकादायक कालखंडाच्या सावलीत ‘शुभ दीपावली’ या शुभेच्छा, ही प्रार्थना मी व्यक्त करतो आहे .
आपल्या भारतीय संकल्पनांमध्ये कमालीचा सखोल अर्थ आणि त्यामुळं त्यात विलक्षण सौंदर्य भरलेलं आहे. मी ‘सौंदर्य’ हा शब्द वापरतो आहे. दीपावलीच्या शुभेच्छासुद्धा व्यक्त करायच्या झाल्या तर त्या आहेत ‘शुभ’ दीपावली. अलीकडं पाश्चात्यीकरण, त्यातले ‘इंग्रजाळलेले’, भाषेचं, जाणिवांचं आणि त्यामुळं संस्कृतीचं ‘इंग्रजीकरण’ करणारे आणि त्यापायी आपलं ‘आत्मभान (self-awareness)’ हरवलेले, आपण कोण, आपण कोणत्या मातीत रुजलेलो आहोत, आपली आई कोण, आपण कुठून उगवून आलो या सगळ्याचा जणू विसर पडल्यासारखं आपण जोरजोरात ‘हॅपी दिवाली’ म्हणतो!
‘हॅपी’ दिवाली! गोष्ट आनंदाचीच आहे, की दीपावली आनंदमय जावो. पण अर्थ आणि त्यामागची भावना, विचार समजल्यामुळं आता अनेक वर्षं मी संज्ञा वापरतो - ‘शुभ’ दिपावली! हा शब्द विलक्षण अर्थपूर्ण आहे. कारण ही दिवाळी ‘आनंदी (हॅपी)’ तर असोच; पण खरा आनंद कशात आहे? कुणाला जर वाटलं ‘हॅपी’ दिवाली म्हणजे सिगरेट-दारू-तंबाखू…’हॅपी दिवाली’ म्हणजे बदललेल्या काळात फटाक्यांमुळं होणारं प्रदूषण. (की जे ‘भारतीय मन’ लक्षात घेतं. भांडायला, खून-खराबा करायला उठत नाही. आपणहून मान्य करून ठरवतं की बदललेला काळ, पर्यावरणाची समस्या पाहता आपण फटाक्यांवर खर्च तरी करायला नको किंवा तो कमी करूया. हा आतून येणारा बदल आहे.) म्हणून ती ‘हॅपी दिवाली’ तर आहेच; पण ती ‘शुभ दीपावली’ आहे.
भविष्यात आपल्याशी भारतीय संकल्पना आणि त्यांचा अर्थ यांवर संवाद करताना कधीतरी अर्थशास्त्र या विषयावर सविस्तर बोलेन. मात्र दीपावलीच्या प्रकाशात आज फक्त ‘शुभ लाभ’ ही संज्ञा सांगतोय.
पाडव्याच्या दिवशी, बलिप्रतिपदेला नवसंवत सुरू होतं. या दिवशी आपला व्यापारीवर्ग आपल्या व्यापाराच्या वह्या-पुस्तकांची पूजा करतो. व्यवसाय सात्विक भावनेनं करायचा आहे, हे त्यामागचं अर्थपूर्ण पावित्र्य. ज्यात मी हिशोब ठेवतो तेच माझे सात्विक, पवित्र धर्मग्रंथ आहेत. या दिवशी व्यापारीबंधू त्या वहीवर स्वस्तिक काढतो आणि ओल्या कुंकवात खाली शब्द लिहितो - शुभ लाभ!
हा फार महत्वाचा आणि अर्थपूर्ण शब्द आहे. अर्थशास्त्रात नफा कमावणं (profit maximization) हा हेतू सांगितला जातो. कोणत्याही व्यवसायात हा नफा वाढत गेला पाहिजे. माझ्या मते, हे अर्थशास्त्र ऍडम स्मिथपासून, जॉन मार्शल लॉर्ड केन्स, मिल्टन फ्रीडमन आणि कालपर्यंत ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं यांनी मांडलेलं पाश्चिमात्य अर्थशास्त्र आहे. हा नफा कमावत असताना मी कुणाचं शोषण करतो आहे का, कुणाचं नुकसान होत आहे का, अलीकडच्या काळाबद्दल बोलायचं झाल्यास व्यापारातून भरमसाठ नफा कमावताना त्याची किंमत पर्यावरण चुकती करत आहे का? हा नफा आहे; मात्र तो ‘शुभ लाभ’ नाही. व्यवसाय चालवायचा असेल तर ‘लाभ’ म्हणजे नफा हवाच. मात्र तो दुसऱ्याला लुटून, त्याचं शोषण करून, खोटं बोलून, फसवून नाही. व्यापार करणं किंवा जीवन जगणं ही win win situation असायला हवी. ग्राहक म्हणून मी तुला वस्तू किंवा सेवा दिली, त्यातून तुझं आणि माझंही घर चालायला हवं. म्हणून त्या व्यवसायातून नफा म्हणजे लाभ आवश्यक आहे; पण तो ‘शुभ लाभ’ असायला हवा. तशी दीपावलीची ही शुभेच्छा - ‘शुभ’ दीपावली!
मला हे म्हणायला आवडतं, कारण ती माझ्या हृदयातली खरीखुरी भावना आहे की मुळातच - सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा! या अवस्थेत मी मुख्यतः जगतो. अशा ‘सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा’ कायमच्याच आहेत; मात्र दिवाळी हे त्या व्यक्त करण्याचं एक चांगलं निमित्त. म्हणून ‘शुभ दिपावली’. आपल्या सर्वांना सुख, समाधान, यश, आनंदा लाभो. येणारं नवं संवत, आपलं जीवन सुख, समाधान आणि आनंदानं भरून जावं. आपल्यातून समाज, देश, विश्व आणि निसर्गसुद्धा सुख, समाधान आणि आनंदानं भरला, भारला जावो.