मराठी अभिमानगीत : एक आनंदयात्रा
२८ फेब्रुवारी, २०१०! सकाळी ७ वाजता बिग एफ् एम् या रेडिओ वाहिनीवर कविवर्य सुरेश भटांचे शब्द निनादले. ‘मराठी अभिमानगीत’ वाजलं आणि खाजगी रेडिओ वाहिन्यांवर मराठी गाणी वाजायला सुरूवात झाली. आनंदयात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला. ज्या प्रश्नापासून हा प्रवास सुरू झाला होता, त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचून एक वर्तुळ पूर्ण झालं.
मराठी अभिमानगीताचं लोकार्पण झालं २७ फेब्रुवारी, २०१० - त्या सोहळ्याला काल दहा वर्षं पूर्ण झाली. सव्वा वर्षं लागलं या गाण्याच्या निर्मितीला. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर उभारलेला भव्य मंच! आठ हजारांचा जनसमुदाय! दिग्गजांच्या हस्ते मराठी अभिमानगीताच्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन होत होतं. डोळ्यांमधून आनंद ओसंडून वाहत होता. कौशलची सव्वा वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत होती आणि ते पाहताना मंदार आणि मी आनंदाने नि:शब्द झालो होतो. जे कुणाच्या कल्पनेतही नव्हतं, ऐकतांनाही जे अशक्यप्राय वाटत होतं, ते कौशलने पूर्ण करून दाखवलं, साकार करून दाखवलं. त्याची सगळी जिद्द, कल्पकता, आत्मविश्वास - सगळं मूर्त रूपाने हजारो लोकांना पाहायला - ऐकायला मिळालं.
या गाण्याच्या आणि प्रकल्पाच्या निर्मितीच्या पहिल्या क्षणापासून कौशलने मला यात सामावून घेतलं. त्यामुळे माझ्यासाठी तर हा सगळा प्रवास अधिक जिव्हाळ्याचा होता आणि आजही आहे. मी, मंदार, महेशदादा, उन्मेषच नव्हे; तर अनेकजण यात आपणहून सहभागी झाले. हा प्रकल्प ‘माझा’ आहे, ही ‘माझी’ जबाबदारी आहे, या भावनेने प्रत्येकजण आला. यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनात हा आपलेपणा निर्माण करायचं श्रेय अर्थातच कौशलला जातं. सव्वा वर्षं इतर कोणतंही व्यावसायिक काम न करता, कौशलने या एका गाण्यासाठी तन-मन-धन झोकून दिलं. हे खरोखरंच सोपं नव्हतं. अतिशय धाडसी निर्णय होता तो. मंदार सावलीसारखा कौशलच्या पाठीशी उभा होता. महेश वर्देंसारखा अत्यंत शिस्तबद्ध मार्गदर्शक सोबत होता, तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या प्रवासात अनेकजण सहभागी झाले.
तीन शहरांतल्या वेगवेगळ्या नऊ ध्वनिमुद्रणालयांत ‘मराठी अभिमानगीत’ आणि इतर दोन गाणी, वाद्यसंगीत आवृत्ती आणि समूहगान आवृत्ती ध्वनिमुद्रित झाली. बारा ध्वनिमुद्रक, पासष्ट वादक, एकशे बारा प्रस्थापित गायक, तीनशे छप्पन समूहगायक आणि चौदाशे लोकांच्या सकारात्मक सहभागातून साकारलं ‘मराठी अभिमानगीत’! एखाद्या गाण्याची जन्मकथा, त्याची निर्मिती, त्याचा प्रवास कुतुहलाचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, चर्चेचा, अभिमानाचा विषय ठरू शकतो आणि लोक अत्यंत प्रेमाने त्यासाठी एकत्र येतात असा अनुभव देणारं हे गाणं आहे ‘मराठी अभिमानगीत’! कविवर्य सुरेश भटांच्या ‘मायबोली’ कवितेचं ‘मराठी अभिमानगीत’ का झालं? कसं झालं? या गाण्याने नेमकं केलं तरी काय? - गेल्या दहा वर्षांत वेगवेगळ्या निमित्ताने हे सांगितलं गेलं. मराठी अभिमानगीत झाल्यानंतर ‘हा सगळा प्रवास लिहून काढ’, असा अतिशय मोलाचा सल्ला कौशलने दिला होता. प्रत्यक्ष त्या कामात सहभागी असणे वेगळं आणि तटस्थपणे ते सगळं मांडणं, हे ही खूप जबाबदारीचं आहे, असं वाटत राहिलं. दडपणंही आलं आणि अशा अनेक कारणांनी ते लिहिणं मागे पडलं.
आज मराठी अभिमानगीताच्या शतपट मोठा भव्य प्रकल्प आम्ही हातात घेतला आहे. या नव्या प्रकल्पाची सुरूवात होत असताना मराठी अभिमानगीताच्या आठवणींचा प्रवास नव्याने बळ देईल, प्रेरणा देईल, आत्मविश्वास देईल, असं वाटलं. म्हणून हा लेखनप्रपंच. कौशल म्हणतो - ‘उत्तम करण्याचा नुसता विचार करत बसण्याच्या नादात प्रत्यक्ष करणं राहून जातं, त्यापेक्षा सुरूवात करावी, वाट सापडत जाते.’ या नव्या वाटेवरून मराठी अभिमानगीताच्या आनंदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचं स्वागत!
शब्दांकन - अस्मिता पांडे.
छायाचित्र सौजन्य - संजय पटवर्धन
https://www.facebook.com/marathiabhimaangeet/
0 comments:
Post a Comment