Monday, November 27, 2017

कोणे एके काळी म्हणे...

कोणे एके काळी म्हणे...
'Windows' म्हणजे 
एक 'खिडकी' होती 
आणि
'Applications' म्हणजे 
कागदावर लिहिलेला
'विनंती अर्ज' होता...
जेव्हां 'Keyboard'
म्हणजे 'पियानो'
आणि
'Mouse' म्हणजे
फक्त 'उंदिरच' होता...
जेव्हां 'File' ही
कार्यालयातील
'एक महत्वाची वस्तू' होती
आणि
'Hard Drive' म्हणजे
महामार्गावरील 'एक
जिकिरीचा वाहन प्रवास' होता...
जेव्हां 'Cut' हे 'चाकूने किंवा
धारदार शस्त्राने' करत होते
आणि
'Paste' हा
'डिंका' ने करत होते...
जेव्हां 'Web' म्हणजे
'कोळ्याचे जाळे' होते
आणि
'virus' ने फक्त
'तापच' येत होता...
जेव्हां 'Apple'
आणि
'Blackberry'
ही केवळ 'फळेच' होती...
त्यावेळी म्हणे आपल्याकडे
कुटुंबासाठी,
आणि
मित्र-मैत्रिणींसाठी
मुबलक वेळ होता...!!!
कोणे एके काळी म्हणे...
खरंच काय असं होतं...???
#fb #msg

Wednesday, November 22, 2017

डॉ. रखमाबाईंची संघर्षगाथा

डॉ. रखमाबाईंची संघर्षगाथा



चंद्रकांत पाटील

प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा २२ नोव्हेंबर हा जन्मदिन. यंदाचं त्यांचं १५२वं जयंतीवर्ष आहे. त्यानिमित्ताने आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी दिलेल्या लढ्याची ही कथा…

रखमाबाई राऊत. डॉक्टरकीची पदवी मिळवून प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर. डॉ. आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्या, परंतु लगेचच आजारपणात त्यांचा मृत्यू झाल्याने त्या डॉक्टरकी करू शकल्या नाहीत. रखमाबाईंनी मात्र तहहयात डॉक्टरकी केली आणि निभावलीही. सोबत समाजकार्याचा वसाही जपला. एक बुद्धिमान, बाणेदार, धाडसी आणि सेवाव्रती असं रखमाबाईंचं व्यक्तिमत्त्व होतं. आज स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती असे शब्द खूप सहजपणे वापरले जातात आणि ते महत्त्वाचेही आहेत. परंतु सव्वाशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने आपल्या ज्ञानाच्या तुलनेत खूपच सामान्य असलेल्या नवऱ्याला नाकारणं ही त्या काळाच्या परिप्रेक्ष्यात क्रांतिकारी घटना होती. मात्र मोहिनी वर्दे यांनी १९८२ मध्ये ‘रखमाबाई : एक आर्त’ हे पुस्तक लिहीपर्यंत त्यांच्या कर्तृत्वावर काळाचा पडदा पडलेला होता. मात्र आता रखमाबाईंचं कर्तृत्व काळानेच उजळून देण्याचं ठरवलेलं असावं. त्यामुळेच प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी रखमाबाईंच्या आयुष्यावर आणि कर्तृत्वावर सिनेमा बनवला आहे.

रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी चौधरी इंग्रज सरकारच्या नोकरीत असल्याने त्यांना सरकारदरबारी मानमरातब होता. त्यांना जयंतीबाई नावाची मुलगी होती. तिचा विवाह वयाच्या १५व्या वर्षी १८६३ मध्ये मुंबईतील गोरेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक जनार्दन सावे ह्यांच्याशी झाला. २२ न‌ोव्हेंबर १८६४ साली जयंतीबाईंनी एका मुलीला जन्म दिला. ती मुलगी म्हणजे- रखमाबाई. दुर्दैवाने जयंतीबाई १७ वर्षांच्या असतानाच जनार्दन सावे यांचं निधन झालं आणि जयंतीबाई रखमाबाईला घेऊन वडिलांकडे आल्या.



आपल्या विधवा मुलीचा व नातीचा भविष्यकाळ सुखाने जावा म्हणून हरिश्चंद्र चौधरी यांनी आपल्या मुलीचा पुनर्विवाह डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी लावून दिला. राऊत हे ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे प्राध्यापक होते. ते आधुनिक विचारसरणीचे होते. डॉ. राऊतांनी छोट्या रखमाबाईंचासुद्धा स्वीकार केला व रखमाबाई ‘सावे’ऐवजी ‘राऊत’ झाल्या.

आताच्या पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील दातीवऱ्याच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी वयाच्या ९व्या वर्षी रखमाबाईंचं लग्न झालं. मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी श्रीमंत होते, परंतु निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय न करता, ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने राहता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू शकत नाही. आपली डाळ शिजत नाही हे कळल्यावर दादाजीने १८८४ मध्ये तिला वकिलांमार्फत नोटीस पाठविली. न्यायाधीश पिन्हे ह्यांच्यावर या खटल्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पिन्हे ह्यांनी ‘लहानपणी लग्न झालेली मुलगी आता सज्ञान झाली आहे. निर्णय घेण्याची क्षमता तिच्यात आली आहे. चांगले आणि वाईट याची जाणीव झालेल्या स्त्रीला नवऱ्याकडे पाठविण्याची सक्ती करणे रानटीपणाचे ठरेल’, असं सांगून निर्णय रखमाबाईंच्या बाजूने दिला.

ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. ‘नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून कोर्टाच्या निर्णयावर टीका करण्यात आली. लोकमान्य टिळकांनीही आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं.

त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला. परंतु रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही. २३ वर्षांच्या रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली. विदेशातील ‘लंडन टाइम्स’, ‘सेंट जेम्स् गॅझेट’ अशा अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून हा विषय गाजू लागला. इंग्लंडमध्येसुद्धा सामाजिक धुरिणांचा चर्चेचा विषय बनला. तेथील विचारवंत महिलांनी रखमाबाईंना सहकार्य करण्याचं आश्वासन पत्राद्वारे दिलं. ‘लंडन टाइम्स’चे बिशप ऑफ चाल्टरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व व्हॉइसरॉय ऑफ हिंदुस्थान ह्यांच्या कानावर ही बातमी घातली. परिणामी हा खटला प्रिव्ही कौन्सिलसमोर पुन्हा नव्याने चालविण्याचं ठरलं. या खटल्याच्या खर्चासाठी प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी ‘रखमाबाई ए हिंदू लेडी डिफेन्स कमिटी’ या संस्थेची स्थापनाही केली.

हे सगळं पाहून रखमाबाईंचे पती दादाजी आणि मामा नारायण धर्माजी यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचं ठरवलं. इंग्लंडमध्ये जाऊन लढण्याची त्यांची ताकद नव्हती. तसंच जनमत आपल्याविरुद्ध जात आहे याची जाणीव त्यांना झाली होती. शेवटी रखमाबाईंशी चर्चा करून असा निर्णय घेण्यात आला की लग्नाचा व कोर्टाचा खर्च म्हणून रुपये २०००/- दादाजींना देऊन कायदेशीर घटस्फोट घ्यायचा. त्याप्रमाणे ५ जुलै १८८८ मध्ये हा वाद मिटविण्यात आला.

रखमाबाईंच्या आयुष्यातील एक संघर्षमय वादळ शमलं. त्यांचं अर्धं आयुष्य जीवनाशी संघर्ष करण्यात गेलं. आता नव्या पर्वाला सुरुवात होणार होती. त्यानंतर रखमाबाईंनी आपल्या भूतकाळाचं गाठोडं बाजूला ठेवून आपलं लक्ष पुढील शिक्षणाकडे केंद्रीत केलं. त्यांच्या संघर्षमय जीवनामुळे त्यांचं नाव इंग्लंडमधील अनेक स्त्रियांना परिचित झालं होतं. तेथील एक महिला डॉ. एडिच पीची फिप्सन यांनी रखमाबाईंना इंग्लंडमधील वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं, तसंच लेडी मॅक्लेरन यांनी आपल्या घरी राहण्याची सोय करीन असं कळवलं. त्यामुळे इंग्लंडमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक विषयाचा अभ्यास फक्त चार महिन्यांत पूर्ण करून रखमाबाईंनी ऑक्टोबर १८९० मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन’ ह्या कॉलेजात प्रवेश घेतला. लांब हाताचा ब्लाऊज, पांढरी साडी, कपाळावर मोठं कुंकू, असा त्यांचा पोशाख. १८९१ व १८९२ मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल हॉस्पिटल’मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी शवविच्छेदन व अॅनेस्थेशिया ह्या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर डब्लिन येथील ‘रोटांडो’ हॉस्पिटलमध्ये मिडविफ्री व स्त्रीरोगतज्ञ हा शिक्षणक्रम पूर्ण केला. नॅशनल डेंटल हॉस्पिटलमध्ये दंतचिकित्सेचं शिक्षण घेतलं. तसंच ‘बाळंतपणातील शस्त्रक्रिया’ ह्या विषयात ‘लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन’ येथे त्यांनी परीक्षेत ऑनर्स मिळविला. अशा विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८९४ मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. परंतु लंडन विद्यापीठाला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार नव्हता. रखमाबाई खचल्या नाहीत त्यांनी पुढील परीक्षेसाठी ‘जॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजस् ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिंबरा’ येथे प्रवेश घेतला. येथे त्या उत्कृष्ट मार्कांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या नि त्यांच्या नावापुढे एम्.डी. आणि एल्.आर.सी.पी. अँड एस् (Licential of the Royal Collage of Physicians & Surgeons) ही उपाधी लागली. ‘डॉ. रखमाबाई सखाराम राऊत’ ह्या नावाने त्या डिसेंबर १८९४ मध्ये भारतात परतल्या.

मुंबईत परतल्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात रखमाबाईंनी मुंबईतील ‘कामा’ हॉस्पिटलमधून केली. तिथे त्या हाऊस सर्जन होत्या. नंतर त्या गुजरातमध्ये गेल्या. सुरतमध्ये ‘शेठ मोरारजीभाई व्रजभूषणदास मालवी’ ह्या हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. ह्याच काळात मुंबई, दिल्ली, राजकोट, सुरत इत्यादी ठिकाणी त्यांनी लंडनमधील ‘डफरीन’ या संस्थेच्या सहकार्याने हॉस्पिटलची उभारणी केली. १८९६ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हा त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘इंग्रज ए हिंद’ हा बहुमान दिला.

डॉ. रखमाबाईंनी वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिलं, तसंच सामाजिक कार्यातही. १९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं. विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली. १९३२ मध्ये त्यांनी गावदेवी मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्यांनी कामाठीपुरातील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने आयोजित केली. वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या, आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत धडपडणाऱ्या रखमाबाईंनी २५ डिसेंबर १९५५ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

ऊर्जेची अखंड ज्योत निमावली! स्त्रीशक्ती विचारांचं घोंघावणारं वादळ रुढार्थाने शमलं. पण त्यांनी दिलेला लढा सर्वकालिन महिलांसाठी आदर्श आहे!
Maharashtra Times | Updated: Nov 19, 2017, 12:23AM IST

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/dr-rahamabais-confrontation/articleshow/61703292.cms



तिहाई

तिहाई...

मरणाचा क्षण असा असावा
नितळ निळे आभाळ दिसावे
मुसळधार बरसाती नंतर
स्वच्छ कोवळे ऊन पडावे

निसर्ग गंधीत आसुसलेला
स्वागतास मधु अधीर असावा
मातीने बाहू पसरावे
आकाशाने आ वासावा

कळ हृदयाशी यावी अंधुक
कळले किंवा कळू न यावे
आह मुखातून येता येता
आहा आहा वाह निघावे

आत्ता चालत बोलत होता
लोकांमध्ये कुजबुज व्हावी
गर्दी जराशी इकडे, तिकडे ...
दर्द भरी शांती पसरावी

फांदीवरच्या पक्ष्याचाही
सूर अलविदा व्हावा हळवा
निरोप घेण्यासाठी वळतो
मरणाचा क्षण तसा दिसावा

नाम

आम्ही माणूस

आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो
-----------------------------------------
---------- वसंत दत्तात्रय गुर्जर
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
आम्ही बोलू शकतो वाचू शकतो अन् ऐकूही शकतो।
आणखी एक।
आम्ही माणसांत राहू शकतो।
नाहीतर पशुपक्षी।
फक्त पहातात ऐकतात ऐकून घेतात न् समजूनसुद्धा।
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
====
====
आम्ही प्रेम केलं।
चांगल्या मुलीवर।
तीही चांगली गोष्ट झाली।
ती गोष्ट काही माणसांना सांगावीशी वाटली सांगितलीही।
नाहीतरी लपवून ठेवण्यात काहीच अर्थ नाही।
एक दिवस समजणारच।
आम्ही प्रेमात फसलो।
तीही गोष्ट काही माणसांना सांगितली।
कुणाचाच दोष नव्हता।
होतं ते सगळं भल्यासाठीच।
आता प्रेमबिम करायचं नाही।
तसं कधी वाटलं तरीसुद्धा
=====
=====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
आम्ही ओरडू शकतो गाऊ शकतो हसू शकतो रडूही शकतो।
काहीकाही वेळा मुद्दाम अशाही गोष्टी कराव्या लागतात।
शेजारच्या खोलीतला माणूस एक दिवस देवाघरी जातो तेव्हा रडावं लागतं सगळे रडतात म्हणून।
नाही रडलं तर म्हणतात ह्याला भावना नाहीत।
मी गेलो तर कुणी रडू नये खरंखरं न् कृत्रिमही।
कारण सर्वच माणसं देवाघरी जाणारायत।
मग रडायचं का नि कशासाठी।
जन्माला आला मरेपर्यंत जगला मेला एवढंच।
जन्माला आला।
काहीतरी झालं पाह्यजे त्याच्या हातनं तेही एवढ्यासाठीच
====
====
आम्ही हसू शकतो।
केळाच्या सालीवर जेव्हा नायलॉनी स्त्री पडते तेव्हा।
खरंच खरंच बरं वाटतं तेव्हा पाहताना अन् आम्ही हसतोही।
हसलंच पाह्यजे चालता येत नसलेल्या उंच टाचांच्या सॅंडल्स घालणा-या स्त्रियांना।
नाही।
एका दृष्टीने आम्हीही चुकतो।
लिपस्टिकनं एखाद्या स्त्रीची शान वाढत असेल ओठ काळे न होता तर लावायला हरकत नाही।
उंच टाचांच्या सॅंडल्स घालून चालता येत असेल तर वापरायला हरकत नाही।
क्रेप नायलॉनचा आखूड बाह्यांचा ब्लाउझ अन् बिजली नायलॉन साडी नेसून।
चांगली दिसत असेल तर नेसायला हरकत नाही।
तेवढी समंजस सौंदर्यदृष्टी असलीच पाह्यजे
====
====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो। चांगलं झालं।
डोळ्यांना मोहवणारे क्षण आम्ही पकडू शकतो।
किती किती चांगलं वाटतं मनात गुदगुल्याही होतात।
एखादी अनाहूत मुलगी रस्त्यात भेटते।
अन् म्हणते।
आपण त्या दिवशीचे 'तुम्ही'च का?।
काव्यवाचन केलेले?
आवडलं मला।
कशा हो कविता लिहिता?
हे तुम्हाला जमतं कसं?।
एकापाठोपाठ एक प्रश्न।
उत्तर एकच।
आता जपून वागलं पाह्यजे।
प्रेमबिम काही नाही।
वाटलं तरीसुद्धा।
ती चांगली आहे।
मीही चांगला आहे।
माणसं चांगली आहेत।
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
तेही चांगलंच आहे।
कधी रंगात आलो की आम्ही गाऊ शकतो।
आमच्याबरोबर इतरांच्या कविता।
तेव्हा आवाज आपोआप आपला चांगला वाटतो गळा नसूनसुद्धा।
काय गंमत आहे नाही।
आम्ही ओरडू शकतो।
झालाच पाह्यजे झालंच पाह्यजे।
अमक्यातमक्याची दादागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी।
जो हमसे टकराएगा मिट्टीमे मिल जाएगा।
हमारी माँगे हमको दो नहीं तो कुर्सी छोड दो।
अमकातमका मुर्दाबाद अमकातमका झिंदाबाद।
आम्ही ओरडू शकतो
=====
=====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
ओरडू शकतो गाऊ शकतो हसू शकतो रडूही शकतो।
अन् आणखीनही काही करतो निसर्गानं दिलेल्या शक्तीनुसार
====
====
सवय सवय म्हणून।
सकाळी दात घासतो।
किडू नयेत म्हणून।
सकाळी टमरेल घेऊन रांगेत उभं राहतो शारीरिक शुद्धीसाठी।
सकाळी आंघोळ करतो।
रोग होऊ नयेत म्हणून।
सकाळी वर्तमानपत्र वाचतो।
जगाचं ज्ञान होण्यासाठी।
मग साडेनवाला आम्ही जेवतो। जगण्यासाठी।
मग ऑफिसात जातो।
काम करतो।
एकशे एकसष्ट रुपयांसाठी।
संध्याकाळी घरी येतो।
आईवडलांनी लग्न लावून दिलेल्या मुलीबरोबर फिरायला जातो।
चौपाटीवर फिरायला जातो।
नारियलका पानी पितो।
घरी येतो जेवतो।
मी माझ्या खाटेवर झोपतो।
ती तिच्या खाटेवर झोपते।
सवयीनुसार मी तिच्या खाटेवर जातो।
कधीकधी तीही माझ्या खाटेवर येते।
सकाळी मात्र आम्ही।
ती तिच्या खाटेवर असते।
मी माझ्या खाटेवर असतो।
आई बाहेरच्या खोलीत असते।
वडील गॅलरीत असतात।
मग मी दार उघडतो।
दुधाच्या दोन बाटल्या हातात घेतो।
आदल्या रात्रीचा शर्ट घालतो।
तीन जिने उतरतो।
दूधसेंटरवर येतो।
चोपन्न पैसे देतो।
दोन बाटल्या घेतो।
दुधाच्या।
तीन जिने चढून पहिल्या खोलीत येतो।
तेव्हा बायको स्टोव्ह पेटवते।
मग मी दात घासतो।
आदल्या दिवसाप्रमाणंच सर्व करतो
====
====
आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो।
चांगलं झालं।
आम्ही माणूस म्हणून मरणार।
तेही चांगलंच आहे।
सहा हातांच्या तीन तोंडांच्या ईश्वरानं मला शांती द्यावी।
हेही चांगलंच आहे।
खूप चांगलं आहे।
ईश्वर मला शांती न् सद्गती देवो।।
====
====
वसंत दत्तात्रय गुर्जर

पाऊस गाणे

पाऊसगाणे
=======

------------
धुम्मसधारा कडेकपारी
काजळ्काळ्या अंधाराला
गंधाराची गंधीत बाधा
पाऊसगाणे

पाऊसगाणे गातो पाऊस
धिड्‍ धित्तांग कधी रिं झिं रिं झिं
कधी कधी म्हणतो तालसुरातून
कधी भटकतो बेतालातून वेताळागत
पाडून भिंती दिक्कालाच्या
वाहून नेतो कधीचे पाणी
कुठ्ल्या सहस्त्र वर्षांपुर्वी बनलेल्या त्या थेंबाची तो वाफ़ बनवतो
कुठल्या सहस्त्र मैलांवरती वाहून नेतो
थेंब कुणाच्या गालावरचा
कुठल्या गच्चीवरती पडतो
यक्ष कधीचा शब्द लादतो मेघांवरती
गडगडती ते, सरसर सरसर,
रस रस रस रस
आणि बरसतो आज इथे तो पाऊसगाणे.

मल्हाराचे घनघनांत घन स्वागत करती
आणि बरसती पाऊसगाणे
घन बरसे
धन बरसे वर्षा
मन तरसे
तन तरसे वर्षा-नुवर्षे

गाणे गातो पाऊस गंभिर
गातो पाऊस गंभिर गाणे
उथळ जलाची गहन निराशा
उथल पुथल करणार्‍या लाटा
नृत्यामध्ये मग्न होऊनी
नाचती तालावर मेघांच्या
हृदयामध्ये भग्न अशा त्या
जिव्हार लाटा उसळत उधळत नाचनाचती
पाऊसगाण्याच्या तालावर

चुकार पक्षी
भिजके पंख
आकाशाचा
शोधी रंग
घेई ठाव
नव्या दिशेचा
पत्ता नाही
कशाकशाचा
मुक्त उधळतो
(वार्‍याच्याही विरुद्ध जाऊन काय शोधतो
वरच्याच्याही विरुद्ध जाऊन काय मिळवतो)
ऐकत आहे
मनभावाने
सुप्तसुरांचे
मुक्तसुरांचे
सप्तसुरांचे
पाऊसगाणे
-----------

=======
-नाम