Saturday, October 4, 2014

लेख

#मराठी

मला नेहमी साधं सरळ जगायला आवडतं. जेव्हा आजच्या सारखा खूप पाऊस पडतो, तेव्हा आत्ताच्या सारखा मी खिडकी शेजारी माझी आरामशीर खुर्ची टाकून बसतो आणि मी आधी कधी न वाचलेल्या पुस्तकांची वाफाळलेल्या कॉफीबरोबर चव घ्यायला लागतो. खिडकीबाहेर पावसात उभा असलेला पिंपळ वाऱ्याने उगाच सळसळू लागला आणि त्याची नुकतीच नवीन जन्मलेली कोवळी नाजूक मऊशार तपकीरी हिरवी पानं पाहिली, की मग मला उगाच काहीतरी रंगवावंस वाटू लागतं. एखादा कागद घेऊन मी उगाच काहीतरी त्यावर मिळेल त्याने रंगवतो. तसं काही खास कारण नसतं आणि मला काही सिद्ध वगैरे पण करायचं नसतं. बस्स! मला फक्त काही तरी रंगवायचं असतं. असंच एखादं जुनं भावगीत मला आठवतं, ते आत्ता यावेळी का आठवावं याला काही उत्तर नसतं. कोणी प्रेम करायला जवळ नसतानाही एखादं पावसात भिजलेलं गीत मनातून उमलून का बाहेर यावं यालाही काही स्पष्टीकरण नसतं. खिडकीतून आत येणाऱ्या पावसाच्या आवाजात सुस्पष्ट ऐकता यावं म्हणून मग मी आवाज थोडा मोठा करतो आणि ऐकत राहतो. मला गीताचे शब्द ऐकू येतातच असं नाही. पण काही तरी कुठं तरी मनात उगाच हिरव्या कच्च पानावर पहाटे एखादा दवबिंदू पडल्यावर पान जसं थरथरतं तसं थरथरल्यासारखं वाटतं. मग मला उगाच बेडवर लोळायची हुक्की येते. सबंध दिवस मी काही काम करत नाही. डोळे मिटून बेडवर लोळत पडतो. कधी झोपतो, कधी जागा होतो. पावसांच्या सरींबरोबर स्वत:च स्वत:ला ऐकत स्वत:च स्वत:शी स्वत:लाच गुणगुणत राहतो. दिवसभर पडला की पाऊस पण दमतो आणि संध्याकाळी विश्रांती घेतो. रात्री आकाशातले काळे ढग थोडे विरळ होतात आणि चंद्र हळूच उगवतो. मी हळूच उठून बसतो आणि डोळे किलकिले करून इकडे तिकडे पाहतो. मी बिलकूल घाईत नसतो. मला कधीच कुठेच कोणाकडे जायचं नसतं. मानवी मनाला निर्जीव करून टाकणारी पैसा, घड्याळ आणि इतर कृत्रिम बंधनांनी माझं आयुष्य नियंत्रित करणं मला मान्य नसतं. मी स्वैर होतो सळसळणाऱ्या पिंपळासारखा...पावसांच्या सरीसारखा...मी एक धबधबा होतो माझ्या आतमध्ये फेसाळणारा पांढरा शुभ्र...चैतन्याने भरलेला आणि उर्जेने सळसळणारा...कोसळायला लागला की प्रचंड ताकदीने कोसळणारा...मला माहित आहे मला कोणी रोखू शकत नाही...आयुष्य जगण्यापासून. मी अनंत होतो थोडासा माझ्या आतमध्ये...आणि परत एकदा थंडगार धुकं दाटून येतं चहूबाजूने माझ्या. मी हरवून जातो स्वत:तच काही क्षण का होईना अनंत काळासाठी...

~ MKs Kimantu Omble
https://www.facebook.com/profile.php?id=100001951428644

Related Posts:

  • विचार भरत दादा -आपण जितके साधे राहत जाऊ,आपल आयुष्य तितक सोप आणि सुंदर होत जात.मोठेपणा मिरवणारी माणस नंतर एकलकोंडी होत जातात..!!~ Bharat Jadhav https:/… Read More
  • शब्दोत्सव #मराठी  शब्दोत्सव मी मराठी उपक्रम  एक लेखक/लेखिका एक विचार #शब्दोत्सव … Read More
  • पुर्वी मोबाईल नावाचं काय गम्मत असते पहा !पुर्वी मोबाईल नावाचं यंत्र भारतात नव्हतं तेव्हा महिला आपल्या चेहर्‍यावरचा मेकअप, ओठांवरची लिपस्टिक , डोळ्यांला लावणारे काजळ, केस… Read More
  • मनमन ताजं व्हावं, म्हणून घरì… Read More
  • लेख #मराठीमला नेहमी साधं सरळ जगायला आवडतं. जेव्हा आजच्या सारखा खूप पाऊस पडतो, तेव्हा आत्ताच्या सारखा मी खिडकी शेजारी माझी आरामशीर खुर्ची टाकून बसतो आणि … Read More

0 comments: