प्रिय अबक ,
मला तुझे नाव माहित नाही . तुझे लिंग माहित नाही . तुझे वय माहित नाही . तुझे मासिक उत्पन्न माहित नाही . तुझे लाईफ स्टाईल माहित नाही . पण मला तू माहित आहेस ! मला तुझ्यातली नकारात्मकता माहित आहे . तुझी बदललेली मानसिकता माहित आहे . मला झाकलेला तू माहित आहेस . तुला मी माहित असायलाच हवा असे नाही . मी खुर्चीवर बसतो तेव्हा वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे असतो . खुर्चीवर नसताना अंकुर असतो . खरं सांगतो . . दोन्ही भूमिकांत मी आनंदी असतो . तसा तू मला दिसत नाहीस . सेल्फी मधे आनंद शोधणारी तू मला दमलेली दिसतेस . म्हणून तुझ्यासाठी थोडे शब्द . .
आपण पैशाने खूप वाढलोय . आनंदाने किती वाढलोय हे कधी तू पाहिले आहेस ? बरं आपल्या आनंदी व्हायच्या संकल्पना या वर्षात किती बदलल्यात रे .. नवीन फोन ,शूज , गाडी , हॉटेल , फॉरेन ट्रिप , इन्व्हेस्टमेंट , नवीन डील , नवीन व्यवसाय याने आपल्याला आनंद मिळतो . सकाळी उपमा मस्त झाला होता म्हणून शेवटचं आनंदी तू कधी झाला होतास रे ? आठवतंय . . कट्ट्यासमोर आई असेल किंवा बायको . . स्वयंपाक सुरु असताना कुडमुडे पणा करत शेवटच्या गप्पा कधी मारल्या होत्यास ? आठवतंय . . नाही आठवत ! आपण आयुष्यात खूप पुढं आलोय . . जीवनात मात्र बकाल झालोय . तू महागड्या हॉटेल मधे जातेस , पब मधे थिरकतेस , दोन चार अल्कोहोल शॉट्स पचवतेस . . हे सगळं करून तू घरी काय नेतेस ? एकटेपणा . . तुझ्या एन्जॉयमेंट ला सोशल मीडिया वर २००-४०० लाईक्स नाही आले तर तुझा मूड जातो ! अजून लाईक्स यायला अजून धडपड , अजून मोठी जागा . . अजून चांगले फोटो . . ही धडपड कधी संपणार गं ? या धडपडीचा भाग व्हायला का आपण मोठे झालो ?
तूला आठवतंय . . लहान असताना ,नंतर शाळेत जाताना रस्त्यावर सापडलेल्या फुलापासून ते कुत्र्याच्या पिलापर्यंत सगळं उचलून आपण घरी आणायचो . फुलपाखरं पकडायचो . हवेत भिरभिरणाऱ्या म्हातारीला पकडायला बेभान होऊन पळायचो . रुपयाला १६ या हिशेबाने मिळणाऱ्या मसाला , लिम्लेट च्या गोळ्या आनंदाने खायचो . आज हजारो रुपयांचे चॉकलेट फ्रिज मधे पडलेले असतात पण उत्साहाने खायची भावना होत नाही . का ? आपला उत्साह कोठे हरवलाय ? एका फोटोत एक कपडा आला की आपला त्यातला इंटरेस्ट संपतो . . दरवेळी नवीन कपडा आपल्याला लागतो . नात्यांचे पण असेच झाले आहे का ? अल्टर आणि रफ़ू करणारी पिढी भिकारी नव्हती रे . . त्यांच्या भावना प्रत्येक धाग्यात अडकल्या होत्या . आपले तागे आणि आपले धागे खूप क्षणभंगुर आहेत . शिलाई खूपच तकलादू . . आपले कपडेही लवकर खराब होतात आणि नातीही . . . आपण सतत नवीन शोधत असतो . . कपडाही नातेही . .
नवीन काय नसतं अरे . . तुझ्या टेबल वरचा पेन स्टेन्ड तू उजवीकडून डावीकडे ठेवलास की टेबल नवीन होते . केसांची बट तू मोकळी सोडलीस की तू नवीन होतेस . चेहेऱ्यावरचे भाव बदलेलेस की तू नवीन होतोस . यात शून्य खर्च आहे . पण तू बदलत नाहीस . तू अडकला आहेस .एका सोन्याच्या पिंजऱ्यात . तुला वाटणाऱ्या सोन्याच्या पिंजऱ्यात . ज्यात प्रवेश सहज होतो . सुटका होत नाही . तू शेवटची आनंदी कधी होतीस ? याच्या आठवणी तुला फारतर कॉलेज पर्यन्त नेतील . . त्या नंतर आपण व्यवहारी झालो . आपण हसायला सुद्धा 'मॅनर्स' ने लागलो . खरं सांगू . . इथंच आपण संपलो . आपल्या प्रत्येकाकडे सांगायला भरपूर आहे पण ऐकायला कोणीच नाही . . का ? आपले कान आणि मन फार लवकर बोअर होते . . आपण सगळेच खूप मोठे ओझे ओढत आहोत . . सतत . .
शाळेचे दप्तर कधीतरी रिकामे व्हायचे . . मनाचे दप्तर कधी रिकामे होणार ? उसवलेल्या नात्यांचे हिशोब तू मनात करत राहतेस . हुकलेल्या संधींची गणिते तू मनात सोडवत बसतोस . . त्याची उकल कधीच होत नाही . प्रश्न अजून गुंतागुंतीचे होतात . नात्यात करिअर येते . करिअर मधे नाते येते . तुला भरपूर पैसा मिळवायचा आहे . पैसा आपल्या मागील पिढ्यानी मिळवलाच नाही का ? अर्थात त्यांची स्वप्नं कधी आयफेल टॉवर खाली वाईन चे ग्लास पकडून किंवा किस करतानाचे फोटो काढण्याची नवती . सुट्टी म्हणजे नरसोबावाडी ,औदुंबर , पन्हाळा टोक म्हणजे महाबळेश्वर यातच संपली . ते या ठिकाणी जाऊन रिफ्रेश होत राहिले . तू अमेरिका पालथी घालून कधी जेट लेग तर कधी दमलो म्हणून झोपून राहिलास . . खरं सांग . . सुखाची बेरीज कोणी केली ?
मी पैसा मिळवूच नकोस म्हणत नाही . पैशा सोबत जरासे समाधान सुद्धा मिळव. थोडासा आनंद मिळव. थोडीशी शांतता मिळव .तुला एकटं राहायची भीती वाटते . . तुला संडासात पेपर लागतो , गाडीत एफ एम लागतो , बस मधे व्हाट्सअप लागतो . . का ? तुझ्यासमोर मोठा प्रश्न आहे . . मोकळं बसून करायचं काय ? खरं आहे . . आपण मोकळं बसून करणार काय ? आठवून आनंदी व्हावे असं आपल्याकडे आहे काय ? आपण बकाल आहोत . . . आपली ओळख फसवी आहे . आपल्या भावना आणि भावनांची गुंतवणूक तात्पुरती आहे . . यावर तू कधी विचार करणार आहेस ?? किंवा कधी विचार करुही नकोस . . त्याची काहीच गरज नाही .
तू जेव्हा माझ्या समोर खुर्चीत बसतोस /बसतेस तेव्हा तुझा एकटेपणा मला जाणवतो . तुझी तक्रार वेगळी असते . पण वेदना खूप खोलवर कोठेतरी असते . तुझे महाग कपडे , बाहेर थांबलेली चार चाकी , इंपोर्टेड घड्याळ , ओपीडीत पसरलेला तुझ्या परफ्युम चा मंद वास , तुझा बेस्ट ब्लेझर , कडक सन ग्लासेस , कल्पनेच्या पलीकडची महागडी चेष्मा फ्रेम , खिशातून डोकावणारे सोन्याचे कोटिंग असलेले पेन इत्यादी इत्यादी च्या पलीकडचा तू मला दिसतोस . घुसमटलेली तू मला दिसतेस . . शुष्क . . कोरडी! हे बघून मला वाटतं . . तुझ्या हातावर खडीसाखरेचा एखादा मोठा खडा ठेवावा , एखादा चिरमुऱ्याचा लाडू द्यावा , गुळाचा खडा द्यावा , रावळगावचे एखादे चॉकलेट द्यावे पण . . . . या गोष्टी हातावर पडल्या की लहानपणी जसे आपण खुलायचो तसे आता आपण खुलणार नाही . हातावरच्या गुळाच्या आनंदापेक्षा चिकट तळहात कसा साफ करायचा . . रुमाल खराब होईल आणि इथे टिशू तर दिसत नाही या भयंकर समस्येत तू गुरफटणार म्हणून मी कधीच काही देत नाही . . . तू आनंदात रमण्यापेक्षा समस्येत गुरफाटायची सवय मनाला लावली आहेस . . . . यावर तू निरुत्तर आहेस . मी हतबल !!
---
वैद्य .अंकुर रविकांत देशपांडे
एम डी (आयुर्वेद )
सांगली -पुणे
7276338585
https://www.facebook.com/ankur.deshpande4444
0 comments:
Post a Comment