Sunday, July 5, 2020

ई साहित्य पुस्तक

आज आषाढाचा पहिला दिवस. 
आजचा दिवस महाकवी कालिदासांना समर्पित. संस्कृत महाकाव्यांच्या त्या असीम वैभवाचा रसास्वाद घ्यायचा दिवस.
तसाच हा ई साहित्य चा. २००८ च्या आषाढाच्या पहिल्या दिवशी ई साहित्य चे पहिले पुस्तक, छापील पुस्तक, ’ऑडवाटेच्या कविता’ बरोब्बर बारा वर्षांपुर्वी प्रकाशित झाले.
कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यमंदिरात झालेला तो सोहळा, ती गर्दी, त्या गळाभेटी, ती भाषणं, ते कवितावाचन आणि पुस्तकप्रकाशनाचा तो क्षण आपल्यापैकी प्रत्येकाला आठवत असेलच. ती सुरुवातच एवढी जबरदस्त होती की तो दमखम एक शतकभर तरी नक्कीच पुरेल. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गर्दीमुळे “आपल्या” सर्व लोकांनी उभे राहून आलेल्या पाहुण्यांना बसायला जागा करून दिली आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला. कारण हे “आपले” लोकही काही जवळपासचे रहाणारे नव्हते. नाशिक, पुणे, बोरिवली पनवेल अशा लांब्लांबच्या ठिकाणाहून आलेले. आणि तीन तास उभे राहिलेले हे माननीय कविगण होते. आजही त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे.
कार्यक्रमाचं नियोजन आणि संयोजन सॅमने केलेलं. पूर्ण स्वतःच्या खिशातून. अतिशय बारिकसारिक डिटेल्सची काळजी घेऊन त्याने हा कार्यक्रम पडद्याडून संयोजित केला. कुठेही कसलाही गडबड गोंधळ नव्हता.  प्रविण दवणे सरांना आणायची आणि परत न्यायची जबाबदारी स्वतःची गाडी घेऊन किरण मल्लावने पार पाडली होती. पुस्तकाचे संपादन प्रभा आणि मुक्ताने अत्यंत कुशलतेने केलं होतं. मुखपृष्ठावर अमृताने एक उडणारी कापसाची म्हातारी ठेवली होती. ती आपोआप हवेवर उडत उडत कुठवर आली ते आपण पहात आहोतच. प्रत्येकाकडे काही ना काही रोल होता आणि प्रत्येकाने तो समर्पणाने आणि समर्थपणे निभावला. सगळेच अननुभवी आणि अव्यावहारिक. त्यामुळे नवथर उत्साहाचा वावर जाणवत होता. सुदैवाने आजही तो उत्साह आणि प्रेम जाणवण्याइतपत उसळत आहे. 
कार्यक्रम तीन तास चालला. मला मिळालेले फ़ोटो व व्हिडिओ सोबत जोडले आहेतच. अजून कोणाकडे असतील तर द्या. भूपेशने आधीच दिलेले आहेत.  
ई साहित्य या शब्दाला जाहिर व्यासपीठ मिळाल्याला आज बारा वर्षे पूर्ण होत आहेत. एक तप. त्यासाठी कोणी कोणाचे आभार मानायचे आणि कोणी कोणाचे कौतुक करायचे हा प्रश्नच आहे. तर ते सगळे तूर्तास बाजूला ठेवून पुढचा मार्ग चालूया.
तू चालत रहा। तू चालत रहा।
चरैवति। चरैवति॥
#नाम
२२.६.२०२०
#esahity


0 comments: