माझे संगीत व साहित्य क्षेत्र
~ सुधाकर कदम
भाग ३
--------------------------------------------
--------------------------------------------
या वेळी काही मान्यवरांचे आशिर्वादपर बोल येथे टाकल्याशिवाय राहावत नाही...
स्वरराज छोटा गंधर्व - "मराठी गझल गायकीच्या नवीन वाटचालीस माझा आशिर्वाद आहे."(१९७५)
पं.जितेंद्र अभिषेकी - "सातत्य आणि परिश्रम आपणास यश मिळवून देईल."(१९७७)
सुरेश भट - "महाराष्ट्राचे मराठी मेहदी हसन".(१९८१) आणि "गझलनवाज".(१९८२)
गजानन वाटवे - "मला आवडलेला गझलिया..."(१९८३)
डा.यु.म.पठाण - "मराठी गझलेस योग्य स्वरसाज चढविला".(१९८३)
मा.सुधाकरराव नाईक - "शब्द-स्वरांच्या झुल्यावर झुलविणारा कलाकार".(१९८५)
काही गायक,पत्रकार,समीक्षक,अभ्यासक,संशोधक आणि चाहत्यांच्या प्रतिक्रीया...........
*१९८२ च्या सुमारास सुधाकर कदमांचा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता.व्यक्तिशः मला गझलेबद्दल प्रेम असल्यामुळे ह्या कार्यक्रमास मला आवर्जून बोलावण्यात आले होते.कदमांनी सर्व गझला स्वतः स्वरबद्ध केल्या होत्या.चाली अत्यंत आकर्षक,अर्थाला अनुरुप अशा होत्या.एकूण कार्यक्रम निटनेटका,चांगला झाला व कदमांबद्दल कौतुक वाटले.एकच व्यक्ती हार्मोनियम वाजविते,गाते,बोलते व संगीतही देऊ शकते,हे वेगळेपण होतेच.
-करवीर कोकिळा रजनी करकरे देशपांडे-
(पार्श्वगायिका,कोल्हापुर.)
* Tha pioneer in tha introduction of MARATHI GAZAL GAYAKI.(2003)
-Maharashtra Jaycees-
* विदर्भातील रसिले गझल गायक म्हणून श्री सुधाकरजी कदम महाराष्ट्राला परिचित आहेत.मराठी गझलांना सुंदर स्वरसाजासह अधिकच रसिल्या स्वरुपात सादर करणे हा या रसिक गायकाचा खरा आनंद आहे. (’सूरसुधा’दिवाळी अंक,१९९६)
-मधुरिका गडकरी-
(ज्येष्ठ संगीत समीक्षिका,नागपुर.)
* आर्णीसारख्या आडगावात राहूनही सुधाकर कदमांनी आपल्या गायकीचा रंग-ढंग जोपासला आणि आर्णीच्या मातीचा गंध महाराष्ट्रात नेला.आपले वेगळेपण ठसविण्यासाठी अनवट अशी वाट निवडली.’मराठी गझल’ हा प्रकार कार्यक्रमासाठी पसंत केला.हिंदी-उर्दू गझल गाणे वेगळे आणि मराठी गझल पेश करणे वेगळे.हिंदी-हिंदुस्थानी,मराठी या केवळ भाषा नाहीत.भाषेबरोबरच त्या त्या भाषांची संस्कृतीही प्रवाहित होत असते.संस्कृतीनुसार भाषांचा बाज बदलत असतो आणि भाषा-वैशिष्ट्यांमुळे संस्कृतीचा मळा श्रीमंत होत असतो.गझलच्या संदर्भात ते अधिकच खरे आहे.कारण तो ढंग काही मराठीचा नव्हे.अरबी-उर्दू ही त्या प्रकारातील काव्याची गर्भगत नाळ.सांगायचा मुद्दा असा की जो प्रकार आपल्या भाषिक कुळातला नाही तो प्रकार घेऊन सुधाकर कदमने आपले कार्यक्रम यशस्वी केले.ही वाट वहीवाट नव्हती.हिंदी-उर्दू गझल अशीच वहिवाट होती.सुधाकरने ती सोडली आणि मराठी गझल लोकप्रिय करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला.
-वामन तेलंग-
(संपादक-तरुण भारत,नागपुर)
कार्तिकएकादशी/१९९८
*’हरचंद सुरीली नग़्मोंसे, जज़बात जगाए जाते है,उस वक़्त की तल्ख़ी याद करो,जब साज़ मिलाए जाते है’....
एक अतूट अजोड नाते जोडण्याची शक्ती,किमया,करिष्मा स्वरात आणि फक्त स्वरांतच आहे.माझे आणि सुधाकर कदम यांचे नाते गेल्या साडेतीन दशकांत जुळल्या गेले त्याचे गमक वरील शरामध्ये आहे.या साडेतीन दशकात मी सुधाकरचे ख्याल गायन ऐकले.त्यांची गझल गायकी ऐकली.सुधाकर जेव्हा गझल गायकीकडे वळले त्यावेळी त्यांच्यावर क्वचित टिकाही झाली.गझलचा आशय,अर्थ.भावना याचा नीट विचार करुन ती स्वरांनी रंजक करणे यात गझल गायकाचे कौशल्य आहे.आपली गझल गायकी पेश करत असता माझ्या कल्पनेप्रमाणे सुधाकर कदम यांनी वरील प्रमाणे व याहीपेक्षा अधिक अवधान बाळगले आहे.पुढे जाऊन मी असंही म्हणेन की अनेक तपांच्या अतूट रियाजातून विलंबित ख्याल गायक,ज्याला अक्षर मंत्राचा साक्षात्कार झाला आहे,तोच गझल समर्थपणे पेश करु शकेल.या विधानाला कोणी आव्हान देत असेल तर मी प्रात्यक्षिक द्यायला तयार आहे.स्वरराज छोटा गंधर्व अनेक वेळा यवतमाळला येवून गेले.त्यांचा मुक्काम त्यांचे शिष्य पुरुषोत्तम कासलीकरांकडे असायचा.यावेळी त्यांच्या घराला सम्मेलनाचे रूप यायचे.या वर्दळीत सुधाकर कदम सर्वात पुढे असत.छोटा गंधर्व सुधाकरशी विशेष सलगीने,आपुलकीने वागत असतांना मी पाहिले आहे.अशा या मनस्वी कलाकाराची मराठी गझल गायकी विदर्भाइतकीच पश्चिम महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात गाजली.त्यांच्या मैफिलींचे इतिवृत्त वर्तमानपत्रांतून समिक्षणात्मक रुपाने मी वाचत होतो तेव्हा मला मनःपूर्वक आनंद व्हायचा.
-रसिकाग्रणी राजे मधुकरराव देशमुख-
(माहुरगड.जि.नांदेड)
* १९७१ ते १९८० या काळात विदर्भाचे गायक सुधाकर कदम यांनी गझलांचे अनेक लहान मोठे कार्यक्रम सुरू केल्याचे त्यांच्या मुलाखतीवरून आढळून आले.मैफिलीचा दर्जा प्राप्त करणा-या या कार्यक्रमांनी गझलचे रसिक तयार होणे सुरू झाले.गझलचा परिचय झाला.मराठी गझलची सुरवात सुरेश भटांपासून मानली तर गझल गायनाची सुरवात सुधाकर कदमांपासून मानावी लागेल.म्हणजे मराठी गझल गायकीचे वय फार फार तर ३० ते ३५ वर्षे मानावे लागेल.
-डाँ.राजेश उमाळे-
(सुप्रसिद्ध मराठी गझल गायक,संगीतकार,संशोधक.अमरावती.)
* गझलसम्राट सुरेश भट आणि संगीतकार यशवंत देव यांनी महाराष्ट्राचे आद्य मराठी गायक म्हणून ज्यांचा गौरव केला .ज्यांना स्वतः सुरेश भटांनी स्वहस्ताक्षरात’महाराष्ट्राचे मेहदी हसन’म्हणून ३० मार्च १९८१ रोजी शेरा देऊन स्वाक्षरी केली.ज्यांना सुरेश भटांच्या सहाव्या स्मृती दिनी २००९ साली’गझल गंधर्व’या किताबाने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाँ.नरेंद्र जाधव यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.मराठी गझल गायकी महाराष्ट्रभर रुजविण्यासाठी आणि लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा ’तो’ कलावंत म्हणजे आर्णी गावातील साधा संगीत शिक्षक सुधाकर पांडुरंग कदम होय.
-प्रा.काशिनाथ लाहोरे-
(दै.लोकमत प्रतिनिधी.यवतमाळ)
* पुण्यात बांधण जनप्रतिष्ठान आणि अभिजात गझल या संस्थेच्या वतीने सुरेश भट यांचा स्मृतीदिन झाला.यावेळी जेष्ठ गझल गायक सुधाकर कदम यांना गझलगंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.गेली ४० वर्षे कदम यांनी मराठी गझलेची निरपेक्ष सेवा केली आहे.अशी गावी मराठी गझल या स्वरुपाचे कार्यक्रम कदम यांनी महाराष्ट्रात गावोगावी केले आहेत.गझल गाताना शब्दप्रधान गायकीला महत्व असते.सांगीतिक रचनेत शब्दांचे अर्थ उलगडून सांगणारी कदम यांची शैली लोकप्रिय आहे.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील साधा शिक्षक माणूस साहित्याची आणि रसिकांची कशी सेवा करतो याचा आदर्श कदम यांनी उभा केला.
-अनंत दीक्षित-
दै.लोकमत,पुणे.
(संपादकीय १७ मार्च २००९)
* कवीला काय म्हणायचे आहे ? काय सांगायचे आहे ? काय सुचवायचे आहे ? ते कवी कमीतकमी आणि नेमक्या शब्दात मांडतो तरी आशयाचा एखादा पैलू,अर्थाचा पदर रसिकाला गझल वाचून पुर्णपणे उलगडेलच असे नाही आणि गझलच्या बाबतीत तर ’समजणे’ हे क्रियापद किती थिटे आहे हे आपल्याला कालांतराने का होईना पण समजल्या शिवाय राहत नाही तेव्हा अर्थाच्या पूर्णत्वाकडे आणि आशयाच्या सघनतेकडे रसिकाला हळुवार सुरावटीतून घेऊन जाण्याचे काम गझल गायक आपल्या गळ्याच्या ताकदीने करीत असतो.आणि मला वाटतेगझल गायनाचं खरं सामर्थ्य यातच आहे.ही जाण सुधाकर कदमांना आहे याचा मनापसून आनंद झाला.ती जसजशी विकसित झली,तसतशी गझल त्यांना प्रसन्न झाली.
-प्रा.डाँ.श्रीकृष्ण राऊत-
कवी,गझलकार,संशोधक.
(लोकमत, ’साहित्यजत्रा’ १०.७.१९८३)
* मराठी गझल गायनाच्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असणारा हा कलावंत आजच्या जाहिरात व शोमँनशीपच्या युगात मागे पडला ही खरी शोकांतिका आहे,मराठी गझलला त्यांनी दिलेल्या बंदिशी म्हणजे सरस्वतीने त्यांना मुक्तहस्ताने दिलेलं दान आहे.सुरेश भट सुद्धा आमच्या समोर हे मान्य करायचे.
-मनोज पाटील माहुरे-
(काठोडा,यवतमाळ.)
* सुरेश भट म्हणजे मराठी गझल हे समीकरण जसे रुढ झाले आहे तसे १९९० च्या दशकात मराठी गझल गायकी म्हणजे सुधाकर कदम हे समीकरण रुढ होते,नव्हे ख-या अर्थाने सुरवातच सुधाकर कदमांनी केली.१९८२ मध्ये पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेला ’अशी गावी मराठी गझल’ हा कार्यक्रम मराठी गझल गायकीबद्दल मार्गदर्शक ठरावा असा होता.स्वतः सुरेश भटांनी निवेदन केलेल्या या कार्यक्रमात सुधाकर कदमांनी सादर केलेल्या...
’हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही,चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही’’झिंगतो मी कळे ना कशाला,जीवनाचा रिकामाच प्याला’
या सारख्या अनेक गझलांच्या बंदिशी आजही रसिकांच्या मनात रेंगाळत आहे.या कार्यक्रमानंतर कदमांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर शेकडो कार्यक्रम केले.यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीसारख्या ग्रामीण भागात राहून त्यांनी एकलव्यासारखी साधना करून अतिशय कष्टाने मराठी गझल गायक म्हणून मान्यता मिळविली.त्या वेळेपर्यंत फक्त मराठी गझल गायनाचा सलग तीन तासाचा कार्यक्रम करणारा एकही गायक नसल्याचे सुरेश भट सांगत.
-अनिल कांबळे-
(गझलकार,पुणे.)
* कविवर्य सुरेश भट यांच्या समर्थ लेखणीतून प्रसवलेल्या गझलांना खरा न्याय दिला तो आर्णी (जि.यवतमाळ) येथील प्रख्यात मराठी गझल गायक सुधाकर कदम यांनी.प्रसिद्ध मराठी कवी कलीम खान यांच्या रसाळ सूत्रसंचालनाखाली या जोडगोळीचा ’अशी गावी मराठी गझल’हा कार्यक्रम महाराष्ट्रभर गाजला.इंदूर,उजैन,नागदा या मध्यप्रदेशातल्या शहरांमध्ये झालेल्या सुधाकर आणि कलीम खान याच्या मैफिलीच्या आठवणी आजही तिथल्या रसिकांच्या मनात दरवळत आहेत.नंतर मराठी गझलेच्या क्षितिजावर भीमराव पांचाळे यांचा उदय झाला.अल्पावधीत मराठी गझलेच्या प्रांतावर या प्रतिभासंपन्न गायकाचे साम्राज्य पसरले.
-अजीम नवाज राही-
*Sir, Aapanach aamhala marathi gazal aikayala shikawile, aapanach mala protsahit karun gayala shikawile. Aapanas nirogi dirghayushya labho.
-Dr. Sushil Deshpande-
Karanja lad
0 comments:
Post a Comment