Monday, August 16, 2021

शब्दमल्हार

#मराठी #Marathi #पुस्तक #Book

शब्दमल्हार ~ प्रवीण दवणे 
---------
जगणं तसं सर्वांचं थोड्याफार तपशीलानं तेच असतं. वेगळेपण येतं - ते तुमच्या आतल्या धडपडीमुळे !  त्या धडपडीचं मोल यश अपयश यात मोजता येतं  नाही . तुम्हाला तुमच्या आतल्या  चेहऱ्या पर्यंत  कितपत पोहोचता आलं , ते महत्वाचं असतं . कवितेचं बोट धरून तो चेहरा मी धुंडाळतो आहे . त्या  धुंडाळ ण्यात , ती दमछाक होण्यात एक गंमत आहे .

एक मन , आकाश शोधतानाची धडपड हि सुद्धा एक कविताच असते .

जे कुठचं नसतं ते आपल्यातून प्रकटतं याचं आनंद प्रत्येक कलावंताला असतो . आपल्याच कलाकृतीकडे 
अलिप्तपणे , चकित होऊन पाहण्याचे क्षण आनंद हि देतात आणि अंतर्मुख हि करतात . शब्द मल्हारा चे सूर 
सरस्वतीच्या गाभाऱ्यात आळविताना माझ्या कवितेने मला हि अनुभूती दिली .


Wednesday, August 4, 2021

तुमच्या दुकानात देव मिळेल कां?

 







तुमच्या दुकानात देव मिळेल कां? 
*******
पाच वर्षांचा एक छोटा मुलगा हातात एक रुपया घेऊन एका  किराणा दुकानात जाऊन ऊभा राहिला. 

दुकानदाराने त्या मुलास विचारले बाळा काय हवं तुला? 

त्या मुलाने दुकानदारास विचारले 
तुमच्या दुकानात देव मिळेल का? 

हे ऐकून दुकानदार संतापला आणि त्या मुलावर जोराने ओरडून त्याने त्या मुलाला दुकानातून हाकलून दिले. 

तो मुलगा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, असे करत करत ३० - ४० दुकाने फिरला. 

प्रत्येक दुकाना समोर जाऊन एकच विचारायचा तुमच्या दुकानात देव मिळेल का? 

शेवटच्या दुकानात एक म्हातारे आजोबा बसले होते, त्यांना पाहून ह्या लहान मुलाने विचारले, बाबा तुमच्या दुकानात देव मिळेल का? 

त्या आजोबांनी विचारले बाळा तुझ्याकडे किती पैसे आहेत? 

मुलाने प्रांजळपणाने सांगितले एक रुपया आहे माझ्याकडे. त्यांनी मुलाला जवळ घेत विचारले, बाळा तुला कशाला देव हवा आहे? तु देव विकत घेऊन करणार काय ? 

प्रश्न ऐकून मुलाला खूप बरं वाटले. त्याच्या अशा पल्लवीत झाल्या, बाबा असे विचारतात म्हणजे नक्कीच यांच्या दुकानात देव असणार आहे. 

तो म्हणाला ह्या जगात मला माझ्या आई शिवाय कोणीच नाही. रोज माझी आई कामाला जाते आणि माझ्यासाठी जेवण घेऊन येते. पण काल पासून ती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे. जर उद्या माझी आई मेली तर मला जेवण कोण देणार? 
डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवच तुझ्या आईला वाचवू शकतो.
म्हणून मी देव शोधतो आहे बाबा. 
आहे ना तुमच्या दुकानांत देव? 

दुकानदाराने त्या मुलाला विचारले किती पैसे आहेत तुझ्याकडे? 

फक्त एक रुपया बाबा. 
बरं, नको काळजी करू.
एक रुपयात देखील देव भेटेल!

दुकानदाराने तो एक रुपया घेतला आणि एक ग्लास फिल्टरचें पाणी त्या मुलाच्या हातात दिले आणि म्हणाला की हे पाणी घेऊन जा आणि तुझ्या आईला पाज. हे पाणी प्यायला दिले की आई तुझी ठीक होईल. 

दुसऱ्या दिवशी एक स्पेशालिस्ट डॉक्टर हॉस्पिटल मध्ये आले आणि आईचें ऑपरेशन झाले. कांही दिवसात ती ठीक ही झाली. 

डीस्चार्ज च्या दिवशी हॉस्पिटलचें बिल बघून ती बाई चक्रावली! पण डॉक्टर धीर देत म्हणाले. काळजी करू नका. एका वयस्कर व्यक्तीने हे सर्व बिल भरले आहे आणि सोबतच एक चिट्टीही ठेवली आहे. 

चिठ्ठी उघडून वाचताच, माझे धन्यवाद मानू नकोस,  तुला वाचवले ते परमेश्वरानेच. मी फक्त निमित्त होतो. तुला धन्यवाद द्यायचेच असतील तर आपल्या छोट्या अज्ञान बाळाला दे, जे बाळ एक रुपया घेऊन देव शोधत फिरत होते. 
यालाच म्हणतात विश्वास ... 
देवाला शोधण्यासाठी करोडो रुपये दान करावे नाही लागत! श्रद्धा, भाव, विश्वास असला की एक रुपयातही देव मिळतो. 

तात्पर्य: 
भक्ती साधी भोळी असू दे. फक्त मनापासुन नामस्मरण केले की देव कोणत्या न कोणत्या रूपात येऊन नक्की मदत करतो ....!

सुनील इनामदार

Tuesday, July 6, 2021

माझे अंतरंग

ईशान्य वार्ता या त्रैमासिकातून संपादक "उत्तम रानडे काका"(Uttam Ranade) यांनी माझे अंतरंग (भटकंती विशेष) या पुस्तकाबाबत व्यक्त केलेली प्रतिक्रिया.....
धन्यवाद काका... आपले आशीर्वाद असेच कायम राहूदे..._/\_

धीरज लोके (२००७)

Friday, July 2, 2021

शंख

शंख...पृथ्वीवर मिळणारं एक चमत्कारिक शास्त्र ..हो शास्त्रच म्हणावं लागेल.समुद्रमंथनात प्राप्त झालेल एक उत्तम रत्न आहे.शंखाला श्री लक्ष्मी देवींचा छोटा भाऊ मानला जातो.अथर्व वेदाच्या चौथ्या कांड मध्ये दहाव्या सुक्तामध्ये म्हटलं गेलं आहे की शंख हा अंतरिक्ष ,वायु,ज्योतिमंडल आणि स्वर्ण युक्त आहे.याचा ध्वनी शत्रूला म्हणजेच नकारात्मक उर्जेला निर्बल करतो,राक्षस /पिशाच्च यांना वाशीभूत करतो,अज्ञान व दारिद्रता,रोग निवारण करतो आणि आयुष्य वृद्धी करतो.
       शंख रोज वाजविणाऱ्या व्यक्तीची फुफ्फुसे खूप मजबूत असतात.अशी व्यक्ती दमा अस्थमाची शिकार होत नाही.शंख वाजविल्यानंतर शरीरातील पेशी आणि पेशी जागृत होतात.मेंदू जागृत होऊन मुक्ती स्थिती प्राप्त होते.शंखामध्ये गंधक,फॉस्फरस आणि कॅल्शियम आहेत.त्यामुळे शंखात पाणी भरले व ते प्यायले असता हे गुण आपल्याला मिळतात.शाखाचे पाणी किटानुनाशक आहे तसेच हे पाणी रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.शंखनाद नियमित करणाऱ्याना यकृताची समस्या ,डोकेदुखी,कर्णबाधा होत नाही.याचा ध्वनी मानसिक तणाव दूर करतो व त्यामुळे कुंडलिनी जागृत होतो.लहान मुलांमध्ये वाणी समस्याच असल्यास मुलांना शंखजल दिल्यास ही समस्या दूर होते असे म्हणतात.
      जोरात शंखनाद केल्याने गॅस्ट्रिक आणि पोटाच्या समस्या दूर होतात.शंख वाजविल्याने छातीचे स्नायू बळकट होतात.गळ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो.vocal cord आणि थायरॉइड संबंधित समस्या दूर होतात.शंख वाजवत अस्तनाशरीरात रक्तप्रवाह वेगाने होतो,केस गळण्याची समस्या देखील दूर होते,चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून सुरकुत्या दूर होतात,रात्रभर पाणी ठेवलेले शंखजल त्वचारोगावर लावल्यास त्वचा रोग दूर होण्यास मदत होते,शंखजलामध्ये गुलाबपाणी मिसळून केस धुतल्याने ते काळे व मुलायम दाटही  होतात ,शंखजल मध्ये तेवढेच पाणी मिसळून डोळे धुतल्यास डोळे निरोगी होतात.शंखजल सकाळी 3च. घेतल्यास बद्धकोष्ठता दूर होते.शंखनाद केल्याने प्रोस्टेट मसल्सना व्यायाम होतो,आंघोळीनंतर शंख त्वचेवर घासल्यास त्वचा उजळते व टवटवीत होते.
    माझा स्वतःचा अनुभव आहे की शरिरात उष्णता वाढल्यास शंख तळहातावर काही वेळ घासावा,म्हणजे शरीराचा दाह कमी होतो,शंखजलाने बीपी  नॉर्मल राहायला मदत होते.
       महाभारतातील श्री कृष्णांचा पांचजन्य शंख प्रसिद्ध आहे.तसेच अर्जुनाचा देवदत्त,भीमाचा पौंड्र ,युधिष्ठिराचा आनंतविजय ,नकुळाचा सुघोष व सहदेवचा मणीपुष्पक शंख प्रसिद्ध आहेत.शंखाचे एकूण तीन भाग आहेत1)पन्हळ 2)अग्र 3)मागील बाजू जिथे वलय असतात.
    शंखाच्या पृष्ठभागावर ब्रम्हा व अग्रभागात गंगा,यमुना आणि सरस्वतीचा वास आहे.दक्षिणावती शंखाच्या वरच्या बाजूला चंद्राचा वास असतो तर मध्य भागाला वरुणाचा.शंखजल स्नान तिर्थसमान फळं देते.
     जिथे शंखनाद होतो तिथे ईश्वरकृपा होते.शंखध्वनी जिथवर पोहोचतो तिथवर सकारात्मक ऊर्जा पसरते.हवेतील काही घातक विषाणूदेखील शंखनादाने मरतात.आपण शंखाला कान लावला तर समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.शंख हा एक नादब्रम्ह आहे.शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत पण शास्त्रानुसार वामवर्ती व दक्षिणावर्ती हे प्रमुख.
   शंखनाद शुभ जरी असला तरी रात्रीच्या वेळी तसेच संध्या आरतीला शंख वाजवणे अशुभ मानले गेले आहे.तसेच गर्भवती महिलांनी शंखनाद करू नये,अन्यथा गर्भावर अवास्तव दबाव पडण्याची शक्यता असते.पूजेचा शंख वाजविण्यास वापरू नये.शंख नर व मादी देखील असतात.नर शंख उजवे(पोकळ बाजू उजवीकडे) तर मादी शंख दवे असतात.मादी शंख ध्वनी करत नाहीत.उजव्या शंखाना दक्षिणावर्ती तर डाव्या शंखाना वामवर्ती वा लक्ष्मी शंख म्हणतात.
      परिवारात ताळमेळ वाढविण्यासाठी शंख उपयुक्त आहे.
वास्तुशास्त्रमध्ये मध्ये देखील शंखाचे महत्त्व आहे.शंख नेहमी प्रातःकाळीच वाजवाव,शुभ फळं देतो.
   - तन्वी भोसले

Wednesday, June 30, 2021

नथुराम गोडसे आणि गांधी


३० जानेवारी १९४८ ला गांधीहत्या झाली. जगभरातून शोक व्यक्त झाला. हत्या करणाऱ्यांना अटक झाली. खटला चालला. शिक्षा सुनावली गेली. आणि त्याची अंमलबजावणी म्हणून फाशीही झाली. 

ह्याच संदर्भात गांधीहत्येच्या खटल्याचे कागदपत्र वाचताना नथुराम गोडसेंच्या जबानीत मला असा एक एक उल्लेख आढळला की, “...जानेवारी १९४८ मध्ये गांधींनी सुरु केलेला उपवास सोडण्यासाठी त्यांनी ज्या ७ अटी ठेवल्या होत्या त्या सर्व हिंदूविरोधी होत्या...” मला खूप विचार करूनही ह्या नेमक्या अटींपैकी एकही आठवली नाही. थोडंफार शोधूनही कुठेच काही मिळालं नाही. आपल्याला शाळेत (किंवा ‘सरकारी’!) इतिहास सांगताना ह्या अटी नेमक्या काय होत्या हे कधीच सांगितले गेले नाही. जानेवारी १९४८ मध्ये गांधी हिंदू-मुसलमान ऐक्यासाठी उपासाद्वारे प्रयत्न करत होते वगैरे वरवरचे उल्लेखच सगळीकडे आहेत. अनेकांनी ते वाचलेही असतील. मग गोडसेंनी त्यांच्या जबानीत असं का सांगावं की त्या सर्व अटी हिंदूविरोधी होत्या? अश्या काय अटी होत्या त्या?

ब्रिटीश लायब्ररीत जुने न्यूजपेपर आर्काईव्झ शोधणं सुरु केलं. १९६६ पासून इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणारे ज्येष्ठ इतिहाससंशोधक आणि लेखक डॉ वासुदेव गोडबोलेही योगायोगाने नेमका हाच संदर्भ बराच काळ शोधत आहेत असे समजले. त्यांना मी ह्याबद्दल विचारणार इतक्यात त्यांचाच निरोपवजा हुकूम आला की ‘टाईम्स ऑफ इंडीया’ चे जानेवारी १९४८ मधले अंक पहा आणि ह्या ७ अटी काय ते शोधून कळवा. मग मात्र माझी खात्री झाली की आता हे प्रकरण तडीस न्यावेच लागेल.

पहिल्यांदा अर्थातच जानेवारी १९४८ चे ‘टाईम्स ऑफ इंडीया’ शोधायला घेतले. सुरुवात १२ जानेवारी १९४८ पासूनच्या अंकांनी केली. गांधींच्या उपवासाची सुरुवात - तब्येतीचे अपडेटस वगैरे सगळी माहीती होती पण त्यांनी उपास सोडण्यासाठी नेमक्या अटी काय ठेवल्या होत्या हे मात्र कुठेच नव्हते. १९ जानेवारी १९४८ च्या ‘टाईम्स ऑफ इंडीया’ मध्ये गांधींनी उपास सोडल्याची बातमी अगदी फ्रंट पेजवर होती आणि त्यात त्यांच्या त्या ७ अटी मान्य झाल्याची बातमीही होती. पण संपूर्ण पेपर शोधूनही त्या अटी मात्र काही सापडल्या नाहीत. गोडसे म्हणतात त्याप्रमाणे त्या खरंच हिंदूविरोधी होत्या का हे नेमकं समजायचा काही मार्ग नव्हता. मग आता काय करावं?

मग त्याच सुमाराचे सहज कुतूहल म्हणून बाकीचे जुने इंग्रजी न्यूजपेपर्स शोधायला सुरुवात केली. १९ जानेवारीच्या ‘डर्बी इव्हिनिंग टेलिग्राफ’ ह्या वर्तमानपत्रांत गांधींनी उपास सोडल्याची बातमी दिसली आणि सोबत हापण उल्लेख दिसला की त्या सात अटींपैकी एक अट ही होती की सप्टेंबर १९४७ च्या दंग्यानंतर दिल्लीतल्या ज्या ११७ मशीदी ज्यांची (हिंदू आणि शीखांनी) देवळं किंवा घरं बनवली होती त्यांच्या पुन्हा मशीदी बनवण्यात याव्यात. हे वाचून मला नाही म्हटलं तरी धक्काच बसला. एकतर कोणत्याही  भारतीय पेपरमध्ये ह्यातले कोणतेच उल्लेख नसावेत आणि ह्या सात अटी जर सगळ्याच अश्याच असतील तर मग?

मी इथले न्यूजपेपर आर्काईव्हज अजून जोमाने शोधू लागलो. ‘कोव्हेंट्री इव्हिनिंग टेलिग्राफ’, ‘डंडी इव्हिनिंग टेलिग्राफ’, ‘ग्लुस्टरशायर इको’, ‘द सिटीझन’, ‘बेलफास्ट न्यूज’, ‘बेलफास्ट टेलिग्राफ’, ‘बर्मिंगहॅम गॅझेट’, ‘द वेस्टर्न मॉर्निंग न्यूज’, ‘नॉटींघम इव्हिनिंग पोस्ट’, ‘हेराल्ड एक्सप्रेस’, ‘द स्कॉट्समन’, ‘लॅंकास्टर गार्डीयन’ वगैरे ह्या आणि अश्या फारश्या माहीत नसलेल्या इंग्रजी वर्तमानपत्रांच्या आर्काईव्हजमध्येही गांधीच्या उपवासाबद्दल बातम्या आहेत. (ही सगळी कात्रणं आहेत बरं का माझ्याकडे!) पण शोधत असलेल्या सगळ्या ७ अटी मात्र कुठेच मिळत नव्हत्या.

हा शोध आता सोडून द्यावा असा विचार मनांत येत असतानाच ‘द यॉर्कशायर पोस्ट’ चा १९ जानेवारी १९४८ चा अंक पहाण्यात आला आणि त्यात ह्या ७ अटी एकदाच्या मिळाल्या. काय होत्या बरं ह्या अटी? खाली मी त्या अटी देतोय. हा अटींवरून ह्या अटी खरंच गोडसेंनी सांगितल्याप्रमाणे हिंदूविरोधी होत्या का हे ज्याचं त्याने ठरवावं. गांधींचे विचार चूक किंवा बरोबर हे ज्याचं त्याने ठरवावं. माझं मत मी सांगणार नाहीये. 

अट १ - दिल्लीजवळच्या मेहरौली येथे मुसलमानांना त्यांचा उरूस साजरा करायची परवानगी असावी. (मेहरौलीत ख्वाजा कुतुबुद्दीनची मशीद होती. दंग्यांत त्याची मोडतोड झाली होती. हिंदू आणि शीखांनी त्याच्या आजूबाजूच्या मुसलमानांना हाकलून लावलेले होते. ह्या ख्वाजा कुतुबुद्दीनचा उरूस २६ जानेवारी १९४८ रोजी व्हायचा होता. पण तो करताना त्यात अडथळे येण्याची शक्यता होती. गांधींना हे नको होते.)

अट २ - दिल्लीतून पळून गेलेल्या मुसलमानांना सुरक्षितपणे परत येऊ द्यावे. 

अट ३ - दिल्लीतल्या ज्या ११८ मशीदींची देवळे बनवण्यात आलेली आहेत त्या मशीदी पुन्हा मुसलमानांना देऊन टाकण्यात याव्यात. 

अट ४ - संपूर्ण दिल्ली मुसलमानांसाठी सुरक्षित बनवण्यात यावी. 

अट ५ - रेल्वेतून प्रवास करणाऱ्या मुसलमानांच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी. 

अट ६ - हिंदू आणि शीखांनी मुसलमानांवर टाकलेला आर्थिक बहिष्कार मागे घेण्यात यावा. 

अट ७ - दिल्लीत उरलेले काही मुस्लिम वस्त्यांचे भाग पाकिस्तानातून आलेल्या हिंदू किंवा शीख निर्वासितांनी वापरू नयेत. 

सोबत ह्या सगळ्या कात्रणांचे फोटोही पहाता येतील. जाताजाता रामायणातल्या एका श्लोकाची मात्र नक्की आठवण करून देऊ इच्छितो:

मरणान्तानि वैराणि निवॄत्तं न: प्रयोजनम् |
क्रीयतामस्य संस्कारो ममापेष्य यथा तव || (रामायण ६ - १०९ - २५)

इत्यलम्!

- संकेत कुलकर्णी (लंडन)

Source : facebook

Friday, June 25, 2021

संग्रहित

विलक्षण योगायोगाची
एक भावुक सत्यकथा

💕❣️
 कथा घडली सुमारे ३५ वर्षांपूर्वी..

 मराठवाडय़ातील लातूर या गावात !! मी त्यावेळी लातूरच्या राजस्थान विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिकत होतो. आवडीचा विषय अर्थातच इतिहास आणि मराठी!! त्यातही मराठी जास्तच जवळची..!! कारण तो विषय शिकवणाऱ्या बाई खूपच मन लावून शिकवायच्या. त्यामुळे त्यांचा तास म्हणजे आम्हाला वैचारिक मेजवानीच असायची. केवळ पुस्तकात आहे, तितकेच न शिकवता त्याच्या अनुषंगाने इतरही बरेच काही त्या शिकवायच्या. त्यामुळे नकळत दृष्टी आणि मनदेखील व्यापक होत गेले. आज जाहिरातीच्या क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून वावरताना मी केलेल्या जाहिरातीमधील मराठी वाक्यरचना, त्याचे व्याकरण अतिशय नेटके व उठावदार असते, त्याचे सर्व श्रेय त्या ‘मराठी’ शिकवणाऱ्या बाईंचेच !!!

त्याकाळात त्यांनी जे मन लावून शिकवले.. ते केवळ परीक्षेतील दहापाच मार्कापुरते नव्हते तर अंत:करणापासून शिकवलेले असल्याने आमच्याही काळजात ‘मराठी’ ही संस्कृती रुजली आहे. याचे संपूर्ण श्रेय त्यांनाच !!

तर एकेदिवशी अशाच नेहमीप्रमाणे त्या तासावर आल्या. मराठवाडय़ातील परभणीचे एक महान कवी बी. रघुनाथ यांची ‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली’ ही कविता आम्हाला त्यावेळी पाठय़क्रमात होती. ती कविता बाईंनी शिकवायला सुरुवात केली. ती कवितादेखील त्या कवींच्या वैयक्तिक जीवनातील एक सत्यकथाच होती. ती त्यांनी शब्दांतून सजवली होती. 

कवितेचा थोडक्यात सारांश असा होता की, कवीची मुलगी लहान असताना भातुकलीच्या खेळातील एक लाकडी विठोबाची मूर्ती नेहमी आवडीने खेळायची. त्याच्याशी लाडेलाडे बोलायची. खोटा खोटा दूधभात त्या विठोबाला ती कधी कधी खाऊ घालायची तर कधी लटके रागवायचीदेखील..!! तिच्या विश्वातला तो ‘लाकडी विठोबा’ म्हणजे सर्वस्व होते.

कालांतराने भातुकली खेळणारी कवीची ती मुलगी मोठी होते. यथावकाश परंपरेप्रमाणे तिचे लग्न होते आणि ती मुलगी सासरी निघून जाते. आणि इकडे माहेरी (म्हणजे कवीच्या घरी) एका कोनाडय़ात त्या भातुकलीचा खेळ पडून राहतो. त्यातच तिचा तो लाकडी विठोबादेखील पडून असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर कवीला सासरी गेलेल्या आपल्या त्या लेकीची आठवण येते आणि कवी गहिवरून जातो. कारण मुलगी नसल्याने ते घर, ती भातुकली एकूणच सारे काही मुके मुके झालेले असते.

तो एकलेपणाचा गहिवर शब्दात मांडताना कवी बी. रघुनाथ.. जणू बाकीच्यांना सांगत असतात की.. हा विठोबा असा का एकटा पडलाय? तर त्याची देखभाल करणारी मुलगी जणू त्याची मायच होती, तीच आता तिच्या गावाला (म्हणजे सासरी) गेली आहे. त्या भावनेतून साकारले गेलेले ते अजरामर काव्य म्हणजेच… ‘‘पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली.. तिच्या मायेची ही पंढरी.. आज ओस झाली’’

ही कविता आमच्या त्या शिक्षिका बाई शिकवत असताना इतक्या तन्मयतेने शिकवत होत्या की नकळतपणे आमच्याही डोळ्यात ‘ती लेक सासरी गेल्यानंतरची वडिलांची भाव विव्हलता’ पाणी आणून गेली..!! कविता शिकवून संपली. वर्ग संपायला अजून पाच मिनिटे शिल्लक होती. वर्गातील सर्व मुले नि:शब्द झालेली..!! आणि त्या शांततेचा भंग करीत हळुवार आवाजात त्या बाई म्हणाल्या..

*‘‘मुलांनो… ती जी सासरी गेलेली मुलगी होती ना.. ती म्हणजे मीच आहे. कवी बी. रघुनाथ हे माझे वडील.. माझे लग्न झाल्यावर वडिलांनी माझ्यावर लिहिलेली ती कविता.. होती..’’*

हे ऐकताच आमच्या अंगावर सरसरून काटा आला. किती अलौकिक भाग्याचा तो क्षण होता. आम्ही सारेच दिड्मूढ झालो. काय बोलावे काहीच सुचेना.. साक्षात जिच्यावर कविता करण्यात आलेली, तीच मुलगी मोठी झाल्यावर आम्हाला तीच कविता शिकवायला येते.. किती विलक्षण योगायोग ना..???

त्या बाईंचे नाव.. सुधा नरवाडकर… आता त्या निवृत्त झाल्या असून नांदेड येथे आपल्या दोन्ही डॉक्टर मुलांसह आनंदाने उर्वरित जीवन जगत आहेत..!!

     *~ श्री. धनंजय देशपांडे, लातूर*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
 

चंदनाच्या विठोबाची
माय गावा गेली
पंढरी या ओसरीची
आज ओस झाली

कोनाड्यात उमडून
पडे घरकूल
आज सत्य कळो येई
दाटीमुटीतील

कांही दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

           ~ बी. रघुनाथ
✨✨✨

मराठी भाषा

विलक्षण मराठी भाषा....😇 

*रस्ता - मार्ग*
* जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता.
* जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग.

*खरं - सत्य*
* नेहमी खरं बोलावं हा उपदेश.
* सत्य म्हणजे सोबत पुरावा जोडावा लागतो.

*घसरडं - निसरडं*
* पडून झालं की घसरडं.
* सावरता येतं ते निसरडं.

*अंधार - काळोख*
* विद्युत पुरवठा खंडीत झाला की होतो तो अंधार.
* निसर्गात जाणवतो तो काळोख.

*पडणं - धडपडणं*
* पडणं हे अनिवार्य.
* धडपडणं हे कदाचित सावरणं.

*पाहणं - बघणं*
* आपण स्वत:हून पाहतो.
* दुस-यानं सांगितल्यावर होतं ते बघणं.

*पळणं - धावणं*
* पाकीटमार काम झाल्यावर जे करतो ते पळणं.
* ट्रेन पकडतांना आपण जे करतो ते धावणं.

*झाडं - वृक्ष*
* जे माणसांकडून लावलं जातं ते झाडं.
* जो आधीपासूनच  असतो तो वृक्ष.

*खेळणं - बागडणं*
* जे नियमानं बांधलेलं असतं ते खेळणं.
* जे मुक्त असतं ते बागडणं.

*ढग - मेघ*
* जे वा-याने ढकलले जातात ते ढग.
* जे नक्की बरसतात ते मेघ.

*रिकामा - मोकळा*
 * वेळ जो दुस-याकडे असतो तो रिकामा. 
* आपल्याकडे असतो तो मोकळा वेळ.

*निवांत - शांत*
*कष्ट केल्यानंतर मिळतो तो निवांतपणा.
* काहीच न करता बसून मिळतो तो शांतपणा.

*आवाज - नाद*
* जो आपल्या चालण्यानं होतो तो आवाज.
* जो मोराच्या चालण्यानं होतो तो नाद.

*झोका - हिंदोळा*
* जो आपला नंबर बागेत कधी लागेल याची वाट पाहायला लावतो तो झोका. 
* जो मुक्तपणे झाडांमधून खेळता येतो तो हिंदोळा.

*स्मितं - हसणं*
* मनात एखादी गोड आठवण आली की जे दिसतं ते स्मित.
* जे लोकां समोर दाखवावं लागतं ते हसणं.

*अतिथी - पाहुणा*
* जो यावा यावा असा वाटतो तो अतिथी.
* जो आला की कधी जाईल असं मनात येतं तो पाहुणा.

*घोटाळा - भानगड*
* जो अचानक नकळत होतो तो घोटाळा.
* जी नियोजनबद्ध पद्धतीने होते ती भानगड.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Saturday, June 12, 2021

पुलं

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख -

 'हॉस्पिटल' हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं... साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो... 

हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे 'दुष्यंत' नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला मी हॉस्पिटलमधे गेलो होतो !

यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा 'घाट' घातला. हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो... पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली 'ओ दूर जानेवाले' ची रेकॉर्ड आठवली.

हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला 'मेडिकल लँग्वेज' म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच 'जवळून' जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) ... 

त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.
अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं.

एवढ्यात नकळतपणे - मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची 'बातमी फुटली'! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' हे जेवढं खरं आहे तेवढंच 'व्यक्ती तितके सल्ले' हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना 'एका व्यक्ती मागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती' अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) 

लोकांचे सल्ले मात्र चालूच होते... 'स्वस्थ पाडून राहा', 'विश्रांती घ्या' इथपासून 'पर्वती चढून-उतरून या' इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं 'सिंहगड'सुद्धा सुचवला!) 'प्राणायाम', 'योगासनं' पासून 'रेकी'पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले! काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा 'मसाज', 'मालिश' असे शब्द उच्चारले.

डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.

हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!... मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली... 

अशा विचारांतच मला झोप लागली...

मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! 
आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत? नव्हतं सहन होत मला हे. मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते ! की कळूनही उपयोग नव्हता ?... ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले... अगदी कायमचेच...
आता ते सगळे लोक परत जातील आणि बहुधा माझी पुस्तकं त्यांना पुन्हा हसवतील ... अगदी कायमचीच !!!

#fbshare





Tuesday, April 20, 2021

माणुसकी

अप्रतिम कविता

1GB माणुसकी 
आम्हाला महिनाभर पुरते....

गुड़ मॉर्निग, गुड़ नाईट 
सर्व काही होते....

वाढदिवसाच्या शुभेच्छा ही 
त्यातून देता येतात
वाटतील तेवढे पुष्पगुच्छ ही 
पाठवता येतात....💐

अभिनंदन, स्वागत,
सर्व काही करता येते
श्रद्धांजलि द्यायला 
मौन ही धरता येते....😷

सर्व कसे अगदी 
ऑनलाइन चालते
1GB माणुसकी 
आम्हाला महिनाभर पुरते....

फेसबूक, whatsapp 
आणि काय काय राव
चॅटींग मधली मजा 
तुम्हाला कुठे ठाव....??

विनोद, मस्ती, 
असो कि जयंती, पुण्यतिथी 
पोस्टचा वर्षाव होतो 
साऱ्यांच्या माथी....

शाळेत नसेल शिकवित 
एवढे ज्ञान मिळते
1GB माणुसकी 
आम्हाला महिनाभर पुरते....

तसे भेटून बोलणे 
होत नाही आता फारसे
तुम्ही ऑनलाइन या ना 
बोलू मग खुपसे....

गेलात जवळून तर 
नमस्कार ही करु नका 
ऑनलाइन मात्र
हाय हॅलो विसरू नका....👋✌

थोडीशी virtual दुनियाच 
आता हवी-हवीशी वाटते
1GB माणुसकी 
आम्हाला महिनाभर पुरते....

ऑनलाइन जग झाले 
याची नाही खंत
माणुसकी आटत चालली 
हे मना सलतं....

भावनेचा ओलावा 
कोरडा झाला फ़क्त 
समुहात राहुनही 
एकटं एकटं वाटतं....

नुसत्या शब्दांनी 
ह्रदय कुठे हलते
1GB माणुसकी 
आम्हाला महिनाभर पुरते....!!

Thursday, March 25, 2021

मराठी माणूस १

श्री.मोरेश्वर केशव कुंटे व सौ. विजया मोरेश्वर कुंटे यांनी१८ नोव्हेंबर १९९१ पासून वानप्रस्थाश्रम स्वीकारला. यात त्यांनी देवदर्शन घ्यायला सुरुवात केली पण ती वेगळ्या प्रकाराने, एक-एक जिल्हा ठरवून त्यातील प्रत्येक शहरात, खेडेगावात जाऊन तेथील ऐतिहासिक माहिती, पूजेची पद्धत, सध्याची परिस्थिती याची माहिती घेऊन त्या मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण फोटो घेऊन त्यावर पुस्तक काढतात आणि मंदिर कोष रूपाने सादर करतात. 
1991 पासून आजपर्यंत ३३ जिल्ह्यांतील १८ हजाराहून अधिक मंदिरे त्यांचे २५ हजाराहून अधिक फोटो व M८० या दुचाकीने १,१५ लाख किलोमीटर चा प्रवास केला असून याविषयावर ४० पुस्तके लिहिली आहेत.त्यांच्या या कार्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ने दखल घेतली आहे. मंदिर कोषाचे गेली 20 वर्ष अथक पणे काम केले. 


सौजन्य  : fb 

Friday, March 12, 2021

जगातील सर्वश्रेष्ठ आई'_ चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष

*_'जगातील सर्वश्रेष्ठ आई'_ चा पुरस्कार मिळालेला भारतीय पुरुष......!!*

      मागील संपूर्ण आठवडा विविध माध्यमातून महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत काल ८ मार्च रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी "जागतिक महिला दिन " म्हणून साजरा केला गेला. 'जागतिक महिला दिना'च्या निमित्ताने वर्तमानपत्र, सोशल मिडियांचे रकाने महिलांच्या गुणगौरवाने भरलेले होते. देशभरात त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्यात महिलांना शुभेच्छा देत अनेक पुरस्कार दिले व घेतले गेले. यासर्व पुरस्कार समारोहात वेगळा आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रांनी घ्यावी असा समारोह म्हणजे बेंगळुरू येथे संपन्न झालेला 'वेमपावर'. या समारोहात "बेस्ट माॅम आॅफ द वर्ल्ड " हा खिताब जाहीर करण्यात आला तो एका पुरुषाला. बेस्ट माॅम म्हटले की, ह्या पुरस्काराची मानकरी महिलाचं असेल असे वाटत असतांनाच तो एका पुरुषाला म्हणजेच पुणे शहरातील आदित्य तिवारी यांना जाहीर झाला.
       आदित्य तिवारी हे सिंगल पॅरेंट असून २०१६ मध्ये २२ महिन्याच्या अवनिशला त्यानी दत्तक घेतले. मुल दत्तक घेतांना कोणताही पालक सुदृढ बाळाची निवड करेल, पण आदित्य यांनी  चक्क डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाची निवड केली. डाऊन सिंड्रोम हा मुलांमध्ये मतिमंदत्व आणणारा आजार असतो. हा आजार असलेल्या मुलांना काळजीपूर्वक जपावं लागतं. अशा मुलाला एक सिंगल पॅरेंट म्हणून मोठा कायदेशीर आणि सामाजिक लढा आदित्यला द्यावा लागला व शेवटी त्याची ममता जिंकली. साधारण दीड वर्षाच्या संघर्षानंतर १ जाने. २०१६ रोजी आईने अनाथालयात सोडलेल्या अवनिशला आदित्यला घरी आणता आले. दत्तक कायदा व समाजाप्रमाणे त्याला घरातूनही विरोध झालाच. परंतू अवनिशला आईची कमतरता न भासू देणा-या आदित्यमधील ममता यासर्व विरोधांना बाळगणारी नव्हती.
        आदित्य तिवारी एका सुप्रसिद्ध आयटी कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. परंतू अवनिशचे पालकत्व स्विकारल्यानंतर त्याच्या काळजीपोटी त्याने नोकरीवर पाणी सोडत 'स्पेशल' मुलांच्या आई-वडिलांना मार्गदर्शन, समुपदेशन व त्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. हे करत असतांना त्याला लक्षात आलं की, भारतात बौद्धिक अपंगत्वासाठी वेगळा विभागाचं नाही. सरकार अशा मुलांना अपंगत्वाचं प्रमाणपत्रही देत नाही. करीता आदित्याने आॅनलाइन याचिका दाखल केली. परिणामी आज सरकारकडून स्पेशल मुलांसाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला असून अशा मुलांसाठी प्रमाणपत्रही देण्यात यायला लागली आहेत.
      'सिंगल पॅरेटिंग' हे काही लिंग आधारित काम नाहीच असे म्हणणारा आदित्य त्याच्या या प्रवासाबद्दल, " ईश्वराने दिलेल्या भेटीमध्ये तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ भेट आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यशाली समजतो." असा सहज साक्षात्कारात बोलून जातो. आदित्याने स्वत:ला कधीच कोणत्याही भूमिकेत टाकण्याचा प्रयत्न केला नाही...ना आई, ना बाबा... तो नेहमीच एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करीत होता. एक चांगला पालक कसे बनायचं हे अवनिशने 'एक पालक' म्हणून आदित्याचा स्वीकार करीत शिकवलं.
        आजपर्यंत आदित्य आणि अवनिश यांनी मिळून २२ राज्यांची सफर केली असून जवळजवळ ४०० ठिकाणी कार्यक्रम व कार्यशाळा घेतल्या आहेत. याखेरीज ते जगभरातील दहा हजारांहून अधिक पालकांशी जोडले गेले आहेत. मानसिकरीत्या असमर्थ असणा-या मुलांचा सांभाळ करण्याच्या पध्दतीबद्दल बोलण्यासाठी आदित्यला संयुक्त राष्ट्राच्या एका संमेलनात विशेष आमंत्रित करण्यात आले होते. केवळ एक महिलाच बाळाचा सांभाळ करु शकते अशी आपल्याकडे मान्यता असतांना आपल्या 'स्पेशल' मुलाचा आदित्याने, एका सिंगल पॅरेंटने काळजी घेतली आणि म्हणूनच आदित्य तिवारींच्या या कर्तुत्वाची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या बेंगळुरु येथील वेमपावर या 'जागतिक महिला दिना'च्या समारोहात "जगातील सर्वश्रेष्ठ आई " या खिताबानं एका पुरुषाला गौरविले.

✒ नरेंद्र गायकवाड.

Monday, February 1, 2021

स्वामी विवेकानंद जयंती

जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही

स्वामी विवेकानंद जयंती (१२ जानेवारी) निमित्त अभ्यास करता-करता एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे समर्थ रामदास स्वामी व स्वामी विवेकानंद ह्या दोन व्यक्तिमत्त्वांमधील समानता.   कागदावर उतरविल्याशिवाय राहवत नाही इतकं साम्य अभ्यास करताना  दिसू लागलं  म्हणून हा लेखनप्रपंच.
समर्थांना लहानपणीच मारुतीरायाच्या भक्तीचे वेड लागले.  एकदा आठ-नऊ वर्षांचा ‘नारायण’ (समर्थांचे मूळ नाव) काही केल्या कुठे सापडेना.  सर्वत्र शोधाशोध झाली; पण नारायण काही मिळेना.  थोड्या वेळाने नारायण फडताळातून बाहेर आला आणि आईचा जीव भांड्यात पडला.  “कुठे होतास इतका वेळ?” ह्या प्रश्नाचे उत्तर देताना नारायण म्हणाला, “चिंता करितो विश्वाची.” लहान नरेंद्रनाथाचे वेडही काहीसे असेच होते.  माडीवर ध्यानस्थ बसण्याचे प्रयोग, त्याने अगदी लहान वयात सुरू केले.  एकदा नरेंद्राने रामायणाची कथा ऐकली व त्यातील हनुमानाच्या शक्तीचे वर्णन ऐकून तो भारावून गेला. कीर्तनकाराने उल्लेख केला की हनुमान वनात राहतो त्याला भेटण्याच्या उद्दीष्टाने छोटा नरेंद्र केळीच्या बनांत बराच काळ बसला; पण हनुमानाचे दर्शन झाले नाही म्हणून खटटू मनाने घरी आला. घडलेली कथा त्याने आईला सांगितली तेव्हा तिने त्याची समजूत घातली की हनुमान रामाचे काही काम करावयास गेला असेल म्हणून तुझी भेट झाली नाही.  हे स्पष्टीकरण छोट्या नरेंद्रला पटले.
ह्या दोन संन्याशांमध्ये ठाशीव साधर्म्य सापडते.  बालपणापासूनचे वैराग्य ही त्यातील सगळ्यात मोठी व पायाभूत समानता.  दोघांना घोड्यावर बसून रपेट करण्याची आवड होती.  समर्थ दासबोधात असे म्हणतात- ‘तुरंग (घोडा) शस्त्र दमून पाहिले’ म्हणजे घोडा घेण्यापूर्वी चालवून पहावा. छोट्या नरेंद्रचा किस्सा सांगतात, त्याला कुणीतरी विचारले, ” बाळ तू मोठेपणी काय करणार? ” त्यावर त्याचे उत्तर होते, ” मी घोडागाडी चालवणार.” हे उत्तर ऐकून सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाच्या तसबीरीसमोर वडिलांनी नरेंद्रला उभे केले आणि सांगितले, “काही हरकत नाही, पण श्रीकृष्णास मान घोडागाडी चालव.”  आणि काय कौतुक वर्णावे, ह्या मुलाने पुढे अनेकांसाठी अध्यात्माचा रथ हाकला, मार्गदर्शन केले.
खेळांची आवड, त्यातील प्राविण्य, सळसळता उत्साह याच्या मूर्ती म्हणजे समर्थ व विवेकानंद होत. विवेकानंदांना फुटबॉल, मुष्ठीयुद्ध अत्यंत प्रिय होते. काही प्रसंगी दुबळ्या शरीरयष्टीच्या मित्रांकडे पाहून किंवा नुसत्या पुस्तकी किडे बनणाऱ्यांकडे पाहून ते म्हणत, “ती पुस्तके फेकून द्या आणि मैदानात उतरा.  उत्तम व्यायाम करा, धडधडीत शरीरसंपदा कमवा.”  हे दोन्ही संन्यासी संगीतात उत्तम गती असणारे होते.  जाणकार होते.  विवेकानंद सतार, तबला, पखावज वाजवित असत.  त्यांनी गाण्याचे बा-कायदा शिक्षण ‘वेणीमाधव अधिकारी’ व ‘दुसरे उस्ताद अहमदखाँ’ ह्यांच्याकडे घेतले.  ‘संगीत कल्पतरु’ नावाचा ग्रंथ त्यांनी वयाच्या बावीस­तेवीसाव्या वर्षी लिहिला होता. पुढे तो १८७८ वर्षी ‘श्रीचंडीशरण बसाक’ यांनी आपल्या ‘आर्यपुस्तकालय’ या प्रकाशन संस्थेद्वारे प्रकाशित केला. समर्थ संगीत कुठे शिकले हे माहीत नाही; पण त्यांचे संगीत विषयावरील भाष्य थक्क करून सोडणारे आहे.  जसे –
१. अजि कोई ‘काफी’ (हा एक राग आहे) गाओ रेऽ
राग में राग तो सारा केदार, मोहन तान कल्याण चलावे
ऐसा हे सारंग भाई ऽ पाहा कैसा शंकराभरणऽ भरण नव्हें इतरा मरण
आसावरी रागऽ आसावरी रागऽ आसावरी रंग माजे
२. ताळ मृदंग, उपांग यंत्र वीणे
धिगीकट धीगीकट तान तानें मानें धींग होतो,
असे रागांवर, तालांवर भाष्य केले आहे.
आता आपण ह्या दोन संन्याशांच्या इतर काही पैलूंवर नजर टाकूया. समर्थांच्या काही ओव्या आणि त्या संदर्भात विवेकानंदांच्या आयुष्यातील प्रसंग अशा क्रमाने हे पाहूया.
दुसऱ्याच्या दु:खाबद्दलची संवेदनशीलता
समर्थ म्हणतात,
दुसऱ्याच्या दु:खे दु:खावेऽ दुसऱ्याच्या सुखे सुखावेऽऽ
आवघेचि सुखी असावेऽ ऐसी वासना ऽऽ (अशी इच्छा)
अकरा सप्टेंबर १८९३ साली शिकागोत भरलेल्या धर्मपरिषदेत विवेकानंदांनी जगद्विख्यात शब्द उच्चारले, “अमेरिकेतील माझ्या बंधू­भगिनींनो” त्यादिवशी त्यांचा उदोउदो झाला.  भाषणाला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या रात्री विवेकानंद घरी आले आणि बराच काळ त्यांना झोप येईना. झालेल्या कौतुकामुळे नव्हे, तर त्यांच्या मनातले विचार होते, ­’हे जगन्माते मला माझ्या देशबांधवांचे दु:ख दूर करण्याची शक्ती दे.  तसे काहीतरी कार्य माझे हातून घडू दे.  असे काही घडणार नसेल, तर असला मान­सन्मान, हार­तुरे, कौतुकसुमनें मला नकोत.’ ह्या विचारांची तीव्रता इतकी होती की डोळ्यातून घळघळा वाहणाऱ्या अश्रुंनी उशी भिजली.  यानंतर भारतात कार्य करीत असताना अनेकदा भारतीय जनतेचे दारिद्र्य, दु:ख पाहून त्यांचे अंत:करण पिळवटून निघे.  एका प्रसंगी त्यांनी असे उद्गार काढले आहेत की समाजसुधारणेसाठी, पीडितांची पीडा दूर करण्यासाठी हृदयातील रक्त शिंपडण्याइतकी तयारी हवी, त्यागवृत्ती हवी.
उपासना आणि संघटना बांधणी
उपासनेबाबत समर्थ अतिशय प्रभावी भाष्य करतात, दासबोधात म्हणतात,
अखंड कामाची लगबग उपासनेस लावावे जग
लोक, समजोन मग आज्ञा इच्छिती
तसेच,
काही गल्बला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ
जेणेकरिता विश्रांती वेळ आपणांसी फावे
विवेकानंदांनी अनेकदा सखोल ध्यानमग्न स्थितीचा अनुभव घेतला. परदेशात वास्तव्य करीत असतां ‘थाऊजण्ड पार्क’ इथल्या वास्तव्यात त्यांनी खूप ध्यानधारणा केली. कन्याकुमारीच्या खडकावर तीन दिवस ध्यान व चिंतनात घालविले.  ‘कॅल्व्हे’ नावाच्या स्त्रीला मानसिक अस्थैर्याने ग्रासले होते. विवेकानंदांकडे ती आली तेव्हा त्यांनी स्वत:च्या बाजूला ध्यानास बसावयास सांगितले. त्यातून तिला अपूर्व शांतता लाभली. इतकी की नंतरचे कित्येक दिवस तो अनुभव ती इतरांना सांगत होती. कार्यव्याप सांभाळताना त्यांनी वैयक्तिक साधनेकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही.
समर्थांच्या भाषेत मांडावयाचे झाले तर
जितुके होईल तितुके करावे
भगवत्कीर्तीने भरावे भूमंडळ
संघटना बांधणीचे अपूर्व कसब ह्या दोघांनी समाजाला स्वत:च्या कार्यातून दाखविले
समर्थ म्हणतात,
सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे
समर्थांनी भारतभर हजारहून अधिक (जवळजवळ अठराशे) मठ उभे केले. महाराष्ट्रात त्यांनी स्थापलेले ११ मारुती अर्थात् मारुतीमंदिरे आजही त्यांच्या कार्याची साक्ष देत उभी आहेत. असंख्य रामदासी, संन्यासी निर्माण केले.  रामदासी संप्रदायाची ही परंपरा आजही टिकून आहे. इतर अनेक देवालयांची पुनर्बांधणी, नवनिर्माण त्यांनी केले.  समर्थांच्या मठाबद्दल परकीय प्रवासी ‘कॉस्मा दी ग्वार्द’ म्हणतो, “रामदासी संप्रदायाचे मठ स्वयंपूर्ण, स्वावलंबी व संपन्न होते.”
ख्रिस्ती मिशनरी चळवळ पाहूनच विवेकानंदांनी ‘रामकृष्ण मिशन’ ह्या नावाने चळवळ उभी केली. संन्याशांची संघटना बांधली. रामकृष्णांनी विवेकानंदांवर जबाबदारी दिली होती, ह्या तरुण संन्याशांपैकी एकही पुन्हा घराकडे, संसारी इच्छांकडे वळता कामा नये. विवेकानंदांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. अमेरिकेत त्यांनी वेदांताचे वर्ग चालविले. अनेकांना ध्यान-धारणा शिकविली. पत्रं लिहून प्रेरणा दिली, मार्गदर्शन. रामकृष्ण मिशनच्या बोधचिन्हामागे विवेकानंदांची आध्यात्मिक संकल्पना अशी होती – ‘पाण्याच्या लाटा म्हणजे कर्म, उमललेले कमलपुष्प म्हणजे भक्ती, हंस म्हणजे परमेश्वर, उगवता सूर्य म्हणजे ज्ञान. ह्या सर्वांना वेटोळे घालणारा नाग म्हणजे कुंडलीनी योग.’ विवेकानंदांच्या पश्चात अनेकांनी पुस्तके लिहिली. त्यातून विवेकानंदांचे संघटना बांधणीचे कौशल्य उमजून येते.
संन्याशाची निर्भीडता व अनेकांचा आधारस्तंभ
पवित्रतेच्या धारणेतून निर्भीडतेचा जन्म होतो.  भयाची भावना जवळपास फिरकतही नाही.
समर्थांचा एक शिष्य उद्धव गोसावी हा एका मठाचा मठाधिपती होता.  तेथील मुसलमान सुभेदार गोसावीबाबांना फार त्रास देऊ लागला.  समर्थांना हे कळल्यावर ते त्वरेने तेथे गेले व त्या सुभेदारास वेताच्या छडीने फोडून काढले.  ह्याबाबतचे समर्थांचे भाष्य मोठे मनोरंजक आहे.
म्हणोनि येके करा रे पाजी ताडिता उभ्याने मुततो काजी
तोबा तोबा हम नहीं जानो जी या अल्ला या खुदा म्हणतसेऽ
असाच तडफदार स्वभाव विवेकानंदांचा होता. कॉलेजात शिकत असताना, परीक्षेची फी भरण्याचीही आर्थिक स्थिती ‘हरिदास’ नावाच्या मित्राची नव्हती. राजकुमार नावाच्या कॉलेजच्या ज्येष्ठ लेखनिकाने त्यांची विनवणी धुडकावून लावली. ह्या राजकुमारला विवेकानंदांनी अफूच्या अड्डयावर धरले व सांगितले की ‘मी ह्याचा बोभाटा करेन.’ तेव्हा तो राजी झाला व हरिदासाचा मार्ग सुकर झाला. वराहनगरच्या मठात विवेकानंदांबरोबर काही संन्यासी राहत होते. एका सरकारी अधिकाऱ्याला हे संन्यासी इंग्रजविरोधी कारवाया करताहेत असा समज (गैरसमज) झाला. तो चौकशीसाठी मठात आला. विवेकानंदांनी आपल्या कार्याची ग्वाही देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला; पण अधिकारी काही बधेना. शेवटी विवेकानंदांनी खोलीचे दार लावून घेतले आणि अशा काही आवाजात सज्जड दम दिला की तो काय समजायचे ते समजून गेला.
अशाच एका प्रसंगात विवेकानंदांचे गुणविशेष प्रकर्षाने उल्लेखावेसे वाटतात. बोटीने परदेशी जात असतां, एका माणसाबरोबर हिंदुत्वाबद्दल होणाऱ्या चर्चेचे वादात रूपांतर झाले. समोरचा माणूस भारतीय देवी – देवतांबद्दल अपशब्द बोलू लागला, हे पाहता विवेकानंदांनी त्याची कॉलर पकडली व म्हणाले, “भल्या माणसा तू आता गप्प बसावंस ह्यातच तुझी भलाई आहे. अन्यथा तुला खाली पाण्यात फेकून देईन,” हे ऐकल्यावर तो गप्प झाला हे सांगणे न लागे.
समर्थांच्या भाषेत विवेकानंदांची कृती वर्णन करावयाची झाली तर ­
आधी गाजवावे तडाखे तरीच भूमंडळ धाके
किंवा
नीतीन्याये वाट रोधावी पाषांडांची
क्रांतिकारी संन्यस्त जीवन
दोघे क्रांतिकारी होते.  वेणाबार्इ नावाच्या तरुण स्त्रीच्या नशीबी विधवेचे जिणे आले. ती समर्थांची शिष्या बनली.  समर्थांनी तिचे नामकरण ‘वेणास्वामी’ केले आणि एका मठाची अधिकारी बनविले. इतकेच नव्हे तर तिला कीर्तन करावयास शिकविले. त्याकाळी कुठल्याही स्त्रीला संन्यास घेणे, मठाधिपती बनणे किंवा समाजप्रबोधन करणे असले अधिकार नव्हते. समर्थांनी स्वत:च्या अधिकारात हे सर्व जाणीवपूर्वक घडवून आणले.  विवेकानंदांनी ‘सिस्टर निवेदिता’सारख्या परदेशी स्त्रीला भारतीय पद्धतीने संन्यास देऊ केला. तिने भारतात शाळा उघडल्या, समाजसेवा केली.
समर्थांचा दासबोध वाचताना जाणवते की त्यांचे भाष्य नाही असा जगातला एकही विषय नाही – राजकारण, महंतलक्षण, मूर्खाची लक्षणे, शहाण्याची लक्षणे, भक्तीचे प्रकार, अद्वैतवाद असे असंख्य विषय दासबोधात विस्तॄतरुपाने मांडले आहेत.
१९ डिसेंबर १९१५साली तुरीयानंदांनी लिहिलेले एक पत्र उपलब्ध झाले आहे.  त्यात ते उल्लेख करतात, विवेकानंदांनी चप्पल शिवण्यापासून ते चण्डीपाठ कसा करावा अशा अनेक विषयांवर अनेकांना मार्गदर्शन केले. ह्या दोन महान व्यक्तींना कुठल्याही विषयाचा आवाका घेणे सहज जमत असे, मग ते विटा भाजण्याचे तंत्र असो, कागद बनविणे असो किंवा अजून काही इंग्लंडमधे फिरत असताना विवेकानंदांनी एका औद्योगिक प्रदर्शनाला देखील भेट दिली. ‘मी संन्यासी आहे, मला काय त्याचे’ अशी विचारधारा बिलकुल नव्हती. थोड्याशा अनवट वाटेने जाणारे हे महंत होते. समर्थ विडा खात असत तर विवेकानंदांनी काही काळ हुक्का किंवा पाईपचा आस्वादही घेतला.

विरक्तांचे परिव्राजक व्रत
संन्यासी हा प्रवासी असावा-‘नदी बहती भली, साधु चलता भला’ ह्या उक्तीप्रमाणे समर्थांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले. विवेकानंदांनी तर देश आणि विदेश दोन्ही पालथे घातले.
समर्थ म्हणतात,
विरक्ते येकदेसी नसावे विरक्ते सर्व अभ्यासावे
विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्या परी
तसेच,
वैराग्याची बहु आवडी उदास वृत्तीची गोडी
विवेकानंदांनी दक्षिणेपासून उत्तरेकडे, पूर्वेपासून पश्चिमेकडे संपूर्ण भारतभर भ्रमण केले. अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांत भ्रमण केले. व्याख्याने दिली’श्रीयुत गुडविन’सारखा शिष्य त्यांना या दरम्यान लाभला. पुढे तो त्यांचा लेखनिक बनला म्हणून विवेकानंद लिहू शकले. वेदांतावर ‘टीका’ करू शकले.
विवेकानंद परदेशी असताना भारतातील काही द्वेष्ट्यांनी त्यांच्याविषयी अपप्रचार केला.  इतकेच नव्हे तर त्यांच्याबद्दल खोटे­नाटे लिहून वर्तमानपत्रात छापून आणले. इतके करूनही समाधान झाले नाही म्हणून ते विदेशापर्यंत पोहोचविले. चारित्र्यावर शिंतोडे उडविले. ह्यामागील मुख्य व्यक्ती त्यांच्या वंग प्रांतातीलच ‘मुजुमदार’ नावाची होती. विवेकानंदांनी हे टीकेचे आसूड हृदयावर दगड ठेवून झेलले. ‘नीळकंठ’ बनून ते कडू विष प्राशन केले.  समर्थांच्या भाषेत व्यक्त करावयाचे तर,
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावें
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसि रे नीववावें
परिव्राजक व्रत घेतलेल्या विवेकानंदांनी आपल्या भ्रमणकाळात एक कठोर व्रत घेऊन स्वत:ची परीक्षा घेतली होती.  व्रत असे होते – स्वत:हून कुणालाही अन्न मागावयाचे नाही. अगदीच आग्रह केला तर थोडेसे अन्न घ्यावयाचे; पण भुकेविषयी उल्लेखही करावयाचा नाही.
समर्थांनी पाण्यात उभे राहून साधना केली तेव्हा, मिळालेली भिक्षा पाण्यातून काढावी म्हणजे त्यातील रस, गंध, चव सगळे नष्ट होते, मग त्यातील एक भाग गायीला, एक भाग पाण्यातील जीवांना द्यावा व एक भाग (मुष्ठीभर) आपण घ्यावा. अशी बारा वर्षे साधना केली.  धन्य ते विरक्त लोक आणि धन्य ती तपश्चर्या!
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी
समर्थांनी मृत्युचे भय घालविण्यासाठी एक स्वतंत्र प्रकरणच दासबोधात लिहिले आहे.  मृत्युच्या पुढे कुणाचे काही चालत नाही.  मृत्यू न म्हणे हा राजा हा रंक, हा संन्यासी हा गृहस्थी असे विस्तॄत प्रबोधन केले आहे. जीवनातले शाश्वत तत्त्व अथवा सत्य म्हणजे मृत्यू हे समजवताना ते म्हणतात,
मरे येक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात राहे
तसेच,
मना सांग पा रावणां काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वें बुडाले
मृत्युसंबंधी विवेकानंदांचे विचार आपल्याला अंतर्मुख करतात. एकदा जमलेल्या लोकांनी मृत्यु- बद्दलचा विषय छेडला तेव्हा विवेकानंद म्हणाले, “जेव्हा जेव्हा मृत्युचा विचार येतो तेव्हा माझ्या मनांतदुर्बलतेचा अंशही उरत नाही.” असे म्हणून विवेकानंदांनी दोन दगड उचलले व एकमेकांवर जोरात आपटले. पुढे ते म्हणाले,”माझं मन असं टणक होऊन जातं, जेव्हा मी मृत्यूबद्दल विचार करतो, याचं कारण मी परमेश्वराचं दर्शन घेतलं आहे.”
किती घनगंभीर विचार आहेत नाही!
अशा या दोन प्रकाशताऱ्यांच्या शिष्यांना आपल्या गुरुबद्दल जे काही वाटलं ते त्यांनी शब्दबद्ध केलं. त्याचा अल्पसा उल्लेख करून हा प्रपंच इथेच थांबवितो.
रामदासांचा शिष्य उद्धव गोसावी ह्याने एका ओवीबद्ध काव्याची रचना केली. त्यात तो म्हणतो की बरें झाले मी लग्न नाही केले, ह्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली संन्यासी झालो आणि अनेक व्यापांतून मुक्त झालो. त्यातल्या शेवटच्या ओळीच फक्त इथे देतो,
धन्य धन्य महापुरुष तेचि ईश्वराचे अंश
शुकासारिखे उदास म्हणती त्यांसी
शिवरामाला तारिले ( उद्धवालाच शिवरामही म्हणत ) जन्मापासूनि मुक्त केले
भक्त लोक मुक्त झाले रामराजें
भगिनी निवेदिताने ‘दी मास्टर अ‍ॅज आय सॉ हिम्’ ह्या पुस्तकांत विवेकानंदांविषयी लिहून ठेवलंय, त्यांच्याकडून काय काय घेतलं, काय अनुभवलं, किती काय शिकली हे वाचनीय आहे.  शिष्याच्या दृष्टीतून दिसणारा गुरु बराच वेगळा जाणवतो.
अशा लोकांचे अनुभव, त्यांचे जीवन म्हणजे हीरे, माणिक, मोती आहेत. आपण त्यातले किती वेचावे, धारण करावे तेवढे थोडे आहे.
आयुष्य हेचि रत्नपेटी माझी भजनरत्ने गोमटीं
ईश्वरी अर्पूनिया लुटी आनंदाची करावीं
इतकेच काय ते म्हणू शकतो

– ©️ सचिन वि. उपाध्ये 



blog

sachinupadhye26@gmail.com

राऊळ महाराज

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
II श्री परमपूज्य सद्‌गुरू समर्थ राऊळमहाराज II
कोकण ही संतरत्नांची खाण म्हटले जाते.वैविध्यपुर्ण सौंदर्य संपन्न कोकणात बरेच संतमहात्मे होऊन गेले. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गाव तसे कळसुत्री बाहुल्या, आणि ठाकर समाजाने जतन केलेल्या बर्याच लोककला मुळे प्रसिद्ध आहे.हेच गाव पिंगुळीतील थोर अवलिया संत राऊळ महाराजांमुळे प्रकाशझोतात आले.

सिंधुदूर्ग जिल्हातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या लहानशा खेडेगावात जन्माला आलेले हे पिंगुळीचे ब्रम्हयोगी असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज्य श्रीसमर्थ राऊळमहाराज. लहानपणापासून परमार्थाकडे ओढा असलेले हे सद्‌गुरू नामस्मरणात रंगून जात. ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्‌गत होती. ते १९४५ ते १९७२ अशी २७ वर्ष कठोर ध्यानसाधना एका छोट्‌याशा खोलीत, एकावेळी २ ते ३ महिने काहीही प्राशन न करता करत असत. त्या काळात जगात ‘आई श्रेष्ठ’ याचेच प्रबोधन ते जास्त करत आणि तीच शिकवण परमपूज्य श्रीसमर्थ अण्णामहाराज आज भक्तजनांना देतात.

पिंगुळी क्षेत्री परमपूज्य श्री समर्थ महाराजांनी जांनी ज्या छोटया खोलीत ध्यानधारणा केली, तेथेच परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराज समाधिस्त झाले आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांनी राऊळबाबांचे समाधीमंदिर तेथेच उभारले आहे. या समाधीमंदिर व श्रीदेवी माउली मंदिर या दोघांच्या मध्ये उभा असलेला औदुंबर वॄक्ष परमपूज्य श्री समर्थ राऊळमहाराजांच्या ध्यानसाधनेचा आणि परमपूज्य श्री समर्थ अण्णामहाराजांच्या आजपपर्यंतच्या ५८ वर्षांचा आध्यात्मिक प्रवासाचा साक्षी आहे.

सर्वसामान्य माणसासारखे एका गरिब शेतकरी कुटुंबात जन्म झालेले कृष्णा उर्फ आबा राऊळ पिंगुळी ग्रामदेवता रवळनाथ देवस्थानचे मानकरी होते.घरच्या गरबीमुळे ते नोकरीसाठी मुंबईला आले.त्याना भजन गाण्याचा छंद होता.ज्ञानेश्वर तुकारामादी संताचे अभंग मुखोद्गत होते.काम करताना आपल्या पहाडी आवाजात सतत मुखांने  अभंग गात असत.संसारात विरक्ती आली आणि ते विश्वात्मक वृत्तीतुन संसारी लोकांना भक्तीमार्गाकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करु लागले. शिक्षण कमी असले तरी त्यांचे पाठांतर चांगले असे.त्यानां ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती.त्यांनी भक्तांसाठी बरेच चमत्कार केले.भक्तांची संकटे दुर केली.

भक्तासाठी पंढरीच्या विठ्ठलाचे आपल्यात दर्शन घडवले.कित्येक भक्तांना ज्ञानेश्वरी ग्रंथ देऊन त्यांचे करवी पारायणे करवुन घेतली.त्या़नी लावलेले औंदुबर वृक्षाचे रोप आज मोठ्या वृक्षात रुपांतरीत झाले.त्यांचा भक्त संप्रदाय खुप मोठा आहे.मुंबई महाराष्ट्र,गोवा कर्नाटक या राज्यातुन आजही पिंगुळी गावी समाधी स्थानी भक्त मंडळी येतात.समाधीस्थानी नतमस्तक होतात.अशा या सद्गुरू राऊळ महाराजांनी इंचगिरीच्या गिरीमल्लेश्वर संप्रदायाच्या बाळकृष्ण महाराजांकडून शिष्यत्व पत्करले होते.

भजन त्यांच्या आवडीचे असल्याने ते स्वत:भजन गात आणि इतरांकडुनही भजन करवुन घेत.ते तपसाधनेसाठी कुठेही गेले नाही घरातच तासन् तास ध्यानाला बसत.असे हे सिद्ध अवलिया जरी आज आपल्यात नसले तरी पिंगुळी गावी समाधी स्थानी नतमस्तक झाल्यावर त्यांचे चिरंतन अस्तित्व जाणवते.त्यांच्या पश्र्चात त्यांचे पुतणे अण्णा महाराज त्यांचे कार्य सांभाळतात.

॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
@गणेश उर्फ ​​अभिजित कदम

Friday, January 29, 2021

विश्व मराठी संमेलन

विश्व मराठी संमेलन
(ऑनलाईन)
२८ ते ३१ जानेवारी, २०२१
"आत्मीय निमंत्रण"
जगभरातील मराठी भाषिक बंधू भगिनींना जोडणाऱ्या चार दिवसीय सोहळा ऑनलाईन पाहण्याचे आत्मीय निमंत्रण...

संमेलनातील चारही दिवसांच्या स्वतंत्र लिंक्स पुढीलप्रमाणे:

विश्व मराठी साहित्य संमेलन - २८ जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdixFuykDlwnWIZqLbE8VGOUc

विश्व मराठी संस्कृती संमेलन - २९ जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdiyRwSm4Wr17zaGH4LtMQZdY

विश्व मराठी उद्योजकता संमेलन - ३० जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdiymGnzu37SQ_HODbpvz4yNF

विश्व मराठी युवा संमेलन - ३१ जानेवारी २०२१
👉 https://youtube.com/playlist?list=PLtJUkj_uBdizjW2HiENIddtgYVvNxxhvA

जगभरात कुठेही असा, विश्व मराठी वाणी या यूट्यूब चॅनल वर विश्व मराठी संमेलनाचे साक्षीदार व्हा! 
स्वप्न विश्व मराठी परिषदेचे, सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी भाषिक ब्रँड च्या निर्मितीचे!

👉सर्व कार्यक्रमांचे प्रक्षेपण :
https://www.youtube.com/c/VishwaMarathiVani

विश्व मराठी वाणी या युट्यूब चॅनेलद्वारे..
👉 सर्व कार्यक्रमांच्या प्रक्षेपणाचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी विश्व मराठी वाणी या युट्यूब चॅनेलला Subscribe करा व त्यासमोरील 🔔 दाबायला विसरू नका...
▪️कार्यक्रम पत्रिका सोबत जोडण्यात आलेली आहे