*थोडक्यात नाहीये, पण महत्त्वाचं*
रविवारच्या बातमीनंतर बरेच विषय चघळले जात आहेत. हो, मी त्याला 'बातमी' म्हणतेय कारण ती बातमीच आहे. आपण त्यावर एखाद-दोन दिवस विचार करत बसू किंवा आठवडाभर किंवा आणखीन थोडा काळ; त्याउपर नाही. हे 'असं कसं बाई बोलता येतं' असं वाटू शकेल पण आहे ते असं आहे. आणि फार वाईट तरी कुठेय. आपण परवाही, कालही आणि आजही जेवलो, झोपलो (शांत लागली नसेल झोप पण झोपलो) - ह्या सगळ्या गोष्टी आपल्यातल्या सकारात्मकतेचीच लक्षणं आहेत.... म्हणजे अजूनही आपल्याला जगावंसं वाटतं, येणाऱ्या दिवसासाठी सज्ज राहावंसं वाटतं - चांगलंच आहे की!
याची दुसरी बाजू अशी की अजूनही आपण मानसिक आजारांची तीव्रता ओळखलेली नाहीये. कशी लक्षात येतील ती? अशी आजारपणं दिसतात का? छे! ताप आहे का? पोटात दुखतंय? जुलाब? उलटी? नाही ना. मग काही होत नाहीये. कारण मेंदू कसा काम करतो हे दिसतंय थोडंच. हे मन काय काय खेळ खेळतं, आयुष्यात काय उलथापालथ करतं हे भोगणाऱ्या माणसाच्या मेंदूत/मनात डोकावून कुठे पाहता येतं?
एका मर्यादेनंतर ते शरीरावर परिणाम करू लागतं पण आपण कधी थांबून विचार करतो का - शरीरावर परिणाम दाखवण्याइतपत मन किती ढवळून निघालं असेल? समुद्राच्या खोल तळाशी पाणबुड्यांच्या गोळीबाराच्या आवाजाने हैराण होऊन देवमाश्यांच्या कानातून रक्त येतं आणि ते समुद्र काठावर येऊन आपला प्राण त्यागतात तशी गत आहे ही!
Clinical depression, PTSD, anxiety disorders, panic attacks - थोडक्यात नैराश्यापासून आत्महत्येचा विचार करणं इथवरच्या अनुभवावरून सांगते, हे वाटतं त्याहून प्रचंड भीषण आहे. पण आता मी यातून बाहेर पडलेय. माझे मानसोपचारतज्ञ म्हणत, "हे elastic सारखं आहे, एकदा ताणलं की पुन्हा कधीच पूर्ववत होत नाही. त्यामुळे मला माहितीये मी कुठल्याही क्षणी या खोल दरीत उडी मारू शकेन आणि मी त्यासाठी मानसिकरीत्या तयारही आहे. फक्त आता मी मागच्या panic attack पेक्षा आगामी panic attackसाठी अधिक सज्ज आहे. माझ्या मानसिक स्वास्थ्याने (किंवा त्याच्या स्वस्थ नसण्याने) मला खूप काही शिकवलंय.
मागील काही वर्षात मी त्यावर उपाय शोधण्याचा, ते बरं करण्याचा आणि त्यासोबत जगायचा एकूणेक प्रयत्न करून पाहिला आहे. ज्यांनी मला या प्रवासात साथ दिली त्या डॉक्टर्स, मानसोपचारतज्ञ, counsellorsची मी ऋणी आहे. पण त्याहूनही अधिक मी आभारी आहे त्या प्रत्येक अनुभवासाठी आणि या मानसिक रोगांसाठी. त्यांनी माझ्या आयुष्याला समृद्ध केलंय, मला शहाणं केलंय.
त्या अनेक प्रयोगांपैकी काही आठवड्यांपूर्वीच केलेला self-love चा म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याचा प्रयोग. माझी मैत्रीण मधुरिमा मजुमदार याची कार्यशाळा घेते, त्यातच मी ह्याबद्दल शिकले. या प्रवासात, मला माझ्यातल्या “मला” शोधायचं होतं - नैराश्याच्या आणि चिंतेच्या काळ्या ढगांपलीकडे असलेल्या मला. कारण पाऊस कोसळत असला, ढग दाटून आलेले असले तरी सूर्य तिथेच असतो - आपल्या भव्य दिव्य तेजाने सगळी सृष्टी झळाळून टाकत असतो. आपल्या आतले आपण त्या सूर्यासारखेच असतो. आपल्यालाच हे नैराश्याचे, चिंतेचे ढग बाजूला सारून (कधी कधी ढकलून) त्या सूर्यप्रकाशात न्हावं लागतं. आणि हे आपल्यासाठी इतर कुणीही करू शकत नाही. कारण तो सूर्य आपल्या आत असतो - आपल्या मन, मेंदू आणि नकारात्मक विचारांप्रमाणेच.
या आत्मशोधाच्या, स्वतःला शोधून काढण्याच्या प्रवासात मी खूप काही शिकले. त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे इथे नमूद करते. (डिप्रेशन आणि मानसिक रोगांवरचे हे काही रामबाण उपाय नाहीत पण यांनी मदत होऊ शकेल नक्कीच ... अनुभवांवरुन सांगते)
१. स्वतःवर तस्संच प्रेम करा जसं प्रेम तुम्हाला इतरांकडून हवंय
स्वतःला आरशात पहा आणि स्वतःशी तस्सेच बोला जसं तुम्हाला इतरांनी बोलणं अपेक्षित आहे. हे फार बाळबोध आणि सोप्पं वाटेल पण तसं नाहीये. Anxiety issues आणि depression असणाऱ्यांसाठी एखाद्याच्या डोळ्यात बघून बोलणं म्हणजे वाघाशी नजरानजर केल्यासारखंच आहे. आणि ज्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलायचे आहे ते आपण स्वतःच असू तर अधिकच कठीण. खूप प्रत्यनांनी त्यात सहजता येऊ लागते.
असं म्हटलं जातं की इतरांकडून अपेक्षाच करू नये आणि स्वतःवरच इतकं प्रेम करावं की इतरांच्या प्रेमाची गरज भासू नये वगैरे वगैरे ते काही तेवढं खरं नाहीये. आपण समाजात राहतो, माणसाला माणूस लागतो. फक्त आपण आपल्यावर प्रेम केल्याने इतरांची गरज कमी भासते. आणि जसजसं इतरांवर अवलंबून राहणं कमी होतं तसतसं आपल्याला सशक्त वाटू लागतं. मानसिक आजारांमध्ये बऱ्याचदा निर्बळ असल्याची भावना सतत जाणवत राहते. ह्या प्रयोगामुळे या भावनेवर नियंत्रण ठेवता येते.
आणि असंही, आपण आपल्या माणसांवर "प्रेम" करायला पाहिजे; त्यांना आपली "गरज" बनावता कामा नये. ते एकूणच चुकीचं आणि अन्याय्य आहे - आपल्यावरही आणि आपल्या माणसांवरही.
२. "असू दे" असं म्हणा
जेव्हा इतर कुणीही असं म्हणत नसेल तेव्हा तुम्ही स्वतः म्हणा "असू दे" "It is Okay" "होतं असं". ना ह्यात अपराधीपणा वाटला पाहिजे, ना स्वतःला माफ करण्याची गरज आहे. फक्त स्वतःला आहोत तसे स्वीकार करण्याची गरज आहे. आणि जगाने तुमचा स्वीकार करण्याआधी तुम्ही स्वतःचा स्वीकार करणे फार गरजेचे.
स्वतःला एखाद्या ३ वर्षाचं मूल आहोत असे समजा, ज्याने आत्ताच TVचा रिमोट पाडलाय. तुमच्याकडे काही पर्याय आहेत: तुम्ही त्या बाळावर खेकसू शकता, त्याला शिक्षा करू शकता, त्याने केलेल्या कृतीचं समर्थन करू शकता किंवा नुसतं "असू दे" म्हणू शकता. कारण तुम्हाला माहितीये की त्या बाळाला काहीच कळलेलं नाहीये, कळू शकणार नाही कारण ते लहान आहे. ज्याला आपली चूक समजू शकते त्याला तुम्ही माफ करू शकता. पण नसेल कळत तर "असू दे" म्हणून विषय संपवू शकता.
तुम्हीच ते मूल आहात. तुम्ही चुकताय कारण तुम्ही ३ वर्षांचे आहात. तुम्हाला अजून १३ वर्षांचं व्हायचंय जेव्हा तुम्हाला कळेल की रिमोट असा फेकायचा, पाडायचा नसतो. (३ किंवा १३ हे प्रातिनिधिक अंक आहेत. अक्कल यायची तेव्हाच येते. वय बघून येत नसते)
बरेच लोक (किमान मी तरी) दुःखी असतात, निराश असतात कारण त्यांना "असू दे" म्हणणारं कुणी नसतं. मी स्वतःला शिक्षा करत असे आणि अधिकाधिक नकारात्मक विचार करत असे. आता मला कळतंय की कुणी हे म्हणेल म्हणून थांबू नये. आपणच आपल्याला म्हणावे "असू दे गं. होतं असं."
मला आठवतं, जेव्हा PTSD चा खूप परिणाम माझ्यावर झाला होता तेव्हाचा हा किस्सा. मी दुधाची पिशवी फोडून दूध उकळलं. त्यानंतर मी त्यावरून वाफ जावी म्हणून झाकण ठेवताना ते अर्धवट ठेवलं. मग मी फ्रिजमधून बटर काढलं आणि ते त्या तापलेल्या दुधाच्या झाकणावर ठेवलं. उकळेलंल दूध होतं म्हणजे झाकण किती तापलं असेल. अर्थातच बटर विरघळलं आणि टपाक्कन दुधाच्या पातेल्यात पडलं. दूध वाया गेलं. माझ्या घरच्यांनी काही बोल लावावा त्यापेक्षा खूप जास्त मीच स्वतःला बोलले. खरंतर घरचे कुणीच मला काही बोलले नाही. उलट मीच सतत स्वतःला बोल लावत होते, "मी अशी कशी वागू शकते!" मी जेव्हा हे माझ्या डॉक्टरांना सांगितले तेव्हा ते म्हणाले "असू दे गं". पण बहुतेक मला ते ऐकूच आलं नाही. आज लक्षात येतंय मी स्वतःला "असू दे गं" म्हणायला हवं होतं.
पण म्हटलं ना, अक्कल यायची तेव्हाच येते आणि ती योग्य वेळीच येते.
३. स्वतःला सांगा "हे ही सरेल. मी आहे तुझ्यासोबत. कधीच साथ सोडणार नाही"
हा पुढचा टप्पा आणि हीच शेवटची टीप. स्वतःला सांगा, "ज्यात तू अडकला आहेस/अडकली आहेस ते तात्पुरतं आहे. हे ही सरेल. आपण यातून बाहेर पडू. मी तुझ्यासोबत आहे. तुझी साथ कधीही सोडणार नाही." तुम्हाला इतरांनी जसं आश्वस्त करायला हवंय, अगदी त्याच पद्धतीने स्वतःशी बोला. कारण इतर लोक तसे बोलतील ही, आश्वासन देतील ही पण तुमचं मन त्यावर विश्वास ठेवलंच याची खात्री नाही. तुमचं मन आजारी आहे. ते इतरांचं नाही ऐकणार कदाचित पण तुमचं नक्की ऐकेल.
ते एका ३ वर्षाच्या बाळासारखं आहे. डॉक्टर म्हणतात, तू बरा/बरी होशील. पण त्याचा त्यावर विश्वास नसतो. पण हेच जेव्हा त्याची आई म्हणते तेव्हा ते बाळ विश्वास ठेवतं. कारण इतर कुणाहीपेक्षा त्या बाळाचा आपल्या आईवर विश्वास असतो. ती त्या बाळाला भरवते, बाळ आनंदी आणि सुदृढ असावं यासाठी सगळे प्रयत्न करते आणि त्यावर निरपेक्ष प्रेम करते.
आपल्याला नेमकं हेच करायचंय. स्वतःवर निस्सीम, निरपेक्ष प्रेम.
ता. क.: ही पोष्ट मी काल इंग्रजीत लिहिली होती. पण बहुतेक माझ्या मराठी वाचकांनी 'एवढं English कोण बरं वाचेल' असं म्हणून सोडून दिली असेल किंवा वाचली असेल पण नीट उमगली नसेल... म्हणून मी ती संपूर्ण पोष्ट मराठीतून लिहिली. या पोष्ट प्रपंचामुळे एका व्यक्तीला आधार मिळाला, मार्ग दिसला किंवा स्वतःवर प्रेम करावंसं वाटलं तरी मला पुरे. आपल्या मानसिक अवस्थेबद्दल असं समाज माध्यमावर लिहिणं सोपं नसतं पण आधार नसणं (अनेकदा असूनही) किंवा मार्ग न सापडण्याचे काय परिणाम होतात हे अवगत असल्याने, ते इतर कुणाच्या वाटेला येऊ नये असं मनापासून वाटतं.
यात बऱ्याच ठिकाणी भाषा आणि व्याकरण चुकलेलं असू शकतं. काही शब्दांना मला पर्यायी मराठी सुचले नाहीत/सापडले नाहीत किंवा मला नाही वाटलं त्या ठिकाणी मराठीतून व्यक्त व्हावं. आहे ते असं आहे. “असू दे”. असं मी स्वतःला सांगितलंय. तुम्हीसुद्धा मला समजून घ्याल ही अपेक्षा. :)