Wednesday, February 26, 2020

कविता

भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या घरादाराची राखरांगोळी करून घेणारे , अपरंपार हालअपेष्टा सोसणारे त्यागमूर्ती , क्रांतिकारकांचे मुकुटमणी , थोर साहित्यिक , महाकवी , नाटककार , समाजसुधारक , विज्ञानवादी विचारवंत आणि मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रेरणादायक स्मृतींना विनम्र अभिवादन !! जगातील क्रांतीकारकांमध्ये माझ्या भारतमातेचा हा सुपुत्र , महामानव त्याच्या हिमालया एवढ्या उत्तुंग त्यागाने उठून दिसतो . आजही कोट्यावधी युवकांना प्रेरणा देतो .
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक लखलखते सोनेरी पान , एक धगधगते अग्निकुंड , कोट्यावधी युवकांना क्रांतिकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा देणारे
अदभूत व्यक्तिमत्व क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २६ फेब्रुवारी हि पुण्यतिथी !!! त्यानिमित्त हि रचना !!!

******" स्वातंत्र्यवीर " ******
*****************************
अष्टभुजा देवीला स्मरूनी , शपथ घेतली मोठी
चला तोडू या सर्व शृंखला , समर्थ भाषा ओठी

अभिनव भारत हेच मानले , तुम्ही सदा गणगोत
कोट्यावधी युवकांच्या मनीचे , तुम्ही प्रेरणास्त्रोत

भोगूनी तुम्ही मरण यातना , दिला अमर जो लढा
मुजोर इंग्रज हबकून गेला , असाच भक्कम धडा

काळकोठडी अंदमानची , केलीत तुम्ही पवित्र
दगडाच्या भिंतीत ,कोरले स्वतंत्रतेचे चित्र

समुद्रासही धडकी भरली , पाहून तुमची छाती
तुमच्या स्पर्शे पुलकित झाली , भारतभूची माती

हसत भोगले देशासाठी , तुम्हीच काळे पाणी
तरुणांनाही स्फूर्ती ठरली , तुमची अमोघ वाणी

रत्नागिरीच्या राम मंदिरी , केलीत प्रेमळ क्रांती
पतित पावन करून दिधली , लक्ष मनांना शांती

बंदूक येथे हतबल झाली , पाहुनी तव लेखणी
जीवनयात्रा यज्ञकुंड अन , पारदर्शी देखणी

विचार बैठक भक्कम तुमची , उपमा नाही धीरा
पुन्हा पुन्हा मी झुकतो चरणी , स्वातंत्र्याच्या वीरा !!
*****************************************
मुरारी देशपांडे
*****************************************

#Fb share

0 comments: